काल होती शांतता निश्चल इथे!(तरही गझल)

Submitted by कर्दनकाळ on 14 April, 2013 - 16:01

तरही गझल
काल होती शांतता निश्चल इथे!
चालला आहे कशाचा खल इथे?

कोकिळेची कूजने विरली पहा....
कावळ्यांचा काय कोलाहल इथे!

तू न डोकेफोड केलेली बरी!
मूढतेचा केवढा अंमल इथे!!

रोज होते वाढ थोडी झीजही;
मी हिमालय! मीच विंध्याचल इथे!

गझलहौशी कैक, शिकणारे किती?
फार थोड्यांचाच आहे कल इथे!

कायदे अन् कागदी आरक्षणे......
आजही दलितांत आहे सल इथे!

दे मला तुझिया स्मृतींची शाल तू.....
विरहवारा केवढा शीतल इथे!

याच वळणावर सुटावे व्यसन हे......
पाहिजे थोडेच इच्छाबल इथे!

माउलींच्या पालखीसाठी, चला......
काळजाची अंथरू मखमल इथे!

**************कर्दनकाळ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इच्छाब >>>>>> इतर काफियांमध्ये असा चालतो का की इच्छाबअसे केले पाहिजे ????

दे मला तुझिया स्मृतींची शाल तू.....
विरहवारा केवढा शीतल इथे!>>>>> हा जास्त आवडला (शाल =ऊब ..मी असा भावार्थ काढला बरोबर आहे ना सर?)

वैवकु,
टायपिंगमिस्टेक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद! 'ळ'चा 'ल' केला आहे!
शाल म्हणजे ऊब अर्थ बरोबर लावला आहेस!

आमचाच एक खूप जुना शेर आठवला.........पण अर्थ वेगळा आहे, संदर्भ वेगळा होता म्हणून! शेर असा आहे.......

इतकी नको स्मृतींची देऊस ऊब मजला.....
ही काच काळजाची तडकेल एकदिवशी!

याच वळणावर सुटावे व्यसन हे......
पाहिजे थोडेच इच्छाबल इथे!<<< सुंदर शेर

काल होती शांतता निश्चल इथे!
चालला आहे कशाचा खल इथे?<<< मतला स्वच्छ आणि मस्त वाटला.

काही शेर थोडे सपक किंवा अनावश्यक वगैरे वाटले हे परखड पण प्रामाणिक मत!

बाकी कर्दनकाळजी, 'इथे' ही रदीफ घेऊन हे काफिये हाताळणे मला तरी विशेष मर्यादा आणणारे वाटले नाही. (म्हणजे ही गझल आणि वैवकुंची गझल वाचल्यावर असे वाटत आहे).

धन्यवाद!

भूषणराव,
एक प्रश्न तुम्हास मुद्दाम या धाग्यावर विचारत आहे, कारण त्याधाग्यावर आम्ही लिहिलेला प्रतिसाद गायब होत आहे!

या शेरावर काही वदाल काय? काही शंका आहेत मनात म्हणून विचारत आहे(खल म्हणून नव्हे!)

आनंद धावतो का इच्छेपुढे कुणाच्या
पानास जीवनाच्या थोडा समास राहो

जमल्यास आपणास बोध झालेला अर्थ गद्यात कळवाल का?

माउलींच्या पालखीसाठी चला......
काळजाची अंथरू मखमल इथे!<<<

१. शेरातील शब्द लोभस आहेत.

२. शेर भक्तीभावाकडे छान कललेला आहे.

३. शेर एका सलग वाक्याप्रमाणे मात्र झालेला आहे. म्हणजे पहिली ओळ वाचल्यावर निर्माण होऊ शकणार्‍या अपेक्षा दुसर्‍या ओळीत काही विशेषत्वाने पूर्ण होत नाहीत.

४. याचा अर्थ हा शेर वेगळ्या प्रकारे लिहिल्यास अधिक गहिरा होईल असा नाही. याचे कारण या शेरातील मूळ खयालच 'दोन स्वतंत्र ओळीत' 'गझलेच्या शेराच्या प्रवृत्तीनुसार' विभागला जाण्यास फारसा पात्र नाही.

धन्यवाद! कृ गै न! Happy

मखमल हा काफिया सुंदर आहे.

भूषणराव, धन्यवाद आपल्या प्रांजळ व परखड प्रतिसादाबद्दल!

'इथे' या रदीफामुळे या शेरात आम्ही जेवढे खुलायला हवे होतो तितके खुललो नाही!

कारण आम्हाला आलेला मूळ काव्यात्मक प्रत्यय असा होता.......

या वाटेवरून माउलींची पालखी जाणार आहे तर चला तिथे (त्या वाटेवर) आधीच जाऊन आपल्या काळजाच्या पायघड्या / काळजाची मखमल अंथरून ठेऊ या!

अवांतर: भूषणराव आम्ही विश्रांतवाडी चौकाच्या जवळच खुद्द राहतो! आमच्या घराच्या खिडकीतून जाणारी पालखी दिसते! दरवर्षी ही पालखी पाहतो तेव्हा वाटते जर आपण निवृत्त असतो तर आपणही या पालखीच्या दिंडीत चालत जाऊ शकलो असतो. मग मनात विचार येतो, चला त्या वाटेवर जाऊन जवळून दर्शन तरी घेऊ या.
दिंडीतील भाविकांना लोक काही ना काही तरी वाटत असतात! म्हणून आमच्या मनात आले की, चला आपण त्या वाटेवर जाऊन आपल्या काळजाची मखमलच अंथरू या!
म्हणून आम्ही हा शेर वरीलप्रमाणे लिहिला.

टीप: माउलींच्या पालखीसाठी....नंतर स्वल्पविराम हवा आहे बहुतेक, कारण चला आपण (त्या वाटेवर) जाऊन काळजाची मखमल अंथरू या असा भावर्थ पूर्ण होतो शेराचा! शेराच्या दोन ओळी समग्र लक्षात घेऊन भावार्थ पोचला म्हणजे झाले असे वाटते.शेराच्या किती भागात किती अर्थ हे गौण व व्यक्तिसापेक्ष असावे.....वै.म.
थांबतो!
.

तिलकधारी आला आहे.

आनंद धावतो का इच्छेपुढे कुणाच्या
पानास जीवनाच्या थोडा समास राहो

जमल्यास आपणास बोध झालेला अर्थ गद्यात कळवाल का?

कर्दनकाळा, या प्रश्नाचे उत्तर तुला तिघेच देऊ शकतात. तिलकधारी, सानेकर आणि श्रीकृष्ण राऊत! सहा सात वर्षांपूर्वी दक्षिण महाराष्ट्र व गोवा या प्रदेशात मराठी गझलेत एक निराळीच लाट येऊन गेली. असे काही शेर करायचे की काय म्हणायचे आहे ते ऐकणार्‍याला समजले तर नाही पाहिजे, पण काहीतरी फारच भारी म्हणायचे आहे असे वाटले मात्र पाहिजे. हा त्या लाटेतील शेर दिसतो. हा शेर नंतर शायराला विचारला की शायर म्हणतो हा 'आपोआप असाच सुचला'. ' आपोआप असाच सुचला' म्हणजे काय विचारले की शायर म्हणतो वरतून आला, मागून आला वगैरे! पुढे शायर म्हणतो की एका विशिष्ट मनस्थितीत हा शेर माझ्याकडून होऊन गेला. असे म्हणून झाल्यानंतर शायर विचारी मुद्रा करून समोरच्याची कीव वाटत आहे असे भाव धारण करतो. येथे हतबल होऊन रसिक 'आपण जाणकार नाही आहोत' हे स्वतःच्या मनाशी कबूल करतो.

या शेरांना भरभरून दाद देणारे सहसा अतृप्त आत्मे असतात. ते जाणकार म्हणून लौकीक प्राप्त व्हावा यासाठी जमेल तेथे हेलपाटे, खेटे घालत असतात. पुढे कालांतराने 'ज्येष्ठ हेलपाटे घालणारे' या निव्वळ एकाच निकषावर ते जाणकार ठरून जातात. मग ते गालिब शब्दबंबाळ होता, फिराकला दर्द समजला नाही अशी विधाने दडपून करू लागतात. पुढे ते इतके जाणकार ठरतात की वरील प्रकारचे शेर करणारेही त्यांच्याच अभिप्रायाच्या प्रतीक्षेत रांगा लावतात.

तुला हे सगळे जमणार नाही, बराच लांबचा पल्ला आहे.

दलितांचा सल हा शेर आवडला.

तिलकधारी निघत आहे.

तिलकधारीजी, समाधान झाले! धन्यवाद!

घोटाळता न आले मज भोवती कुणाच्या....
माझ्याशिवाय बाकी सारे हुशार होते!
...............हा आमचा अनुभव!

वर ज्या शेरावर आम्ही प्रश्न करत होतो? त्यामगील आमचे मुक्त चिंतन जितक्यावेळा त्या धाग्यावर व विपुवर डकवले तितक्यावेळा ते तात्काळ उडवलेले दिसले, मग आम्ही नाद सोडला व समीरला मेल केले, पण अद्याप काही हालचाल नाही, कदाचित आमचे मुक्तचिंतन(वेळेची पदरमोड करून टंकलेले) अदखलपात्र वाटले असावे!