शापित स्वप्ने

Submitted by उद्दाम हसेन on 11 April, 2013 - 03:01

लग्न करून आलेल्या तिच्या स्वप्नाळू डोळ्यातली.....आता थिजून गेलेली स्वप्ने ! त्यातल्या काही स्वप्नांना किनारा मिळाला असेल, काहींना शब्द...पण अशी कित्येक स्वप्ने विरून गेली असतील ज्याचं अस्तित्व तेव्हाही जाणवलं नसेल आणि आताही. अशा काही स्वप्नांसाठी दोन शब्द ..एक प्रयत्न..!
------------------------------------------------------------------------------------------------------

स्वप्नांच्या तुटण्याचा
आवाज होत नाही
डोळ्यात आसवांचे
सुकले थवे हे काही

मेंदीच्या पावलांनो
उंब-यास त्या विचारा
सुटली तिथे जी स्वप्ने
सांभाळतो बिचारा

फाये क्षणाक्षणांचे
वा-यासवे उडाले
रित्याच गंधकोषी
सुगंध ना मिळाले

रडल्या कितीक रात्री
पा-याचे थेंब झाले
माझा सलाम घ्या त्या
थडग्यांचे देव झाले

- किरण
२१ जून २०१०

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारतीताईंच्या निळाई या कवितेमुळे माझी ही कविता आठवली. इथे देण्याचा मोह आवरता आला नाही.

"मेंदीच्या पावलांनो
उंब-यास त्या विचारा
सुटली तिथे जी स्वप्ने
सांभाळतो बिचारा" >>> हे सर्वात आवडलं.
-----------------------------------------------------------------

शापित हे योग्य असावे.

वा किरण
उत्तम

गझलियत कूट कूट के भरी है ।
( जरा वृत्त पाळले असतेत की झाले असते असे वै म..... असो)

फारच आवडलीत सगळ्ली कडवी (एक कडवे = एक शेर असे करून मी वाचले )

किरणशेठ... काय झाले???

कविता आशयसंपन्न आहे...पण तुझ्या प्रतिमांना काय झाले???

मराठीत स्वप्ने तुटत नाहीत.... विरतात....किंवा अपुरी राहतात. ''सपने टूट गये''च्या थाटात स्वप्ने तुटली हे योग्य वाटत नाही.

आणि डोळ्यात आसवे सुकली हे ठीक आहे... पण आसवांचे थवे कसे काय सुकले????

उरलेली तिन्ही कडवी ठीक-ठाक आहेत....

तुझ्याकडून जास्त अपेक्षा असल्याने कदाचित ह्या प्रतिमांचे चुकणे प्रकर्षाने जाणवले असावे.

कृगैन.

धन्यवाद डॉ कैलास. कदाचित स्वप्नं ही काचेसारखी वाटल्याने तसं लिहीलं गेलं असेल. काच तुटते आणि विखुरते. तसंच ही काचेची स्वप्नं. पडली आणि फुटली. त्यांचे तुकडे तुकडे विखुरले असं दृश्य डोळ्यांसमोर होतं ही कविता लिहीताना. कदाचित सपने टूट गये हे कुठंतरी मनात रुतलेलं वाक्यही आपलं काम करून गेलं असेल. काच जशी फुटताना आवाज करते तसंच स्वप्न पडून फुटताना तुटताना ते आवाज करत नाही हे सांगताना विरून जाणे हा शब्दप्रयोग अपेक्षित परिणाम साधूच शकत नाही. इथे स्वप्नं फुटणे किंवा तुटणे असा शब्दप्रयोग करण्याची मुभा घेतली आहे. जाणकारांनी मतप्रदर्शन करावं.

पक्षांचे थवे असतात तसेच आसवांचे थवे. असे थवेच्या थवे डोळ्यातच सुकले याचा अर्थ रडायचीही चोरी असलेलं आयुष्य वाट्याला आलं. भारतात स्त्रियांच्या बाबतीत हे अगदी कॉमन आहे. आजही आहे. मनाचा कोंडमारा आणि अंधारात ढाळलेले अश्रू यासाठी ही उपमा योजली. जर या प्रतिमा वाचकाच्या मनात अपेक्षित परिणाम साधत नसेल तर ती फसली असं मानलं जातं. ही अनुभूती घेतलेल्या मनातही जर त्या प्रतिमा योग्य तो परिणाम साधू शकल्या नाहीत तर ती कविता फसली असं नक्कीच म्हणता येईल.
डॉक धन्यवाद. या निमित्ताने मला खुलासा करण्याची संधी मिळाली.
( मी एक हौशी कवी असल्याने अपेक्षा वगैरे ठेवण्यात खरंच काही अर्थ नाही. खूप कमी वेळा गंभीर होऊन कविता लिहीत असल्याने अपेक्षाभंगच होण्याची शक्यता जास्त आहे. पण एका विशिष्ट गजल लिहीणा-याने कवितेबद्दल व्यक्त केलेली अतिएकांगी मतं वाचून कधी कधी बोटणी सरसावते आणि गझलेला वेदना देऊन जाते. त्याबद्दल आपल्यासारख्या आणि इतर प्रतिभावान आणि संयत गझलकारांनी क्षमा करावी).

वैवकु - धन्यवाद
यार गझल के अँगलसे कविता मत देखो. गझलियतच्या ऐवजी काव्य म्हणशील प्लीज Wink हलकेच घे रे.

पक्षांचे थवे असतात तसेच आसवांचे थवे. असे थवेच्या थवे डोळ्यातच सुकले याचा अर्थ रडायचीही चोरी असलेलं आयुष्य वाट्याला आलं

वेल, असा जर अर्थ घेतला तर समूह असलेली कोणतीही वस्तू वापरता येईल...

आसवांचे घड / घोस डोळ्यांतच सुकले..
आसवांचे गुच्छ डोळांतच सुकले

वरील उदाहरणांत गुच्छ्/घड्/घोस सुकतात तरी... पण थवे कसे सुकावे.?

असो... आपल्याला नाउमेद करण्याचा माझा हेतू नाही.लेट्स मुव्ह ऑन.

अवांतर : गझलकार कवी असतोच. Happy

आपल्याला नाउमेद करण्याचा माझा हेतू नाही. >> आपल्या बाबतीत असं कधीच वाटत नाही. वाटणार नाही. उलट तुम्ही दखल घेऊन चर्चा केली याचा अभिमान / आनंद आहे. तुमच्यासारख्या संयमित व्यक्तींबरोबर अशी चर्चा झडणं हे भाग्यच आहे.

आसवांचे घड / घोस डोळ्यांतच सुकले..
आसवांचे गुच्छ डोळांतच सुकले

वरील उदाहरणांत गुच्छ्/घड्/घोस सुकतात तरी... पण थवे कसे सुकावे.? >>>

अगदी बरोबर.
डोळ्यात आसवांचे सुकले गुच्छ काही. इथे तांत्रिकदृष्ट्या हे बरोबरच होईल. पण आसवं सुकतात म्हणून आसवांचे थवेही सुकतात ही कल्पना ! निरभ्र आकाशात ज्याप्रमाणे पक्षांचे थवे दाटी करतात तसेच डोळ्यातही आसवांचे थवेही दाटी करतात. चूक - बरोबर हे पुन्हा जाणकारांसाठी सोडून देतोय. भगवे आकाश, निळा प्रकाश, हिरवा पारवा कधीच नसतो. पण या कल्पना वापरल्या जातात. Happy

अवांतर : गुच्छ सुकत नाही. त्यातल्या सुकण्यासारख्या वस्तू सुकतात. घड केळीचा असल्याने सुकतो. निर्जीव वस्तूंसाठी हा शब्दप्रयोग केल्यास त्यातला अपेक्षित अर्थ नाहीसा होईल. आसवांचा गुच्छ असाही शब्दप्रयोग वापरात नाही, पण कवीने वापरायला हरकत नाही. आसवांचा घड हा देखील एक नवा शब्दप्रयोग होईल. अर्थातच घड, गुच्छ हे शब्द कविता ऐकताना कानाला खटकतात याबद्दल दुमत नसावे. शक्यतो असे शब्द टाळण्याकडे कल असतो.

स्वप्नांच्या तुटण्याचा
आवाज होत नाही

किरण,सुरुवात अप्रतिम,निळाईवरून ही कविता आठवणं समजू शकले..स्त्रीजीवनातल्या कोंडमार्‍याचा संदर्भ 'तरंगात काही उसासून गेल्या..' ला तुम्ही दिला होता. हा विषय खरंच खूप मोठा आहे अन त्यावर तुम्हाला लिहावंसं वाटलं हे विशेषच आहे.

डोळ्यात आसवांचे
सुकले तवंग काही ' म्हटले तर ? किंवा दुसरे काही ? 'थवे' खटकतंय हे तुम्हीही मानताच.बाकी कविता छानच. लिहित राहिलं की नितळाई वाढत जाते..ले.शु.

किरण, कविता फार आवडली. स्वप्नं तुटत नाहीत? हिंदित असा(च) शब्दप्रयोग असेलही.
हे स्वप्नं तुटणं... भंगणं, काच तडकण्यासारखं असच मला अगदी पहिल्या वाचनात वाटलं. पण पूर्णं कविता वाचल्यावर... एकसंध एखाद्या चित्रपटासारखं चाललेलं स्वप्नं... तट्कन तुटावं.... अचानक जागे होतो आपण... आसवांचं सुकलेलं थारोळं नजरेत घेऊन... अशा अर्थाचं वाटलं.
मलातरी हा शब्दप्रयोग अयोग्यं वाटत नाहीये. (सॉरी डॉक्टर)
पण "थवे" मात्रं खटकलं Happy

<<लिहित राहिलं की नितळाई वाढत जाते..>>... ही भारती म्हणजे ना... किती इतकुशा शब्दांत किती सहज किती खरं.

धन्यवाद सर्वांचे.
भारतीतै. तवंग या शब्दाने ना लय बदलते, ना आशय. चपखल शब्द आहे अगदी. मनापासून धन्यवाद या सुचवणीबद्दल. असाच्या असा हा शब्द घेऊन हे कडवे संपूर्ण होऊ शकते. पण माझ्यासारख्याला एकदा कविता स्फुरताना निरभ्र आकाशात पक्षांचे थवे यावेत तसेच सगळं सुरळीत चालू असताना डोळ्यात अचानक आसवांचे थवे येणारे क्षण (नेहमी) वाटेला आलेलं असं आयुष्य सुचल्यावर त्यातून बाहेर पडून नवं स्विकारायला वेळ लागतो. हट्टीपणाच हा. आणि कवी म्हणून आसवांचे थवे ही पोएटिक लिबर्टी खटकणारी म्ह्टलेलं नाही. प्रत्येकाचं मत मला शिरसावंद्य असेल. त्यांचा विचार नक्कीच करणार.

माफ करा ही कविता स्वतःच उलगडून सांगतोय. अशा वेळी वाचकाच्या प्रतिभेचा अवमान होतो असं म्हटलं जातं. इथे तो हेतू नाही हे समजून घेऊन क्षमा करण्यात यावी.

मेंदीच्या पावलांनो
उंब-यास त्या विचारा
सुटली तिथे जी स्वप्ने
सांभाळतो बिचारा

पहिल्या कडव्यात कुणाची स्वप्ने तुटली हे समजत नाही. मात्र या कडव्यात ते स्पष्ट होत असावं. मेंदी म्हटलं कि नववधू आणि तिचं उंबरा ओलांडणं हे डोळ्यासमोर येतं. ती येताना डोळ्यात स्वप्नं घेऊन येते. पण एकदा पाऊल घरात टाकलं कि ती सप्नं तिथेच थिजून जातात. तो उंबरा अशी स्वप्नं सांभाळत बसतो. कधीपर्यंत ?

फाये क्षणाक्षणांचे
वा-यासवे उडाले
रित्याच गंधकोषी
सुगंध ना मिळाले

अत्तराचे फाये. मनाला सुगंधित करणारी ही बाब आहे. असे क्षण संसारात आयुष्यात असावेत ही त्या अत्तराच्या फायांकडून असलेली अपेक्षा रित्या गंधकोषीमुळे पूर्ण झालेली नाही. आयुष्यात आनंद देणारे, सुगंधित क्षण जवळजवळ नाहीतच अशी आयुष्यं ती.

रडल्या कितीक रात्री
पा-याचे थेंब झाले
माझा सलाम घ्या त्या
थडग्यांचे देव झाले

पारा ही हातात न येणारी गोष्ट. अर्धद्रव असा हा पदार्थ. या स्त्रियांची स्वप्नंही अशीच शापित आहेत. कधीच कवेत न येणारी. पण त्या पा-याचेही आर्द्रतेने थेंब व्हावेत ( त्या स्वप्नांनाच दया यावी) इतक्या रात्री रडण्यात गेल्यात. आधीच म्हटल्याप्रमाणे त्या उंब-याने ही स्वप्ने कधीपर्यंत सांभाळलीत.. तर जेव्हां ही स्वप्नं पाहणाया आयुष्यांची थडगीउभारली गेलीत. त्याचबरोबर त्या स्वप्नांचीही थडगी उभी राहिलीत.

ही कविता माझी आजी गेली तेव्हां सुचली होती. आजी खूप जगली. ९० च्या पुढे. खूप देखणी होती ती. लहानपणी लग्न होऊन मोठ्या कुटुंबात आली. तेव्हांपासून कामाला जुंपली गेली. आजूबाजूच्या पंचक्रोशीसाठी ती माऊली होती. कधीही घरी जा वैनी हातावर भाकर तुकडा ठेवल्याखेरीज परत पाठवत नाही ही तिची ख्याती. कुणीही यावं आपल गा-हाणं सांगावं रडगाणं गावं आणि आजीनं धीर द्यावा, दोन शब्द धीराचे सांगावेत. अगदी छोटा दीर लहान मुलासारखा तिच्याकडे हट्ट करायचा. खेड्यात अशा स्त्री ला माऊली म्हटलं जातं. पण तिच्या मनाचा विचार केला जातो का ? आजोबा लवकर गेले. पाठोपाठ दोन नंबरचा कर्तबगार मुलगा गेला आणि वर्षभरात तरूण नातू. आई वडील नव्हतेच. एकच भाऊ. सर्वात मोठा मुलगा कानाने अधू. त्याला समजही कमी. आजीने कुणाचं केलं नाही असं नाही. नातवंडांचंही खूप केलं. शेवटपर्यंत तिच्या वाट्याला मात्र दु:खच आलं. पण तिच्या चेह-यावरचं हसू कधीही मावळल नाही. मोठ्या मुलासाठी आणि त्याच्या मुलांच्यात जीव अडकलेला असल्याने शेवटपर्यंत ती काम करत राहिली. मुलींनी विश्रांती घ्यायला सांगितलं. पण तिने फक्त हसून घालवलं.

ती जेव्हां गेली तेव्हां मनात हेच विचार होते. कुठून आली असेल माझी आजी. या क्षणानंतर तिचा मागमूसही राहणार नाहीये. कसलाच पुरावा राहणार नाहीये, त्याचबरोबर तिच्या दबलेल्या इच्छा, आकांक्षा यांचंही थडगं बनणार आहे. त्या क्षणी जाणवलं कि हे तर भारतातल्या अनेक स्त्रियांचं जिणं आहे, म्हणून ही कविता फक्त माझ्या आजीच्जी नसून अशा सर्वच स्त्रियांना अर्पण केली होती.

डॉक
कवीच्या मनोगतानंतर या प्रतिमा कशा वाटल्या ? एक कवी म्हणून माझं म्हणणं असेल कि तांत्रिकतेचा ध्यास इतकाही नको कि तरलता, काव्य याकडे दुर्लक्ष व्हावं. गैस नसावा. अधिक उणे झाले असल्यास क्षमा असावी ही नम्र विनंती

किरण मित्रा,
मी तांत्रिकतेबद्दल काहीच भाष्य केलं नाही..... मी प्रतिमा/उपमा यांच्या अयोग्य वापरा बद्दल म्हणालो. एक सलग स्वप्नं मधेच तुटलं या अर्थी तुटणं पटेल पण स्वप्न भंग होणं या करिता तुटलं हे पचनी पडत नाही. थवे बद्दल मी बोललोच आहे.

मी एका प्रथितयश कवीला कवीसंमेलनात त्याच्या कवितेनंतर झालेल्या खुल्या चर्चेत विचारलं होतं ....ज्यावर त्याने'' सोडा हो... बाल की खाल काय काढता '' असं म्हटलं होतं ते आठवलं..

त्याच्या कवितेतील ओळ होती..

''तुझी काव्यफुले ऐकताना''............ आणि मी विचारलं

काव्य ऐकताना ठीक आहे.... काव्यफुले ऐकताना म्हणजे काय???? काव्यफुले न्याहाळताना, काव्यफुले हुंगताना वगैरे जमेल...पण काव्यफुले ऐकताना असंच जर म्हणायचं असेल तर ''फुले'' या शब्दप्रयोगाचं प्रयोजन काय????

वरील चर्चेत मी खरंच बाल की खाल काढू लागलो की काय असं वाटू लागलं आहे.

डॉक
बाल कि खाल काढणे असा अर्थ ध्वनित होतोय का माझ्या कुठल्या प्रतिसादातून ? मी आपल्या प्रतिसादावर माझे म्हणणे मांडण्याचा यथाशक्ति प्रयत्न केला आहे फक्त. स्वप्न विरणे असाच शब्दप्रयोग मराठीत केला पाहीजे असं आहे का ? जर स्वप्नाला वस्त्राची उमपा दिली तर ते योग्य. स्वप्नं तुटू शकतं हे देखील योग्यच आहे. मी याला तांत्रिक बाब म्हटलं होतं. असो. हे माझं मत आहे अर्थात. त्या प्रतिमांचं माझ्या परीने स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. तसंच दाद, भारतीजी या जाणकारांनी त्यांचं मत दिलंय. थवे हे अनेकांना खटकलंय. या संपूर्ण कवितेत अनेक प्रतिमा असल्याने कविता उलगडून दाखवली आहे.

माझं मत मांडायची संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार. गैस नसावा ही विनंती.

बाल कि खाल काढणे असा अर्थ ध्वनित होतोय का माझ्या कुठल्या प्रतिसादातून ?

मुळीच नाही.

धन्यावाद. Happy

किरण, स्वतःला सुचलेल्या मूळ शब्दाचा आग्रह धरणं कवीचा मूलभूत हक्क आहे कारण कविता मला एक जैविक संपूर्णता वाटते तिच्या त्रुटींसह. आपण कसे जन्माला येतो काही जन्मदोष घेऊन, तशी ती येते. काही जन्मदोष संस्करणाच्या पलिकडचे असतात म्हणून आमच्या आक्षेपांचा तुम्ही सादर निरादर करावा.
एरवी तुमच्या या कवितेत दुर्बोध काही नव्हतेच.
तुमच्या आजींसारखं सामान्यातलं असामान्यत्व आपल्याला भेटत रहातं म्हणून तर जगण्याची,कलानिर्मितीची प्रेरणा मिळते.

दाद, Happy

सादर निरादर :अओ:)
बापरे ! Proud आवडेश.

आज ख-या अर्थाने आभार मानताना मनापासून आनंद झालाय. अशी चर्चा कधीच झाली नव्हती. एप्रिल महिन्याची कृपा म्हणू कि दिवसच चांगला होता म्हणू !! खूप खूप आभार.

एक अतिशय निर्भेळ खुली चर्चा ह्यासाठी ही कविता, कवी अन हे प्रतिसादक माझ्या लक्षात रहातीलच. (जुन्या मायबोलीची सरसरून आठवण झाली).
भारतीशी अगदी अगदी सहमत.
अन त्याहीपुढे जाऊन मी म्हणेन की, आम्ही जे प्रतिसादतो ते ही "त्या वेळी जे वाटलं ते" इतक्यावरच अवलंबून असतं. वाचणर्‍यांचा अभ्यास, अनुभव अन काही चिंतन ह्याचा त्यात सहभाग असला तरीही त्या सुद्धा आमच्या सीमाच आहेत.
डॉक्टर, भारती, तुमचे प्रतिसाद वाचत असते इतरत्रही. अतिशय संयत अन अभ्यासपूर्णं विचारदर्शन असतं. तुमचं इथलं वावरणं हे सार्‍यांनाच अतिशय सुखाचं, उबेचं आहे असं मला वाटतं. खरच येत रहा.