गुगल-पाडवा

Submitted by अनुराधा म्हापणकर on 11 April, 2013 - 02:09

मीही आणली ना विकत
गुढी रेशमी एक रेडीमेड..
पाटावरली रांगोळी मात्र
माझीच हं! - सेल्फ़मेड..

गोडधोड काय विचारता ?
आणलंय ना "चितळे"च आम्रखंड..
पु-या मीच केल्या हो,
आणि बाकीचा स्वयंपाकही अखंड

दारावर बांधलं भरगच्च तोरण
आंब्याच्या डहाळीला अशोकाचं पान
झेंडू मात्र टपोरा केशरी
एकेक वेचून घेतलाय छान

मुलांनी विचारलं.. मॊम-
तांब्याला का ग उंचावर टांगलं
तांब्या नव्हे रे - गुढी ती !
आज किनई, असं करणं चांगलं..

"आजच का-" ? विचारशील
तर उत्तर मी थोडं मागाहून देते
विसरलेय खरतर बरंच काही
हळूच "गुगल" वर डोकावून येते

माझ्याच सणाचे महत्व,
मला माहित नाही, म्हणून हसू नका
"थर्टी फर्स्ट" च्या पार्टीत तुम्हीही नाचता
आता - खरं बोलले म्हणून रुसू नका

अनुराधा म्हापणकर

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शुभेच्छा

फक्त "टिंबटिंबरावांचे नाव" गोवले तर मस्त मस्त उखाणे तयार होतील यातून !!!! Happy
मस्त मजा आया !!!