आत्याबाईंच्या गोष्टी ३

Submitted by उमेश वैद्य on 10 April, 2013 - 10:20

अनेक कारणांनी आत्याबाईंच्या कित्येक गोष्टी मनातच राहिल्या. वेळ परत्वे, ईतर कारणाने लिहीणे झालेच नाही. पण आता लिहायचे ठरवले आहे. गुढीपाडव्याच्या पूर्व संध्येला.
त्यातूनच हा आत्याबाईंच्या गोष्टीतला ३ रा भाग लिहून झाला.
पहिल्या २ भागांच्या लिक्स खालील प्रमाणे.
आत्याबाईंच्या गोष्टी - १

आत्याबाईंच्या लहानपणची गोष्ट.

आत्याबाईंचे काही सवंगडी होते. सगळेच आजूबाजूच्या घरांमधले आळीतलेच. "सगळे खेळगडी एकत्र खेळत. एकमेकांच्या घरांमधे प्रत्येकाला मुक्त प्रवेश असे. कोणाच्या घरात काय चालु आहे हे सा-यांनाच ठाउक असे. असे ते सोनेरी दिवस होते." आत्याबाईंनी सांगायला सुरवात केली.

तर आमच्याच घरासमोर फ़डके रहात. त्यांना दोन मुलं होती. जवळपास आमच्याच वयाची.
आम्ही सारे मिळून खेळत असू. कधी आमच्या माडीवर तर कधी आणि कोणाच्या घरी. फ़डक्यांची मुलं आमच्याकडे आली की आई आमच्या खेळात डोकावे. त्या मुलांसकट आम्हाला बोलावून नेई. पानावर बसवे. जशी वेळ असेल तसे पदार्थ पानावर वाढे. म्हणजे, सकाळ किंवा मधवेळ असेल तर पोहे शिरा किंवा इतर खाउ. जेवणाची वेळ असेल तर जेवणच. आई त्या मुलांना आग्रह कर करुन मोठ्या प्रेमाने वाढत असे."हे सांगताना आत्याबाईंच्या चेह-यावर आणि डोळ्यात आजीची (त्यांच्या आईची) आठवण तरळत असे.
ईतर मुलांच्या बाबतीत मात्र हे असं नसे. याच कारण कळलं ते एका मजेशीर गोष्टीमुळे." आत्याबाई म्हणाल्या.

आम्ही त्या मजेशीर गोष्टीच्या अपेक्षेने आत्याबाईंकडे पाहू लागलो. "एकदा आम्ही असेच खेळत होतो. घरासमोरच्या गल्लीतच हा लगोरीचा खेळ रंगला होता. रस्त्यावरून जाणारी येणारी तुरळक माणसे होती. शेजारच्या घरातले विनायकराव रस्त्यावरून चालले होते. पांढरे शुभ्र धोतर, काळी टोपी, सदरा अन कोट.
त्यांच्या सद-याला सोन्याच्या गुंड्या असावयाच्या बरे! आळीत त्यांच्या शब्दाला मान होता. लोक आपल्या घरगुती बाबीतही त्यांचा सल्ला मागत असत. त्यांचा शब्द मोडण्याची ताकत नव्हती कोणात असे करारी व्यक्तिमत्व". आत्त्याबाईंनी विनायकराव आमच्यासमोर ऊभे केले.

तर आमचा खेळ चालू, आणि विनायकराव जात होते. इतक्यात समोरच्या घरातल्या माडीवरून म्ह्णणजे
फ़डक्यांच्या घराच्या खिडकीतून काहितरी एकदम आलं आणि खालून चालत असलेल्या विनायक रावांच्या डोक्यावर बद्कन आदळल. तो म्हणजे एक भिजवलेल्या कणकेचा गोळा होता. त्या पाठोपाठ असे अनेक लहान मोठे गोळे येऊन रस्त्यावर आदळू लागले. आम्हा मुलांसमोरच हे घडलेलं. ते पाहून आमची हसून हसून पुरेवाट झाली. अचानक झालेल्या या हल्यानं विनायकराव क्षणभर गोंधळले, पण पुन्हा सावरून एक गोळा त्यांनी उचलला आणि फ़डक्यांच्या घराची माडी चढू लागले. आता काय होईल याची उत्कंठा आम्हाला स्वस्थ बसू देईना. सुरक्षित अंतर ठेऊन आम्ही मुले विनायकरावांच्या पाठोपाठ जाऊ लागलो. हलके हलके विनायकरावांच्या पाठीमागे पाय न वाजवता आम्ही जाऊन पहातो तो काय, स्वयंपाक घरात जमिनीवर फ़डके काकूंच्या पोळ्या चाललेल्या. दोन्ही मुले समोरच बसून गरम पोळ्या खात होती. पोळ्या लाटता लाटता फ़डके काकूंची बडबड चालू होती.

"पुरे झालं मेल्यांनो. ऊठा आता. पोळ्या लाटून लाटून हात दुखले माझे." काकू बोलत होत्या
आणि दर वाक्यागणीक परातीतील कणकेचा गोळा खिडकीतून फ़ेकत होत्या. मुले खाली मान घालून जेवत होती.

आंम्हाला ते पाहून कससच झालं खालमानेन आम्ही जिना उतरून निघून आलो. विनायकराव आणि फ़डकेकाकू
यांच्यात काय बोलण झालं ते माहित नाही, पण या पुढे असे गोळे येण मात्र कायमच थांबल.
हा प्रकार मी आईला सागितला. आई हळहळली आणि म्हणाली, "अरेरे! वाढत्या वयाची मुलं. पण बाई मुलखाची आळ्शी. घरी सगळ व्यवस्थित असताना देखील मुला-नव-याला चार घास पोटभर करून वाढण जमत नाही तिला. अशीच अन्नाची नासधुस करत असते."

आता मात्र मला आईच्या वागण्यातल रहस्य उलगडल आणि फ़डक्यांची मुले आल्यावर त्यांना पोट भर वाढण्या-या आईच्या त्या वागण्याचा अर्थ देखील कळला. तेंव्हापासून मुलं शाळाकॉलेजातून किंवा खेळून आली की त्यांच्या खाण्यापिण्याच पाहिल्याशिवाय काही सूचत नाही मला". आत्याबाई म्हणाल्या.

एके दिवशी आत्याबाईंना आपल्या वडिलांची आठवण आली. आत्याबाईंचे वडिल खूप तापट पण प्रेमळ होते.
दुस-यांना मदत करण्याचा गुण त्यांच्या अंगी होता. ब्रिटीशांच्या काळात ते रेल्वे खात्यात मोठ्या हुद्यावर होते.
आपल्या नात्यातील अनेक होतकरु विद्यार्थ्यांना आपल्या स्वत:च्या घरी ठेउन त्यांनी शिकवले.

"वडिल लहान असतानाच त्यांची आई गेली. घरात वडिलांची एक विधवा आत्या होती. सोवळी बाई.
तिन त्यांना वाढवलं. वडिलांचे वडिल भिक्षुक होते. गावात राहून भिक्षुकीच्या उत्पन्नावर घर चालत असे.
आजोबांना वाटे, आपल्या मुलानं कुठे पुण्याला वा पैठणला राहून चांगली याज्ञीकी शिकावी.
पण वडिलांना लहानपणापासून त्याची नावड होती. त्यांना वाटे आपण शाळेत जावं खूप शिकावं मग आपलं घर वर येईल. पण या वरून मुला-बापाचे खटके उडत. आपल्या स्वतंत्र विचाराने चालून वडिलांचे म्हणणे अमान्य करणा-या मुलास त्या काळी ’दिवटा’ हे एकच संबोधन असे. आत्याचा आपल्या भाच्यावर खूप जिव होता पण भावापुढे तिच काही चालत नसे. शिक्षणाची ऊर्मी वडिलांच्या मनात वारंवार उसळून येई. ती अस्वस्थता आत्याला माहिती होती.

एकदा एका नात्यातल्या घरी कोणाची तरी मुंज होती. जवळच्या गावातच मुंजघर होत.
घरची सगळी मंडळी मुंजीला गेली. त्या मुंजीत पंक्तित दक्षिणा म्हणून ठेवायला पैशा पैशाची मोड करून
एक बटवा यजमानांनी तयार ठेवला होता. तो या आत्यांकडे सांभाळायला दिला. अशा सोवळ्या बायकांना
अशीच कामे बहुदा देत असत. तर आत्यांनी आपल्या भाच्याला हळूच जवळ बोलावले.
त्याच्या हाती तो दक्षिणेचा बटवा देत त्या म्हणाल्या, " चल क्‌रुष्णा , तुला शिकायचे आहे ना?
मग हे पैसे घे आणि पळून जा येथून". मुंबईला गिरगावात त्यांच्या सासरचे कोणी नातेवाईक होते.
त्यांच्याकडे त्याला पाठवले, आणि ईकडे बटवा हरवला अशी बोंब ठोकली. यजमान बिचारे काहीच बोलले नाहीत
पण मुलगा ही पळून गेला हे समजताच वडिलांची तळपायाची आग मस्तकात गेली त्याचा प्रासाद म्हणून सोवळ्या आत्यांना आपल्या भावाच्या हातचा मार देखील खावा लागला. तो त्यांनी खाल्ला पण आपल्या भाच्याला शिक्षणाची दारं मात्र उघडून दिली. पुढे मग तो भाचा असाच कोणालोणाच्या आस-याला रहात, लोकांची कामं करत शिकला आणि उच्चविद्या विभूषित झाला! आत्याबाईंनी आपल्या वडिलांची गोष्ट सांगितली.

Group content visibility: 
Public - accessible to all site users