ध्यास असावा

Submitted by आनंद पेंढारकर on 9 April, 2013 - 12:58

तुझ्या नि माझ्या कणाकणाला एकपणाचा ध्यास असावा
उरात माझ्या दरवळणारा धुंद तुझा तो श्वास असावा

कधी रिमझिमत सभोवताली तूच अवेळी दाटुन यावे
कधी मुसळधार पावसाचा रात्रभराचा भास असावा

मनी अनामिक थरथर जेव्हा नजर तुझी गात्रात झिरपते
जखम नव्याने ठरून आहे धूसरसा अदमास असावा

अबोल वाळूवरी दिसावी भेट तुझी माझी सरलेली
उदासवाणे फिरावयाला तोच किनारा खास असावा

कशास नात्यास नाव देऊ शब्द जरी झालेत अनावर
नकोत स्पर्शातले भुलावे फक्त खुळा आश्वास असावा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खयालात नाविन्य सखोलता इत्यादी फारसे नाहीत जाणवले
कल्पकता जरा जाणवली
या कल्पकतेच्या हळुवारपणाला साजेसे वृत्त व शब्दयोजन वाटले नाही

लयीच्या ओघात (खुमारीत) रचल्यासरखी वाटली गझल.. भावनांचा ओलावा कमी जाणवला

पण चांगली आहेच व मला बर्‍यापैकी आवडलीही आहे

सर्व मते वैयक्तिक !! दुखावले गेले असल्यास क्षमस्व
कृपया गैरसमज नसावा ....(दोष माझ्या आकलनक्षमतेचाही असू शकतो )
लोभ असूद्या

आपला नम्र
~वैवकु