पंधराशे हॅरीसन - रोलर कोस्टर

Submitted by सीमंतिनी on 9 April, 2013 - 11:16

(अन्यत्र पूर्वप्रकाशित)

काचेच्या अंक्वेऱियममध्ये राज आणि जेनी, जेनीचा betta फिश घेऊन आलॆ. राज माझा एकुलता एक लेक, जेनी त्याची पहिली स्टॆबल गर्लफ्ऱॆंड आणि तिचा तो एकुलता एक ‘बेटा’ फिश. ‘जेनीची परीक्षा संपेपर्यंत सांभाळ’ म्हणून त्या माशासाठी, राज मला गळ घालत होता. सासरच्या कुत्र्याला हाड् म्हणू नये हे ऐकले होते, पण गर्ल फ्रेंडच्या माशाला कसे वागवावे हे कुठे ऐकले नव्हते. म्हणून जेनीची परीक्षा संपेपर्यंत पुढचे ६ आठवडे ह्या माशाची काळजी घ्यायला मी तयार झाले. त्या माशाचे नाव निमो ठेवायचे की मॉली ह्यावर राज आणि जेनीचं एकमत नव्हतं.... त्या गोंधळात तो मासा दोन वर्षाचा होऊन गेला होता, म्हणजे सरासरी दोन-चार वर्ष जगणाऱ्या बेटा फिशच्या दृष्टीने हा मध्यमवयीन होता तर. पण माशांना बहुतेक कल्ले-दुखी, शेपूट-वात असे आजार होत नसावेत. त्यामुळे हा पठ्ठा अगदी आरामात पोहत होता. संधीवाताने दुखऱ्या माझ्या बोटांना त्याचा क्षणभर हेवा वाटला. fluroscent ब्लू रंगाच्या त्या माशाचे नाव मी मनोमन 'निळोजी' ठेवले.
ते दोघं गेले आणि माझ्या सहकारी मेलिसाचा कॅम्पिंगला बोलावण्यासाठी फोन आला. मी तिला सांगितलं, "नाही ग, जेनीच्या बेटा फिशला सोडून असं आठवडाभर नाही येता येणार." मेलिसा उद्गारली, "ओह माय माय! एकदम सिरिअस दिसतायत. आरती, तुला माहित नसेल म्हणून सांगते - काहीवेळा इथे कपल्स मुलं होऊ देण्याआधी एखादा प्राणी एकत्र पाळतात. आपला पार्टनर आणि त्याच्या घरचे किती केअरिंग आहेत हे कळून येते. माझ्या मेलानीचा boyfriend कधी तिच्या मांजराला खाऊ घालत नसे. ते मांजर मेलं तेव्हा त्याची बहिण गावातच होती पण फोन नाही केला कि आली पण नाही. बरच झाला त्या boyfriend च आणि मेलानी चा ब्रेक-अप झाला. तू मात्र ...." तिचं पुढचं बोलणं ऐकण्या आधीच मी माझ्या विचारात गढले. जेनी गोड मुलगी होती. सैपाकाचा कंटाळा होता पण तो तिच्या वयाचा दोष. बाकी रंग, धर्म आणि भाषा वेगळी असली तरी सगळ्यांशी ती आपुलकीने वागत असे. मी निळोजीला निरखू लागले. त्याचा रंग जेनीच्या डोळ्यांसारखा निळा असला तरी त्याचे डोळे माझ्या राजसारखे काळे होते. बेटा फिशच्या मानाने निळोजी जरा मोठाच होता, जसा माझा राज भारतीय मुलांमध्ये मोठा वाटायचा. पण ह्या निळोजीच्या अक्वेरीम समोर आरसा ठेवला कि तो गिरक्या घेत असे - अगदी जेनी सारख्या. मी ठरवले जेनीला तक्रार करायला जागा द्यायची नाही. राघवन माझा नवरा. जेव्हा तो घरी आला तेव्हा मी त्याला सारे समजावले. त्याने आधी सोयीस्कर दुर्लक्ष केले. मग म्हणाला "मासा हा खाण्याचा विषय आहे, संगोपनाचा नाही. यू आल शूड नो दाट!" मी त्याला निक्षून सांगितलं "असं घरात राहून माशाशी वैर बरं नाही!"
निळोजीला निरखण्यात माझी सकाळ-संध्याकाळ मजेत जात असे. पण काल निळोजी अचानक असा तिरपा झाला आणि पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगताना त्याच्या हालचाली मंद मंद वाटत होत्या. मी तातडीने राजला फोन केला. तोही ताबडतोब आला. आधी त्याने माझ्यावरच कस ‘केअरिंग’ असल पाहिजे ह्याबद्दल तोंडसुख घेतलं. अरे कार्ट्या! अडीच किलोचा अडीचशे पौंड झालास ते माझ्याच केअरिंग मुळे ना ... पण असो ते सांगण्याचा क्षण हा नोहे. राजने गुगल वरून माहिती काढली - त्याच्या मते निळोजीला Constipation झाले होते. मध्यमवय कोणाला सोडत नाही हेच खरे. राजच्या मते निळोजीला रोज एक उकडलेला वाटणा खाऊ घातला पाहिजे. मी Toothpick वर वाटणा लावून रोज अक्वेरीम मध्ये धरू लागले. निळोजीला माझ्या दुखऱ्या बोटांची दया येत नसे. तास सव्वा तास वाटणा धरावा तेव्हा तो संपवत असे. राज आणि जेनीच्या मुलांना मला भरवावं लागेल का? माझ्या दुखऱ्या बोटांचा थोडा विसर मला पडला. पण वाटणा खात असला तरी निळोजीची तब्बेत एकूणच मला तोळा-मासा वाटत होती.
आता ३ दिवसांनी निळोजी परत जेनीकडे जाणार होता. आज सकाळी मी कॉफी घेऊन त्याला गुड मोर्निंग म्हणायला गेले तर ..तर निळोजी हे जग सोडून गेला होता. जेनीची आता नक्कीच खात्री होईल कि राज ची family अन्केअरिन्ग आहे! तिला फोन करणे योग्य नाही. निदान एक व्यवस्थित funeral करावं शनिवारी. जेनीला बरं वाटेल. राघवन कॉन्फरेंस साठी गेलेला. शुक्रवारशिवाय तो येणार नाही. एकूण मलाच सगळ बघावं लागणार. येण्या-जाण्याचा क्षण आपल्या हातात नसतो. असतं ते फक्त प्रेमपूर्वक स्वागत आणि सन्मानपूर्वक निरोप. भारतीय संस्कृतीत आगमनाचा सोहळा बायकांचा तर निरोपाची जवाबदारी पुरुषांची. पण आता हे funeral मलाच organize करावं लागणार होतं. मी आधी निळोजीला बर्फाच्या box मध्ये घालून फ्रीझर मध्ये टाकला. माशाचे funeral मी बिल कोसबी शो मध्ये पहिले होते - toilet flush करून. छे!! आधीच तिला निमो हे नाव आवडत नाही. त्यातून त्याला ड्रेन मध्ये निमोसारखे पाठवायचे. त्यापेक्षा त्याला गुलाबाच्या रोपाखाली पुरुया. गुगल वर काही अजून आयडिया मिळतात का ते पाहू लागले. Fish funeral kit मिळतं म्हणे. ५०% discount हि होता. पण नकोच मी स्वतःच box सजवते. माझा एक परफ्युम चा box मी घेतला. अमेरिकेत माशांचं पण नशीब उघडता. गीवान्शे चं कोफिन! राजचे आर्ट चे समान घेऊन मी एक सुंदर मासा मी काढला. खरंच मी परत स्केचिंग सुरु करायला हवं. एखादी माशाबद्दल कविता मिळेल का कुठे? त्या ऐवजी मेलिसा कडून एखादा 'हायकू' घ्यावा. निळोजीचं निरोप घेताना उगीच दुःखाच प्रदर्शन नको. काळ्या ऐवजी प्रिंटेड ड्रेस घालीन. निळोजीचं एक फोटो आत्ताच काढला पाहिजे. मुलांना दाखवायला राज-जेनी ने scrap बुक सुरु केलं तर 'अवर फर्स्ट पेट' म्हणून फोटो लावता येईल. माशाच्या funeral ला सीफूड करणं बरं नाही दिसणार. वेज कटलेट आणि फ्रुट सलाड केलं कि झालं. राघवन आला कि घालेल राज ची समजूत. रसेल पीटर्स च्या बापासारखा नाहीये माझा राघवन. राज सावरला कि घेईल जेनीची काळजी.
शुक्रवारी दुपारी राघवन आला. कॉफी झाल्यावर मी त्याला सगळं सांगितलं. box , ड्रेस, cutlet , स्क्रापबुक अशी सगळी तयारी दाखवली. राज टीन एजर असताना जसा डोळे फिरवून खांदे उडवायचा, तसा क्लासिक आय रोल आत्ता राघवनने केला आणि म्हणाला " पटकन तयार हो, Let's just get another stupid blue betta fish. betta fish थोडीच सांगतो तो मी नव्हेच. मला समजत नाही आरती तुझं प्रेम कशावर आहे - मुलावर कि त्या माशावर कि ह्या असल्या सोहोळ्यांवर!" Roller coaster संपल्यावर जसं हसू येतं तस ओशाळ हसू मला आलं. खरंच माझं प्रेम कशावर आहे - निदान ह्या क्षणी राघवन वर!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. मलाही अगदी राघवनचीच आयडिया सुचली आधी, नविन मासा आण की. माझ्या लेकीचा तिसरा मासा तिसर्याच दिवशी वारल्यावर, मी ही आयडीया केली होती, to save her third heartbreak.

>> Fish funeral kit मिळतं म्हणे. ५०% discount हि होता.
Lol
मजेशीर लिहिता तुम्ही. Happy

"मासा हा खाण्याचा विषय आहे, संगोपनाचा नाही"
"असं घरात राहून माशाशी वैर बरं नाही!"
>> Proud
मजा आली वाचायला.

सह्हीच. Happy

निळोजी कैलासवासी झाल्यानंतरचे विचार केवळ अप्रतिम. विशेषतः स्केचिंग सुरू करायला हवं, फ्युनरलला सीफूड नको, माशाचा फोटो पुढे नातवंडांच्या स्क्रॅबबुककरता काढणं .... Biggrin

राजची व जेनीची निळोजीच्या लुक्सशी तुलना वाचताना जाम हसू येत होते. हा भाग पण आवडला. तुझी विचार करायची, लिहायची ही हलकीफुलकी शैलीही आवडतेच!

मस्त Happy

काय मस्त लिहिलंय.
सासरच्या कुत्र्याला हाड् म्हणू नये हे ऐकले होते, पण गर्ल फ्रेंडच्या माशाला कसे वागवावे हे कुठे ऐकले नव्हते.>> Lol
विशेषतः स्केचिंग सुरू करायला हवं, फ्युनरलला सीफूड नको, माशाचा फोटो पुढे नातवंडांच्या स्क्रॅबबुककरता काढणं >> Lol

Pages