मृगजळ!

Submitted by आर.ए.के. on 9 April, 2013 - 02:05

पडले ते ऊनच होते,
खोटे ते मृगजळ होते,
आनंदातही पाझरणारे,
अश्रू ते अश्रूचं होते!

हारले ते ससे होते,
जिंकले ते कासव होते,
क्षमतेला डावलणारे,
ते आळसाचे नमुने होते!

हसणारे ते नेत्र होते,
हसवणारे ते किस्से होते,
काळासोबत गळून पडलेले,
ते ह्रदयाचे हिस्से होते!

वाटा त्या मोकळ्या होत्या,
रिकामे हे जग होते,
रस्ता सापडूनही चुकलेले,
हतबल ते वाटसरु होते!

घडल्या त्या मूर्त्या होत्या,
बनले ते शिल्प होते,
प्रहारांनी रक्ताळलेले,
दगड ते दगडचं होते!

हरवले ते स्वप्न होते,
सापडले ते सत्य होते,
प्रकाशाचा आव आणणारे,
ते खोटे काजवेच होते!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कविता आवडली

घडल्या त्या मूर्त्या होत्या,
बनले ते शिल्प होते,
प्रहारांनी रक्ताळलेले,
दगड ते दगडचं होते!>> विशेष आवडले !