सोलापुर म्हटले की पहिली प्रतिक्रिया बहुदा, 'ते चादरवालं?' किंवा 'बापरे काय तो उन्हाळा!' यापैकी एक हमखास असते. हे ऐकून बहुतेक सोलापुरकर इतके सरावलेले असतात की बर्याच वेळेला स्वतःच अशी ओळख करुन देतात. आपल्याच गावाची नालस्ती करण्यात पुढाकार घेणारे हे महान लोक आहेत. पण त्यात कसलाही न्युनगंड वगैरे काही नाही, ती त्यांची हल्ला टाळण्याची एक पद्धत आहे.
जगाच्या पाठीवर कुठेही दिसणारी आणि सोलापुरचे नाव ठळकपणे मिरवणारी चादर त्याच्या अभिमानाचा विषय जरुर आहे, पण या लोकांना स्वतःची टिमकी वाजवण्याची सवयच नाही. एखाद्या अस्सल सोलापुरीपुढे तुम्ही या चादरींचं कितीही तुफान कौतुक केलत तरी, 'हां, हाये ते' असा एक अत्यंत तोकडा उल्लेख होइल व विषय संपेल. आणि उन्हाळ्याचं म्हणाल तर खर्या सोलापुरी माणसाला त्याचा अजिबात त्रास होत नाही. फारच उन झालं तर तो शांतपणे सगळी कामं सोडून घरात बसतो, टोप्या वगैरे घालणे इथं भ्याडपणाच समजतात.
प्रत्येक गावाचे काही मानबिंदु असतात ( मानबिंदु जितके जास्त तितकी गावाची मान लांब असा निकष लावला तर पुणे म्हणजे एक जिराफ आहे!). सोलापुरचे मानबिंदु दोन-एक तर ४२ च्या चळवळीत फासावर गेलेले चार हुतात्मे आणि दुसरे सिद्धरामेश्वर. स्वातंत्र्य चळवळीत मार्शल लॉ लागू झालेलं हे एकमेव गाव अस प्रत्येक सोलापुरी मुलाने लहानपणापासून एकलेलं असतं. त्यामुळे पुस्तकात लिहीलेला इतिहास हा आपल्या गावात घडला हे एक जोरदार फिलींग इथं सर्वांना असतं. यामुळेच की काय कुणास ठाउक, पण भांडखोरपणा इथे ठासून भरला आहे. दोन सोलापुरी मित्र जेव्हा कोठेही भेटतात तेव्हा प्रथम पोटात गुद्दे मारुन, 'काsss बे माज आलायं का लई' असं कानडी हेलात जोरदार स्वागत करतात. शारिरीक जवळीक ही यांच्या एटीकेट्सचा एक भाग आहे. राजकारणात मात्र या भांडखोरपणामुळे कुठलेच नेतृत्व वा पक्ष इथं एकदम सेटल झालयं असं होत नाही.
मुळात हे एक सर्वार्थाने 'मल्टिकल्चरल' गाव आहे. मराठी,कन्नड,तेलगू आणि सोलापुरी हिंदी (ही एक वेगळी भाषा आहे!) अशा चार भाषा,अनेक पंथ, आणि संस्क्रुती याची ही एक भेळ आहे. त्यामुळे नुसतं सोलापुरात राहतो ह्या वाक्याला काही अर्थ नाही, सोलापुरात कुठं? हे महत्वाचं. ही सगळी विसंवादी पात्र एकत्र राहण्यामागे बसवेश्वरांच्या समन्वयवादी शिकवणीचा मोठाच वाटा आहे.
सोलापुरी मराठीलाही बेळगावप्रमाणे कन्नड हेल आहे. पण त्यातला गोडवा? तेवढं सोडून बोला. फटके मारल्यासारखं बोलण्याची इथे पदधत आहे. उदा. अमेरिकेवरुन परतलेल्या मित्राला 'काsss बे अमेरिकेला जौन बी काळंच की बेss तू', या थाटात चहा पाजतील. अर्थात मनात काही वाईट भावना ठेउन हे मुळीच नसतं. नवीन माणसं असल्या बोलण्याने गांगरतात आणि सोलापुरकरांबद्दल गैरसमज करुन बसतात. इथल्या दुकानदारांचे मराठी आणि धंदा करायची पद्धत तर अवर्णनीय आहे. एक तर जास्त माल दाखवणं हा अपमान समजतात, दुकानात जर काही नसेल तर ते आख्या सोलपुरातच नाही हे पटवतात किंवा 'बोंबेउन मागवलेय' या आश्वासनावर बोळवण करतात. कुठल्याही नव्या गोष्टीने हे एक्साईट होत नाहीत, आणि कमीतकमी शब्दात कशाचेही ग्लॅमर घालवण्यात तज्ञ आहेत. आमचा एक नवीन लग्न झालेला मित्र हौसेने बायकोला घेउन रुम फ्रेशनर घ्यायला गेला. 'ते मिस्ट आहे काय हो' अशा नाजुक विचारण्यावर; 'सिद्ध्या, ते धुरळा उडतयं ते दाखव म्याडमला', या थाटात पार कचरा करुन मालक पोट खाजवायला मोकळे झाले!
सोलपुरी हिंदी ही कचाकचा भांडायसाठी जगातली अत्यंत पावरबाज भाषा. मराठी आणि हिंदी मधल्या 'वेचक आणि वेधक' शब्दांना सणसणीत कानडी फोडणी दिली की हा पदार्थ बनतो. सोलापुरात बेगमपेठ नावाचा भाग आहे. असं म्हणतात की औरंगझेबाने त्याच्या बेगमांना इथं ठेवलं होतं. यावर आमचे संशोधन असे की थोड्या दिवसांनी जेव्हा तो लढाया करुन परत आला तेंव्हा बेगमांचं हिंदी एकून त्याने हाय खाल्ली व त्यातच त्याचा अंत झाला!
खाण्याच्या बाबतीतही सोलपुरात बरीच सरमिसळ आहे. सोलापुरची खासियत म्हणजे शेंगादाण्याची जहाल चटणी आणि ज्वारीची भाकरी. हा पदार्थ जरी सर्व महाराष्ट्रात बनत असला तरी सोलापुरकरांची त्यावर मास्टरी आहे. इडली हा त्यांचा दुसरा वीक पॉईंट, अर्थातच इथे सीमाभागात असल्याचा प्रभाव स्पष्ट आहे. सोलपुरात कित्येक होटेल्स केवळ सकाळी काही तास इडली-चटणी विकतात आणि बाकी वेळा बंद.
सोलापुरकरांचा अत्यंत आवडता विरंगुळा म्हणजे चित्रपट. सिनेमाचे इतके प्रचंड वेड असलेले दुसरे गाव कुठेही नसेल. इथे सिनेमा बघायला पाल़कांची परवानगी घेतली जात नाही (नवीन बालसंगोपनाच्या मागे लागून हा प्रकार अलीकडे सुरु झाल्याचे ऐकीवात आहे,काय चाललय हे?). मल्टीप्लेक्स नाव ही कुणाला माहिती नसल्यापासुन ती इथे आहेत. त्यामुळे सिनेमाला जाउन तिकीट मिळालं नाही म्हणुन परत येणं इथं पाप समजतात.हा नाही तर तो कोणतातरी बघायचाच. त्यामुळे सहसा कुठला सिनेमा इथं फ्लॉप होत नाही. मिथुन,अमिताभ इ.इ. च्या पडत्या काळात सोलापुरी जनतेने त्यांना उदंड सहारा दिला आहे. लोकसंख्येच्या मानाने इथे खुपच म्हणजे जवळपास १५ थेटर्स आहेत. त्यातले काही फक्त कन्नड किंवा तेलुगू सिनेमे दाखवतात आणि सगळेच चालतात. असं आहे म्हणुन थेटर्स स्वच्छ वगैरे अजिबात नाहीत, उलट मुतारी, घाम, पानाच्या पिचकार्या आणि उच्छ्वास यांचा मिळुन येणारा दरवळ नसेल तर सिलेमाचा फीलच येत नाही. पंखे कधितरीच चालतात आणि उकाडा तर कायमचाच म्हणुन लोक शर्ट काढून डोक्याला गुंडाळतात. आवडतं गाणं लागलं की तोच फिरवून नाचतात किंवा धासू डायलॉगला हवेत उडवतात. शांतपणे सिनेमा पाहणे एकदम नामंजूर. त्यामुळे पुण्यात पहिल्यांदा सिनेमा पाहताना माझी जाम गोची झाली होती. तिथे काय सगळेच समीक्षक, त्यामुळे विनोदी प्रसंगालाही लोक दातातल्या दातात हसत होते, मी हैराण. सतत बडबड करीत सिनेमा पाहिला तरचं त्याचे पैसे वसूल होतात यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. जुन्या काळात मुगले आझमच्या प्रिंट्स वरातीतून आणण्यापासून रेफ्युजी रिलीज झाल्यावर बच्चनचा मुलगा आला म्हणुन आख्या थेटरला पेढे वाटण्यापर्यंत या मॅडनेसचे अनेक किस्से आहेत.
मला नक्की खात्री आहे की हा लेख वाचूनही, 'काsss बे लई ल्ह्याय्लास की' या शब्दात माझे 'कौतुक' होईलं, खांद्यावर जोरदार बुक्की बसेल आणि मग आम्ही इडली खायला मोकळे होऊ!
दिव्य मराठीच्या सोलापूर
दिव्य मराठीच्या सोलापूर एडीशनमध्ये तिरकी फिरकी या सदरात एक छोटी टिप्पणी आली आहे!
http://epaperdivyamarathi.bhaskar.com/solapur/solapurcity/261/05012015/0/2/
आंतरजालिय जगात अजून हा लेख फिरतोय हे वाचून आश्चर्य वाटले.
सोलापुरला संध्यकाळी साडे सात
सोलापुरला संध्यकाळी साडे सात वाजता पोचणार, ट्रेनने. तिथुन पुढली ट्रेन रात्री साडे अकराला आहे. म्हणजे जवळपास ३ तास आहेत फिरायला.
काय काय पहाण्या सारखं आहे या वेळेते? या खेपेत खादाडी करु शकणार नाही, तरी ते ही सांगुन ठेवा, पुढल्या खेपेत करेन.
धन्यवाद.
Pages