आणि आम्ही सोलापुरकर...

Submitted by लसावि on 22 October, 2008 - 22:53

सोलापुर म्हटले की पहिली प्रतिक्रिया बहुदा, 'ते चादरवालं?' किंवा 'बापरे काय तो उन्हाळा!' यापैकी एक हमखास असते. हे ऐकून बहुतेक सोलापुरकर इतके सरावलेले असतात की बर्‍याच वेळेला स्वतःच अशी ओळख करुन देतात. आपल्याच गावाची नालस्ती करण्यात पुढाकार घेणारे हे महान लोक आहेत. पण त्यात कसलाही न्युनगंड वगैरे काही नाही, ती त्यांची हल्ला टाळण्याची एक पद्धत आहे.

जगाच्या पाठीवर कुठेही दिसणारी आणि सोलापुरचे नाव ठळकपणे मिरवणारी चादर त्याच्या अभिमानाचा विषय जरुर आहे, पण या लोकांना स्वतःची टिमकी वाजवण्याची सवयच नाही. एखाद्या अस्सल सोलापुरीपुढे तुम्ही या चादरींचं कितीही तुफान कौतुक केलत तरी, 'हां, हाये ते' असा एक अत्यंत तोकडा उल्लेख होइल व विषय संपेल. आणि उन्हाळ्याचं म्हणाल तर खर्‍या सोलापुरी माणसाला त्याचा अजिबात त्रास होत नाही. फारच उन झालं तर तो शांतपणे सगळी कामं सोडून घरात बसतो, टोप्या वगैरे घालणे इथं भ्याडपणाच समजतात.

प्रत्येक गावाचे काही मानबिंदु असतात ( मानबिंदु जितके जास्त तितकी गावाची मान लांब असा निकष लावला तर पुणे म्हणजे एक जिराफ आहे!). सोलापुरचे मानबिंदु दोन-एक तर ४२ च्या चळवळीत फासावर गेलेले चार हुतात्मे आणि दुसरे सिद्धरामेश्वर. स्वातंत्र्य चळवळीत मार्शल लॉ लागू झालेलं हे एकमेव गाव अस प्रत्येक सोलापुरी मुलाने लहानपणापासून एकलेलं असतं. त्यामुळे पुस्तकात लिहीलेला इतिहास हा आपल्या गावात घडला हे एक जोरदार फिलींग इथं सर्वांना असतं. यामुळेच की काय कुणास ठाउक, पण भांडखोरपणा इथे ठासून भरला आहे. दोन सोलापुरी मित्र जेव्हा कोठेही भेटतात तेव्हा प्रथम पोटात गुद्दे मारुन, 'काsss बे माज आलायं का लई' असं कानडी हेलात जोरदार स्वागत करतात. शारिरीक जवळीक ही यांच्या एटीकेट्सचा एक भाग आहे. राजकारणात मात्र या भांडखोरपणामुळे कुठलेच नेतृत्व वा पक्ष इथं एकदम सेटल झालयं असं होत नाही.

मुळात हे एक सर्वार्थाने 'मल्टिकल्चरल' गाव आहे. मराठी,कन्नड,तेलगू आणि सोलापुरी हिंदी (ही एक वेगळी भाषा आहे!) अशा चार भाषा,अनेक पंथ, आणि संस्क्रुती याची ही एक भेळ आहे. त्यामुळे नुसतं सोलापुरात राहतो ह्या वाक्याला काही अर्थ नाही, सोलापुरात कुठं? हे महत्वाचं. ही सगळी विसंवादी पात्र एकत्र राहण्यामागे बसवेश्वरांच्या समन्वयवादी शिकवणीचा मोठाच वाटा आहे.

सोलापुरी मराठीलाही बेळगावप्रमाणे कन्नड हेल आहे. पण त्यातला गोडवा? तेवढं सोडून बोला. फटके मारल्यासारखं बोलण्याची इथे पदधत आहे. उदा. अमेरिकेवरुन परतलेल्या मित्राला 'काsss बे अमेरिकेला जौन बी काळंच की बेss तू', या थाटात चहा पाजतील. अर्थात मनात काही वाईट भावना ठेउन हे मुळीच नसतं. नवीन माणसं असल्या बोलण्याने गांगरतात आणि सोलापुरकरांबद्दल गैरसमज करुन बसतात. इथल्या दुकानदारांचे मराठी आणि धंदा करायची पद्धत तर अवर्णनीय आहे. एक तर जास्त माल दाखवणं हा अपमान समजतात, दुकानात जर काही नसेल तर ते आख्या सोलपुरातच नाही हे पटवतात किंवा 'बोंबेउन मागवलेय' या आश्वासनावर बोळवण करतात. कुठल्याही नव्या गोष्टीने हे एक्साईट होत नाहीत, आणि कमीतकमी शब्दात कशाचेही ग्लॅमर घालवण्यात तज्ञ आहेत. आमचा एक नवीन लग्न झालेला मित्र हौसेने बायकोला घेउन रुम फ्रेशनर घ्यायला गेला. 'ते मिस्ट आहे काय हो' अशा नाजुक विचारण्यावर; 'सिद्ध्या, ते धुरळा उडतयं ते दाखव म्याडमला', या थाटात पार कचरा करुन मालक पोट खाजवायला मोकळे झाले!

सोलपुरी हिंदी ही कचाकचा भांडायसाठी जगातली अत्यंत पावरबाज भाषा. मराठी आणि हिंदी मधल्या 'वेचक आणि वेधक' शब्दांना सणसणीत कानडी फोडणी दिली की हा पदार्थ बनतो. सोलापुरात बेगमपेठ नावाचा भाग आहे. असं म्हणतात की औरंगझेबाने त्याच्या बेगमांना इथं ठेवलं होतं. यावर आमचे संशोधन असे की थोड्या दिवसांनी जेव्हा तो लढाया करुन परत आला तेंव्हा बेगमांचं हिंदी एकून त्याने हाय खाल्ली व त्यातच त्याचा अंत झाला!

खाण्याच्या बाबतीतही सोलपुरात बरीच सरमिसळ आहे. सोलापुरची खासियत म्हणजे शेंगादाण्याची जहाल चटणी आणि ज्वारीची भाकरी. हा पदार्थ जरी सर्व महाराष्ट्रात बनत असला तरी सोलापुरकरांची त्यावर मास्टरी आहे. इडली हा त्यांचा दुसरा वीक पॉईंट, अर्थातच इथे सीमाभागात असल्याचा प्रभाव स्पष्ट आहे. सोलपुरात कित्येक होटेल्स केवळ सकाळी काही तास इडली-चटणी विकतात आणि बाकी वेळा बंद.

सोलापुरकरांचा अत्यंत आवडता विरंगुळा म्हणजे चित्रपट. सिनेमाचे इतके प्रचंड वेड असलेले दुसरे गाव कुठेही नसेल. इथे सिनेमा बघायला पाल़कांची परवानगी घेतली जात नाही (नवीन बालसंगोपनाच्या मागे लागून हा प्रकार अलीकडे सुरु झाल्याचे ऐकीवात आहे,काय चाललय हे?). मल्टीप्लेक्स नाव ही कुणाला माहिती नसल्यापासुन ती इथे आहेत. त्यामुळे सिनेमाला जाउन तिकीट मिळालं नाही म्हणुन परत येणं इथं पाप समजतात.हा नाही तर तो कोणतातरी बघायचाच. त्यामुळे सहसा कुठला सिनेमा इथं फ्लॉप होत नाही. मिथुन,अमिताभ इ.इ. च्या पडत्या काळात सोलापुरी जनतेने त्यांना उदंड सहारा दिला आहे. लोकसंख्येच्या मानाने इथे खुपच म्हणजे जवळपास १५ थेटर्स आहेत. त्यातले काही फक्त कन्नड किंवा तेलुगू सिनेमे दाखवतात आणि सगळेच चालतात. असं आहे म्हणुन थेटर्स स्वच्छ वगैरे अजिबात नाहीत, उलट मुतारी, घाम, पानाच्या पिचकार्‍या आणि उच्छ्वास यांचा मिळुन येणारा दरवळ नसेल तर सिलेमाचा फीलच येत नाही. पंखे कधितरीच चालतात आणि उकाडा तर कायमचाच म्हणुन लोक शर्ट काढून डोक्याला गुंडाळतात. आवडतं गाणं लागलं की तोच फिरवून नाचतात किंवा धासू डायलॉगला हवेत उडवतात. शांतपणे सिनेमा पाहणे एकदम नामंजूर. त्यामुळे पुण्यात पहिल्यांदा सिनेमा पाहताना माझी जाम गोची झाली होती. तिथे काय सगळेच समीक्षक, त्यामुळे विनोदी प्रसंगालाही लोक दातातल्या दातात हसत होते, मी हैराण. सतत बडबड करीत सिनेमा पाहिला तरचं त्याचे पैसे वसूल होतात यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. जुन्या काळात मुगले आझमच्या प्रिंट्स वरातीतून आणण्यापासून रेफ्युजी रिलीज झाल्यावर बच्चनचा मुलगा आला म्हणुन आख्या थेटरला पेढे वाटण्यापर्यंत या मॅडनेसचे अनेक किस्से आहेत.

मला नक्की खात्री आहे की हा लेख वाचूनही, 'काsss बे लई ल्ह्याय्लास की' या शब्दात माझे 'कौतुक' होईलं, खांद्यावर जोरदार बुक्की बसेल आणि मग आम्ही इडली खायला मोकळे होऊ!

गुलमोहर: 

सिनेमाचे इतके प्रचंड वेड असलेले दुसरे गाव कुठेही नसेल>>>>>>>>
हे १००% खर आहे रे. Happy
अजुनही तिथे आवडत्या हिरोच्या मोठ्या पोष्टरला हार घालणे हा प्रकार असतोच.
सिद्धेश्वराचे मंदिर माझ आवडत आहेच. शिवाय जुनी महानगरपालिकेची देखणी इमारत देखील मला आवडते. Happy
शेंगदाण्याची चटणी मला तरी काय जहाल तिखट नाही वाटली. पण तिची चव अल्टिमेट आहे.
मी सोलापुरात बर्‍यापैकी सॉफिस्टेकेटेड येरीयात (आयटीआयच्या मागच कुठल ते उपनगर) देखील राहिलो आहे आणि एकदम सीध्या साध्या माणसांमध्ये देखील राहिलो आहे. (अक्कलकोट रोड वरच सोलापुर संपल इथे अस म्हणता येइल अस एक उपनगर. बहुतेक राजीवनगर)

मी काहि फोटु काढले होते सोलापुरचे ते बघ रे भो खालील लिन्कवर.

http://picasaweb.google.com/zakasrao/SolapurSiddheshvarTemple?authkey=-R...

जरा मराठी टाइपिंगची तुझी प्रॅक्टिस दिसत नाहिये. ती जरा सुधर की. Happy

अमेरिकेवरुन परतलेल्या मित्राला 'का बे अमेरिकेला जौन बी काळंच की बे तू',या थाटात चहा पाजतील >>

Lol

छान लिहिलंय....

माझ्या कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये सोलापूरच्या एका मुलाला बाथरूमच्या दारावर जोरात धक्के मारून विचारलं जायचं आणि त्याचं नेहमीचंच सोलापुरी उत्तर ऐकल्यावर खूप धन्य व्हायचं.. 'अबे अंगोळ करु लागलो बे..'

मस्त लिव्हलस की बे. पण कायच्या काय लिव्हू नंगस. शेंगदाण्याची चटणी आमच्या मराठवाड्यातच चांगली मिळते. Happy

बेगमांचं हिंदी एकून त्याने हाय खाल्ली व त्यातच त्याचा अंत झाला! >>>> Lol

छान लिहिलं आहे.

>>का बे लई ल्ह्यायलायंस की >> Lol
तेव्हढं शुद्धलेखनाचं बघ बे! Lol

~~~~~~~~~
दक्षिणा...... Happy
~~~~~~~~~

आवडलं..
सोलापूरच्या चटणी बद्दल एकदम perfect !!
सोलापूरच्या मुलींबद्दल नाही का काही? ... : -)

दीपावली अभिष्टचिंतन ... !!

काssssss बेsssss आगाऊ? लय शाणा झाला का? लय जास्तीच सुचायलंय की पुन्याला जौनss?
एकदम पार्क वरच्या भेळेसारखं चटपटीत लिहीलास की. बेष्टच एक्दम.
ओ केदार. शेंगदाण्याची चटणी स्पर्धा घ्यायची का बोला. Happy

माझे बरेच मित्र होते सोलापूर - कुर्डुवाडीचे.. परिक्षेच्या आधीचे खास संवादः

अर्रं टण्या, ते टॉम मधलं गीअर काय कळतच नाय बे. जरा दाखव बे पेपरात (टॉमच्या पेपरमध्ये ९०% पेपर गीअरवरच असायचा Happy )

--------------
The old man was dreaming of lions

सोलापुरी भाषा हा खरोखरीच संशोधकांना आव्हान वाटावं असा विषय आहे.

`का बे, वाटेत का उभारलास?' [= रस्ता आडवून का उभा राहीलास] हे फक्त इथेच ऐकायला मिळतं.
'मेरे पीठकू डोले हैं क्या' [= माझ्या पाठीला डोळे आहेत का? म्हणजेच मला मागचं कसं दिसणार?]
'अशेंगा, अशेंगा' = असेल, तसंहि असेल.
हे वाक्प्रचारसुद्धा तुम्हाला दुसरीकडे ऐकायला मिळायचे नाहीत.

पण एक खरं की सिनेमावर प्रेम करण्याची एक घट्ट आणि जुनी परंपरा ह्या शहराला आहे. कदाचित त्यामुळेच मला वाटत आलंय की 'माझी गीतयात्रा' सारखं रसीलं पुस्तक लिहीणारे माधव मोहोळकरांसारखे व्यासंगी लेखक फक्त सोलापुरांतच पैदा होऊ शकतात. त्यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं पण त्यांच्या तोडीचे असे अनेक हौशी आणि व्यासंगी सिनेसौकीन सोलापुरच्या मातीत जन्मले आहेत, की ज्यांनी कधी लेखणी नसेल उचलली पण त्या प्रत्येकाकडे माहितीचा आणि किश्शांचा प्रचंड साठा आहे.

दुसरं म्हणजे, यांच्या सिनेमाच्या आठवणी नेहमी शालेय आणि कॉलेज-जीवनाशी निगडीत असतात. म्हणजे असं की, "नववीची परीक्षा तोंडावर येऊन ठेपलेली आणि नेमका 'कोहीनूर' लागला, हालत एकदम खराब झाली, बे", किंवा "सहावी झाल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीत मामांच्या कडे इंदूरला गेलो होतो. काय सांगू बे, तिकडे 'जिस देशमे' ला सेन्सॉरचे कट लागले नव्हते. 'हाय हाय दिलकी हालत शराबी' म्हणजे तुकडा, बे. तुम्हाला इकडे अर्धीसुद्धा पद्मिनी नसेल मिळाली बघायला", किंवा " 'गाइड' मुळे एफ.वाय.ला ड्रॉप घायला लागला" असे किस्से चवीने सांगणारी माणसं, किंवा "रफीच्या नखाची सर तुमच्या किशोरकुमारला नाही" ह्या मुद्द्यावरून एकमेकांच्या गचांड्या धरणारे संगीत-शौकीन याच गावात भेटतील, दुसरीकडे मिळणं कठीण.

एक मात्र खरं की मंगळवेढ्याचे जोंधळे, पापडासारख्या पातळ आणि कुरकुरीत ज्वारी-भाकर्‍या, शेंगा-चटणी आणि विजापूर वेशीत मिळणारं 'भाजलेलं मटण' ह्या अस्सल सोलापुरी पदार्थांना जगाच्या पाठीवर कुठे तोड नाही.

बापू करन्दिकर

मस्त लिहीलय.
ते शेंगदाणा चटणीच्या बाबतीत तर अगदी अगदी, सोलापुरी चटणी नं. १. Happy

आगाऊ, मस्त लिहिलंय!! लै आवडलं ! सोलापूर 'भ्'कारातल्या शिव्यांसाठी प्रसिध्द असून त्याबाबतीत नागपूरचं सख्ख भावंड आहे असं ऐकीवात आहे. Proud

..............
कुणा आवडे चकली, कुणा कानोल्यात सुख; दिवाळीच्या फराळाचा, माझ्या पोटोबाला धाक!!!! Proud

मस्त बे! अगदी बेस्ट जमलय बघ. आम्ही पण गावाकडची उखळात कांडलेल्या चटणीसाठी अगदी अतुर....

लै भारी..
उत्तम लिहिलय
सुप्रजा पावभाजी हा ही माझा तेवढाच आवडता मुद्दा आहे.

मल्टिप्लेक्स बद्दलचा मुद्दा अगदीच पटला.

वाक्प्रचारांबद्दल बोलायचे तर "उडी खाल्ली" "त्यानी असच करतय बग" आणि "आ..उगी? ज्यादा शानपत्ती करायला का?" आठवत आहे.

सोलापूरच्या मुलींबद्दल नाही का काही? >>>>

आहे की... सोलापुरातल्या अर्ध्या अधिक थिएटर्सना मुलींचीच तर नावं आहेत... उमा, आशा, उषा, मीना, कल्पना... Proud

का बेsssss, देशपांडेगुरुजींना विसरला काsss? महाराष्ट्राचा पहिला हास्यसम्राट आमच्या सोलापुरनं दिलाय. बाकी शेंगाचटणीच्या आठवणीने मात्र तोंडाला पाणी सुटलं .
भाग्यश्रीचा वडा आणि नसलेची शेंगा चटणी आणि सात रस्त्याची डिस्को भजी.
लाळ गळायला लागली यार.

विशाल कुलकर्णी.
नवी मुंबई.

मनापासून लेखाचे स्वागत केल्याबद्दल सर्वांचॅ धन्यवाद!!!!
तरी गड्ड्याची जत्रा हा मुद्दा राहिलाच.
<<<तेव्हढं शुद्धलेखनाचं बघ बे!>>>
जरुर,हा माझा पहिलाच प्रयत्न होता,सुधारणा नक्कीच होईल.
शुभ दिपावली.!!!!!

*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

कसल भारी लिहीला बे ... एकदम परफेक्त

सोलापूर पाहील तुमच्या सगळयांच्या कृपेने. मजा आला !!!

काय सांगायलास बेSSSSS!! Happy
aagaau.. मस्त लिहिलस कि रे एकदम. आम्ही सोलापूरकरच बरं का! फूल्टू आठवणी जाग्या केल्यास बेSS दुनिया भारी वाटल समज!!
तन्या.. कुर्डुवाडी माझं मूळ गाव आहे रे.. आपली भेट कूठे झालिये कि काय.. (विचारी चेहरा)

बाकी सोलापूरच्या सगळ्याच गोष्टि एकदम खास सांगितल्यास मित्रा.
शेंगादाण्याची चटणी.. अगदी अगदी!! (लांबोटिला एस. टी. थांबली कि एकच झुंबड उडते लोकांची हि चटणी घेण्यासाठी) ईथल्या शेंगादाण्याला तेल सूटते कूटले कि, त्यामुळे मस्त मुद्दा चटणी होते आणि चवही अप्रतिमच आहे. पूण्यातल्या शेंगादाणे कूटले तर नूसते 'भकर भकर'.. कोरडेच (ओलावा नाही बघा इथे :)).

संघमित्रा.. सोलापूरची आहेस कि काय तू... पार्क वरची भेळ... Happy
आमचा 'सुभद्रा' ला अड्डा असायचा अन पार्क चा कट्टयावर !!

आगाव, श्रिनिवासला / श्रीलक्ष्मीला कधी चित्रपट बघितलायेस का?
मी तिथे घराना मोगडु पाहीला होता. (फक्त पाहीलाच होता, ऐकला नव्हता, कुणाला कळतय?) Biggrin
साउंड सिस्टीम आणि डासांची गुणगुण गाणी असेही काही ऐकु देत नाहीतच. :- P
____________________________________________

कृष्णासारखा सखा पाठीशी असेल तर येणारी संकटेही असामान्यच हवीत.
संकटे जर सामान्य असतील तर तो कृष्णाच्या देवत्वाचा अपमान ठरेल ना !! Happy

आगाउ.. जबर्‍या लिव्हल की ओ तुम्ही.. म्ह्न्जे कोलापुरी भाश्येत... एकदम नादखुळाच की ओ Wink
सोलापुरी भाषेत काय बे..ये असत का बे...हे मात्र पंचेस आमच्या सोलापुरी मित्रांकडुन अनेक वेळेला ऐकले आहेत..

खासच लिहिले आहे.. Happy

०-------------------------------------------------०
नेहेमीच डोक्याने विचार करु नये, कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना, स्वप्नांचा गाव द्यावा

विशाल,याच दोन काय पण लक्ष्मिनारायण आणि शारदामधे देखील शिणेमे पाहिले आहेत.(शारदामधे कसले सिनेमे लागतात ते फक्त 'जाणकार' सोलापूरींना माहित आहे Wink )
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

सोलापूर च्या चटणीवाणी झणझणीत लिहिलास कि बे !
>>मल्टीप्लेक्स नाव ही कुणाला माहिती नसल्यापासुन ती इथे आहेत.त्यामुळे सिनेमाला जाउन तिकीट मिळालं नाही म्हणुन परत येणं इथं पाप समजतात.हा नाही तर तो कोणतातरी बघायचाच.त्यामुळे सहसा कुठला सिनेमा इथं फ्लॉप होत नाही.
शम्भर टक्के !
जाता जाता : १९३० मध्ये तीन दिवस सोलापूरने स्वतन्त्र्य अनुभवले होते.

.(शारदामधे कसले सिनेमे लागतात ते फक्त 'जाणकार' सोलापूरींना माहित आहे )
कसला ज्ञानी आहेस रे Wink

____________________________________________

कृष्णासारखा सखा पाठीशी असेल तर येणारी संकटेही असामान्यच हवीत.
संकटे जर सामान्य असतील तर तो कृष्णाच्या देवत्वाचा अपमान ठरेल ना !! Happy

विजापूर मध्ये कोणी मा.बो. कर आहे का? कळवल्यास आभारी होईन.

Pages