एका वेदनेची गोष्ट...

Submitted by मी मुक्ता.. on 8 April, 2013 - 05:53

तशी ती पहिल्यापासूनच हळवी.. बर्‍यापैकी स्वतःत राहणारी, तरी संवेदनशील.. नक्की कधी हे नाही सांगता येणार पण खूप आधीची आठवण म्हणजे हृदयनाथांचे आर्त स्वर लेवून भेटायला आलेल्या ग्रेसच्या गहिर्‍या निळ्या दु:खाची.. प्रेमातच पडली ती त्या वेदनेच्या.. जसजसे वय, समज आणि जाणिवा वाढत गेल्या तसतसे ह्या दु:खाच्या वाटेवरचे इतर प्रवासीही सोबती झाले.. साहिरचं चिरविरहाचं दु:ख, गुलजा़रचं चंद्रमौळी दु:ख, गुर्टूबाईंचं ते असं आर्त स्वरात "कदर न जाने मोरा सैया" म्हणणं, गुलाम अलींचं मनाचा तळ ढवळणारं "चुपके चुपके..", आमोणकरांची भैरवी, मेहदी हसनने गायलेला मिर्झा गालि़ब.. एकेक प्रवासी भेटत गेले तसं तिचं ते दु:खात विरघळून जाण्याचं वेड पण वाढत गेलं.. ती रंगीबेरंगी राजवर्खी, घनगूढ लोभसवाणी, बघता बघता मनाच्या आरपार जाणारी वेदना जगण्याचा तिने ध्यास घेतला. वेड्यासारखी ती शोधत राहिली ती आयुष्याच्या प्रत्येक क्षणात दु:खाचे कवडसे, मागत राहिली आयुष्याकडे पंचप्राण आकर्षून घेणारं दु:ख.. किंवा असं दु:ख ओंजळीत घालू शकेल असा कोणीतरी..
कधीतरी एकदा जागी झाली या वेडातून तर ओंजळीत उरलेले फक्त ओबडधोबड, कुरुप दगड-गोटे..त्याक्षणी तिला जाणवलं, पदरी पडलेल्या या भयानक दु:खापासून आता सुटका नाही आणि या दगडांना तासून, घडवून सुबक मूर्ती बनवाव्या अशी आपली प्रतिभाही नाही...
"खोटे... खोटे... खोटे..." ती स्वतःशीच म्हणाली..
"खोटे असतात सगळेच कलाकार.. का?.. का म्हणून वेदना अशी सजवून, मढवून समोर ठेवतात आपल्या? आयुष्य आपल्याकडे जे उघडनागडं दु:ख फेकतं, ते कुठे असं सुंदर असतं? आणि शब्दांची वस्त्र चढवून, सुरांची झालर लाऊन समोर येणार्‍या दु:खाच्या या फसव्या सौंदर्याला बळी पडतो आपण मूर्खासारखे.. जितकी उंची वस्त्र, जितकी भरजरी झालर, तितके जास्त शरण जातो त्याला.. तितके जास्त ओढले जातो त्याच्या आकर्षणात... पण आता खूप झालं.. बास्स.. अजून नाही.. परत नाही.. आता साक्षात रतीमदनाचं रुप घेऊन जरी वेदना समोर उभी राहिली तरी तिला भुलायचं नाही.." ती मनोमन ठरवून टाकते..
इतक्यात ब्रह्मपुत्रेकाठच्या उत्कट स्वरात बांधलेला 'गुलजार', लताच्या आवाजात कानी येतो..
"ओ मोरे चंद्रमा, तोरी चांदनी अंग जलायें..
तोरी उंची अटारी, मैने पंख लिये कटवायें.."
आणि स्वत:च्याही नकळत त्या जीवघेण्या वेदनेला ती पुन्हा शरण जाऊ लागते....

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users