बेटे, फोन तो सिर्फ बात करने के लिए होता है..?(!)

Submitted by इब्लिस on 7 April, 2013 - 13:27

मोबाईल कोणता घ्यावा या धाग्यावर एक प्रतिसाद टाईप करताना डोक्यात अचानक एक किडा वळवळला. म्हणून हा धागा. किड्याची समरी वर टायटल मधे आहेच. इतके बोलून, नमन झाल्यानंतर उरलेले घडाभर तेल पुढे ओततो -

फार फार वर्षांपूर्वी, म्हणजे सुमारे ४थी-५वी मधे असताना आमच्या अख्ख्या कॉलनीत एक फोन होता. तो देखिल लँडलाईन. फोन कसा करतात याची ओ की ठो जाणकारी आम्हाला नव्हती. फोनवाले घर शेजारीच होते. वडीलांच्या ऑफिसात फोन ऑफकोर्स होताच. एकदा आईने मला शेजारी जा अन तुझ्या वडिलांना अमुक निरोप फोन करून सांग असे काम सांगितले.

मी नेहेमी खेळायला शेजारी जात असलो, तरीही फोन या प्रकरणाशी त्या काळी शून्य संबंध असल्याने, फोन कसा 'करतात' याचे शून्य ज्ञान होते. शेजारी गेलो. रिसिव्हर उचलून कानाला लावून बोलतात हे पाहून ठाऊक होते. तसा तो कानाला लावला, अन मी फोन उचलला आहे म्हणजे पलिकडून वडीलच ऐकणार हे नक्की असे गृहित धरून घाईघाईत निरोप सांगून फोन ठेवला अन घरी परत आलो. माझ्या नशीबाने हा सगळा प्रकार कुणीही पाहिला नव्हता. अन वडिलांना तो निरोप न मिळाल्याने काही फार फरकही पडलेला नव्हता.

त्या काळी फोनला 'ऑपरेटर' सिस्टिम होती. म्हणजे फोन उचलून कानाला धरून ठेवायचा. यथावकाश तिकडून ऑपरेटर काका/काकू फोनवर 'नंबर प्लीज' असे आपापल्या स्वभावानुसार विचारत. कुणी वस्सकन नंबर? इतकंच, तर कुणी नाजुकपणे प्लीऽज. नंबर माहीती नसला तरी सगळे मिळून ४ आकड्यांत नंबर असल्याने कॉमन नंबरवाल्याचं नांव सांगितलं तरी चालत असे, फोन जोडला जाई. नंबर माहीत नसेल, तर ते ऑपरेटरच स्वतः डीरेक्टरी एन्क्वायरीचे काम करून फोन जोडून देत असत.

यासोबतच्या 'एसटीडी' कॉलच्या कथा वेगळ्या अन सर्वांना ठाऊक आहेत. ऑर्डीनरी, अर्जंट, पीपी, लाईटनिंग इ. कॉलचे प्रकार असत. पण तो वेगळा विषय.

काही वर्षे गेली. फोनच्या डब्ब्यावर डायल आली. फोन नंबर ४ आकडी वरून ६ आकडी झाले. आजकाल एसटीडी कोड धरून १० आकडी झाले आहेत. फोनचे डब्बे कॉर्डलेस झाले आहेत. मधे मोडेम लागले आहेत.

दरम्यान आम्ही शिक्षणासाठी पुण्याला गेलो. परत आलो. तर वर्षा दोन वर्षांत या टेलिकम्युनिकेशन लाईनमधला एक 'पेजर' नामक प्रकार आला. अन फक्त वर्ष दोन वर्षे टिकला. एक छोटी डब्बी २-३ हजारांना विकत घेऊन कंबर-पट्ट्याला बांधून फिरणे, अन त्या डब्बीवर टेक्स्ट मेसेज मिळणे असे याचे स्वरूप होते. मेसेज पाठवणारा पेजर कंपनीला 'टेलीफोन' करून अमुक नंबरला तमुक मेसेज पाठवा असे सांगत असे. हे लै मॉडर्न वगैरे होते, पण लवकरच एक 'मोबाईल' नामक प्रकार आला, अन पेजर मेला. जात्या काळात तर २ शर्ट विकत घेतले तर १ पेजर फ्री असल्या देखिल स्कीम्स होत्या, पण ती टेक्नॉलॉजी मेलीच हे खरे.

तेंव्हाचा मोबाईल जहाल महाग. आऊटगोइंग ९ रुपये प्रति मिनिट, अन इनकमिंग ३ रुपये प्रति मिनिट. असे लोकल कॉलचे भाव होते. सगळ्यात पॉप्युलर मॉडेल नोकिया २११०. ते पण १२-१४ हजारांना होते त्या काळी. (अवांतर : तेंव्हा सोने ३-४ हजार रुपये तोळा होते. प्लीज नोटच. या फोनची पहिली गिर्‍हाईक लोक्स पेजर सारखीच अ‍ॅनास्थेटिस्ट्स. यांचे अक्खे दुकान फोनवर चालते. एक 'डबा बाटली'* अन एक फोन. असे भांडवल आमच्या कॉलेजकाळी असे. ओटीचा फोन एंगेज = अ‍ॅनास्थेटिस्ट इन ओ.टी. Wink )

मग हळू हळू मॉडेल्स बदलू लागली. मी पहिला घेतला तो सीमेन्सचा हा फोन होता :

तो जुना झाल्यावर बंधूराजांनी ढापला, दरम्यानच्या काळात एक सॅमसंगचे सेक्सी मॉडेल होते.
हे पण बंधूराजांनी कुठेतरी गायब केले. (-फोटो सापडल्याने अपडेट केले)

नंतर सोनी एरिकसन घेतला. नंतर तो मातोश्रींना दिला, अन मी माझ्यासाठी एक टचस्क्रीनवाला चायना घेतला. तो चायना फोन कन्यारत्नाने वापरून सध्या घरी एका ड्रॉवरमधे पडून आहे. सोनी पण कुठेतरी पडलेला असेल. मधेच कधीतरी एक नोकिया घेतला होता. फोनवर क्यामेरे अन रंग आले तेव्हा. तो काही केल्या माझ्या काँप्युटरशी 'बोलेना' मग एका ज्युनियरला गिफ्ट देऊन टाकला. असे ५-६ तरी हँडसेट बदलून झालेत.

सध्या इतर ३ फोन 'माझे' आहेत. एक गॅलॅक्सी टॅब-२, एक मायक्रोमॅक्स कॅनव्हास एचडी, एक गॅलॅक्सी ३ नामक भरपूर जुना ( सुमारे २-४ वर्षे) स्मार्ट फोन.

तर याच गॅलॅक्सी ३ ला मी पुन्हा वापरात आणला तो सीसी टिव्ही म्हणून. शिवाय त्याला मी रेडिओ म्हणूनही वापरतो. एक जुनाट हेडफोनची पिन खुपसली की रेडिओ चालू होतो.

तर,
हे नमनाचे घडाभर तेल ओतून झाल्यावर मित्रहो, नॉस्टाल्जिया अपार्ट,

आपण सगळेच लोक फोन बदलतो. कधी हौस म्हणून, कधी गरज म्हणून, तर कधी नाईलाज म्हणून. जुन्या झालेल्या / स्पेअर फोनचे तुम्ही नक्की काय करता? आहे त्या फोनचे 'फोन' सोडून इतर काय उपयोग करता? अन हो, हरवला, तर त्या फोनमधल्या कार्ड्/डेटा च्या सुरक्षितते साठी काय करता? हे देखिल ऐकायला आवडेल.

स्पेसिफिकली अँड्रॉईड फोनबद्दल सांगितलेत तर मला जास्त उपयोगी होईल.

जसे,

माझा टॅब मी बीएसएनएलचा डेटा प्लॅन (३०० रुपये = ८ जीबी ३ महिन्यासाठी २जी) असे कार्ड वापरून कारमधे नॅव्हिगेशन सिस्टिम, लॅपटॉपला टीथरींग हॉटस्पॉट, माझ्या गॅलॅक्सीच्या कॅमला रिमोट व्ह्यूअर, प्रेझेंटेशन्स साठी लॅपटॉपचा पॉवरपॉइंट रिमोट इ. कामांसाठी वापरतो.

सगळ्या फोन्स वर पुस्तके वाचतो. पेशंटचे, आजारांचे फोटो काढतो. एक्सरे, एम आर आय, सी.टी. इ. इमेजेस मित्रांसोबत शेअर करून सेकंड ओपिनिअन मागतो. प्रेझेंटेशन्स/अभ्यासा साठी डेटा कलेक्ट करतो. बारकोड्स स्कॅन करतो. व्हॉट्सॅप वापरतो. फेसबुक, मायबोली वापरतो. अनेक..

तुम्ही काय-काय करता?

इ-ब्लिस्..

(*डबा बाटली = ईथर वापरून भूल देण्यासाठी लागणारी यंत्रणा. हिला गमतीत डबा बाटली म्हणत.)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इ ब्लिस नाव सार्थकी आहे .जे जे उपयोगी असते तेच खरे सुंदर .२००५ मध्ये घेतलेला नोकिआ ११०८ अजूनही टॉर्चसकट चालतो ,सात दिवस स्टैंडबाय राहतो ,टिएफटि स्क्रीनमुळे उन्हात वाचता येतो .आणि हो विकत घेतांना दुकानदार म्हणाला होता अंकल ये फोन सिर्फ बात करने के लिए नही ,इस मेँ टॉर्च भी है ।

Pages