स्मृतींची चाळता पाने......अर्थातच Down memory lane!

Submitted by मानुषी on 7 April, 2013 - 02:13

स्मृतींची चाळता पाने......अर्थातच Down memory lane!
बऱ्याच दिवसांनी सांगलीला दोनच दिवस पण निवांतपणे रहायला मिळालं. माहेरघरची बाग अजून तरी...म्हणजे उन्हाळ्याची सुरवात होती त्यामुळेच... चांगली हिरवी दिसत होती. नारळाची ७/८ झाडं घरावर अगदी छत्र चामरं ढाळत होती.

बागेत पेरू, रामफ़ळ, सिताफ़ळ, चिकू, लिंबू अशी फ़ळझाडं आणि असंख्य सुवासिक आणि शोभेची फ़ुलझाडं!


यातलं लाल गावठी चाफ़्याचं झाड अगदी बहरलेलं! असं वाटंत होतं की आपले हजारो हात वर आकाशाच्या दिशेने फ़ेकून, पसरून कुणी उभं आहे. आणि म्हणतंय लुटा ही दौलत! त्या हाताच्या प्रत्येक बोटाला चाफ़्याच्या कळ्याफ़ुलांचे लाल गुलाबी गुच्छ लगडले आहेत! जर का या झाडाचा एरियल व्ह्यू घेतला तर एक लाल रंगाची छत्रीच उघडल्याचा भास होईल.


चिकूच्या झाडाला चिक्कू अगदी पानोपानी लगडले होते. झाडाखाली पक्ष्यांनी अर्धवट उष्टावलेल्या चिक्कूंचा सडा पडलेला होता.
बेलाच्या झाडाला बेलफ़ळंही झाडावर हिरवे पिवळे चेंडू लटकले असावेत तसे लटकलेले होते.

लहानपणी घरात वडिलांनी करून ठेवलेला बेलफ़ळांचा मुरांबा कायम असायचा. कुणाच्याही पोटात जर काही गडबड असेल तर लगेच थोडासा घ्यायचाच! पोट हमखास ठिकाणावर! गवती चहा, ब्राम्ही, अडुळसा, कोरफ़ड अश्या किती तरी औषधी वनस्पती या बागेत आहेत. म्हणूनच डॉक्टरकडे जायची फ़ारशी कधी वेळ येत नसे. वडिलांनाही त्यांच्या व्यवसायाव्यतिरिक्त, अशी घरगुती मलमं, ताकातलं पाचक चूर्ण, काढे असं बनवण्याची आवड होती.

माहेरघर सांगलीच्या राजवाडा या भागात! ही सर्व जागा पूर्वी सांगलीच्या राजेसाहेबांच्या मालकीची होती. नंतर त्यांनी त्यानी त्याचे प्लॉट्स पाडून काही आणे पर स्क्वेअर फ़ीट् या भावाने विकले. त्यातच वडिलांनी हा प्लॉट घेऊन घर बांधले.
घराबाहेर पडल्यावर समोरच्या रस्त्याकडेची आणि राजवाडा पटांगणातली गुलमोहोर, शिरिषाची झाडं इतक्या वर्षांनीही अगदी जिथल्या तिथेच होती. फ़क्त गुलमोहोर आत्ता निष्पर्ण अवस्थेत होता. शेंगा मात्र खूपच लटकलेल्या होत्या. हाच गुलमोहोर पुढे ऐन उन्हाळ्यात अगदी वणवा पेटल्यासारखा फ़ुलतो.
आणि शिरीष मात्र टवटवीत, बहरलेला! हा वृक्ष आत्ता अगदी डेरेदार दिसत होता. केवढी तरी सावली देत होता. आणि गुलाबी रंगाचे नाजुक केसर असलेली फ़ुलं हिरव्याकंच पानांवर उठून दिसत होती. याचं शिरीष हे नाव खूप उशिरा कळलं. आम्ही त्याला आईस्क्रीमची फ़ुलं म्हणायचो!


या शिरिषाखालूनच अगणित वेळा ये जा केली होती. कारण जिवलग मैत्रिणीच्या घराकडे जाण्याचा रस्ता याच शिरिषाच्या सावलीतून जायचा! आम्हा दोघींची घरं अगदी हाकेच्या अंतरावर.
घरासमोरचा एक छोटा रस्ता पार केला की राजवाडा ग्राउंड. याच ग्राउंडमधे आम्ही गुरूगुरू सायकली(दुचाकी) फ़िरवायचो. कधी डब्बलसीट, कधी दोघी मैत्रिणी आपापल्या सायकलींवर पण बरोबरच! घरापुढून जाणारा रस्ता लांबून, काही घरांच्या एका वसाहतीला वळसा घालून, गोल फ़िरून पुन्हा घरापुढे संपायचा. त्या रस्त्यावरून गोलगोल कितीही चकरा मारल्या तरी कधीच कंटाळा यायचा नाही. कारण सायकलींच्या वेगाबरोबरीनेच तोंडच्या गप्पाही अगदी वेगात रंगलेल्या असायच्या.

या ग्राउंडमधेच सांगलीचे संस्थानिक हिज हायनेस राजा चिंतामणराव यांचं गणपती मंदिर आहे. याला "दरबार हॉल" म्हणून ओळखतात.


मेन रोडवरून मिरजेकडून आलं की पोस्ट ऑफ़िसवरून राजवाडा चौकातून पुढे डावीकडे आत वळलं की कोर्टाच्या इमारती आहेत. तिथून आल गेलं की आधी एक चौकोनी कमान लागते.


त्या चौकोनी कमानीतून पुढे गेलं की डावीकडून हा रस्ता तीन कमानीतून पुढे दरबार हॉलपर्यंत जातो.

या कमानीच्या दोन्ही बाजूच्या भिंतींना पुरातन कालातले दोन अजस्र लोखंडी दरवाजे आहेत. सध्या हे भिंतीतच पॅक आहेत. पण पूर्वी युद्धाच्या वेळी हे बंद करत असत. या दरवाज्यांच्या वरच्या बाजूला नजर गेली की अजस्र आकाराचे अणकुचीदार लोखंडी खिळे दिसतात. ते या दरवाज्यांवर अश्या उंचीवर बसवले आहेत की शत्रूच्या हत्तीने या बंद दरवाज्यावर धडक दिली तर हे खिळे बरोब्बर त्याच्या गंडस्थळात (मस्तकात) घुसतील. आणि हत्ती नामोहरम होऊन परत जाईल.

या भागाला राजवाडा म्हणूनच ओळखतात. या भागाच्या चहुबाजूंनी पूर्वी खंदक होता. आणि त्यात पाणी असायचं. अगदी आम्ही शाळा कॉलेजात असेपर्यंत तरी हा खंदक होताच.........अगदी चहू बाजूंनी नाही पण काही भागात तरी होता. नंतर हा खंदक हळूहळू बुजवला.

आता या कमानीतून आत गेलं की हा समोरचा बुरूज आणि त्यावरचा हा गणराया दिसतो.


तिथून आत गेलं की या तीन कमानी दिसतात. या बुरुजाभोवती बरीच सरकारी ऑफ़िसेस आणि टायपिंग, झेरॉक्सची दुकानं वगैरे दिसतात.


या तीन कमानीतून आत गेलं की वर उल्लेखलेलं मोठं ग्राउंड आणि ग्राउंडच्या त्या टोकाला दरबार हॉल दिसतो.

या दरबार हॉलच्या बाहेर दोन पुरातन कालातल्या तोफ़ा ठेवल्या आहेत.

आम्ही दोघी मैत्रिणींनी या तोफ़ांवर बसून कित्येक संध्याकाळी एकमेकींशी "मनीचे हितगुज" करत टाइमपास केलेला आहे. पण आता वाटतं की तो टाइमपास नसून आपल्या प्रिय जनांच्या सहवासात घालवलेला क्वालिटी टाईम होता. टीव्ही आणि कंप्युटरने माणसाचा ताबा घेण्यापूर्वीचा काळ होता तो! आणि आता वाटतं की याच परिसराने आमचं बालपण आणि वाढत्या वयाचा कालखंड समृद्ध केला आहे. आणि ते एकमेकींच्या सहवासातले एकेक क्षण वेचत, हुंदडत आम्ही मोठ्या झालो. त्या सुखद सोनेरी क्षणांच्या स्मृती मनात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.
या तोफ़ांभोवती आता दिसते आहे ती हिरवळ तेव्हा नव्हती. तेव्हा या तोफ़ांना पॉलिश वगैरे नसायचं. आता मात्र छान पॉलिश वगैरे करून अगदी चकचकीत काळ्याभोर केल्या आहेत. हे सगळं कालांतराने विकसित केलं गेलं आहे. दरबार हॉलच्या दारात उभं राहिलं असता डाव्या बाजूला कलेक्टर कचेरी आहे.

आणि या निळ्या रंगाच्या बंद दारातून अगणित वेळा ये जा केली होती. आत गेल्यावर चहुबाजूंनी काळ्या फ़रशीचे ओटे होते. आणि मध्यभागी एक विस्तृत चौक.

या जागेच्या मागील भागात खरे भटजींचं कुटुंब रहायचं. त्यांची मुलं आणि आम्ही मैत्रिणी या चौकात खूप खेळायचो. याच जागेत बऱ्याच वेळेला हरताळका जागवलेलीही आठवतेय. मध्यरात्रीपर्यंत झिम्मा, फ़ुगडी आणि सगळे खेळ खेळून दमल्यावर तिथेच दहिभात खाऊन उपास सोडल्याचंही अंधुक आठवतंय!
त्या काळ्या थंडगार गुळगुळीत फ़रश्यांवर गजगे(सागरगोटे) खेळताना काय मजा यायची. एक्खई, दुक्खई......करत शेवटी गजगा इतका उंच टाकायचा की तो खाली येईपर्यंत खालचे सगळे गजगे एका सपाट्यात मुठीत गोळा झाले पाहिजेत. एक पाय लांब आणि एक पाय गुढग्यात दुमडून बसलं की हळूहळू जमिनीवरच्या, गोळा करायच्या गजग्यांची संख्या वाढत जाईल तशी या खेळाला एक सुंदर लय प्राप्त होत जाते. आणि हळूहळू मन एकाग्र होत जाते. आणि एक झिंगच चढत जाते.
असे हे कित्येक खेळ आम्ही याच जागेत अगदी धुमसून म्हणतात तसे खेळलो.

सकाळच्या कोवळ्या उन्हात कॅमेऱ्याच्या साथीने फ़ेरफ़टका मारताना गतस्मृतींना उजाळा मिळाला.
आणि मनात आल्याशिवाय राहिलंच नाही................"सांगली बहु चांगली"!!!!!!!!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषी मस्त ग. तीन वर्षापूर्वीचा जाऊन आले सांगलीला. फोटो बघताना परत आठवण झाली:)

काव्यात्म लेखन आहे, आवडलेच!

प्रत्येक वाक्यात गावाबद्दलची आपुलकी दिसून येत आहे.

छान लेख आहे.

सागरगोटे किती वर्षात खेळलेच नाहीत. आता कधीतरी गावाकडे गेले की मुद्दाम घेऊन येईन म्हणजे लेकीलापण शिकवता येतील Happy

मस्त वर्णन.. लहान असताना एक कुतुहल असायचं राजवाड्यात काय चालतं वगैरे.. Happy
इचलकरंजीचा राजवाडा पण मस्त आहे.. कॉलेजमधे धम्माल नुस्ती..

मी पण सांगलीची .... आमचा शाळेला यायचा जायचा रस्ता हाच.... खूप दिवसात गेले नव्हते .... मीच सायकल चालवत जात आहे असे वाटले .... खूप छान...

सहिये मानुषी... खूप लहानपणी गेलेलो सांगलीला.. या प्रकारच्या वास्तू पाहिल्याचे अंधुक अंधुक आठवतेय.. पण त्या याच हे आता खात्रीने नाही सांगू शकत राव..

मानुषी, मस्तच. तुझ्या घराभोवती रुंजी घालणार्‍या आठवणी अगदी अगदी भावल्या. आणि प्रचित्रांसाठी मनापासून आभार.
माझ्या सासुबाईंना, नवर्‍याला वाचायला देणारय. त्यांचं वास्तव्य होतं सांगलीत.

मानुषी.. आम्हालाही तुझ्या आठवणींच्या गल्लीत फिरवून आणलंस ... खूप खूप आवडली तुझी लेन Happy
मैत्रीणी,लहानपणचे खेळ्,सायकल ची सवारी सर्व डोळ्यासमोर उभं केलंस... मस्तच गं!!!

काय समृद्ध बालपण होतं तुझं - लेखनही असं बहारदार की सगळंच्या सगळं डोळ्यासमोर उभं रहातंय अग्दी....

खूपच छान, मनापासून धन्स.....

मानुषीताई, मस्त मस्त! Happy
लहानपणापासून केवळ लग्नाकार्यांनाच सांगलीला गेलेली असल्याने. सांगली पाहणं झालेलंच नाही. आता हे फोटो घेऊन सांगली फिरून पाह्यला हवी.

छान फोटो आणि लेख. Happy

कोल्हापुरातच बालपण गेलं असुनही सांगलीला फार वेळा जाण झालं नाही.
एकदा एक शाळेतली सहल, आणि एकदा मित्रांबरोबर एकदिवसीय ट्रिप.
तेव्हा हरिपुरचा संगम आणि काही भागातली सांगली पाहिली होती.
Happy

खूपच छान! मिरजेला जाताना सांगलीच्या गनप्ती मंदिराला धावती भेट दिली होती. खरंच सम्रुध्द्द बालपण!

मानुषी, मस्तच! सगळी प्रचि सुंदर!

चिकु, बेलफळ, आणि नारळाचे विशेष आवडले! Happy

वर्णन देखिल छान! अगदी! Happy

मानुषी,
सुंदर सफर घडवली
मी पुर्वी शिक्षणासाठी सांगलीत २-३ वर्षे असुन देखील हे फारसं पाहायला मिळालं नव्हतं.
हा आणि इतर असा सांगलीचा सगळा ठेवा मला खुप अस्सल वाटतो

मी ज्यावेळी नागपुरला पहिल्यांदाच गेलो, काही महिने राहिलो त्या वेळी "सांगली आमची चांगली" अस सगळ्यांना सांगायचो,त्याची खुप वेळा प्रचिती आली म्हणुन. सांगली कडच्या माणसांमध्ये स्वाभिमान हा खच्चुन भरलेला आहे,हे नक्कीच जाणवतं

मस्त लिहिलं आहेत. फोटो छानच आलेत. फोटोत एकही माणूस/ गर्दी कशी काय नाही? Happy बहुतेक तुम्ही हा लेख लिहिणार असं माहित असल्यामुळे फोटोतही त्या काळासारखीच कमी गर्दी आहे वाटतं!

असं ऐकलं आहे, की हा संपूर्ण राजवाडा परिसर विकला आहे. इथेही आधुनिक इमारती उभ्या राहणार आहेत. त्यामुळे तुमच्या या फोटोंना आता ऐतिहासिक महत्त्व प्राप्त होणार आहे!

Pages