पापणीस ओल नाही

Submitted by अनुराधा म्हापणकर on 6 April, 2013 - 06:25

मतलबी जगी या, आसवास मोल नाही
कुणाच्याच कुणासाठी, पापणीस ओल नाही

मना शोधिसी का, अर्थ नात्यांचा, व्यर्थ आहे
हे लावणे जीवाचे, जरी वाटे की फोल नाही

फुका लाव आशा, तेथ, भेटली निराशा
संभाळ रे मनाला, की ढळणार तोल नाही

डोळ्यांस जे दिसे ते, मायावी डोह सारे
परी उथळ सर्वकाही, काहीच खोल नाही

जगणे तुझे नी माझे, बंदिस्त चौकटीचे
दुनियाच ही आताशा, राहिली गोल नाही

मतलबी जगी या, आसवास मोल नाही
कुणाच्याच कुणासाठी, पापणीस ओल नाही

- अनुराधा म्हापणकर
६ एप्रिल २ ० १ ३

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आवडली ही कविता अनुराधाजी.

हे काव्य मी असे वाचले.

मतलबी दुनियेमधे या आसवांना मोल नाही
आपल्यासाठी कुणाच्या पापणीला ओल नाही

व्यर्थ आहे,अर्थ नात्यांचा, मना तू शोधतो का
जीव लावावा जरी हे वाटणे बघ फोल नाही

लावली आशा जिथे,तेथे निराशा भेटलेली
हे मना सांभाळ ऐसे की ढळावा तोल नाही

जे दिसे डोळ्यांस ते ते,डोह मायावीच सारे
पण उथळ ते सर्व काही,एक सुद्धा खोल नाही

चौकटीच्या जीवनी बंदिस्त जगणे आपले अन
ही धरा सुद्धा अताशा राहिलेली गोल नाही

मतलबी दुनियेमधे या आसवांना मोल नाही
आपल्यासाठी कुणाच्या पापणीला ओल नाही

काव-काव

@काव काव... खरंच फार छान बदल आहेत. त्यामुळे कवितेचे टेक्श्च्रर आणखी स्मूथ (इंग्लिशबद्दल क्षमस्व) वाटते.
धन्यवाद !