भक्ति: सक्तीची आणि भपक्याची!!

Submitted by झुलेलाल on 6 April, 2013 - 00:05

होळीच्या दिवशी बाहेरही पडणं अशक्य असल्यानं वेळ घालवण्यासाठी काही ना काही ठरवावंच लागलं असेल. टीव्हीवरचे कार्यक्रम पाहात कुणी सुट्टी ‘विनाकारणी’ लावली असेल, तर कुणी गप्पाटप्पा करत वेळ घालवला असेल.. त्या दिवशी आदल्या दिवशीचं एक वर्तमानपत्र चाळताना दोन बातम्या पुन्हा डोळ्यासमोर नाचू लागल्या. एका बातमीत होळीच्या भक्तिरंगांची भपकेबाज उधळण होती, तर दुसरीत, ‘सक्तीच्या भक्ती’चे रंग विखुरले होते..

धर्माचे राजकारण आणि सणांचे ‘कॉर्पोरेटायझेशन’ सुरू झाले आणि देशात अचानक सणांचे महत्त्व वाढू लागले. सण हा बाजारपेठांच्या उभारीचा हुकमी एक्का ठरल्याचे सिद्ध झाले. दृक्श्राव्य माध्यमे आणि वर्तमानपत्रांतील जाहिरातींवरून सध्या कोणता सीझन आहे, हे ओळखायची सवय नकळत आपण जडवून घेतली. बाजारपेठांच्या गल्लाभरू युक्तीने त्याहीपुढे मजल मारली आणि सणांचाही बाजार सुरू केला. दसरा हा ‘विजयादशमी’चा सण राहिला नाही, आणि पाडवा हा ‘गुढीपाडवा’ राहिला नाही. दसरा-पाडवा हा केवळ सोने खरेदीचा सण म्हणून रूढ झाला आणि होळी हा रंगांचा, धुंदीचा उत्सव झाला. दिवाळी तर मौजमजेच्या आणि पैशाच्या उधळणीच्या असंख्य रंगांनी उजळून गेली. गणेशोत्सवासारखे सणही जाहिरातबाजीच्या कचाटय़ातून सुटले नाहीत. सणांच्या दिवसांनी बाजारपेठांचे खऱ्या अर्थाने सोने केले...

मग परंपरांचा विसर पडू लागला. श्रीमंतीच्या प्रदर्शनाचे दिवस म्हणजे सण असा पायंडा रूढ झाला. अशा परिस्थितीत, सामान्य स्थितीतील कुटुंबांचा मात्र कोंडमारा होत राहिला. प्रदर्शनाच्या या स्पर्धेत उतरवतही नाही आणि त्यातून बाजूलाही होणं शक्य नाही अशा विचित्र स्थितीत सापडली. सणांना, भक्ती नव्हे, तर सक्ती आणि भपक्याचे रंग चढू लागले..

दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रात, पारंपरिक महत्त्व ओळखून सणापुरती होळी साजरी करण्याचे भान सामान्य कुटुंबे दाखवत होती, तेव्हा दुसरीकडे मात्र भक्तीच्या नावाखाली भपक्याचे ओंगळवाणे प्रदर्शन सुरू होते. आसाराम बापू नावाच्या एका तथाकथित संताने भक्तांवर रंगांची आणि वारेमाप पाण्याची मनसोक्त उधळण केली आणि ‘संताघरी सुकाळ-दुष्काळ सारखेच’, असा जणू संदेश दिला. आसारामाच्या अंगणात होळीच्या रंगांची मुक्त उधळण होत असताना, अनेक कुटुंबे आपापल्या गावात हंडाभर पाण्यासाठी ताटकळत, टँकरकडे डोळे लावून बसली होती. आसारामाचे हजारो भक्त मात्र, जगाची दु:ख विसरून पाण्याचे फवारे झेलत धन्य होत होते.

..ही बातमी वाचताना, माझ्या डोळ्यासमोर आसारामबापूंचा ‘कृष्णावतारी’ फोटो उभा राहिला. बापूंच्या ‘सत्संगा’चे भपकेबाज सोहळे आठवू लागले, या सोहळ्यांच्या भव्य मंडपांची बापूंच्या कृष्णावतारी फोटोंच्या कमानींनी सजलेली प्रवेशद्वारे नजरेसमोर नाचू लागली. डोक्यावरच्या भरजरी पागोटय़ात मोरपीस खोवून मिश्कील डोळ्यांनी हसणारा तो चेहरा, ‘कृष्णावतार’ भासवण्याचा सक्तीचा प्रयत्न किळसवाणा वाटू लागला. मी वर्तमानपत्राचं पान उलटलं आणि लगेचच, ती विषण्ण बातमी पुन्हा डोळ्यासमोर आली. मी बापूंचा भपका विसरलो. नजर शून्य झाली आणि एका वेबसाइटवर कधीतरी बघितलेली असंख्य छायाचित्रं, जिवंत होऊन करुणपणे डोळ्यासमोरून सरकू लागली..

उत्तर प्रदेशातल्या वृंदावनात त्याच दिवशी होळीचा आगळा सण साजरा होत होता. वृंदावन म्हणजे, गोपाळकृष्णाचं गाव. इथे असंख्य भाविक भक्तिभावानं येत असतात. वृंदावनातील देवळांना भेटी देतात, भगवान कृष्णापुढे भक्तिभावाने मस्तक झुकवितात, आणि पुण्य गाठीशी बांधण्यासाठी दानधर्मही करतात. इथे वावरताना, आजूबाजूला कृष्णभक्तीच्या भजनांचे मंजूळ सूर सतत कानावर पडत असतात. आसपासच्या आश्रमांमधून ओघळणाऱ्या या सुरामध्ये भक्तिभाव असतोच, पण कान देऊन ऐकलं, तर त्या सुरांमधून कारुण्याचे झरेही झरझरत असतात. बाहेरगावांतून वृंदावनात येणारे भाविक भक्तीनं भारलेल्या या वातावरणामुळे धन्य समजून पुण्य पदरात पडल्याचं समाधान साधतात.

या सुरांच्या कारुण्याची कहाणी काही दिवसांपूर्वी मी लोकसभेच्या कामकाजाच्या तपशिलात पाहिली होती. महिला आयोगानं या कारुण्याचा व्यापक शोध घेतला होता आणि न्यायालयानंही त्याची गंभीर दखल घेतली होती. हे सूर केवळ भक्तीच्या भावनेतून पाझरणारे सूर नाहीत, तर पोटाची खळगी भरण्याच्या आणि आला दिवस तगण्याच्या नाइलाजातून निघणारे ‘सक्तीच्या भक्ती’चे सूर आहेत, हे तेव्हाच स्पष्ट झालं होतं. पतीच्या निधनानंतर वैधव्य आलेल्या आणि कुटुंबात नकोशा होणाऱ्या असंख्य महिला निराधार अवस्थेत घराबाहेर पडतात आणि जगण्याची वाट शोधत वृंदावनात दाखल होतात. अशा विधवांना आश्रय देणारे अनेक आश्रम वृंदावनात आहेत. रक्ताच्या नात्यांनी नाकारलेल्या या महिलांना इथे आश्रय मिळतो आणि आपलं उरलेलं एकाकी आयुष्य ढकलत त्या या आश्रमांच्या भिंतीआड दिवस मोजू लागतात. बाहेर ऐकू येत असतात, ते आयुष्याचं कारुण्य लपेटलेले त्यांचे केविलवाणे सूर. या विधवांना इथे केवळ ठाकूरजीची, म्हणजे कृष्णाची सेवा करावी लागते. मंदिरांच्या वाटेवर भजने आळवली, की हाती पडणाऱ्या कूपनमुळे त्यांना जेवण मिळतं. अशा शेकडो महिला वृंदावनात आश्रमांमध्ये ठाकूरजींच्या सेवेत स्वत्व हरवून राहात आहेत. त्यांना सामाजिक अस्तित्व नाही. ओळखही नाही. या महिलांना माताजी म्हणतात, पण कुटुंबांतील मातेचं स्थान नशिबानं केव्हाच हिरावलेलं असतं..

आसारामबापू जेव्हा रंगांची उधळण करून भक्तांना भपक्याच्या रंगात न्हाऊमाखू घालत होते, त्याच काळात, आश्रमांच्या भिंतीआड राहून केवळ भक्तिरसाने ओथंबलेली कृष्णगीते गाणाऱ्या या महिलांसाठी कित्येक वर्षांनंतर एक वेगळा दिवस उजाडला होता. या महिलांनाही होळीच्या रंगात रंगविण्याची एक कल्पना पुढे आली आणि त्या नीरस, हरवलेल्या आयुष्यांवर काही क्षणांच्या खुशीचे रंग उमटले. उपेक्षित, वंचित आणि दुर्लक्षित विधवांनी परस्परांवर रंगीबेरंगी फुले उधळत मुक्तपणे होळी साजरी केली होती..

होळीच्या रंगांची उधळण आता संपली आहे. आता कदाचित त्या विधवा पुन्हा आश्रमांच्या भिंतीआड जाऊन, कृष्णगीतांची उधळण भाविकांवर करत असतील. आयुष्यात अचानक, अनपेक्षितपणे उगवलेल्या त्या रंगोत्सवाच्या आठवणींची एक शिळी शिदोरी आता त्यांच्यासोबत असेल..

http://www.lokprabha.com/20130412/zero.htm

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. त्यांना या उत्सवात सहभागी करुन घेण्याची प्रथा आताची आहे का ? "वॉटर" चित्रपटात तसे दृष्य आहे आणि तो काळ तर पुर्वीचा आहे.

चांगला लेख.

बर्‍याच महिन्यांनंतर (वर्षांनंतर??? ) लेख दिसला तुमचा माबोवर.

झुलेलाल उर्फ दिनेश गुणे,

आपला लेख ठीक वाटला. मात्र पूज्य आसारामबापूंवर का ताशेरे झाडलेत ते कळलं नाही.

विशेषत: हा परिच्छेद विपर्यस्त वाटला.

>> दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रात, पारंपरिक महत्त्व ओळखून सणापुरती होळी साजरी करण्याचे भान
>> सामान्य कुटुंबे दाखवत होती, तेव्हा दुसरीकडे मात्र भक्तीच्या नावाखाली भपक्याचे ओंगळवाणे प्रदर्शन सुरू
>> होते. आसाराम बापू नावाच्या एका तथाकथित संताने भक्तांवर रंगांची आणि वारेमाप पाण्याची मनसोक्त
>> उधळण केली आणि ‘संताघरी सुकाळ-दुष्काळ सारखेच’, असा जणू संदेश दिला. आसारामाच्या अंगणात
>> होळीच्या रंगांची मुक्त उधळण होत असताना, अनेक कुटुंबे आपापल्या गावात हंडाभर पाण्यासाठी
>> ताटकळत, टँकरकडे डोळे लावून बसली होती. आसारामाचे हजारो भक्त मात्र, जगाची दु:ख विसरून पाण्याचे
>> फवारे झेलत धन्य होत होते.

पूज्य आसारामबापूंची होळी हे भक्तीच्या नावाखाली ओंगळवाणे प्रदर्शन कसे ठरते? नव्या मुंबईत त्यांनी १,००,००० लोकांसाठी ६,००० लिटरचा केवळ १ टँकर वापरला. हे प्रमाण माणशी ६० मिलीलीटर एव्हढे नगण्य आहे. ज्या भक्तांनी या होळीत भाग घेतला, ते घरी जाऊन वेगळी होळी खेळणार नव्हते. त्यामुळे एकंदरीत पाण्याची प्रचंड बचतच झाली.

तसेच पूज्य आसारामबापूंच्या होळी खेळण्याने दुष्काळ पडला नाहीये. ना त्यांच्या होळी टाळण्याने दूर होणार आहे. दोघांचा एकमेकांशी ओढूनताणून बादरायण संबंध लावलेला आहे.

आ.न.,
-गा.पै.

हे इथेही प्रकाशित केले आहे. फक्त आसाराम बापूंऐवजी नाव लक्ष्मण प्रजापती वापरले आहे. बाकी आश्रमाची जमीन, अल्पवयीन पीडिता सार्‍या बाबी सारख्याच आहेत.

https://www.youtube.com/watch?v=AsYYS3Ik7-k

गापै
हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होतो आहे आमच्या शे पाचशे च्या चिरीमिरी ने काय होणार आहे हि मानसिकता
मला लहानपणी वाचलेली 'खुलभर दुधाची' कहाणी आठवली. देवाचा गाभारा दुधाने भरून वाहील असा संकल्प राजाने केला व सक्तिने सर्व नागरिकांना स्वतःला थेंबही न घेता सगळे दूध देवळात आणुन घालायचा हुकुम सोडला. सार्‍या गावाने सगळे दूध ओतले तरी गाभारा भरेना. अखेर एक म्हातारी आली. तिने राजाचा हुकुम बाजुला सारून आपल्या घरच्या वासराना, लेकराना दूध पिऊ दिले आणि उरलेले खुलभर दूध ती देवळात घेऊन आली. तिने आपला गडु देवावर ओतताच गाभारा ओसंडुन वाहु लागला.
आता मला मोठेपणी ऐकलेली 'खुलभर पाण्याची' कहाणी आठवली. देवाचा गाभारा दुधाने भरून वाहील असा संकल्प लोकशाही राजाने केला व अनासक्तिने सर्व नागरिकांना स्वतःला थेंबही न घेता सगळे दूध देवळात आणुन घालायचे आवाहन केले.
कोणी विचार करु लागला कि इतर लोक दुध टाकणार आहेत च आपली एखादा तांब्या पाण्याने काय होणार आहे? चला आपण पाणीच टाकू
कोणी विचार करु लागला कि इतर लोक साले चोर आहेत पाणी टाकतील मग आपण दुध टाकले तरी त्याचा काय उपयोग? चला आपण पाणीच टाकू.
अशा रितिने सर्व गाभारा पाण्याने ओसंडून वाहू लागला.