जोडीदाराच्या भावना

Submitted by सौ. वंदना बर्वे on 2 April, 2013 - 00:01

शेखर एका बड्या कंपनीमध्ये उच्चपदस्थ आहे. त्याची पत्नी वासंती ही माझी मैत्रीण. लग्नाला आठ वर्षे झाली आहेत. उभयतांना एक मुलगी आहे. संसार सुखाचा सुरू होता. निदान आम्हा मैत्रिणींना तरी असं वाटायचं. शेखरचे त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या स्त्रीशी असलेल्या अफेअरची खबर बाहेर आली. त्यातल्या सत्यतेची खात्री झाल्यावर वासंतीने त्याच्याशी बोलणं टाकलं. संसार तुटण्याच्या मार्गावर आहे.

संसार तुटू नयेत असं मनापासून वाटतं. पण वासंतीने पुढे होऊन हा संसार तोडावा व मुलीला स्वतंत्रपणे स्वत:च्या बळावर वाढवावं, सुसंस्कारीत करावं असं वाटतं. माहेर सोडून सासरी आल्यावर वासंतीने सर्वार्थाने चांगला संसार केला. शेखरच्या आईवडिलांची शुश्रुषा शेवटपर्यंत केली. दुर्धर आजारात शेखरच्या वडिलांना दर दोन दिवसात बध्दकोष्ठतेचा त्रास व्हायचा. अंथरुणावरून चालत बाथरूमलाही जाणे शक्य नव्हते. त्यांचे सर्व विधी अंथरुणातच व्हायचे. लघवीवर नियंत्रण नव्हते. त्यांची स्वच्छता, दररोज अंघोळ, दर दोन दिवसानी घट्ट झालेला खडा काढणे, वेळच्या वेळी अन्नपाणी व इतर सर्व शुश्रुषा वासंतीने न कंटाळता केली. तीही स्वत:ची नोकरी संभाळून. शेखरच्या आईची सेवा तर तिने दिलेले त्रास मनात न आणता केली. सर्व कशासाठी केले केवळ शेखरसाठी. त्याच्यावरच्या प्रेमापायी. तिच्या त्याच्याविषयी असलेल्या भावनेलाच त्याने सुरूंग लावला.शेखरने तिची भावनिक फसवणूक केली.

दुसऱ्या व्यक्तीशी शारिरीक संबंध ठेवणे हे जोडीदाराच्या भावनेशी प्रतारणा करणे होय. नवऱ्याची मैत्रीण असणे किंवा बायकोचा मित्र असणे चुकीचे नव्हे. एकमेकांना चांगल्या पध्दतीने समजून घेण्यासाठी ते आवश्यकही आहे. जी गोष्ट आपण नवऱ्याला सांगू ती गोष्ट तो त्याच अर्थाने व त्याच पातळीवर घेईल की नाही यात शंका आहे. पण तीच गोष्ट त्याच्या मैत्रिणीने सांगितली की त्याला पटते. नवरा बायकोचे नाते दृढ होण्यासाठी मित्र किंवा मैत्रीण महत्वाचे असतात. काही कारणास्तव नवराबायकोत बेबनाव झाला तर तिथेही त्यांना सावरण्याकरीता मैत्रच उपयोगी पडते. इथे हेतु आणि दृष्टीकोन निर्मळ असणेच अपेक्षित आहे. वैयक्तिक पातळीवर बायकोचा मित्र आणि नवऱ्याची मैत्रिण यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बहुधा दुषितच आढळतो. मैत्री विशिष्ट मर्यादेपर्यंत स्विकारली जाते. ही मर्यादा व्यक्ती व्यक्तीप्रमाणे बदलत जाते.

नवऱ्याची मैत्रीण ही बहुतकरून संशयाच्या फेऱ्यातच असते. नवऱ्याने केलेली आपल्या मैत्रीणीची स्तुती ही त्यालाच शालजोडीतून कधी सव्याज परत मिळेल हे नाही सांगता यायचे. नवऱ्याच्या मैत्रिणीचा संसारात वावर हा बायकोला सहसा खपत नाही. प्रामाणिकपणे सांगायचं तर कुठल्याच पातळीवर नाही. यात मालकी हक्काची भावना असतेच असं नाही. सहसा स्वभावत: स्त्री ही पुरुषाला सर्वस्व अर्पण करते. तिथे तिला हातचं राखून ठेवणं जमत नाही. तिची पुरुषाकडूनही तशीच अपेक्षा असते आणि ती गैरही नाही. गृहिणी, सचिव, सखी, माता या सर्व भुमिकेतून नवऱ्याला कायम संभाळते. म्हणूनच अशा कुठल्याही भुमिकेत तिच्याहून वेगळी स्त्री ती सहन करीत नाही. ती स्त्रीला स्वत:ची केली प्रतारणा वाटते.

मुलांना ओळख करून देताना बायकोचा मित्र "मामा" असणे नवऱ्याला हितकारक वाटते तर नवऱ्याची मैत्रिण "आत्ते" असणे बायकोला सेफ वाटते. गंमतीचा भाग सोडला तर त्यामागचा अंतस्थ हेतु अथवा अपेक्षा तशीच असते आणि वास्तव त्याहून वेगळे आहे याची खात्री वजा संशय असतो. कौटुंबिक वादविवादाच्या प्रसंगी हे नथीतले "नाजूक" तीर प्रत्यक्ष बाणापेक्षाही कठीण व क्लेशदायक असतात. विवाहबाह्य संबंध याचा अर्थ बहुतांशी शारिरीक संबंध असाच घेतला जातो. वैयक्तिक दृष्ट्या असे संबंध ही प्रतारणा असते तर सामाजिक दृष्टीकोनातून तो स्वैराचार, लफडं, भानगड असते. यातल्या तथ्यातथ्यतेचा भाग सोडला तर, शारिरीक संबंध प्रस्थापित होण्याअगोदरपर्यंतच्या संबंधांना विरोध होत नाही. जास्तीत जास्त "धोका" म्हणून जोडीदार एकमेकांना सुचित करतात.

काहीही झाले तरी शेखरने जे केलं त्याला जसा चित्रपटात, नाटकात, मालिकेत "तिने त्याला माफ केले आणि ते सुखाने नांदू लागले" असा सुखांत वासंतीने करणे पटणारे नाही. तिने घटस्फोटासाठी केलेली तयारी योग्य आहे. राहता राहिला मुलीच्या भवितव्याचा प्रश्न तो ती सक्षम व स्वत:च्या पायावर उभी असल्याने सोडवू शकते. निलमशी जेंव्हा मी हे बोलले तेंव्हा तिला आश्चर्य वाटले.

"तू आणि संसार तोडायला पाहिजे असे म्हणतेस? जाउदे, पण ते योग्यच आहे."
"असे संबंध केवळ कुटुंबच उध्वस्त करतात असं नाही तर समाजही बिघडवतात. याना मान्यता मिळता कामा नये"
"वासंतीचा निर्णय योग्यच आहे. पण शेखरची सर्वस्वी चूक आहे असं मी म्हणणार नाही."
"काय?"
"तुला कदाचित पटणार नाही. विवाहबाह्य संबंधांचा आपण उगाच गवगवा करतो. आदिम काळापासून ते अस्तित्वात आहेत आणि यापुढेही राहणार आहेत. यात जो सापडतो तो गुन्हेगार ठरतो. सापडत नाही तो सुसंकृत. त्यातही अशा कितीतरी बायकाना त्यांचे नवरे बाहेरख्याली आहेत याची पूर्ण कल्पना आहे तरी केवळ छी थू होईल या भयास्तव त्या संसार रेटीतच आहेत. काहींना असुरक्षितता तर काही जणींना अपत्यांचे भविष्य संसार टिकवण्यास प्रवृत्त करतात. मला तरी असे संबंध फारसे वावगे वाटत नाहीत. माझ्या नवऱ्याने असे संबंध प्रस्थापित केले असतील तरी मी उलट त्याचे स्वागतच करीन"
"निलम, हद्द झाली तुझ्यापुढे. हे स्वैराचाराला मान्यता देण्यासारखे नाही का?"
"जे सुख देण्यात समजा मी कमी पडत असेन तर ते मान्य करण्यात काय पराभव. त्याला ते सुख बाहेर मिळत असेल तर त्याने ते का घेऊ नये? केवळ माझ्याशी लग्न केले आहे म्हणून? शरिरसंबंध हा एकच क्रायटेरिया आहे का प्रामाणिक असण्याचा? तुलना करणे हा माणसाचा स्वभावधर्म आहे. देखण्या पुरुषाला पाहिल्यावर, एखाद्याच्या व्यक्तिमत्वातले आपल्याला भावणारे गुण आढळल्यावर आपला नवरा असा असायला पाहिजे होता असं बायकोला वाटतं. नवऱ्याला आवडणारे गुण दुसऱ्या एखाद्या स्त्रीमध्ये आढळले तर तो आपली बायकोही अशी हवी होती असे म्हणतो. वैचारीक, बौध्दिक, आवड निवड समान असणाऱ्या व्यक्तीकडे नवरा बायकोपैकी कुणी आकर्षिली गेली तर काही वाटत नाही. त्यांची त्याबाबतची देवाणघेवाण मर्यादेच्या आतली वाटते, स्विकारणीय होते. वास्तविक पाहता आपला नवरा किंवा बायको आपली ती भावनिक गरज पूर्ण करू शकत नाही म्हणून त्या गरजेच्या पुर्तते करीता दुसऱ्या व्यक्तीकडे मैत्री केली तर तो आपल्या दृष्टीने व्यभिचार ठरत नाही. पण हेच शारिरीक गरजेच्या बाबतीत घडले की आपण लगेच व्यभिचार, प्रतारणा म्हणून ओरडत फिरतो. शरिरसंबंधांना आपण दिलेले अवास्तव महत्व या सगळ्याला कारणीभूत आहे. "स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकालची माता असते" हा स्त्रीचा गौरव व पुरुषांचे दु:ख आहे. वासंतीने सगळा संसार संभाळताना शेखरकडे दुर्लक्ष केलं. तिच्या प्राथमिकता बदलल्या. त्यालाही तिची गरज आहे हे ती विसरली. बऱ्याच संसारात नवराबायकोचे शरिरसंबंध हे केवळ यंत्रवत असतात. ओढ, उत्कटता कधीच संपलेली असते. स्त्रीला पुरुषाचं आणि पुरुषाला स्त्रीचं फक्त शरीरच हवं असतं का? निश्चितच नाही. त्यापलिकडचे मिळणे जेंव्हा दुरापास्त होते, तेंव्हा ते शरीर नकोसे होते. मग ते लग्नगाठीने बांधलेले का असेना. या बाजुचाही विचार कर वंदना म्हणजे तुला शेखर अपराधी वाटणार नाही."

निलमचं म्हणणं पटलं नाही. हे मान्य आहे की आपल्या जोडीदाराकडून असलेल्या सगळ्या अपेक्षा एकाच व्यक्तीकडून पूर्ण होऊच शकत नाहीत. म्हणून आपल्या अपेक्षांशी साधर्म्य असणारी दुसरी व्यक्ती आपला जोडीदार असती तर असे वाटणे किंवा त्याच्याशी त्यामर्यादेपर्यंत मैत्री करणे यातही काही चूक नाही. मुद्दा जेंव्हा शरिरसंबंधांचा येतो तेंव्हा एक शाश्वत नियम लक्षात ठेवला पाहिजे "तृष्णा न जीर्णा वयमेव जीर्णा". जोडीदाराकडून ती अपेक्षा पूर्ण होत नाही म्हणून दुसरीकडे ती अपेक्षा पूर्ण करायची. कालांतराने तिथेही कंटाळा येतो, मग तिसरीकडे. संसाराचा विस्कोट होइस्तोवर हे चक्र थांबतच नाही. "काम" धर्मनियंत्रित करणे यासाठीच समाजमान्य पर्याय म्हणजे लग्न.

विवाहबाह्यसंबंध हे योग्य की अयोग्य हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण ते ठेवण्याआधी किमान आपल्या जोडीदाराच्या भावनांची कदर ठेवावी हे म्हणणे गैर आहे का?

सौ. वंदना बर्वे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वंदनाताई , अचानक तुम्ही राहूल द्रविड च्या ख्रिस गेल कशा काय झाला ? Happy
आयपीएल चालू होत असण्याचा तर परिणाम नाही ना ? Happy
On a serious note , काही मुद्दे चांगले आहेत , पण परत शेवटात गोंधळ आहे . तुमच्या शेवटच्या प्रश्नातच त्याच उत्तर आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे

माझ्या नवऱ्याने असे संबंध प्रस्थापित केले असतील तरी मी उलट त्याचे स्वागतच करीन
>>>>>>>>>>>
प्रत्यक्षात अशी एखादी नीलम सापडेल का? Wink

बाकी जर खरेच त्या नीलम ने आपल्या नवर्‍याच्या विवाहबाह्य संबंधाचे स्वागत केले तर नवर्‍याच्या मनात नीलम बद्दलच संशय येऊन तोच तिला सोडून देईल. Happy

आधीच्या लेखांपेक्षा बरीच सुधारणा आहे... आधीचे सगळे मुद्दे एकत्रित सरमिसळ न केल्यामुळे असावे... काही वाक्ये पटत नाहीतच... तरीही बदल स्वागतार्हच!!! अधिकाधिक वाचन, मनन, चिंतन आणि मगच लेखन भरपूर सुधारणेला वाव मिळवून देइल... लिहीत राहा... पुलेशु...

शेखर जर उच्चपदस्थ आहे, आणि तुमची मैत्रीणही नोकरी करतेय तर मग सासर्‍यांची सेवा करायला नर्स का नाही ठेवली? नर्स ठेवली असती तर कदाचित >>सर्व कशासाठी केले केवळ शेखरसाठी. त्याच्यावरच्या प्रेमापायी>>> ही भावना कमी झाली असती.

माझा एक सामान्य प्रॉब्लेम आहे. मला तुम्हाला 'शेवटी म्हणायचे काय आहे' हेच कधी समजत नाही. मागच्या लेखावरील गंभीर समीक्षकांची प्रतिक्रियाही अशीच काहीशी होती हे आठवते.

ह्या त्याच सौ वंदना ताई की ड्युआडी आहे?

एकदम U Turn. कमाल आहे?

सौ वंदना ताई - तुम्हाला असले विषय निवडणे तरी शोभते का? तुमचे "हे" काय म्हणतील?

हा अंदाज कसा काय बांधला की 'कमी' पडले तरच पुरुष दुसर्‍या स्त्रीकडे जातो? नीलम पण महान आहे. Happy

नेहमी स्त्री शारीरीक सुखात कमी पडली तरच पुरुष जातो म्हणणे म्हणजे परत स्त्रीच्याच चुका का?

मग स्त्री दुसर्‍या पुरुषाकडे गेली तर तीच वाईट वळणाची.. नवर्‍यात कमी नाही का?

बहुतेक, मानसिक पातळीवर स्त्री-पुरुष आकर्षित झाले की पुढची व शेवटची पातळी हि शारीरीक मानत असावेत (समाजात) मग राहिलेच काय म्हणून शारीरेक संबध झाले की बोंबाबोंब होत असेल.. नुसती मैत्री खपवून घेत असतील.
पण सुरुवातीला, नवर्‍यानेच आधी बायकोला कामाला जुंपून ठेवले व बायकोने जुंपून घेतले तर चूक कोणाची?
आधी, चांगली बायको म्हणजे माझ्या आई-वडीलांपासून सर्वांचा मान्,पान, आवड जपणारी हे डोक्यात कोण बसवतं? आणि हे करणे जरूरीच आहे नवर्‍यावरचे प्रेम कबूल करायला असे कोण मानून चालतं?

इतका कमाउ नवरा आहे तर ठेवा ना नोकर... बायकू सुद्धा नोकरीच करत होती ना? सुपरवूमन कशाला बनायचे आधी बायकोने? नवर्‍याला काय फरक पडणार मग? बायको राहिली 'मल' साफ करत... थकत सेवा करत.. मग "असला" नवरा काय हेच करणार ना? आता नवर्‍याला नोकराणीची गरज नाही राहीली(आई-वडील नाहीत हयात) आता त्याला थकलेली नोकराणी नकोय तर राणी हवीय..

नवऱ्याची मैत्रीण असणे किंवा बायकोचा मित्र असणे >>>

आशीष राणेंनी पण असलंच काहीतरी लिहीलमय त्यांच्या कथेत.
सं.- एक सॉरी - आशीष राणे

झंपी आणी अंड्या येकदम सही लाईनवर चालत आहेत. म्हणजे त्यांचे मुद्दे पर्फेक्टो वाटले.

गंमत मला एकाच गोष्टीची वाटते की कायम सूनेने सासु सासर्‍यांचे काही तक्रार न करता सर्व काही केले पाहिजे असे बर्‍याच नवर्‍यांचे ( स्वतःला आदर्शवादी समजणार्‍या) मत असते, पण तेच बायकोने स्वतःच्या आई वडिलांकरता काही केले तर तिच्यावर टीकेचे झोड ( सासरच्यांकडुन ) उठतात. मग भले ही ती स्त्री आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असो वा नसो. बरं एवढे करुन त्या स्त्रीच्या पदरात कायम निराशाच पडते.

झंपी वर बरोबर म्हणतेय की स्वतःला सुपरवुमन समजण्यापेक्षा वासंतीने नर्स ठेऊन स्वतःकरता वेळ दिला असता तर बरे झाले असते.

आणी बायको जर वडलांचे एवढे करीत होती ( तिची नोकरी सांभाळुन ) तर तेव्हा हा वीरभद्र काय करीत होता? या महारथीचे काहीच कर्तव्य नाही का याच्या वडिलांच्या प्रती ? अप्पलपोटा कुठला !

सर्व प्रतिसादांना धन्यवाद.

टुनटुनजी,

"गंमत मला एकाच गोष्टीची वाटते की कायम सूनेने सासु सासर्‍यांचे काही तक्रार न करता सर्व काही केले पाहिजे असे बर्‍याच नवर्‍यांचे ( स्वतःला आदर्शवादी समजणार्‍या) मत असते, पण तेच बायकोने स्वतःच्या आई वडिलांकरता काही केले तर तिच्यावर टीकेचे झोड ( सासरच्यांकडुन ) उठतात. मग भले ही ती स्त्री आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असो वा नसो. बरं एवढे करुन त्या स्त्रीच्या पदरात कायम निराशाच पडते."

एकदम सहमत. असे अनेक मैत्रिणिंच्याबाबतीत आहे खरे. जसं झंपीजी म्हणतात त्याप्रमाणे त्यामागची कारणेही असू शकतात.

आपले "वीरभद्र" हे विशेषणही आवडले.

सौ. वंदना बर्वे

खरंतर निलमचे विचार जास्त मॅच्यअर वाटतात, पण अजुनही पुरूषसत्ताक मनोवृत्तीतून बाहेर पडायची आमची तयारी नाही हेच खरं. पुरूषाचे विवाहबाह्य संबंध कळले तर परीचितांमध्ये दबक्या आवाजात कुजबूज होते. त्याला जाब विचारणारा कोनी माईचा लाल पुढे येत नाही तर त्याऐवजी पठ्ठ्याची मजा चाललीये असं इतर पुरूषांच्या मनांत येतं. आणि स्त्रीयां मात्र अशा व्यक्तीपासून अंतर राखून रहाण्याचा प्रयत्न करतात. याउलट एखाद्या स्त्रीचे विवाहबाह्य संबंध कळले तर मात्र परीचित स्त्रीया तीला नको-जीव करतात. मात्र पुरूष स्वत: गळ टाकता येईल का? हे चाचपून बघतात.

बर्वे ताईंन्ना नमस्कार!
म्हंजे अगदी साक्षात, शिरसाष्टांग नमस्कार.

गेल्या लेखाखाली अगदी खडूसपणे विबासं हा नेक्ष्ट लेखाचा विषय घ्या असं सांगितलं, तर त्या बॉलवर बाईंनी जी काय सिक्सर मारलिये! अहह!! (पूर्वी अहह म्हणत. आजकाल अगगऽ)

बर्वे काकू, अपुन तोहरा पंखवा हुई गवा..

ताई, तुमच्या या मैत्रिणीच्या उदा. वरून तुम्ही काहीच धडा घेतलेला दिसत नाही.
नशिब तिचे , की तिच्याकडे नोकरी आहे. त्यामुळे सन्मानाने एकटी जगू तरी शकते. कोणत्याही प्रकारे अर्थाजन करू न शकणार्‍या बायकांना कशीही परीस्थिती आली तरी कोणाच्या तरी ताटाखाली लाचारीचे जिणे जगावेच लागते.
बायकांची नोकरी /उद्योग ई. आणि शिक्षण हे कीती महत्वाचे आहे , हे लक्षात आले का ताई तुमच्या अता तरी?
आणि तसे नवरा + सासर म्हणजे च आयुष्य नव्हे , हाही उजेड पडला का?

रच्याकने ,
'जे सुख देण्यात समजा मी कमी पडत असेन तर ते मान्य करण्यात काय पराभव '
-- या वाक्याबद्दल निषेध. पराकोटीचे मुर्ख आणि तद्दन फालतू वाक्य आहे.

बाकी बायकांचे उत्साही/अनुत्साही असणे त्यांच्या मनस्थितीशी पर्यायाने दोघातल्या संबंधावर अवलंबून असते बरेचदा.
पण पुरुषांबद्दल 'Men who can not perform' असल्या जाहीराती आणि त्यावरचे उपाय ऐकले आहेत. स्पॅम ईमेल्स पण येतात तसली. त्यांमुळे बायकांपेक्षा पुरुषांसाठी हा खरोखरचा प्रॉब्लेम असू शकतो तेव्हा बायकांनी काय करावे?

बायकांची नोकरी /उद्योग ई. आणि शिक्षण हे कीती महत्वाचे आहे , हे लक्षात आले का ताई तुमच्या अता तरी? >> डेलिया Happy '"काम" धर्मनियंत्रित करणे यासाठीच समाजमान्य पर्याय म्हणजे लग्न.' इथे सुई अजून अडकलेली आहे.

'जे सुख देण्यात समजा मी कमी पडत असेन तर ते मान्य करण्यात काय पराभव '
-- या वाक्याबद्दल निषेध. पराकोटीचे मुर्ख आणि तद्दन फालतू वाक्य आहे. >> डेलिया हे काहीही नवीन वाक्य नाहीये. हजारो वर्षे हजार लोकांकडून ऐकले आहे.
मृच्छकटीक नाटकात गृहस्थ चारुदत्त गणिका वसंतसेनेच्या प्रेमात पडतो आणि चारुद्त्ताच्या बायकोला अभिमान वाटतो की एवढी मोठी गणिका माझ्या नवऱ्याच्या प्रेमात पडली. त्यांच्या संसाराचा काही काही विस्कोट होत नाही कि तिच्या माथी काही लाचारीचे जगणे येत नाही. कारण तिथे 'लाचारी' काय ह्याची व्याख्याच नाहीये. आत्मभान आले की प्रश्न येतात. आपले आयुष्य कसे असावे (सर्व पातळ्यांवर - लैंगिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक) हे विचार करण्याची क्षमता आली कि प्रश्न येतात. पडणारे प्रश्न सोडवण्यास जे रिसोर्सेस लागतात ते नोकरी-उद्योग ह्यामुळे उपलब्ध होऊ शकतात.. शिक्षणाने त्या रिसोर्सेस मधले योग्य काय अयोग्य काय ह्याचा विवेक मिळू शकतो. पण आत्मभान मुळात असले पाहिजे.

आपल्याला मिळणा-या पगारात महिनाभर काय काय खायचं हे ज्याचं त्याला चांगलं माहीत असतं. मिळणारा पगार किंवा कमाई यात ज्याप्रमाणे माणूस अ‍ॅडजस्टमेण्टस करायला शिकतो तसंच लग्न करताना आपल्याला या जोडीदाराबरोबर निभावून न्यायचे आहे याचं भान नसेल तर तो / ती कुणाचाही जोडीदार व्हायला पात्र नाही, मग ते लग्न इच्छेविरुद्ध झालेलं असो किंवा इच्छेने झालेलं असो. एकदा बिल्डरकडे फ्लॅट बुक केला कि व्यवहार मोडता येतो का पहा. लग्न हा देखील असाच एक करार आहे. ज्यांना मान्य नाही त्यांनी करू नये. लिव्ह इन रिलेशनशिप, विवाह असे पर्याय आहेत.

एकच आहे, लग्नानंतर जोडीदारानेच करार मोडला तर मग उरलेल्यावर तो करार निभावून नेण्याचे बंधन राहत नाही. लग्नामधे ज्या तडजोडी अपेक्षित धरलेल्या आहेत त्या पूर्ण करणे अशक्य असल्याचं नंतर लक्षात येणं हेच दुर्दैव आहे. अशा वेळी वेगळं होणं हा दोघांसाठी चांगला मार्ग असल्यास पर्याय नाही. खरी गरज आहे ती लग्नाआधी या गोष्टी दोघांनी स्पष्टपणे बोलण्याची. अक्षरशः एखादा कायदेशीर व्यवहार पूर्ण करत असल्याप्रमाणे या गोष्टी बोलल्या गेल्या पाहीजेत. किमान लग्नाआधी जाणिव तर होते. (दोघांना किंवा दोघांपैकी एकाला पूर्ण भान असल्याचे यात गृहीत धरलेले आहे). आपल्याकडे ब-याचशा गोष्टी गृहीत धरल्या जातात. बरेचदा मुलांना लग्न म्हणजे काय याची जाणिव नसते. आई किंवा वडील यांना मुलाशी त्याबाबत बोलावे असे वाटलेलेच नसते. म्हणूनच आपल्या जबाबदारीबाबत ते गंभीर नसतात. मुलींच्या बाबतीत तिच्या मागे आईची भुणभुण तर असतेच असते, पण जो तो तिला मोलाचे सल्ले देतच असतो. लग्न म्हणजे काय हे मुलीला पूर्ण माहीत असतं, मुलांच्या बाबतीत ते सांगता येत नाही.

बाकि चर्चा विबासं या धाग्यावर झालेली आहे. आता या चर्चांचा कंटाळा येतो. मालिकेतही तेच आणि चर्चेतही तेच. नॉर्मल लाईफबद्दल कुणी बोलणार असेल तर खरंच शनिवारवाड्यावर सत्कार करण्याचा विचार आहे.

आत्मभान आले की प्रश्न येतात. आपले आयुष्य कसे असावे (सर्व पातळ्यांवर - लैंगिक, भावनिक, आर्थिक, सामाजिक) हे विचार करण्याची क्षमता आली कि प्रश्न येतात. नोकरी-उद्योग ह्यामुळे पडणारे प्रश्न सोडवण्यास जे रिसोर्सेस लागतात ते उपलब्ध होऊ शकतात. शिक्षणाने त्या रिसोर्सेस मधले योग्य काय अयोग्य काय ह्याचा विवेक मिळू शकतो. पण आत्मभान मुळात असले पाहिजे. >> टाळ्या!!!

नोकरी-उद्योग ह्यामुळे पडणारे प्रश्न सोडवण्यास जे रिसोर्सेस लागतात ते उपलब्ध होऊ शकतात. >>पण हे असं लिहायला हवं ना?- पडणारे प्रश्न सोडवण्यास जे रिसोर्सेस लागतात ते नोकरी-उद्योग ह्यामुळे उपलब्ध होऊ शकतात.

नताशा >> Happy बरोबर. सम्पादन केले. इंग्लिश ग्रामर मध्ये अशा चुकांना 'मिस्प्लेसड मोडीफायर' म्हणतात, मराठी शब्द माहित नाही Happy

सिमंतिनी, करेक्ट Happy
Logical predication- Modifier problem Happy
हा 2 वर्षं CAT, GMAT चा अभ्यास केल्याचा परिणाम आहे. Sentence correction असा सेक्शन असतो ह्या परिक्षांत.

नेमका वंदनाताईंच्याच धाग्यावर काय तो (त्यांच्या दृष्टीनी) शिक्षणानी आलेला माज दाखवतेय मी. Proud