कौतुक न लगे

Submitted by हेमंततनय on 1 April, 2013 - 14:04

ओपन-डे ची विवेकच्या मनांत तशी दहशतच होती, त्याउलट ज्याच्यामुळे विवेकवर ही आफत ओढावत असे तो त्याचा एकूलता एक कुलदिपक, रोहन मात्र कुऽऽऽल असे.
नाईलाज म्हणून विवेक शाळेत पोहोचला. मग काय? रिपोर्टींग करायचं, म्हणजे हजेरी लावायची .(च्यायला इथेपण?) मग एक-एक करून सर्व विद्यार्थ्यांच्या प्रोग्रेसचा आलेख वर्गशिक्षक वाचून दाखवणार, रोहनच्या बाबतीत मात्र बापाच्या इज्जतीचा पंचनामा ठरलेलाच, सर्व मुलांचं छान ! छान !! सांगून झाल्यावर रोहनचं नाव घेतलं. आणि मुलगा 'हुशार' असूनही त्याच्याकडे पुरेसं लक्षं दिलं न गेल्यामुळे कसा वाया जातोय हे निमुटपणे सर्वांसमोर खालमानेनं विवेकने ऐकून घेतलं. यापुढे काळजी घेईन असं सांगावं लागतं हे सवयीने त्याला माहित होतं.
सर्व मुलांचं सांगून झाल्यावर निकिताची आई छाऽऽऽन हसत उठली, आणि तीने आणलेली काही पुस्तके शिक्षकांना देऊ करत म्हणाली,
“ही निकितासाठी काही पुस्तकं मी घेतली होती, तीची ता वाचून झाली आहेत. म्हणून मी म्हटलं शाळेच्या लायब्ररीत ठेवली तर इतरांनाही वाचायला मिळतील.”
झालं त्यानंतर निकिताचं किमान दहा मिनिटं तरी कौतुक झालं असेल.
आजचा प्रसंग विवेकला फारच झोंबला होता. म्हणजे एरवी त्याला कोणाच्याही बोलण्याचं फारसं काही वाटत नसे, विनिताचं म्हणजे बायकोचं अगदी ‘उपमर्द’ करणारं बोलणंही विवेक विवेकाने झेलत असे. पण बायकांसमोर आणि विशेषत: निकिताच्या आईसमोर तरी आपली इज्जत जाऊ नये असं कोणाही पुरूषाला वाटणारच यावर त्याचा 'ठाम विश्वास' होता. निकिताची आई निकिताला शाळेत सोडायला येऊ लागल्यापासून इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या वडिलांनी शाळेत सोडायला येण्याचं प्रमाण वाढलं आहे हे त्याच्या लक्षांत आलं होतं. आणि पूर्वी रोहनला शाळेत सोडायला कंटाळणारा विवेक, हल्ली विनिताने सांगण्यापूर्वीच तयार असे. लगेच इंडिका काढून रोहनला शाळेत सोडी आणि स्टेशनजवळ पार्कींगला पैसे लागतात म्हणून ती पुन्हा घरी आणून ठेवत असे. व ऑटोला पार्किंगपेक्षा जास्त पैसे देऊन स्टेशनला जात असे आणि मग ट्रेनने कामावर.
आजही तो उशिराने का होईना ऑफीसला गेला. ऑफिसात सर्वजण त्याच्या येण्याचीच वाटच पहात होते. तो पोहोचताच प्रत्येकजण त्याच्यावर एक-एक करुन काम टाकू लागला. आणि नेहमीप्रमाणेच प्रत्येकाचं काम हे 'अर्जंटच' होतं. अर्थात विवेकला या सर्व गोष्टींची सवय असल्याने तो गोंधळून जात नव्हता एवढंच.
संध्याकाळी घरी पोहोचला. मागोमाग विनिताही आली आणि काही मिनिटांतच तीचा तणतणाट सुरू झाला. ‘आज कोर्टात कोणाशी तरी भांडण झालं असणार किंवा ट्रेनमध्ये तरी, नाहीतर ती अशी आल्या-आल्या चिडलेली नसते. त्यासाठी घरात एखादं कारण सापडावं लागतं.’ (अर्थात ते रोजच सापडतं)
“किती दिवस सांगतेय, ते मेलं मासे पाळायचं खूळ सोडून दे”
“अगं ! पण मासे घरात पाळणं शुभ असतं. भरभराट होते घराची” विवेकने समजावायचा प्रयत्न केला.
“झाली तेवढी भरभराट पुरे, ते पाणी शिळं करायला माझी बादली अडवली, एंजलफिशने अंडी घातली म्हणून माझा टब अडवला. आता मी कपडे धुणार कशात? “
“का? वॉशींग मशीनला काय झालं?”
“हे हँडवॉशचे कपडे आहेत मशीनमध्ये धुता येत नाहीत.”
“आयला कमाल आहे, त्यांना म्हणावं एक तर वॉशींग मशीन तरी बनवू नका नाहीतर असले हँडवॉशचे कपडे तरी बनवू नका उगाच डबल-डबल मेहनत माझ्या बिच्चा-या बायकोला होते”
‘कळली तुझी अक्कल, सांगायला जावं तर विषय भलतीकडेच घेऊन जातो. त्यापेक्षा ते मासे देऊन तरी टाक रे...”
“अगं त्यापेक्षा मी तूला नवी कोरी बादली आणि टब आणून देतो, मग तर झालं?”
“आणि ते ठेऊ कोणाच्या डोक्यावर? तुझ्या की माझ्या ?? एवढंस मेलं ते बाथरूम, एक बादली ठेवली तर बसायलाही जागा उरत नाही.”
आता हे प्रकरण ‘नवीन घर’ घेण्याच्या मागणीपर्यंत जाणार, ही धोक्याची घंटा तात्काळ लक्षांत येऊन विवेकने शरणागती पत्करली
“ठिक आहे बघतो दोन दिवसांत”
विवेकने एक महिन्यात बंदोबस्त करण्याच्या बोलीवर मित्रकडे मासे ठेवले. आणि ऑफिसमध्ये गेल्यावरही विवेकच्या मनात, 'माशांचं काय करायचं' हा एकच विचार घोळत होता. एवढ्यात समोरच्या क्लस्टरमधून शिल्पाने हाक मारली.
“विवेक, ते कालचा रेट कॉन्ट्रॅक्चा ड्राफ्ट तयार झाला असेल तर द्या ना”.
विवेकने यांत्रीकपणे समोरच्या ट्रेमधून ड्राफ्ट तिच्या हवाली केला. शिल्पा म्हणजे डिपार्टमेंटचा एक ग्लॅमरस चेहरा होता, तीने विवेकला हाक मारल्यावर कोणताही कॉमेंट न करता, तीचं काम करणं विवेकच्या तत्वात बसत नव्हतं. पण आज आता असं घडलं नाही, हे शिल्पाला जरासं निराळं वाटलं.
“विवेक इज एव्हरीथींग ऑल राईट ?”
“ हं ! हं !! ठीक आहे”.
“ रोहनने काही नवा घोळ घातला का?”
“नाही गं ! हा माशांचा घोळ आहे”.
“अय्या !! म्हणजे विनिताने घोळाची मागणी केली की काय? तसं असेल तर मलाही आणा हं थोडंसं, आणि हो मला कालवणापेक्षा तळलेलंच जास्त आवडतं.”
“ए बयेऽऽऽ ! एका घोळात दुसरा घोळ घोळवून माझा घोळ वाढवू नकोस, समजलं?”
शिल्पाला या वाक्याचा अर्थ व संदर्भ काहीही लागेना पण तीने चाणाक्षपणे हे जाणले की, आता गप्प रहाणं चांगलं. पण बोलता बोलता तीने विवेकच्या विचारांची गाडी रोहनवर आणून ठेवली होती आणि विवेकने ‘रोहन’ अधिक ‘घोळ’ या क्लूवरून ती गाडी रोहनच्या शाळेत ड्राईव्ह केली मात्र,.... एक मस्त कल्पना त्याच्या डोक्यात चमकून गेली. आणि तो खूष होऊन पुन्हा आपल्या कामात गढून गेला.

रोहनच्या शाळेत सहा फूट लांबीचे दोन फिश टँक पाहीले होते आणि त्यात चक्क जीवंत मासेही होते. ‘चला म्हणजे एका दगडात दोन पक्षी’. तो स्वत:च्या हुशारीवर खुष झाला. पुढच्या ओपन डेला विवेक ते मासे घेऊन शाळेत गेला. व शिक्षकांना देऊ केले, शिक्षकांने आभार मानत स्विकारले व प्यूनला टँकमध्ये सोडण्यास सांगितले.
‘बस? नुसतं तँक्यू ? ती दोनशे रुपड्यांची पुस्तकं दिली तर दहा मिनीटे कौतुक, आणि हजारो रुपये किंमतीचे मासे दिले तर नुसतं थँक्यू?.
त्याच्या पुढच्याच ओपन डेला चिरागच्या वडिलांनी टुरनामेंटला एकदा वापरलेले बॅडमींटनचे शटल-कॉक्स दिले तर त्यांचंही तोंड भरभरून कौतुक..... हा तर उघडपणे पक्षपात होता. फुटकळ वस्तू देऊनही लोकांचं केवढं ते ‘कौतुक’ आणि माझी ‘थॅक्यूवर’ बोळवण ??? झालं,.... आता यांना अद्दल घडवायचीच.....
एप्रिलमध्ये परीक्षा संपल्या होत्या, वॅकेशनमुळे विनितालाही कोर्ट नव्हते. त्यामुळे रोहन त्याच्या आईबरोबर आजोळी करवीर नगरीस (कोल्हापूर होऽ) प्रयाण करता झाला. विवेक मात्र सुट्टी न मिळाल्यामुळे घरी एकटाच रहाणार होता. आणि विनिताच्या आदेशाप्रमाणे ती घरी नसताना घरात नवीन रंग लावायचे काम पूर्ण करायचे विवेकने मान्य केले होते. त्याप्रमाणे रंगकाम चालूही करवून घेतले. बरं पावस्कर मिस्त्री नेहमीचाच असल्याने त्याच्यावर खुशाल सोपावता येत असे. तसं विवेकला घरातच ऍडजेस्ट करता आलं असतं, पण अशी नामी संधी सोडेल तर तो विवेक कसला?
तो उठला, टुरवर जाताना घेतात ती बॅग तयार केली. आणि थेट रोहनच्या शाळेत पोहोचला. शिक्षकवर्ग निवांतपणे पेपर तपासणी व इतर सुटीकालीन कामे करण्यात मग्न होता. विवेकला पहाताच रोहनच्या एक्स वर्गशिक्षकाने त्याचं स्वागत केलं.
“ओह !! या मि. वाडेकर, निकाल लागायला अजून दहा दिवस आहेत. तुम्ही कुठेऽऽ निघालात वाटतं. ... खुशाल जा. आणि तुम्हाला रिझल्टच्या दिवशी येता येणार नसेल, तरीही हरकत नाही. तूम्ही निश्चिंत रहा, आम्ही पोस्टाने पाठवून देऊ.”
“नाही मी त्यासाठी नाही आलोय”
“बरं मग काय काम आहे?”
“मला इथे चार दिवस रहायचंय”
“ठिक आहे चार दिवसांनी कुठे जाताय का? हरकत नाही, आम्ही पोस्टाने रिईल्ट पाठवू”
“तसं नाही मला इथे शाळेत चार दिवस मुक्काम करायचाय.”
“अस्सं आहे होय ! खुशाल रहा, पण काय हो करणार काय तुम्ही शाळेत राहून ?” वर्गशिक्षकही थट्टेच्याच मुडमध्ये होते. त्यांचा हा थट्टेचा सूर विवेकला कळत असूनही, तो गंभीर मुद्रेने वागत होता.
“करणार काही नाही,.... अहो आपण घरी रहातो ना तसंच इथे रहाणार”
“होऽऽ का?, मला वाटलं लहानपणी काही शिकायचं राहून गेलं असावं, म्हणून ते आता शिकून घेताय.”
“अहो शिकायची प्रोसेस कधी पूर्ण होते का?” विवेकनेही खोचकपणे ऐकवलं.
“ठिक आहे, प्रिन्सिपॉलही येतीलच इतक्यात, आपण त्यांनाही सांगू.”
वर्गशिक्षकांना विवेकच्या प्लानची सुतराम कल्पना नसल्यामुळे, ते अजूनही मस्करीच्याच मुडमध्ये होते. त्यांना विवेक खरंच इथे रहायच्या बेताने आलाय असं अजिबात वाटत नव्हतं. त्यामुळे तेही विवेक थट्टा करतोय असेच समजत होते. पण लवकरच ते हसणं विसरून रडकुंडीला येणार होते.
“प्रिन्सिपॉलना कशाला त्रास देताय, मी एकटा राहू शकेन.” विवेकने बॅग उघडून घरात घालायचा लेंगा आणि टी-शर्ट काढले. तेव्हा वर्गशिक्षक भांबावले.
“अहोऽऽ अहो ऽऽऽ ! हे तुम्ही काय करताय?”
“काही नाही.... मी घरात पँट घालत नाही.”
“तेऽऽऽ तुम्ही काहीही घाला.. किंवा घालू नका होऽ, पण इथे काय करताय?”
“आत्ता तूम्हीच तर मला इथे रहायची परवानगी दिलीत ना?”
“छे ! छे !! असं कसं होईल ? अहो ही शाळा आहे घर नाही.”
“मग ? .... मी कुठे म्हणतोय ? की हे घर आहे.”
“हो किनाई ?? मग शाळेत रहाता येणार नाही.”
“का ?”
“शाळेत मुलं शिकायला येतात, रहायला येत नसतात, आणि तूम्हीही राहू शकणार नाहीत.”
“मी राहू शकेन”
“तसं नाही हो, राहू शकणार नाही म्हणजे रहाता येणार नाही.”
“तरीही मी करेन, अंडजेस्ट करेन.”
“काय चालवलंय काय तुम्ही? तुम्हाला खरंच कळांत नाही की, मुद्दाम वेड पांघरताय, ? मला असं म्हणायचं की, तुम्ही इथे रहायचं नाही, इथे रहायला परवानगी नाही समजलं? इथे फक्त शाळेच्या वेळेतच विद्यर्थी आणि शिक्षक येतात, आणि शाळेच्या वेळेनंतर सगळे आपापल्या घरी जातात.”
“तुम्ही खात्रीने सांगू शकता? सगळे आपापल्याच घरी जातात?” विवेकने अद्याप आपला हेका सोडला नव्हता.
“त्याच्याशी आम्हाला काय करायचंय...... शाळा सुटल्यावर कोऽऽऽण कुठेऽऽऽ जातं ते? मला एवढंच सांगायचंय शाळेच्या वेळेनंतर इथे फक्तं बेंच, टेबल्स, खुर्च्या अशा निर्जीव वस्तू असतात.”
“निर्जिव? ते मासे आहेत ना? ते कुठे निर्जिव आहेत?”
“मग तूम्ही माशांबरोबर टँकमध्ये रहाणार का?” वर्गशिक्षक उपहासाने बोलले.
“नाही मी वर्गात राहीन”
“अहोऽऽऽ पण आमच्याकडे वर्षांनुवर्षे त्याच वर्गात रहाणारी मुलेही, वेळेनंतर घरी जातात हो.” वर्गशिक्षकांना त्या परिस्थितीत कोटी करायचा मोह आवरला नाही.
एव्हाना प्रिन्सिपॉलही तेथे पोहोचले. त्यांनी चौकशी केली असता त्यांना सर्व प्रकार सविस्तार (की तिखट-मिठ लावून) शिपायाकडून कळला होता. त्यांनी विवेकला आपल्या केबीनमध्ये बोलावून घेतले. मग तेथेही वरील प्रकारचेच थोडेफार संवाद झाल्यानंतर प्रिन्सिपॉलनी प्यूनसाठी बेल वाजवली, प्यून आला.
“हे बघ सदानंद, हे आज आपले पाहुणे आहेत. आणि ते चार दिवस इथेच रहाणार आहेत. आपण त्यांचे जीवंत मासे ठेऊन घेतले किनाई तसंच त्यांनाही त्यांच्या इच्छेप्रमाणे चार दिवस ठेऊन घेणार आहोत. तू त्यांच्या माशांची कशी व्यवस्थित देखभाल करतोस ? तसंच आता यांचीही करायची. समंजल? जा आधी एक किलो किडे घेऊन ये.”
“सर एक किलो?”
“आणून ठेव रे, संपले तर ठिक नाहीतर माशांना घालता येतील.”
“म्हणजे ? किडे माशांसाठी आणायचे नाहीत ?”
“तुला काय करायचंय?...... नसत्या चौकशा करत रहातो, सांगितलेलं काम कर जा पटापट.”
सदानंद निघून गेला, इथे विवेकलाही नाही म्हटलं तर थोडं टेन्शन आलंच.
“म्हणजे तुम्ही मला किडे खाऊ घालणार ?” विवेक
“आम्ही माशांना किडेच खायला घालतो, सध्यातरी” प्रिन्सिपॉल
“वा ! वा !! वा !!! उत्तर, असा पाहूणचार हवा,” असे म्हणत विवेकने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. त्यांनीही हस्तांदोलन केले आणि म्हणाले.
“आणखी काही सेवा ? “
“नाही पुरे झाले, मी अतिशय आनंदीत झालो आहे आपल्या पाहुणचाराने. आणि आता असा विचार करतोय की, चार दिवसांनी काय होणार आहे? म्हणून मी बेत बदलला आहे, काही दिवसांनी मी पुन्हा येईन, चांगलं महिनाभर रहायला, चालेल ना?”
“अहो हे काय विचारणं झालं? अवश्य या.”
“बरं मग येऊ आता?”
एवढ्यात सदानंद पुन: आला
“सर ते किडे आणायला पैसे?” सदानंद
“ते किडे जाऊ दे, हे वीस रुपये घे, आणि समोरच्या भटाकडून दोन चहा घेऊन ये, जा पटकन.”
सदानंद गेल्यावर पुन: प्रिन्सिपॉल विवेककडे वळले.
“चहा येईपर्यंत तरी थांबाल ना?”
चहा येईपर्यंत प्रिन्सिपॉल आणि विवेक दोघांच्या गप्पा रंगल्या, त्यानंतर चाहा संपवून प्रिन्सिपॉलचा निरोप घेऊन विवेक घरी परत निघाला. जाताना मनांतच चफडत होता. “सालं ठरवलं होतं एक नी झालं भलतंच..... चांगली जिरवायची होती त्यांची. मग त्यांनी हाता-पाया पडून, गयावया केल्यावर मी उदारपणाचा आव आणून माफ करणार होतं. पण काय करणार, सालं नशीबच XX तर काय करेल पांडू.”
निकालाचा दिवस होता. शाळेचा हॉल खचाखच भरला होता. प्रिन्सिपॉल भाषण करायला उठले. त्यांनी नेहमीप्रमाणे शिक्षण पद्धती, पालकांकडून अपेक्षा, शासनाकडून अपेक्षा इत्यादी घिसेपिटे विचार बोलून झाल्यावर नविनच विषय छेडला. ...
“आम्हा शिक्षकांचे काम कितीही साधे वाटले तरी ताण आम्हालाही असतोच. वर्षभर मुलांना सांभाळणे, शिकवणे, संस्कार करणे या बरोबरच मुल्यमापन करणे हे एक आव्हानच असते. कधी-कधी काही कारणांमुळे एखाद्याला त्याच्या योग्यतेपेक्षा कमी गुण किंवा दर्जा दिला जाऊ शकतो. अर्थात माझे सहकारी जाणिवपूर्वक पक्षपात करत असतील असे मला वाटत नाही. पण असं घडल्यास काही पालक फारच त्रागा करतात, तर काही पालक सुचकपणे आमच्या चुका आमच्या नजरेसमोर आणतात.”
विवेकला हा सर्व रोख आपल्यावर आहे, हे कळत होतं. आता फक्त पळून जावं इतकंच त्याच्या मनांत होतं. प्रिन्सिपॉल पुढे बोलते झाले.
“मला विशेष उल्लेख करावासा वाटतो की, 10 दिवसांपूर्वी मिस्टर विवेक वाडेकर या एका सुजाण पालकाने आमच्या शाळेस स्नेहभेट देऊन, आम्हा शिक्षकांचा वर्षभराचा ताण एका झटक्यात हलका केला आणि आम्हाला हसायला शिकवलं. त्यानिमित्त या शाळेतर्फे त्यांचा 'शाल व श्रीफळ' देऊन सत्कार करण्यात येत आहे. कृपया वाडेकरांनी स्टेजवर यावं.”
शालजोडीतले हाणणे म्हणजे काय?, याचा प्रत्यय विवेकला शब्दश: येत होता. आता नाईलाज होता, तो यंत्रावत उठला, खालमानेनेच स्टेजवर पोहोचला. प्रिन्सिपॉलकडे पाहिले तर त्यांच्या चेह-यावर सराईतांचा निर्विकारपणा दिसत होता. विवेकचा 'शाल व श्रीफळ' देऊन सत्कार करण्या आला. प्रिन्सिपॉलने आणखी एक सिक्सर मारला.
“आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला नितांत गरज आहे. म्हणूनच आपल्याला जमेल तेव्हा आम्हाला आवर्जुन भेट द्यावी ही माझी वाडेकरांना वैयक्तीक विनंती आहे.”
सर्वत्र टाळ्यांचा आवाज होत होता. विवेकने हळूच इतर शिक्षकांकडे पाहिले. त्यांच्या चेह-यावर खरंच कौतुक दिसंत होतं. मग हळूच आपली नजर प्रेक्षकांकडे वळवली. कौतुकाने आणि उत्कंठेने ओतप्रोत भारलेले प्रेक्षक आपल्यासाठी इतक्या प्रदीर्घ वेळ टाळ्या वाजवताहेत ही कल्पनाच रोमांचकारी होती. असा अनुभव विवेकसाठी नवा होता. त्याला गहिवरून आलं होतं. या आसमंतात प्रिन्सिपॉलचा खोचकपणा केव्हाच विरून गेला होता..... एवढ्यात....... तिस-या रांगेतील मधल्या खुर्चित चक्क निकिताची आई बसली होती.... तीही कौतुकाने आणि आनंदाने टाळ्या वाजवत होती..... आणि विवेकचं लक्षं तीच्या दिशेला जाताच तीने आपला उजवा हात उंचाऊन हलवत विवेकचं लक्षं वेधून घेतलं. ...... आणि स्वत:च्याच नकळत विवेकनेही तीचं अनुकरण केलं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users