सांजवेळ

Submitted by सचिन पगारे on 31 March, 2013 - 08:22

दिगूअण्णा खिडकीच्या बाहेर बघत बसले होते. खाली जी मुले खेळत त्यांना बघणे, दिवसभर रहदारी बघणे. हा त्यांचा नेहमीचा क्रम होता .दिवस तर कसाबसा ढकलला जात असे पण संध्याकाळ मात्र उदासवाणी असे. ह्या सांजवेळी दिगूअण्णा नेहमीच अस्वस्थ असत.

आतल्या खोलीत मालतीबाई जपमाळ ओढत बसे. ह्या जोडप्याची देखभाल करण्यासाठी कोणीही नव्हते. घरात पैसा होता पण मायेच कुणी नव्हत. दिगूअण्णाना मालतीबाई नि मालतीबाईना दिगूअण्णा इतकेच त्यांचे विश्व.

शेजारच्या सखारामबापूंचे भरलेल कुटुंब त्यांना नेहमीच मोहवत असे. सखारामबापूंची नातवंड दुपारी दिगूअण्णाच्या घरी येत तेव्हा दिगूअण्णा नी मालतीबाईना फार आनंद होत असे.

सखारामबापूंचा मुलगा बबन हा खरच गुणी मुलगा होता.दिगूअण्णाचा माधव आणि हा बबन एकाच वयाचे दोघेही एकत्रच शिकले पण शैक्षणीक प्रगतीत माधव हा नेहमीच वरचढ होता. दिगूअण्णाची साम्पतिक स्तिथी हि सखारामबापूंपेक्षा चांगली होती. निरनिराळ्या क्लास्सेस यांचा मारा करून माधव हा अभ्यासात चांगलाच पुढे आला होता. बबनची मात्र एवढी प्रगती नव्हती सखाराम बापूंच्या तुटपुंज्या मिळकती मुळे त्यांना बबनच्या शैक्षणीक प्रगतीकडे नीट लक्षच देता आले नव्हते.आणि बबनही शिक्षणात सामान्यच होता.

काळ आपल्या वेगाने पुढे निघून गेला माधव हा एक संगणक अभियंता झाला व अमेरिकाला जाऊन सेटल झाला तर बबन हा एका कंपनीत कारकून म्हणून कामाला लागला त्याने एका घरगुती मुलीशी लग्न केले व त्यांचा संसार सुरु झाला माधवनेही एका अमेरिकन मुलीशी लग्न केले व तो तिथेच स्थायिक झाला.

आज दिगूअण्णा जेव्हा दोन्ही संसाराकडे बघत होते तेव्हा त्यांना जाणवले कि ज्यावेळी माधवची शैक्षणीक प्रगती होत होती त्यावेळी ते आनंदात होते. परंतु आज मात्र तशी परिस्तिथी नव्हती

सखारामच्या कुटुंबाकडे पुरेसा पैसा नव्हता. तथाकतीत प्रतिष्ठेची साधने नव्हती. पण त्या घरात प्रेम होते, जिव्हाळा होता, कौटुंबिक सौख्य होते. बबन हा आपल्या आई वडिलांकडे लक्ष देई. घरात पैसे दिले म्हणजे आपले कर्तव्य झाले असे मानणाऱ्यापैकी बबन नव्हता. त्याला बढतीची जागा मिळत होती पण त्या साठी दुस ऱ्या राज्यात जावे लागेल अशी अट होती.

पण बबनने बढती नाकारली व आई वडिलांची सेवा करण्यासाठी तो येथेच राहिला. सखारामबापूंनी त्याला समजावले “बेटा, तू जा आमची काळजी करू नको. आम्ही काय पिकले पान. आज आहोत, उद्या गळून पडणार”. पण बबन म्हणाला, “बाबा, तुम्ही मला काटकसर करून शिक्षण दिलेत. तुमची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे. आज उतारवयात तुम्हाला नि आईला माझी गरज आहे. मी जास्त पैशांसाठी नि करीअरसाठी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही.तो कृतघ्नपणा होईल. करीअर पैसा ह्या गोष्टी निश्चितच मोठ्या आहेत. पण माझ्या आई वडिलांपुढे त्या मला तुच्छ आहेत. थुंकतो मी त्या जादा मिळणाऱ्या पैशांवर. जर मला आई वडिलांचा त्यासाठी त्याग करावा लागणार असेल.” मला माहित आहे बाबा मी लहान असताना जेव्हा आजारी पडे. तेव्हा तुम्ही नि आई रात्ररात्र माझ्या उशाशी बसून काढल्यात. आज तुम्ही वृद्ध झालात तुम्हाला आज माझी खरी गरज आहे, तर मी तुम्हाला सोडून कसा जाऊ. बाबा, मला जर कुणी गरीब म्हटले तर मला काही वाटणार नाही. पण पैशांसाठी आई वडिलांना सोडणारा कृतघ्न म्हटले तर मला माझीच लाज वाटेल, बाबा”.शेवटी त्याच्या हट्टापुढे सखारामबापू झुकले.

इकडे माधव अमेरिकेत सेटल झाला होता. आपल्याला नातू झालाय हे दिगूअण्णाना फेसबुकच्या माध्यमातून कळले. अनेक वर्षांनी त्यांना आपल्या मुलाला भेटायचा योग आला. ते सपत्निक अमेरिकाला गेले. आपली अमेरिकन सून नि नातवंडे त्यांनी डोळे भरून पाहिली.नातवाना हे आजी आजोबा बिलकुल आपले वाटले नाही. त्यांची छोटी नात तर आजीचे कुंकू, गळ्यातले मंगळसूत्र, साडी हा अवतार बघून एकाद्या परग्रहावरील माणसाला पाहावे तशी त्यांना पाहू लागली. एकदा मालतीबाईनी आपल्या सुनेला संकष्टीचा उपवास धरायला सांगितला. तेव्हा सुनबाई फक्त हसली. नंतर माधव आईला म्हणाला,”तिला पुन्हा असे काही सांगू नकोस.तिला ह्या गोष्टीन मध्ये अजिबात रस नाही”. मालतीबाई नाराज झाल्या. नातवान्शीही त्यांचे कधी जुळलेच नाही आजी बाबा आपल्या नातवाना अनोळखीच राहिले. माधव आपल्याला एकदाही इथे कायमचे राहायला या असे बोलला नाही हे दिगू अण्णांना चांगलेच खटकले.

शेवटी महिनाभर तेथे राहून दिगूअण्णा नि मालतीबाई परतले. तोच त्यांना आमंत्रण मिळाले सखारामबापूंच्या एकसष्ठीचे. दिगूअण्णा मागील महिन्यातच एकसष्ठ वर्षाचे झाले होते पण कोणालाच त्याची आठवण नव्हती. सखारामबापूंची एकसष्टी जोरात झाली. शंभर एक पान उठले. बबन सपत्निक आईवडिलांच्या पाया पडला.आपण आज जे यशस्वी आहोत त्यामागे आईवडिलांचा आशीर्वादच आहे हे त्याने ठासून सांगितले.

काटकसरीत थोड्या पैशात संसार करणारा बबन आज स्वताला यशस्वी म्हणत होता याचे दिगूअण्णाना कौतुक वाटले. दिगूअण्णानी सखारामबापूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व म्हणाले “सखाराम, आपण बालमित्र मी जीवनात नेहमीच तुझ्या पुढे राहिलो. तुझ्याहून जास्त पैसा कमावला. पोराला शिक्षण दिले, पण आज मला कळते कि, मी तो इसापनितीतला ससा आहे नि तो तू कासव, शेवटी शर्यत जिंकणारा. आज आपल्या ह्या जीवनाच्या सांजवेळी नक्कीच तू माझ्यापेक्षा सुखी आहेस तुझ्यासारखेच यशस्वी जीवन साऱ्याना लाभो हीच प्रार्थना.”

सखारामबापू भारावल्यासारखे दिगूअण्णाकडे पाहतच राहिले..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिगूअण्णा आणि मालतीबाई यांना वेळ सत्कारणी लावण्याकरता स्वतःला गुंतवून घ्यायची गरज आहे. शेजार्‍यांची मुलं कमी शिकली, पुढे नोकरी, पगार फार नाही म्हणूनही स्वतंत्र राहणं परवडत नसल्याने एकत्र राहत असतील तर त्यांच्याकडे बघून हळहळण्यात काही अर्थ नाही. तुमच्या बघण्यात असे दिगूअण्णा असतील तर त्यांच्यावर सहानुभूतीपर लेख लिहिण्यापेक्षा त्यांना वेळ घालवण्याचे उपाय सुचवून त्यांनी काय केलं ह्यावर लिहा. ते वाचायला जास्त आवडेल.

छ्या! काहीतरीच बर्का तुमचं सायो ताई.
अहो, बबनला वेगळ्या शहरात बढती व बदलीचा योग आला होता की! त्याने तो बाणेदारपणे नाकारला. पहा, काय शब्द आहेत त्याच्या तोंडी!
>>
पण बबन म्हणाला, “बाबा, तुम्ही मला काटकसर करून शिक्षण दिलेत. तुमची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे. आज उतारवयात तुम्हाला नि आईला माझी गरज आहे. मी जास्त पैशांसाठी नि करीअरसाठी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही.तो कृतघ्नपणा होईल. करीअर पैसा ह्या गोष्टी निश्चितच मोठ्या आहेत. पण माझ्या आई वडिलांपुढे त्या मला तुच्छ आहेत. थुंकतो मी त्या जादा मिळणाऱ्या पैशांवर. जर मला आई वडिलांचा त्यासाठी त्याग करावा लागणार असेल.” मला माहित आहे बाबा मी लहान असताना जेव्हा आजारी पडे. तेव्हा तुम्ही नि आई रात्ररात्र माझ्या उशाशी बसून काढल्यात. आज तुम्ही वृद्ध झालात तुम्हाला आज माझी खरी गरज आहे, तर मी तुम्हाला सोडून कसा जाऊ. बाबा, मला जर कुणी गरीब म्हटले तर मला काही वाटणार नाही. पण पैशांसाठी आई वडिलांना सोडणारा कृतघ्न म्हटले तर मला माझीच लाज वाटेल, बाबा”<<

खरा श्रावणबाळ!! वा!

पन मग बबन तर त्याच्या आई बाबाना घेऊन नोकरिच्या थिकानि जाऊ शकत होता कि त्यासाथी त्याला बधती नाकारायची काय गरज होती???

माधव किंवा बबन मोठेपणी कसे वागले हे त्यांनी लहानपणापासून काय पाहिले यावरही अवलंबून नाही का? भरमसाट क्लासेस लावुन त्यासाठी पैसे पुरवणे एवढंच काम दिगुअण्णांनी केलं तर पैसे पुरवणे महत्वाचे एवढं माधवच्या डोक्यात बसलेलं असेल तर त्याला तो काय करणार? पुढे आपली काळजी घ्यावी या हेतुने मी ही इनव्हेस्टमेंट करत आहे असं स्पष्टपणे दिगुअण्णांनी माधवला सांगितलं असतं तर अशी वेळ आली असती का?
एकमेकांशी बोलणे का जमत नाही लोकांना? नातं कोणतंही असो, संवाद साधला गेला पाहिजे. नोकरीतही 'अपेक्षा निश्चित करणे' हा मुख्य प्रकार होतो. मग काय करावे, करावे का, झाले का हे सारे पाहिले जाते. अव्यक्तं समजून घ्यायच्या अपेक्षा कशाला? तसेच पालकांना मुलांसोबत रहायचे असेल तर त्यांनी तसे सांगायला नको का? संवाद साधून सुवर्णमध्य काढायचा की कधीतरी त्यांना स्वतःहून समजेल म्हणून वाट पहात रडत रहायचं? दिगुअण्णांनी मुलाकडे रहाणं, दिगुअण्णांकडे कोणीतरी पूर्णवेळ रहाणं, वृद्धाश्रम इत्यादि बरेच पर्याय आहेत सोबतच हवी तर. हे सगळं न करता दुसर्या माणसासमोर मुलांची तक्रार करणं चुकीचंच..
बबनलाही तसेच सर्व पर्याय होते करियरसाठी. आईबाबांना घेऊन दुसरीकडे जाणे किंवा दुसरी व्यवस्था करणे. आपल्यामुळे आपल्या मुलाची प्रगती खुंटते आहे हा सल सखारामबापूंना अस्वस्थ करणार नाही का?
आपण एखाद्या गोष्टीकडे कसे पाहतो यातच सगळं येतं. माझ्या मुलाने त्याला हवी तशी प्रगती केली आता मी समाधानी आहे किंवा माझ्यामुळे मुलाची प्रगती खुंटली म्हणून मी दुःखी आहे अशाप्रकारे काहीही.. शेवटी आनंदात रहायचे की कुढत कुढत हा ज्याचा-त्याचा प्रश्न ...

हम्म.. पेराल तस उगेल !
अवांतर (बबन हा एका कंपनीत कारकून म्हणून कामाला लागला त्याने एका घरगुती मुलीशी लग्न केले >> घरगुती मुलगी म्हणजे Uhoh , मला घरगुती हे विशेषण लोणचे, पापड ई. वस्तुसाठीच माहिति आहे)

घरगुती मुलगी म्हणजे , मला घरगुती हे विशेषण लोणचे, पापड ई. वस्तुसाठीच माहिति आहे) हह्यह्यहयहयहयहयहह हेहेहेहेहेहेहेहे

स्मित. घरगुती मुलगी म्हणजे काय हे समजण्यासाठी वंदना बर्वेंचे लेख वाचा. त्यांचे याविषयात प्रचंड संशोधन आहे म्हणे.