ब्रेकिंग न्यूज...

Submitted by झुलेलाल on 29 March, 2013 - 02:17

आगामी लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्ता मिळाली किंवा मिळाली नाही, तरीही पक्ष संघटनेत प्रचंड फेरबदल करण्याचा निर्णय काँग्रेस महासमितीच्या काही गुप्त बैठकांमध्ये झाला असून निवडणुकीनंतर राजसंन्यास घेण्याचे विद्यमान गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे मनसुबे पक्षातूनच उधळून लावले जाणार असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. शिंदे यांच्यावर सोपविल्या जाणाऱ्या एका अतिमहत्त्वाच्या जबाबदारीपूर्वी या जबाबदारीस ते पात्र आहेत किंवा नाहीत याची पडताळणी गेल्या काही महिन्यांपासून पक्षाचे अतिवरिष्ठ नेते अत्यंत गुप्तपणे करीत आहेत.
काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच याची सूत्रबद्ध पूर्वतयारी सुरू असली तरी अद्याप खुद्द शिंदे यांना मात्र त्याची कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नसल्याची पक्षाच्या वरिष्ठ आणि ‘जनपथप्रिय’ सूत्रांकडून समजते. निवडणुकीनंतरच्या राजकीय परिस्थितीवर शिंदे यांच्या गृहखात्याचे बारीक लक्ष असून आगामी निवडणुकीनंतर काँग्रेसप्रणीत आघाडीला सरकारस्थापनेची संधी मिळण्याची शक्यता धूसरच असल्याचा गृहखात्याच्या काही यंत्रणांचा अंदाज आहे. अर्थात, निवडणुकीस अद्याप बराच कालावधी असल्याने मधल्या काळात विरोधी पक्षांच्या बदनामीची आणि शकले उडविण्याची अनेक षड्यंत्रे आखली जात असून त्याचा फायदा पक्षाला उठविता येईल, असाही अहवाल या यंत्रणांनी दिल्याचे समजते. त्यासाठीही शिंदे यांचीच मदत घेण्याची शिफारस पक्षश्रेष्ठींच्या सल्लागारांनी केली आहे.

देशात अत्यंत महत्त्वाच्या सामाजिक समस्येवर सरकार आणि जनताही हवालदिल असते, विरोधी पक्षांनी हत्यारे परजून सरकारला धारेवर धरण्याची तयारी केलेली असते, तेव्हा संकटमोचकाची भूमिका पक्षातील ज्येष्ठ ‘गांधी’वादी नेते दिग्विजय सिंह हे बजावत असतात. पण आता त्यांच्या वक्तव्याची आणि विधानांचीच खिल्ली उडविली जात असल्याने त्यावर वादच निर्माण होत नसल्याचे स्पष्ट झाले आणि पक्षाच्या वरिष्ठ वर्तुळात चिंता पसरली. दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यातून निर्माण होणाऱ्या वादंगामुळे विरोधक दिग्विजय सिंह यांनाच लक्ष्य करतात आणि मूळ प्रश्नापासून सुटका होते हे लक्षात आल्यापासून पक्षश्रेष्ठींनी दिग्विजय सिंह यांना आपले विचारधन मुक्तपणे उधळण्याची मुभा दिली होती, पण दिग्विजय सिंह यांच्या मुक्ताफळ माऱ्यांचा प्रभाव ओसरत चालला आहे. नव्याने उपाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्या राहुल गांधी यांच्या युवा वर्तुळात काही दिवसांपूर्वी यावर सखोल खल झाला. दिग्विजय सिंह यांना बाजूला करण्याची वेळ आल्याचे मत अनेक युवा नेत्यांनी व्यक्त केल्यामुळे तोंडाला कुलूप घालण्याचे आदेश दिग्विजय सिंह यांना देण्यात आले.
राहुल ब्रिगेडमधील युवा वर्तुळाच्या या कारनाम्यांमुळे काँग्रेसमधील ज्येष्ठांमध्ये मात्र तीव्र अस्वस्थता पसरली होती. दिग्विजय सिंह यांची उपयुक्तता आणि विरोधकांसाठी असलेले उपद्रवमूल्य या दोन्ही बाबी पटवून देण्यासाठी अनेक नेत्यांनी थेट सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर राहुल ब्रिगेडच्या निर्णयावर फेरविचार होणार अशा अपेक्षा उंचावल्या होत्या. तेवढय़ात आगामी निवडणूक न लढविण्याचा व राजकारणातून निवृत्ती घेऊन सोलापूरच्या फार्म हाउसवर साहित्यिकांशी गप्पाटप्पा करण्याचा राहून गेलेला आनंद पुन्हा मिळविण्याचा मनोदय सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले व पक्षश्रेष्ठींनी दिग्विजय सिंह यांच्या पुनर्वसनाचा निर्णय बदलला, अशी माहिती मिळते.
निवडणुकीनंतरच्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर लगेचच सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या काही विधानांमुळेच, त्यांच्यावर निवृत्तीनंतरची नवी जबाबदारी देण्याचा पक्षश्रेष्ठींचा ठाम निर्णय झाल्याची माहिती या सूत्रांनी दिली. येत्या लोकसभा निवडणुकीनंतर सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूरच्या फार्म हाऊसवर निवांतपणा न देता, दिल्लीतच आणावे असे ठरले असून दिग्विजय सिंह यांचे स्थान त्यांना बहाल करण्यात येणार आहे.

..राजधानीतील बडय़ा राजकीय नेत्यांच्या एका बैठकीत या संदर्भात गांभीर्याने झालेल्या चर्चेचा तपशील ‘लोकप्रभा’च्या हाती आला आहे. त्या बैठकीतील चर्चेची टिपणे असलेली फाइलच हाती आली असून, आगामी काळात शिंदे बजावणार असलेल्या भूमिकेबद्दलच्या या बैठकीतील उलटसुलट चर्चेचा तपशीलही त्यामध्ये उपलब्ध आहे.

राज्यसभेतील गंभीर विषयावरील चर्चेच्या वेळी सुशीलकुमार शिंदे यांनी खासदार जया बच्चन यांना तंबी देऊन गंभीर विषयाची आठवण करून दिल्याने चर्चेला मिळालेले वेगळे वळण, खतरनाक अतिरेकी हाफीज सईद याचा श्रीयुत सईद असा केलेला उल्लेख, लोकांची स्मरणशक्ती कमी असते याबद्दलचा त्यांचा ठाम विश्वास, कोळसा खाण घोटाळा जनता विसरेल असा खात्रीपूर्वक दावा करून व त्याला बोफोर्सचा संदर्भ जोडून शिंदे यांनी माजविलेल्या वादळामुळे त्या वेळच्या ताज्या प्रश्नांवरून होणारी सरकारची घुमसट थांबल्याबद्दल शिंदे यांना कोणत्या स्वरूपात बक्षिसी द्यावयाची याचाही विचार पक्षश्रेष्ठींकडून सुरू होता. विशेषत: जयपूरच्या काँग्रेस महासमिती शिबिरातील शिंदे यांच्या वक्तव्याने संघ परिवार आणि काँग्रेसचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपची तर पुरती त्रेधा उडाली होती. या वक्तव्याशी पक्ष सहमत नाही, अशी सारवासारव करून काँग्रेसने त्या वेळी शिंदे यांच्या वक्तव्याची जबाबदारी झटकली असली तरी त्यातून निर्माण झालेले वादळ देशासमोरील अन्य अनेक प्रश्नांना बगल देत घोंघावत राहणार व सतावणाऱ्या अनेक वादळांतून सरकार तरणार याची पुरेपूर खात्री मात्र पक्षश्रेष्ठींना होती. यामुळेच आगामी निवडणुकीनंतर शिंदे यांना स्वस्थ बसू द्यायचे नाही यावर पक्षात एकमत झाल्याचे या सूत्रांनी सांगितले.
संघ-भाजपच्या शिबिरात दहशतवादी प्रशिक्षण दिले जाते, हिंदू आतंकवादाचे काही पुरावेही आपल्याकडे आहेत, असे सांगत शिंदे यांनी संघ-भाजपला जी धडकी भरविली त्यामुळे काँग्रेसमध्ये उत्साहाच्या उकळ्या फुटू लागल्या होत्या. दिग्विजय सिंह यांनीही संघ-भाजपला संशयाच्या घेऱ्यात खेचणारी अनेक विधाने यापूर्वी अनेकदा केली होती. अतिरेकी हफीझ सईदला त्यांनीही आदराने संबोधले होते. अमेरिकेवर हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनचा उल्लेखही दिग्विजय सिंह यांनी ओसामा साहब असा आदरार्थी केला होता. ओसामाच्या अंत्यविधीबाबतही त्यांनी आंतरराष्ट्रीय मतप्रदर्शन केले होते. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर संघ-भाजपकडे संशयाची सुई वळविण्याचा प्रयत्नही त्यांनी केला होता, पण त्याचे अपेक्षित वादळ माजले नव्हते. उलट अशी वक्तव्ये केल्याबद्दल दिग्विजय सिंह यांचीच खिल्ली उडविली जाऊ लागली.
या पाश्र्वभूमीवर शिंदे यांची वादग्रस्त विधाने प्रभावी ठरत असल्याचा अनुभव पक्षाला वारंवार येऊ लागल्याने आगामी काळात दिग्विजय सिंह यांच्यावरील जबाबदारी शिंदे यांच्या खांद्यावर टाकून दिग्विजय सिंह यांची उचलबांगडी करण्याचे पक्षाने ठरविले आहे.

सोलापूरच्या फार्म हाउसवर साहित्यिकांच्या गराडय़ातील गप्पांच्या मैफलीत देशाच्या माजी गृहमंत्र्याने कितीही वादग्रस्त विधाने कितीही गांभीर्याने केली, तर साहित्यिक टोळकी त्यावर एकमेकांना टाळ्या देत खदाखदा हसतील, कुणी साहित्यिक आपल्या वर्तमानपत्रीय रकान्याच्या रतीबात त्याचा गमतीने उल्लेख करेल किंवा एखादा स्थानिक वार्ताहर आपल्या वर्तमानपत्रातून शिंदे यांच्या भाकिताची बातमी प्रसिद्ध करेल, पण विनोदापलीकडे फारसे स्थान त्याला मिळणार नाही. मुळातच, विनोद हाच शिंदे यांच्या स्वभावाचा स्थायिभाव असल्यामुळे आणि कितीही गंभीर विधान हसतहसतच करण्याची त्यांची सवयच असल्यामुळे त्यांची वक्तव्ये केवळ हसण्यावारी नेली जातील, पण हीच विधाने त्यांनी, अगदी हसतहसत, दिल्लीत पत्रकारांसमोर किंवा दूरचित्रवाणी माध्यमांसमोर केली, तरी त्यातले गांभीर्य ओळखण्याइतका मूर्ख सुज्ञपणा अनेक संबंधितांकडे असल्याने त्यावर वादळे माजतील याची पक्षश्रेष्ठींना पक्की खात्री आहे, अशी माहिती ही फाइल ‘लोकप्रभा’कडे सोपविणाऱ्या या सूत्रांनी वर्तविली.
(टीप- फाइलमध्ये असलेल्या टिपणीतही तशीच नोंद आढळत असल्याने, या माहितीची शहानिशा करण्याची गरज भासलेली नाही..)

याच फाइलमधील अन्य काही कागदपत्रांतून मिळणारी माहिती आणखीनच स्फोटक आहे. सुशीलकुमार शिंदे यांना वादग्रस्त विधाने करण्यासाठी आवश्यक असलेला स्फोटक मसाला पुरविण्यासाठी काही जाणकार व तज्ज्ञ मंडळींचे सल्लागार मंडळ नेमण्याचाही विचार गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. येत्या वर्षभरात, निवडणुकीअगोदरच, असे सल्लागार मंडळ स्थापन करण्यात येणार आहे. या कालावधीतही शिंदे यांना मुक्त वक्तव्यांची मुभा देण्यात येणार असून शिंदे यांची विधाने विनोदाने घेतली जाणार नाहीत याची खबरदारी हे सल्लागार मंडळ घेणार आहे.
(टिपणी - काँग्रेसचा हा प्रयोग यशस्वी ठरला, तर आगामी काळात अशा सल्लागारांची सर्वच राजकीय पक्षांना कमीअधिक प्रमाणात गरज भासेल व राजकारणबाह्य़ रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असेही राहुल ब्रिगेडमधील शिक्षणतज्ज्ञ तरुणांचे मत आहे. त्यामुळे, अशा प्रकारचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरू करण्याचाही काँग्रेसचा विचार सुरू आहे. भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अशा लोकसेवांच्या धर्तीवरच ‘इंडियन रूमर्स सव्‍‌र्हिस’ (आयआरएस) नावाची नवी पदनिर्मितीही करण्यात येणार असून त्यासाठी स्पर्धापरीक्षांची आखणी करण्याचेही घाटत आहे. ही पदे केवळ राजधानीतच राहणार असल्यामुळे कोणत्याही स्थानिक भाषेतून याची परीक्षा होणार नाही, असेही सध्याच्या नियमावलीत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे, असे या फायलीतील एका टिपणीत म्हटले आहे. अथात, त्यामुळे मराठी उमेदवार या परीक्षेसाठी साहजिकच बाद ठरणार आहेत.)
००००
या फाइलमधील कागदपत्रांत आणखीही काही नोंदी आढळतात. काही नोंदी महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाच्या असल्याने व इतर वृत्तपत्रांत येण्याआधी ‘ब्रेक’ करणे आवश्यक वाटत असल्याने त्यांचाही उल्लेख येथेच करणे आवश्यक आहे.
शहरांमधील वाढत्या साथीच्या रोगांवरून विधिमंडळाच्या विद्यमान अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक सरकारला धारेवर धरणार, अशी माहिती राज्याच्या गुप्तवार्ता विभागाने मुख्यमंत्र्यांना दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सह्य़ाद्री अतिथीगृहात महत्त्वाच्या मंत्र्यांची, वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची आणि महापालिकांच्या आयुक्तांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत अनेक मंत्र्यांनी या समस्येवरील उपाययोजना सुचविल्या. गेल्याच महिन्यात याच मुद्दय़ावर बिहारच्या विधानसभेतही गरमगरम चर्चा झाली होती. (गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र सरकार बिहारमधील अनेक घडामोडींचा सातत्याने मागोवा घेत असून बिहारच्या पावलावर पाऊल ठेवण्याच्या दृष्टीने चाचपणी करण्याच्या गुप्त सूचनाही संबंधितांना देण्यात आल्याचे याच टिप्पणीत म्हटले आहे.) बिहार विधानसभेत या मुद्दय़ावरील चर्चेदरम्यान एका आमदारांनी सुचविलेल्या उपायावर सह्य़ाद्रीवरील बैठकीत ‘आम सहमती’ झाल्याचे या टिपणीवरून समजते.
येत्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील सर्व महत्त्वाच्या शहरांतील साथीचे आजार आटोक्यात आणण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेण्यात येणार असून या योजनेचे नाव ठरविण्यासाठी एक समितीही नियुक्त करण्यात आली आहे. (या समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला कमी प्रतिनिधित्व मिळाल्याबद्दल पक्षात नाराजी व्यक्त होत असल्याचा इशाराही या टिप्पणीतूनच देण्यात आला आहे. शिवाय, विविध योजना जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि महात्मा गांधी किंवा आझाद यांच्या नावाने सुरू असतानाही, नव्या योजनेलाही याच नेत्यांपैकी कुणाचे तरी नाव देऊन राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याच्या हालचालीही सुरू असल्याची नोंद या कागदपत्रांत सापडते.)
साथीचे आजार फैलावण्याचे मुख्य कारण डासांचा प्रादुर्भाव हेच असल्याने डासांचा नायनाट करणे हे या मोहिमेचे अंतिम उद्दिष्ट राहणार आहे. बिहार विधानसभेतील चर्चेदरम्यान, ‘डासांचे निर्बीजीकरण’ करण्याचा उपाय एका आमदाराने सुचविल्याची माहिती सह्य़ाद्रीवरील बैठकीत एका सनदी अधिकाऱ्याने दिली होती. या उपायाचाच या मोहिमेत अंतर्भाव करण्याचे ठरले आहे. हे काम जिकिरीचे असल्याने त्यासाठी प्रचंड मोठा कर्मचारी वर्ग व निधी आवश्यक असल्याचेही या अधिकाऱ्याने बैठकीत स्पष्ट केल्यानंतर कोणत्याही महत्त्वाकांक्षी मोहिमांसाठी राज्य सरकार कधीही निधीची कमतरता पडू देणार नाही, प्रसंगी त्यासाठी कर्ज घेण्याचीही सरकारची तयारी आहे, असे नि:संदिग्ध आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिल्याची नोंद या फाइलमध्ये दिसते. आता राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये डासांच्या निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेण्यात येणार असून विधिमंडळात हा विषय पटलावर येईल तेव्हा तशी घोषणा करून विरोधकांची हवा काढून घेण्याचे डावपेच सत्ताधारी पक्षाने आखले आहेत.
शिवसेनेत ‘टाळीबंदी’
राज्यात नव्याने निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीबाबतची काही टिपणेही या फायलीत आहेत. शिवसेना-मनसेची दिलजमाई, भाजपमधील गडकरी-मुंडे वादावरही त्यामध्ये निसटते भाष्य आढळते. शिवसेनेने सध्या पक्षात ‘टाळीबंदी’ जारी केली असून वरिष्ठ नेत्यांनी घराच्या व कार्यालयांच्या तसेच शाखांच्या खिडक्याही बंद ठेवाव्यात असे आदेश उद्धवजींनी दिल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. ‘टाळी देणे’ अथवा ‘टाळी घेणे’ हा पक्षांतर्गत ‘राजकीय गुन्हा’ समजला जाणार असून असे करणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि नेतेही घराच्या, कार्यालयाच्या किंवा शाखेच्या खिडकीतून ‘डोळे मारतात’ आणि सोबत येण्याच्या खाणाखुणा करतात त्यामुळे राजकीय अस्वस्थता अधिक वाढते अशा तक्रारी मनसेचे नेते व कार्यकर्ते जाहीरपणे करू लागल्याने खिडक्या कायमच्या बंद करण्याचा आदेश जारी झाला आहे. मुंबईतील सर्व शाखांच्या खिडक्या सीलबंद करण्याची मोहीमच लवकरच हाती घेण्यात येणार असून, पालिकेने उतरविलेली होर्डिग्ज व फलक भिंतीच्या आतील बाजूंना उभे करून खिडक्या बंद करण्यात येणार आहेत. टाळीचे अधिकार केवळ उद्धवजींना देण्याबाबतचा एक ठरावही येत्या काही दिवसांत होणाऱ्या आमदारांच्या व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संमत केला जाणार आहे. मात्र, टाळी ‘देण्याचे’ अधिकार, की टाळी ‘घेण्याचे’ अधिकार याबाबत अद्याप पक्षातच संभ्रम असल्याने, भाजपचे गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत चर्चा करून हा संभ्रम दूर करण्यात येणार आहे. मनोहर जोशी आणि मुंडे यांचे सख्य लक्षात घेऊन मुंडे यांच्याशी चर्चा करण्याकरिता मनोहर जोशी यांच्या नावाची शिफारस करण्यात येणार आहे. यामुळे राऊत समर्थकांत काहीशी नाराजी असली तरी त्यांची समजूत काढण्याचे काम नार्वेकर करणार आहेत.
भाजपमध्ये दिलजमाई
शिवसेना आणि मनसे यांनी महायुतीत एकत्र यावे व महायुतीची शक्ती वाढावी यासाठी प्रयत्न करणारे गोपीनाथ मुंडे यांची शक्ती मात्र पक्षातच कमी होत असल्याने, राज-उद्धव यांच्या ऐक्याबरोबरच मुंडे-गडकरी ऐक्य व्हावे यासाठी पक्षांतर्गत प्रयत्नांना यश येणार असे दिसत आहे. यासाठी खुद्द विनोद तावडे यांनीच पुढाकार घेतला आहे. गोपीनाथ मुंडे हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, याचा पुनरुच्चार गडकरी यांनी करावा व उभयतांमधील वाद मिटवावा असे तावडे गटाचे प्रयत्न असले, तरी गडकरी गट त्यावर समाधानी नाही. गडकरी हे संघटनात्मक राजकारणात आहेत आणि आपण संसदीय राजकारण करत असल्याने वादाचा प्रश्नच नाही, असे मुंडे यांनीच जाहीर केले होते. याची आठवण करून देत, संघटनात्मक बाबीत मुंडे ढवळाढवळ करणार नसतील तरच ऐक्य शक्य होईल, असा पवित्रा गडकरी गटाने घेतला आहे. विशेष म्हणजे, गडकरी हे आता माजी राष्ट्रीय अध्यक्ष असल्याने, त्यांचे वजन दिल्लीत वाढलेले असतानाच, शरद पवार यांनीही आपले वजन गडकरींच्या पारडय़ात टाकले आहे. पूर्ती प्रकरणानंतरच्या वादात शरद पवार व अजित पवार यांनी एकमुखाने गडकरींची स्तुती करून मुंडे यांनाच शह दिला होता. बीडमधील घरफोडीच्या प्रकरणानंतर मुंडे व अजितदादा यांच्यात भडकलेल्या वादामुळेच पवार कुटुंब मुंडे यांच्या विरोधात गडकरींच्या पाठीशी उभे असले तरी दिल्लीत भाजपमध्ये पवार यांच्याविषयी ‘आशादायक ’ आदराची भावना असल्याने गडकरींना त्याचाही लाभ मिळेल व मुंडेंना माघारच घ्यावी लागेल, मगच दिलजमाई होईल अशी शक्यताही या कागदांवरून व्यक्त होते.
००००
या फायलीतील आणखीही कागदपत्रे चाळली असता स्फोटक बातम्यांचा खजिनाच हाती सापडत गेल्याने कुतूहलापोटी शेवटच्या पानापर्यंत चाळणी केली असता, फाइलच्या अखेरच्या पानावरील नोंदही येथे नमूद करणे आवश्यक वाटते. या नोंदीनुसार, ‘सनसनी’ नावाने वृत्तप्रसारण करणाऱ्या एका वाहिनीच्या होळीनिमित्तच्या प्रसारणासाठी तयार करण्यात आलेल्या नोंदींची ही फाइल असल्याचे दिसते; तथापि होळीच्या दिवशी त्या वाहिनीवर अशा प्रकारच्या कोणत्याच बातम्या न झळकल्याने आमच्या प्रतिनिधीने मिळविलेल्या माहितीनुसार, या फाइलची एकमेव प्रत गहाळ झाल्याने त्या दिवशीचे हे सनसनी वृत्तप्रसारणच रद्द करण्यात आले. अशा बातम्या पुरविणाऱ्या सूत्रांचे जाहीर आभार मानण्याची प्रथा प्रसार माध्यमांत नाही; परंतु एका वृत्तवाहिनीवर कुरघोडी करून एप्रिलच्या पहिल्याच दिवशी ‘ब्रेकिंग न्यूज’ची ती संधी आम्हाला दिल्याबद्दल आम्ही या सूत्रांचे शतश: आभारी आहोत.

http://www.lokprabha.com/20130405/cover.htm

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण 'जस्टीस' कटजूनी सुशीलकुमार शिंदेना याबाबतीत जोरदार स्पर्धा करण्याचा विडाच उचलला आहे, असंही खात्रीलायक स्त्रोताकडून कळतं ! Wink