मला जसे सुचले, जमले तसे जगत गेलो!

Submitted by गझलप्रेमी on 23 March, 2013 - 11:32

गझल
मला जसे सुचले, जमले तसे जगत गेलो!
जिंदगीस मी सामोरा हसत हसत गेलो!!

गाव दूर होते, रस्ता बिकट खूप होता.....
अखेरचे अंतर, तर मी रडत कढत गेलो!

ठसठसायच्या जखमाही किती, चालताना.....
हसू चेह-यावर ठेवत, कण्हत कण्हत गेलो!

वेंधळेपणा बघ माझा जगावेगळा हा.....
मुसळधार दु:खे होती, भिजत भिजत गेलो!

असा कोणत्या मातीचा मी असेन बनलो?
शोधण्यास ते, मजला मी खणत खणत गेलो!

मीच एक उरलो सरत्या पिढीची निशाणी!
हळू हळू का होईना, रुळत रुजत गेलो!!

सूर्य एक होतो, ज्याचे वय उतार झाले!
धर्म तळपण्याचा पाळत, निवत निवत गेलो!!

समीक्षकांनो! चालू द्या थयथयाट तुमचा.....
मी गझल भटांची होतो, मुरत मुरत गेलो!

तुझा फक्त ओझरताही स्पर्श बघ पुरेसा!
डवरल्या तरूसम मीही फुलत फुलत गेलो!!

मीच रान होतो, वणवा मीच लागलेला!
शहर बघ्यांचे होते, मी जळत जळत गेलो!!

काय काय अजुनी नाही कळत, हे समजले......
कमी कमी ताठा झाला, झुकत झुकत गेलो!

खुडायची होती त्यांना फुले सर्व माझी!
अचानक कसा मी त्यांना सलत सलत गेलो!!

कार्यभार आयुष्याचा आटपून झाला!
भेटण्यास मृत्यूलाही पळत पळत गेलो!!

..................गझलप्रेमी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गझल आवडली,
विशेषतः

<< मीच रान होतो, वणवा मीच लागलेला!
शहर बघ्यांचे होते, मी जळत जळत गेलो!!

काय काय अजुनी नाही कळत, हे समजले......
कमी कमी ताठा झाला, झुकत झुकत गेलो! >> अप्रतिम आशय!

त्यांचा लोभ असण्यापेक्षा त्यांना 'असाच एकच कुठलातरी आय डी असू द्या' म्हणणे तुम्हाला सोयीस्कर ठरेल गझलप्रेमी!

धन्यवाद अमेयजी!
असाच लोभ असू द्या!
अवांतर: आज लिहिलेली एकटाकी गझल आहे ही, परमेश्वर कृपेने!
आज पूर्ण दिवस हीच गझल गुणगुणत होतो व तिच्याच कैफात दिवसभर वावरत होतो!
कधी कधी परमेश्वर आमच्यावर कृपेची अशी बरसात करतो व आमच्याकडून असे काहीबाही लिहून घेतो!
आम्हीफक्त निमित्तमात्र आहोत!

>>>कधी कधी परमेश्वर आमच्यावर कृपेची अशी बरसात करतो व आमच्याकडून असे काहीबाही लिहून घेतो!
आम्हीफक्त निमित्तमात्र आहोत!<<<

साहेब, परमेश्वराने या रचनेची लय काय सांगितली आहे ते सांगता का? रचना म्हणता येत नाही आहे मला तरी

भूषणराव!
साहेब, परमेश्वराने या रचनेची लय काय सांगितली आहे ते सांगता का? रचना म्हणता येत नाही आहे मला तरी<<<<<<<<<<<<<
आहो आम्ही कुठले आलो साहेब? असो.

हे एक मात्रावृत्त आहे!
नाव माहीत नाही!
२४ मात्रांचे हे वृत्त आहे.
लय आहे..........१४मात्रा + १० मात्रा = २४ मात्रा.
१४ मात्रांनंतर यति येत असावा!
भटांची एक सुंदर गझल याच वृत्तात आहे जिचा मतला आहे.........
तुम्ही काय म्हणता याचा मज विषाद नाही!
मी जिवंत आहे माझा हा प्रमाद नाही!

भूषणराव १३ शेरांची ही गझल आहे, एकाही शेरावर आपण काही वदला नाहीत? आश्चर्य वाटले!

>>>हे एक मात्रावृत्त आहे!
नाव माहीत नाही!
२४ मात्रांचे हे वृत्त आहे.
लय आहे..........१४मात्रा + १० मात्रा = २४ मात्रा.
१४ मात्रांनंतर यति येत असावा!<<<

अहो तेच तर म्हणालो, की १२ वेळा गा आहे पण १३ वेळा आल्यासारखा वाटत आहे.

>>>भूषणराव १३ शेरांची ही गझल आहे, एकाही शेरावर आपण काही वदला नाहीत? आश्चर्य वाटले!<<<

असा कोणत्या मातीचा मी असेन बनलो?
शोधण्यास ते, मजला मी खणत खणत गेलो!

काय काय अजुनी नाही कळत, हे समजले......
कमी कमी ताठा झाला, झुकत झुकत गेलो!<<< अप्रतिम शेर

मला जसे सुचले, जमले तसे जगत गेलो!
जिंदगीस मी सामोरा हसत हसत गेलो!!

गाव दूर होते, रस्ता बिकट खूप होता.....
अखेरचे अंतर, तर मी रडत कढत गेलो!

ठसठसायच्या जखमाही किती, चालताना.....
हसू चेह-यावर ठेवत, कण्हत कण्हत गेलो!

वेंधळेपणा बघ माझा जगावेगळा हा.....
मुसळधार दु:खे होती, भिजत भिजत गेलो!<<<

चांगले शेर!

नमस्कार
प्राध्यापक महाशय
कुठे या माणसाच्या नादी लागता ?

कळावे आपला नम्र
किरण
(वाचलेत ना? आमचे काम झाले आहे :हहगलो:. मायबोली आधीच सोडली आहे.)

समीक्षकांनो! चालू द्या थयथयाट तुमचा.....
मी गझल भटांची होतो, मुरत मुरत गेलो!<<<

हा शेर एका वेगळ्या अर्थाने महत्वाचा आहे. भटांच्या गझलेबाबत असा शेर पाहण्यात आला नव्हता, आवडला. पण पहिली ओळ जरा अधिकच आक्रमक वाटली. Happy

भूषणराव, कोणत्या मिस-यात २६ मात्रा आल्या आहेत?
आमच्या कल्पनेप्रमाणे प्रत्येक मिस-यात १४+१० = २४ मात्रा असाच हिशेब लागत आहे!
यतिही ब-यापैकी सांभाळला गेला असावा!
आपण मात्रा मोजल्यात का?
की १३ दुने २६ मत्रांचा भास होत आहे असे आपणास म्हणायचे आहे?
कृपया मार्गदर्शन करावे!

भूषणराव!
समीक्षकांनो! चालू द्या थयथयाट तुमचा.....
मी गझल भटांची होतो, मुरत मुरत गेलो!<<<

हा शेर एका वेगळ्या अर्थाने महत्वाचा आहे. भटांच्या गझलेबाबत असा शेर पाहण्यात आला नव्हता, आवडला. पण पहिली ओळ जरा अधिकच आक्रमक वाटली<<<<<<<<<<<

हा शेर फक्त भटांच्या गझलेसाठी नव्हे तर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणा-या प्रत्येक शायराच्या गझलेसाठी आहे, जे सांगण्यासाठी आम्ही म्हणतो की, मी गझल भटांची होतो, मुरत मुरत गेलो!
इथे मी हा प्रातिनिधिक आहे भटांच्या पावलांवर पाऊल ठेवणा-या प्रत्येक शायरासाठी!

टीप : ही गझल व हा शेर आजच लिहिले आहे!

प्रयत्न चांगला आहे.

मला जसे सुचले, जमले तसे जगत गेलो!
>> जसे जमले तसे कायम, जगत जगत गेलो असा वाचला मी.

आनंद यात्रीजी,
सुचवलेला पर्याय चांगला आहे, पण वृत्ताचे काय?
मात्रा=२४हव्यात!
आपल्या पर्यायी मिस-यात २३ होतात, शिवाय लयीचे काय?

लय अतीशय आवडली
काफिया दोनदा वापरून एक छान इफेक्ट साधला गेला आहे पण प्रत्येक शेरात तसे जाणवत नाही आहे काही शेर काफियास संपूर्णपणे न्याय देणारे असे वाटले नाहीत ...हेही वै. म. कृ. गै. न.

जळत जळत आणि झुकत झुकत अतीशय उत्तम शेर झालेत माझ्या मते
जळत वरून तो तुमचा मूळ शेर आठवला ज्यास मी बदल सुचवला होता ..............

मनाच्या जंगलामध्ये स्मृतींचा केवढा भडका
कुणाला काय हो त्याचे बघूया काय होते ते ( बदल : जगू आयुष्य वणव्याचे बघूया काय होते ते )

धन्यवाद

मात्रा=२४हव्यात!
आपल्या पर्यायी मिस-यात २३ होतात, शिवाय लयीचे काय?

>> Uhoh

जसे जमले तसे कायम, जगत जगत गेलो
१२ ११२ १२ २११, १११ १११ २२
होतायत की २४. तुम्ही २३ कशा मोजल्या?

लयसुद्धा आहे की! जिथे स्वल्पविराम दिलाय, तिथेच यति येतोय.

धन्यवाद वैभवा!
प्रांजळ प्रतिसादाबद्दल!

तुला आमचे शेर स्मरतात बघून बरे वाटले!

अवांतर: ही एकटाकी लिहिलेली गझल आहे! एक पूर्ण दिवस लागला होता!


..........गझलप्रेमी

धन्यवाद भूषणराव सुखद आठवण करून दिल्याबद्दल!

मात्रांच्या हिशेबावर वदला नाहीत?

दुस-या एका ठिकाणी आम्ही आपणास एक संकल्पात्मक प्रतिसाद दिला होता! कसा वाटला आपल्याला तो?

आपण आमची मानसिकता आमूलाग्र बदलून टाकली त्याबद्दल आभारी आहे!

आपली प्रगल्भता आम्हास सांभाळून घेत असल्याबद्दल खूप बरे व सिक्युअर वाटत आहे!

सामाजिक व भावनिक बुद्धीमत्तेत आम्ही थोडे कमीच पडतो हे आम्हास कबूल आहे!
सुधारण्याचा डोळस प्रयत्न चालू केला आहे!
आपली साथ आहेच!

.................गझलप्रेमी

आपला कुणाशीतरी सुखसंवाद चाललेला असला की पाहून बरे वाटते देवसर !

ही अवस्था अशीच राहो ही विठ्ठलचरणी प्रार्थना

तू साथ दिलीस तर अवघड काहीच नाही,>>>>>>

मग आजवर काय करत आलोय आम्ही मायबोलीकर ??? तुम्हाला आमचा हात हातात घेता आला नाही त्यास आम्ही काय करणार ??

Pages