ll पुन्हा आळंदी ll

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 23 March, 2013 - 07:33

मना वाटे जावे l इथेच संपून l
पुन्हा जाणं येणं l घडो नये ll १ ll
तुझिया स्वरूपी l जावे मिसळून l
शून्य हा होवुन l देह प्राण ll २ ll
सुटला मोह l सुटली बंधनं l
मनाच धावणं l पांगुळलं ll ३ ll
प्राणाचा हा प्राण l सामोरी पाहून l
झरे नेत्रातून l इंद्रायणी ll ४ ll
कोंदटला श्वास l हुंदका दाटून l
गेलो विसरून l स्थळ काळ ll ५ ll
माझ्या मीपणाचा l होवूनिया अंत l
जाणिवेची मोट l रिती झाली ll ६ ll
चंदन तुळस l गंध अबीराचा l
विसर जगाचा l पडियेला ll ७ ll
आनंद मनात l आनंद देहात l
निनाद कानात l पांडुरंग ll ८ ll
जीर्ण गाठोड्यास l हिसका बसून l
आले संवेदन l कसे बसे ll ९ ll
परतलो पुन्हा l जड पावुलांनी l
मर्जी स्वीकारुनी l तुझी देवा ll १०ll

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम.
अतिशय भावपूर्ण, भक्तिमय रचना.
विक्रांतजी, आळंदीत तुमची स्वतःची अशीच अवस्था झाली असणार हे अगदी लक्षात येतंय....

विक्रा॑तजी,
लिखाणावरुन आपण पक्के वारकरी दिसता.
येत्या वारीला येत असाल तर हडपसर मध्ये भेटण्याचा योग येऊ शकतो.

जीर्ण गाठोड्यास l हिसका बसून l
आले संवेदन l कसे बसे ll ९ ll
>>> वाह जी वाह.... वाचता वाचता तुमच्या भक्तीमय भावनेतून आम्हीही जागे झालो ह्या ओळींसह...

आवडली !

वा....वा........ फार सुरेख !!

आनंद मनात l आनंद देहात l
निनाद कानात l पांडुरंग ll ८ ll
जीर्ण गाठोड्यास l हिसका बसून l
आले संवेदन l कसे बसे ll ९ ll
परतलो पुन्हा l जड पावुलांनी l
मर्जी स्वीकारुनी l तुझी देवा ll १०ll............. अप्रतिम !!

आनंद मनात l आनंद देहात l
निनाद कानात l पांडुरंग ll.....

अगदी गाभारयात असल्यासारखे वाटतय …. Happy