शतक

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

आज आमच्या प्रिय मंडळाच्या 'शब्दगंध' ह्या काव्य-उपक्रमाचा १०१ वा कार्यक्रम होता. 'शतक' ह्या विषय घेऊन कविता करायची होती तेंव्हा केलेली कविता....

वय वर्ष शून्य
हाताच्या दोन्ही मुठीभरुन
आयुष्य घेऊन जन्माला आलेलं
पण ना जगण्याची भ्रांत
ना आपण आहोत त्या जगाचा पत्ता
आईच्या कुशीत
शांतपणे निजलेलं

वय वर्ष दहा
खाऊन आईच्या हातचे धपाटे
आणि आजीच्या हातचे लाडू
हळू हळू मोठ होत चाललेल

वय वर्ष वीस
'हू केअर्स!!'
'नथींग ईम्पॉसिबल!'
रात्रीचा दिवस
आणि दिवसाची रात्र करत
आपल्याच तालामधे गुरफटलेल.

वय वर्ष तीस
थोडसच पण सावधान झालेल
गोड बायकोसाठी रात्र
आणि कडूजार बॉससाठी दिवस
ह्या दोघांमधे
आयुष्य विभागलेल

वय वर्ष चाळीस
जेमतेम असलेल वजन
आता पेलवेनास झालेल
त्यात कधीकाळी गोड असलेल्या बायकोची कायम किरकिर
म्हणे मुलांना घेऊन इथेतिथे फिरफिर
जिवाला मुळीच चैन नसलेल!

वय वर्ष पन्नास
अर्ध शतक इथे संपलेल
अर्ध उरलेल
डायेटिंगनी ग्रासलेलं
केस काळे करुन करुन कंटाळलेल
थोड बॅक बॅलन्स असलेल
पण मुलांसाठी राखून ठेवलेल

वय वर्ष साठ
किती लवकर
निवृत्तीपाशी येऊन पोचलेल!!!
आता सगळ लवकर
फिरुन घ्यायच
खूप काही बघायच
हे करायच .. ते करायच
तब्येतील जपत जपत
पुढच्या प्रवासाला लागायच!

वय वर्ष सत्तर
अनुभवाची केवढी मोठी श्रीमन्ती असलेलं
जोडीदाराच्या आधाराशिवाय एक एक पाऊल अडलेल

वय वर्ष ऐंशी
एकेक पान गळालेल
सखे सोबती हरवलेल
नवीन पिढीसोबत मात्र
मस्त मेतकुट जुळलेल!

वय वर्ष नव्वद
भेगाळलेल्या भुईसारख
ओलाव्यासाठी आसूसलेल
कुणी आशिर्वादासाठी
वाकलच खाली तर
"जिवेत शरदः शतम"
म्हणून प्रेमाने त्याला गोंजारलेल!

वय वर्ष शंभर
हजारातून एखाद्याच लाभलेल
ओठावर तेच बापपणीचे
निर्व्याज हसू
थरथरणार्‍या हाताचा
तोच मऊशार स्पर्श
सुंदर जगाकडे
टुकटुक बघणारे तसेच डोळे
देवापुढे निर्विकार झुकलेल!

यशवंत

विषय: 
प्रकार: 

नमस्कार बी तुम्ही छान लिहिता. अजून बरेच वाचायचे आहे. तुमच्या सिंगापूरमध्ये माझा चुलतभाऊ माधव भावे राहतो. तोपण कविता करतो. शब्दगंधमध्ये तोपण आहे असे मला वाटते. मी मायबोलीची नविन सभासद आहे, पण वाचक मात्र खूप दिवसांपासून आहे.