।। वैराग्य।।

Submitted by कमलाकर देसले on 21 March, 2013 - 08:56

।। वैराग्य।।
Mar 19, 2013,
आर्टिकल (महाराष्ट्र टाइम्स)

' अ ' तोंडात घास घालणार , तोच अचानक त्याच्या ' ब ' मित्राने ' अ ' च्या जोरात गालावर मारले. घासही पडला आणि गालाला जोराची चपराकही लागली. तृप्तीच्या क्षणी असा विक्षेप कोण सहन करणार ? जेवणारा ' अ ' ही त्याच्या मित्राला मारायला धावला.

' ब ' म्हणाला , ' तू मला हवी ती शिक्षा देऊ शकतोस , पण माझे चुकले असेल तर. त्यासाठी तुला माझी बाजू ऐकावी लागेल. आता तू ठरव माझी बाजू ऐकून मग मला शिक्षा द्यायची , की केवळ संतापाची प्रतिक्रिया म्हणून मला शिक्षा द्यायची! ' ठासून संतापलेला ' अ ' विचारात पडला. आधी याचं ऐकून तर घेऊ , असा विचार करून घुश्श्यातच म्हणाला , ' बिनडोक कुठला. सांग काय सांगायचे ते. ' कुठलीही प्रस्तावना न करता ' ब ' म्हणाला , ' तुझ्या आवडत्या जेवणात विष आहे. मला हे कळलं. मला तुझ्या हातचा घास पटकन फेकायचा होता. त्या क्षणी कृतीचीच भाषा मला योग्य वाटली. घास पडताना कानशिलात लागली. मी काय करू ? माझ्यासाठी तू वाचणं महत्त्वाचं होतं. ' पडताळून पाहिल्यावर जेवणात खरंच विष होतं हे सिद्ध झालं. मारणाऱ्या मित्राचे ' अ ' ने आभार मानले.

ज्या आवडत्या जेवणाच्या नुसत्या कल्पनेने ' अ ' च्या तोंडाला पाणी सुटत होतं , ते जेवण साक्षात समोर असताना ' तो ' खात नाही ; कारण आता त्याला कळलं आहे की ते विषाक्त आहे. म्हणून ते त्याज्य आहे. आता त्याने त्या जेवणाचा ' त्याग ' करण्यात त्याचा कोठला पुरुषार्थ असेल ? कुठला मोठेपणा असेल ? नाही. असे काहीच नसेल. ते जेवण विषारी नसताना त्याने दुसऱ्याला दिले अथवा स्वत: खाल्ले नाही , तर गोष्ट वेगळी. जेवणात विष आहे हे माहीत झाल्यावर त्या अन्नाचा त्याग करणे यात कोठलीच विशेषता नाही. उलट असं करणंच श्रेयस्कर आहे , जे या प्रसंगातील ' अ ' ने केले.

जेव्हाकेव्हा प्रपंचात , आवडीच्या कर्मात , जगण्यात अहंकाराचं , कर्तेपणाचं विष कालवलं जातं , तेव्हा हा प्रपंच , आपलं कर्म आणि आपलं जगणं विषाक्त होतं. संत अशा विषाक्त प्रपंचाचा , कर्माचा आणि कर्तेपणाचा ' त्याग ' करतात. हा असा ' त्याग ' करणे म्हणजे पुरुषार्थही नव्हे , की जगावर केलेला उपकारही नव्हे. हे खुद्द सत्पुरुषांनाही मान्य असते. आपण सामान्य लोक ' त्यागा ' चे बिल्ले संतांच्या गळ्यात अडकवून स्वत: मात्र अहंकाराचा विषाक्त आहार खायला मोकळे होतो. मुक्तीसाठी मिळालेला मानवी देह आपण नव्या बंधनांसाठी वापरतो.

कुठल्याही गोष्टीतली जीवघेणी निषिद्धता जाणून , त्या गोष्टीचा त्याग होणे म्हणजे ' वैराग्य. ' वैराग्य म्हणजे (जगाच्या नव्हे) स्वत:च्या भल्यासाठी केलेला त्याग होय. ज्ञानोबाराय सांगतात , वांती केलेले अन्न खाण्याची किंवा प्रेताला अलिंगन देण्याची जशी इच्छाच होत नाही , तसे असते वैराग्य. वमिलिया अन्ना l लाळ न घोंटी रसना l आंग न सूये आलिंगना l प्रेताचीया ll
-कमलाकर देसले

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users