अजून पूर्ण मला, जाणतात लोक कुठे?

Submitted by गझलप्रेमी on 19 March, 2013 - 07:36

गझल
अजून पूर्ण मला, जाणतात लोक कुठे?
अजून थेट मला पाहतात लोक कुठे?

मनात एक, दुजे चेह-यावरी दिसते.....
घडेल भेट असे, भेटतात लोक कुठे?

कशास रक्त असे,आटवू उगा इतके?
झिजा, जळा, उसळा....मोजतात लोक कुठे?

कशास मीच घसा कोरडा करू दुनिये?
इथे तिथे बहिरे, ऐकतात लोक कुठे?

उगारुनी बघतो, हात जोडुनी बघतो!
जुमानतात कुठे? मानतात लोक कुठे?

हवा कशी पडली यावरीच वाद घडे.....
उरात जे सलते.....बोलतात लोक कुठे?

जरा कुणाविषयी, पेपरात स्फूट दिसे!
बडी करून मने, सांगतात लोक कुठे?

भलेभलेच चिखल, फेकतात मुक्तपणे......
गळे गळ्यात परत, भांडतात लोक कुठे?

किती सशक्त, सकस, वाचनीय शेर इथे......
विवाद फक्त दिसे, वाचतात लोक कुठे?

भरीव शेर किती आतुनीच तो स्फुरला......
कशास फोड करू? तोलतात लोक कुठे?

सुखे समोर उभी राहतात, कष्ट कुठे?
अतीव भोग असे, भोगतात लोक कुठे?

अजून दु:ख मला जाणवेच ओझरते....
अजून खळखळुनी, हासतात लोक कुठे?

हरेकजण दिसतो धावण्यात व्यग्र इथे!
पुकारतोस कुणा? थांबतात लोक कुठे?

....................गझलप्रेमी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही एक अक्षरगणवृत्तातील गझल आहे ! वृत्ताचे नाव माहीत नाही.
झुकी झुकीसी नजर बेकरार है कि नही<ी/strong>
..........या हिंदी गझलेच्या चालीवर म्हटल्यास या गझलेतील लय व गोडी महसूस करता यावी

प्रत्येक मिस-यात १५ अक्षरे आहेत व २२मात्रा आहेत!
७अक्षरे........मग यति..............मग ८ अक्षरे =१५अक्षरे.............अशी लय आहे!
मात्रांच्या हिशोबात बोलायचे झाल्यास .....................
१०मात्रा......यति....................१२ मात्रा = २२मात्रा!
आता पहा गुणगगुणून ही गझल, कशी वाटते ती...........

>>प्रथमच या वृत्तात गझल लिहिली!<<

म्हणजे लिहिले तेच सगळे आहे पण ह्या वृत्तात पहिल्यांदाच

>>वृत्त माझ्यासाठी नवखे आहे आवडले
गझलही नेहमीप्रमाणे <<

"वृत्त नवखे आहे आणि आवडले" हे कळाले पण

"गझलही नेहमीप्रमाणे" म्हणजे??
नीट काय ते सांगा ना, आवडली की नाही ??

एखाद्या नाटकाचे बरेच प्रयोग झाले की, मग येणा-या जाहिरातीत नटांच्या नावांच्या जागी लिहितात,,,,,,,,
नेहमीचेच यशस्वी कलाकार...........त्या शैलीतला वाटतो प्रतिसाद!

माझा प्रतिसाद कमालीचा व्यामिश्र व म्हणूनच कामियाब असा झाला आहे असे नम्रपणे आधीच नमूद करू इच्छितो

त्यातील दोनही ओळींचा एकमेकीशी घनिष्ठ संबंध आहे
त्यात एकही अक्षर भरीचे नाही आहे
पहिली ओळ अतीशय थेट व सहज व प्रासादिकही(कानाला गोड वाटते) आहे नवखेआवडले हे दोन शब्द तिच्यातील की वर्ड्स आहेत
'गझलही' मधील "ही" वरील वाक्याशी जोडून पाहाता अर्थासाठी अतीशय महत्त्वाचा असून भरीचा ठरत नाही नेहमीप्रमाणे हा शब्द या प्रतिसादाचा आत्मा आहे शेरात जसा काफिया असतो तसा
प्रतिसादाचे खालील प्रमाणे अर्थ होतात .....................

१)वृत्त नवखे आहे तसाच गझलकारही नवखा वाटतो (नेहमीचा असूनही ) तरीही दोघे 'नेहमीप्रमाणे'आवडले असे म्हणायचे आहे

२)नेहमीप्रमाणे आवडले म्हणजे आवडून घेण्याची सवय लागली आहे असाही अर्थ काढता येतो

३)सवयीच्या वाचकाना ही गझल नेहमीप्रमाणे सो सो झाली आहे हे वेगळे सांगावे लागत नाही( तरीही ती त्याना आवडते ...मुद्दा क्र २ नुसार.. ही आवडली आहे हे नेहमीप्रमाणे गझलकारास वेगळे सांगावे लागत नाही )
३-अ)अर्थात गझल कशी वाटली हे वाचकांचे चे स्वानुभवजन्य वै म असते कोणत्याही प्रतिसादकाचा वा प्र्सतिसादाचा त्याच्याशी संबंध नसतो हे उघडच आहे

४)'नेहमीप्रमाणे' च्या पुढे असलेले ................ देखील भरीचे नाही आहेत तिथे वाचकास हवा तो शब्द पेरून गाळलेल्या जागा भरता येतात व मनाप्रमाणे शेर करून पर्यायी शेर केल्याचे त्यास समाधानही लाभते
४-अ)............>>>>आपल्यास जे म्हणायचे आहे तेच नेमके अव्यक्त ठेवायची ही मी शोधलेली ही अनोखी अंदाज ए बयान ची खास शैली आहे असे कोणी म्हटल्यास मला ते नक्कीच आवडेल Happy

) श्री गझलप्रेमी म्हणतात तसे अख्ख्या प्रतिसादाचा अर्थ हवातसा लावणे हे काम वाचकावर सोपवता येते व प्रतिसादक नामानिराळा राहू शकतो

टीपः मुद्दा क्र २ नुसार गझल आवडली की केसे हे वेगळे सांगायची गरज वाटत नाही

असो

माझाच एक शेर उर्धृत करून थांबतो

पुढे नाही मला सांगायचे
कशाला फारसे सांगू तुला

अवश्य कळवावे ...................
~वैवकु
Happy

असा प्रतिसाद माझ्यासाठी नवखा आहे.
प्रतिसाद आवडला
पण ..........
>>"गझलही नेहमीप्रमाणे" म्हणजे??
नीट काय ते सांगा ना, आवडली की नाही ??<<<

या प्रश्नावरील उत्तर हे एखाद्या बहुपदरी, संदिग्ध शेरासारखे वाटले

मियाँ,

आम्ही जे प्रतिसाद देतो त्यामुळेच आय डी ब्लॉक होत आहेत, मार्क्स द्यायला सुरुवात केली तर आम्हीच ब्लॉक होऊ अशी भीती वाटते.

असो, तुमचा आग्रह दिसतो, यापुढे देत जाऊ.

एक गंभीर समीक्षक खपला तरी चालेल, पण गझलेला मार्क्स मिळालेच पाहिजेत. कळावे

गं स

(अवांतर प्रतिसादासाठी गझलप्रेमी व प्रशासक यांच्यासमोर दिलगीर आहोत)

ग.सं.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
गझलेच्या वृत्तावर, यतीवर, मात्रांवर व लयीवर आम्ही जे वर प्रतिसादात लिहिले आहे त्यावर काही वदाल काय?
हिंदीतील उधृत केलेली गझल याच वृत्तात आहे ना?
वृत्तहाताळणीला आपण किती गुण द्याल?

अवांतर: गझलेस गुण वा श्रेणी देण्याची कल्पना अभिनव आहे!
फार तर ते गुण अंतर्गत चाचणी परीक्षेचे आहेत असे म्हणू या म्हणजे शायरांना फारशी भीती वाटू नये!
गझलेस गुण देताना शेरनिहाय दिले जावेत!
अर्थात गुण देणा-याने/गझलेचे मूल्यांकन करणा-यानेmodel amswers देखिल द्यायला हवीत, म्हणजेच मूल्यांकन करणा-याने तो शेर कसा हवा होता हे द्यायला हवे, म्हणजे मूळ शायराला त्यातून बरेच शिकता येईल!
समग्र गझलेस गुण देऊ नये!

गझलेचे मूल्यांकन>>>>>>>>>>>
कल्पना चांगली असली तरी तिचा गैरफायदा घेणार्‍या लोकांचेच जास्त फावेल असे वाटते व त्यामुळे माझ्या सारख्या नवशिक्यास तसेच गझलेकडे वळू इच्छिणार्‍या गझलेच्छुकांस गझलेबद्दल व त्यांच्या गझलेचा पेपर तपासणर्‍या तज्ज्ञ गझलकारांमुळे एकूणच गझलकार जमातीबद्दल अनास्था/तिरस्कार वगैरे वगैरे वाटण्याचीही भीतीच जास्त वाटते आहे
कळावे
वैवकु

वैभवा तू म्हणतोस ते पटते आम्हाला!
मग मूल्यांकन ऐच्छीक ठेवता यावे!
ज्या शायराची इच्छा असेल व ज्याच्याकडून मूल्यांकन करून हवे असेल त्याच्याकडून ते करवून घेता यावे!
शिवाय गुणांची भीती वाटत असेल तर श्रेणीपद्धतीचाही वापर करता यावा, जेणे करून शायराची इच्छा असल्यास त्याला आत्मपरीक्षणाला व स्वसुधारणा करायला वाव मिळावा, होय की, नाही? बघ पटते का ते?
या फक्त आमच्या नम्र सूचना आहेत!
............गझलप्रेमी

मला आठवते त्यानुसार 'सुरेश भट डॉट इन' या साईटवर गंभीर समीक्षक गझलेला गुण द्यायचे ते केवळ गंमत या हेतूनेच! वास्तविक पाहता कोणाच्याही काव्याचे अथवा कलाकृतीचे गुणांकन हे अतिशय व्यक्तीगत स्वरुपाचेच होऊ शकते, ते 'अ‍ॅबसोल्यूट' असू शकत नाही. मात्र गझलेच्या बाबतीत वेगळेपण इतकेच की त्यात 'गझलतंत्र' हा एक महत्वाचा भाग असल्याने गझलेच्या शुद्धतेचे गुणांकन हे 'क्वाँटिफायेबल' व 'अ‍ॅबसोल्यूट' असू शकते. गझलेतील खयालांचे किंवा बोलकेपणाचे किंवा गहिरेपणाचे गुणांकन तसे असू शकत नसले तरी तंत्राचे गुणांकन निरपेक्ष असू शकते. त्यामुळे, तेवढ्याच मर्यादीत स्वरुपात गुणांकन करायचे असल्यास गं स करू शकतील, पण ती फारच प्राथमिक पायरी आहे व ती ओलांडलेलेच आपण सर्वजण येथे गझलकार म्हणून नांदत आहोत, त्यामुळे ते अनावश्यकच ठरावे.

बाकी, एकाच्या गझलेला चांगले किंवा वाईट म्हणण्याइतका दुसरा श्रेष्ठ असायला लागतो, तितका श्रेष्ठ मराठीत भटांनंतर कोणी झालेला नसल्याने 'आपापले मत देऊन मोकळे होणे' हेच योग्य व शक्य आहे.

भूषणराव १०१% सहमत!
पण ऐच्छीक मूल्यांकन ठेवले तर काही प्रश्नच येणार नाही!
बहिरंग व अंतरंग अशा दोघंना वेगळे गुण/श्रेणी देता यावी!

मग मूल्यांकन ऐच्छीक ठेवता यावे!>>>>>

हाच विचार पर्यायी-गझला करण्याआधीच आपणास सुचला असता तर किती बरे झाले असते
इतरांचे जाऊद्या पण तुमच्याच बाबतीत बोलायचे झाल्यास आधीचे दोन आय्डीतरी उडाले नसते

आता गझलेच्या मूल्यांकनाचे काम हाती घेण्याचा मनसुबा बाळगून असाल तर हाही आय्डी गायब होण्याच्या नामुष्कीला सामोरे जायची तयारी तुम्हाला ठेवावी लागेल की काय असे वाटते ...

वाटले ते सांगीतले इतकेच ! न पटल्यास जास्त विचार करू नये ही विनंती

मूल्यांकन निदान गझलेचे करण्याची तरी अजून आमची योग्यता नाही, पण आमच्या प्रत्येक गझलेचे मूल्यांकन करवून घेण्याची मात्र प्रामाणिक इच्छा आहे!

पण ऐच्छीक मूल्यांकन ठेवले तर काही प्रश्नच येणार नाही!<<<

बेसिकली मूल्यांकन कशाला हवे आहे? केवळ एक गंमत म्हणून करायचे म्हंटले तर ठीक आहे, पण त्या मूल्यांकनात मांडलेल्या विचारांमुळे वादबिद व्हायला लागले तर काय घ्या? त्यापेक्षा आहे ते मस्त आहे की? Happy

मूल्यांकन करवून घेण्याची मात्र प्रामाणिक इच्छा आहे!>>>>

यचे उत्तर बेफीजींनी वरील प्रतिसादातील एका ओळीत दिलेच आहे की भट साहेबांनंतर त्या योग्यतेचा गझलकार झाला नाही म्हणून..............यातच सर्व आले असे मला वाटते

अजूनही अट्टहास असेलच तर सोडावा इतकेच सांगू शकतो

आमच्या प्रत्येक गझलेचे मूल्यांकन करवून घेण्याची मात्र प्रामाणिक इच्छा आहे!<<<

त्यासाठीच वैभव जोशी एकदा माझ्याशी बोलत असताना त्यांनी एक मस्त आयडिया सुचवली होती. ते म्हणाले होते की मुशायरा करता तसाच एकदा एक नुसताच गझलकारांचा दोन तासांचा सेशन ठेवा, ज्यात कोणीही रसिक किंवा श्रोता वगैरे नसेल; त्या सेशनमध्ये निव्वळ गझलेवर गद्य चर्चा करा. आपापली मते सांगा. चांगली गझल म्हणजे काय, गझल कशी सुधारता येईल, ती स्फुरते कशी वगैरे ! मला ती कल्पना आवडली होती. ती अजूनही अंमलात आणता येईल. आता ते स्वतः त्यात सहभागी होणार नाहीत याची कल्पना आहे, पण बाकीचे वाटल्यास येऊ शकतात. काही नाही, नुसत्या गझलेवर गप्पा मारायच्या. मग त्यात प्रत्येकाची एक एक गझल चर्चेसाठी घेऊन त्यावर नि:पक्षपाती मतमतांतरे व चर्चाही घडवून आणायची. हेतू एकच, गझलकारांमधील संवाद सुधारावा आणि सर्वानुमते गझलेच्या दर्जात्मक बाबींवर काहीतरी एकमत असलेले परिमाण म्हणा किंवा भूमिका म्हणा, ठरावी.

Happy

उदाहरणार्थ, सदर गझलेतील 'लोक कुठे' ही रदीफ 'लोक' व 'कुठे' यात सलग येणार्‍या दोन 'कं' मुळे उच्चारायला किंचित अवघड जात आहे. शिवाय, अजून पूर्ण मला लोक जाणतात कुठे असे केल्यास काफिया बराच सैल होईल आणि रदीफ नुसतीच 'कुठे' अशी उरेल व ते कदाचित अधिक सोपे होईल खयाल मांडायला. पण शायराला जर मुळात रदीफ 'लोक कुठे' अशीच घ्यायची असेल तर त्यावर चर्चाच करणे चुकीचे ठरेल, पण इतके खरे की खयाल मग 'लोक कुठे' यावर येण्यास बद्ध होतील व त्यामुळे मर्यादीतही होऊ शकतील. Happy

ही अशी चर्चा आंतरजालीय प्रतिसादांच्यामार्फत केल्यास पानेच्या पाने उलटली तरी एकाच गझलेवर चर्चा सुरू राहील. म्हणून तो सेशन महत्वाचा वाटतो. Happy

मी आता काही तासांनी येथे परतू शकेन. धन्यवाद!

-'बेफिकीर'!

बेफीजी : पूर्वी तुम्हीच एकदा असा प्रस्ताव मायबोलीवरील एका प्रतिसादात समोर ठेवला होता हे आठवते आहे बेफीजी यासाठी नव्या मुंबईला डॉ.साहेबांकडे जमूया असे ही ठरले होते काहींनी हो असेही म्हटले होते ...
मला आठवते आहे ते

खरेच खूप मजा येईल तुम्हीच पुढाकार घ्यावा अशी प्रार्थना

मलाही बोलवा .
(माझ्यासारख्या नवशिक्याला खूप काही शिकायला मिळेल या विचाराने आताच माझ्या हावरेपणाला ऊत आलाय !!!)

Pages