असे मी काय वदलो की, करावा वाद लोकांनी!

Submitted by गझलप्रेमी on 18 March, 2013 - 12:17

गझल
असे मी काय वदलो की, करावा वाद लोकांनी!
दिली गझलेवरी माझ्या उसळती दाद लोकांनी!!

मला पाहून पक्वान्ने कशी स्मरतात लोकांना?
कसा बघ, घेतला गझले, तुझा आस्वाद लोकांनी!

कुणी भिरकावले पत्थर, स्तुतींची तर कुणी सुमने....
शिव्यात्मकही दिला गझले, तुला प्रतिसाद लोकांनी!

शहाणा तोच होता एकटा त्या घोळक्यामध्ये.....
कसे त्यालाच बघ केले, पुरे बरबाद लोकांनी!

सुरांची संपली मैफल, घरी जो तो निघालाही;
परतताना घरी नेला तिचा आल्हाद लोकांनी!

असावा पोचला माझा, बरोबर शेर हृदयाशी;
जणू तो ऐकला माझा-तुझा संवाद लोकांनी!

जगाला चाखता यावी खरी चव नादब्रह्माची;
तुझ्या गझलेत ऐकावा अनाहत नाद लोकांनी!

स्मरेना कोणत्या गझला कुठे मी वाचल्या होत्या;
विसरता मी, दिली मजला करोनी याद लोकांनी!

फुटे या लेखणीलाही असा पान्हा कधी काळी!
झराया लागली झरझर....दिली मज साद लोकांनी!!

नव्हे घड एक द्राक्षांचा, दिली मी बाग गझलांची!
लगोलग घेतला माझा, मनस्वी स्वाद लोकांनी!! –

........................गझलप्रेमी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असावा पोचला माझा, बरोबर शेर हृदयाशी;
जणू तो ऐकला माझा-तुझा संवाद लोकांनी!
>> अप्रतिम!!!

दुसर्‍या ओळीतला आशय फारच आवडला.

फार काही चांगली नाही वाटली ही गझल
शेवटून दुसरा तर अगदीच काहीतरी

काफियाप्रवण झालेत सर्व शेर काफियेही फारसे भावत नाहीयेत

काफियाप्रवण /काफियाशरण >>>>>>मला तेच म्हणायचे होते
या दोन्हीत फरक असतो हे आत्ताच समजले

असो

ज्ञानात वाढ केल्यबद्दल धन्स

गझलेतील शेर हे काफियाला निभावणारेच असावे लागतात! काफिया हा अलगदपणे व अनिवार्यपणे विनासायास बसल्यासारखा असावा, त्यालाच काफियाप्रवण शेर म्हणतात! प्रत्येक कामयाब शेर हा काफियाप्रवण असतोच!

काफियासाठी शेराची जुळवणी ओढाताण करून केलेली लगेच कळते ज्यात लेखनगर्भ निष्ठा ही दुर्बळ असते! शेराची प्रत्यकारकताही अशक्त असते! अशा शेराला काफियाशरण शेर म्हणतात!