शरदबाबूंचा श्रीकांत

Submitted by भारती.. on 17 March, 2013 - 05:53

शरदबाबूंचा श्रीकांत

हे गोड गारुड पुनः अंगावर घेऊन वाचलं. त्याच्या बंगाली मिठाईसारख्या मधुररसात पुनश्च बुडून गेले अन त्यावर लिहिण्याचा मोह आवरला नाही !

मी शरच्चंद्र चट्टोपाध्यायांवर लिहावं असं काही नवीन नाही. इतकं सर्वमान्य प्रत्ययकारी लेखन .. त्याचा हा सर्वसामान्य परिचय.पण आताच्या कुणी वाचकांनी घेतला नसेल हा आनंद किंवा कदाचित कुणाला देऊ शकेनही थोडासा पुनःप्रत्ययाचा आनंद तर..इत्यादि प्रतिवाद स्वतःशीच करत हे लिहिलं गेलंच.एक ऊर्मीच निर्माण करण्याची शक्ती असते अशा लेखनात.

सर्वप्रथम, आभार कै. भा.वि.(मामा )वरेरकरांचे, हा रस त्याच्या खास प्रादेशिक माधुर्याला धक्का न लावता मराठीत आणण्याचे काम त्यांनीच करावे ! शरदबाबूंचे अंतरंग मित्रही होते ते अन दोन्ही भाषाभगिनींचे जाणकार.पुढल्या पिढ्यांसाठी हा कालातीत खाऊ आपण मराठीत आणलात मामा, अन्नदाता सुखी भव !

मामांच्या अनुवादाच्या त्या काळ्यापांढर्‍या ओळींत उतरत जातो आपण अन जगू लागतो एक वेगळा (१९३९ ची प्रथम आवृत्ती,नवभारत प्रकाशन संस्था- किती समर्पक नाव असल्या साहित्यकृती शरद-साहित्य-मालेतून महाराष्ट्रात प्रचलित करणार्‍या कै. रघुनाथ दिपाजी देसाईंच्या संस्थेचं- ), तरीही आपलाच अन आत्ताचाच वाटणारा स्थलकालखंड.

श्रीकांत शरदबाबूंची सर्वोत्कृष्ट कादंबरी मानली गेलीय. चार भागात कथानायकाने निवेदिलेली प्रदीर्घ आयुष्यकहाणी. कथाभाग, माणसं,संबंध, काहीच साधंसरळ नाहीय. कथानकाला वेढणारं वास्तव दुष़्काळ ,गरिबी,रोगराई,त्यातून उद्भवणारं क्रौर्य अन निर्ममता यात गुरफटलेलं आहे.पण या सगळ्यातूनही लक्षात रहाते ती अविच्छिन्न सुंदरता,वारंवार तुटणार्‍या संबंधातूनही प्रत्ययास येणारी.आपल्याला जीवनाबद्दल आशावादी करणारी.

तथाकथित आस्तिकता,श्रद्धा, रुढी अन पांडित्य या मूल्यांना प्रश्न विचारणार्‍या श्रीकांतच्या भोवतालातच उगवून आलेलं ईश्वरीय प्रेम, निरनिराळ्या रुपात विनटलेलं.ते त्याला भाग्याने मिळालं नाहीय, त्याने अर्जित केलंय ते.

''बाई मी विकत घेतला श्याम'' .. असे आयुष्यानुभव विकत घेतात श्रीकांतसारखी हिमतीची माणसं, सगळे बंध तोडून जगणारी,पण म्हणून स्वैर नव्हेत, आपल्याच देवाकडे आपलंच तप आचरत असतात ही मंडळी. आयुष्याचा अर्थ शोधत जगण्याचं तप. त्यासाठी कोणतीही तडजोड नाकारण्याची व्रतंवैकल्यं .. प्रेम,मोह,भक्ती या प्रचलित गुळगुळीत शब्दांचा शब्दकोशाबाहेरचा अर्थ शोधण्याचं संशोधनकार्य .

तर ही एका प्रेमिकाची भ्रमणगाथा किंवा भटक्याची प्रेमकथा. कसेही.लौकिक आयुष्यात कधीही सफल होऊ न शकणार्‍या एका प्रेमबंधनापासून पुनःपुनः दूर जाण्याचा विफल प्रयत्न.

पहिल्या भागातला बाल श्रीकांत उतारवयात आपल्या भटक्या आयुष्यातील आठवणी काढतोय .त्यासाठी तत्कालिन थोडासा पाल्हाळिक प्रस्तावनेचा मोह शरदबाबूंना झालाय खरा, पण लगेचच कादंबरीतले पहिलेच अद्भुत पात्र आपल्यासमोर ते हजर करतात. बाल श्रीकांतचं स्फूर्तीस्थान इंद्र. इंद्रनाथ. .त्याच्याहून वयाने थोडा मोठा. अफाट धाडस, कोवळ्या वयातली निरागस दयाभावना,जंगलात मध्यरात्रौ अलगुजाचे स्वर छेडण्याची, समोरच्याला मोहात प्रेमात पाडणारी नि:संग व्यक्तित्वातली मोहिनी. श्रीकांतच्या बालमनावर खोल अनुभवांचं गोंदण उमटवणारा हा मित्र त्याला घरातल्यांच्या अन विशेषतः त्याच्या दांभिक मोठ्या भावाच्या मते दु:साहसाला प्रवृत्त करत असतो.रात्रीअपरात्री घरातून पळून त्याच्याबरोबर होडीची सैर करायला जातो श्रीकांत ,अन त्याला खरं जीवन कळू लागतं. खोट्या जीवनाचं बेगड पुढे आयुष्यभर श्रीकांतला भुलवत नाही याचं कारण हा इंद्र.

वानगी दाखल दोन अनुभव.

महामारीत मरून पाण्यात टाकलेल्या ,सापडलेल्या मृत बालकाचा दफनविधी करणारा कोमलहॄदय इंद्र..

''पाण्यात अर्ध्या बुडालेल्या सुरूच्या झाडाच्या जंगलात इंद्रानं त्या बालकाचं प्रेत मोठ्या ममताळूपणानं नेऊन जेव्हा ठेवलं,तेव्हा रात्र संपत आली होती.कितीतरी वेळ खाली वाकून तो त्या प्रेताच्या चेहर्‍याकडे पहात राहिला होता. फिक्कट चंद्र प्रकाशात त्याचा जो चेहरा दिसत होता,त्यावरून त्या प्रेताच्या दर्शनानं त्याच्या मनात उत्पन्न होणार्‍या भावना त्याच्या कोमेजलेल्या चेहेर्‍यावर स्पष्ट दिसून येत होत्या..''

अशा भयाकारी तरी करूण अनुभवातही श्रीकांत त्याला प्रेताची जात विचारतो आहे अन इंद्र 'छट! मेल्यावर कसली आली आहे जात! 'असं त्रिकालाबाधित सत्य उच्चारतोय! ते प्रेत धन्यवादास्तव 'भय्या' असं स्पष्टपणे म्हणाल्याचं ऐकलंय इंद्राने,होडीत तो बाल प्रेतात्मा आपल्या मागे बसून राहिलाय हे जाणवून 'श्रीकांत रामराम म्हणायला लाग बाबा ! ' असं गंभीरपणे सांगतोय इंद्र.. ( या अघोरी ,अगोचर जीवनक्रमात असे प्रसंग यायचेतच , पुढेही आलेत ते श्रीकांतच्या जीवनात).

हा इंद्र त्याला अन्नदाआक्कासारख्या विलक्षण स्त्री पर्यंत घेऊन जातो अन भारतातल्या कल्पनातीत 'स्त्रियश्चरित्रं' ची पहिली पण जीवनभर साथ करणारी खोल ओळख श्रीकांतला होते. मसणवटीजवळ रहाणार्‍या व्यसनी गांजेकस मुसलमान शहाजीबरोबर असणारी त्याची 'सहधर्मचारिणी' (या शब्दाचा विशेष अर्थ नंतर कळतो श्रीकांतला) अन्नदा हिंदू आहे, मुसलमान प्रियकराबरोबर पळून आलेली आहे अशा संशयाने तिचा तिरस्कार करू पहाणार्‍या इंद्रला तिच्याबद्दल अनामिक आकर्षणही आहे.त्यांच्याकडच्या सापाच्या मंत्र अन नागमण्याच्या आख्यायिकेसारखं काहीतरी गूढ वलय त्या फाटक्या स्त्रीभोवती आहे.शहाजी मरतो तेव्हा दोन्ही पोरांना कळतं की अन्नदा त्याची पत्नीच होती अन भरकटलेल्या धर्मांतरित पतीसाठी घरदार अन अब्रूही वार्‍यावर सोडून त्याच्यामागे निघाली होती..शुद्ध दारिद्र्यावस्थेतही ती मानी स्त्री नवर्‍याची देणी फेडून अन या पोरांच्या मदतीचा हात नाकारून अज्ञातात निघून जाते तेव्हा श्रीकांतचा लहानसा जीव त्या स्वाभिमानाच्या तेजाने थरारून जातो.

इथून पुढे युवावस्थेतला श्रीकांत आपल्याला भेटतो तो एका वेगळ्या परिस्थितीत. आता तो त्याच्या शालेय काळातल्या एका युवराज मित्राच्या आग्रहावरून त्याच्या चाकरीत अन त्यातून पुढे त्याच्या एका खाजगी संगीत बैठकीला आलाय.

'’जाऊन पाहिलं तो युवराज सज्ञान झाल्याचे पुरावे दिसू लागले'' -खास श्रीकांतीय विनोद.गाणारी बाई पाटणा शहरातून बरेच पैसे घेऊन दोन आठवड्यांच्या बोलीने आलीय.ही प्यारी उर्फ राजलक्ष्मी.

अन्नदाआक्काच्या पातिव्रत्यानं अन स्वाभिमानानं खोलवर प्रभावित झालेल्या श्रीकांतने प्रेमाकर्षणात पडावं ते या गाणार्‍या बाईजीच्या?प्रेम फजिती करतं माणसाच्या तत्त्वांची कारण ते अबोध मनातून येतं ,स्वप्नांखालोखाल अनाकलनीय अशा या प्रांतातून वादळवारे वहात येतात ,आपल्या तथाकथित उदात्त विचारांचा पालापाचोळा करतात.

ही गाणारी तरुण स्त्री ,दारिद्र्यामुळे तिच्या परित्यक्त आईनेच विकलेली,दुर्दैवाच्या फेर्‍यात भरकटत गेलेली श्रीकांतची बालमैत्रीण, जिने एका बाल-मोहाने त्याला लहानपणीच मनोमनी वरलं असतं.श्रीकांतच्या ती गावीही नसते खरं तर .पण आता यौवनाच्या पहिल्या पायरीवर हे पहिलं प्रेम आताच्या तरुण राजलक्ष्मीच्या रूप-स्वरसंपदेचा झळाळ घेऊन श्रीकांतला अशी भूल घालतं जी पुढे जन्मभर पुरायची असते.

स्वतःला प्रश्न विचारत,दोष देत या अत्यंत संघर्षमय अशा नात्याच्या भोवर्‍यात पुनःपुन; खेचला गेलेला श्रीकांत कादंबरीभर दिसत रहातो पुढे. यातला सुरुवातीचा प्रसंग म्हणजे राजपरिवारात पैज लावून मध्यरात्री भयानक स्मशानात एकटा जाणारा अन प्यारीला व्याकूळ करणारा श्रीकांत.

''रात्रीला एक विशेष स्वरूप आहे.घोर रात्र डोळे झाकून ध्यानाला बसली आहे,सारं चराचर विश्व तोंड झाकून,श्वास कोंडून अतिशय सावधतेने त्या अचल शांततेचं रक्षण करत आहे.एकदम डोळ्यांसमोर सौंदर्याच्या लहरी खेळू लागल्या. वाटलं, प्रकाश म्हणजेच सौंदर्य असं कुठल्या भामट्याने सांगितलं? अंधाराला काय सौंदर्य नाही ? ही लबाडी माणसानं कशी पचू दिली ?''

शी: ! हे सगळंच पुनः उद्धृत करण्याइतकं का सुंदर लिहिलंत शरद्बाबू ? आणि थांबावं तरी कुठे? सगळंच लिहित बसावंसं वाटतंय. राजलक्ष्मीच काय, कुणीही प्रेमात पडेल अशी ही श्रीकांतची व्यक्तीरेखा कोणत्या मातीची घडवलीत ? नि:संग तरीही पराकोटीची रोमँटिक, व्याकूळतेला नर्मविनोदाची जोड अन चिंतनाला काव्यमयतेची. अन राजलक्ष्मी म्हणजेही कुणीही ऐरीगैरी नाही.तीही तोडीस तोड विशेषच .तेव्हा तुमच्या एकूणच लेखनाच्या पुनःपुनः प्रेमात पडावं झालं.

या स्मशानात आलेल्या अतींद्रिय भयावह अनुभवांनी श्रीकांतची रात्र-सौंदर्यसमाधी उतरून बोबडी वळते तेव्हा त्याला वाचवतात राजलक्ष्मीने पाठवलेली तिची माणसंच.तरीही तो तिचा अन तिच्या प्रेमात गुंतत जाणार्‍या स्वतःचा तिरस्कारच करत रहातो.

मग त्या वातावरणातून दूर, नेहमीच्या आयुष्यात परतून येतो.विसरतो हळुहळू प्यारीला बहुधा.पण 'कसल्या तरी अभावाची वेदना ' वागवत एके दिवशी पुन: मंत्रभारितासारखा पाटणा शहरात जाऊन थडकतो.जवळचे अपुरे पैसे,प्रवासातलं अन्नपाणी कशाची चिंता न करता आयुष्यापासून अन स्वतःच्या प्रेरणांपासून पळून जाऊ इच्छिणारा हा विमुक्त भटक्या चक्क एका संन्याशाच्या मठीत जाऊन स्थिरावतो.आशेने की भलत्या जागी गुंतलेल्या आपल्या मनाला अध्यात्माचा आधार मिळेल.

श्रीकांतच्या मागोमाग भटकेपणाचा वसा घेतलेल्या वाचकालाही इथे चाकोरीबाहेरचे विश्वदर्शन घडायला सुरुवात होते. साधूसंन्याशांचं जग,त्यातले अंतर्विरोध अन विनोदही.भिक्षा मागायला जाताना सामोरी येणारी गृहदर्शनातली अन समाजजीवनातली केविलवाणी,दु:खभरी दृष्यं.

श्रीकांतचं या प्रवासातच संन्यास-दीक्षाग्रहण व्हायचं खरं तर,पण तो अंगभूत भूतदयेने देवीच्या साथीत एका छोट्या गावात एका मतलबी गृहस्थाच्या,त्याला कामापुरतं भाऊ मानणार्‍या त्या गृहस्थाच्या तितक्याच मतलबी पत्नीच्या दोन आजारी मुलांसाठी स्वामींबरोबर प्रयागला प्रयाण मागे ठेवतो अन स्वतःच आजाराला जेव्हा बळी पडतो तेव्हा मात्र तेच कुटुंब त्याला पाऊसवादळातच तसेच तापाने फणफणलेले सोडून पलायन करते.

शुद्ध हरपण्याआधी श्रीकांतला एकच नाव आठवते,प्यारी बाईजी,अन एकच शहर.पाटणा.निरोप जातो. अन शुद्धही.

प्रवेश दुसरा. प्यारीने अपरिमीत सेवा करून वाचवलेला श्रीकांत तिच्या पाटण्यातल्या घरी आहे.इथे ती प्यारी नाही.जगाच्या नजरेत पुनः राजलक्ष्मी व्हायची तिची खटपट चाललीय. ज्या नवर्‍याच्या नाममात्र विवाहबंधनात ती पूर्वी विकली गेली होती त्याच्या दुसर्‍या पत्नीच्या-तिच्या सवतीच्या- मुलावर अपत्यप्रेम वर्षवून ती गृहस्थी जीवनातलं प्रतिष्ठित मातृप्रेमाचा अनुभव घेऊ बघतेय.

श्रीकांत, तिच्या बाल-गांधर्वविवाहातला तिचा मनोमनीचा प्रियकर. मनात जपलेला प्रेमाचा एकच चंद्र-कवडसा.पण स्त्रीला नेहमीच प्रेमापेक्षा मोह समाजातल्या संभावितपणाचा,आणि प्यारीसारख्या पतितेला ही संधी अधिकच महत्त्वाची. या द्वंद्वात सापडलेली ती प्रेमाच्या कर्तव्यात जराही कसूर करत नाही पण अवगुंठित शब्दात श्रीकांतला दूर व्हायला विनवते.

त्याला तरी कुठे हे हृद्-बंधन झेपत असतं ? तिचं अभीष्ट चिंतून आजारातून उठलेला श्रीकांत दु:खी मनाने तिचा निरोप घेतो.

निरोप घेणं अन भेटतच रहाणं हे श्रीकांतच्या प्रेमकथेचं प्राक्तन आहे. एक पाश नाकारणारा,अगदी प्रेमातही स्वतःला बांधून घ्यायला अनुत्सुक ,जवळजवळ संन्यासी वृत्तीचा दयामय पुरुष अन एक नाचगाण्याच्या बैठकी करणारी बाईजी. तिच्या परीने तीही संन्यासिनीच. शृंगारलेलं तनमन आतून व्रतांनी निराहारांनी सुकवणारी.कसल्याशा न केलेल्या पापांच्या परिमार्जनासाठी.

प्रत्येक निरोपाच्या वेळी भूमिका बदलत असतात. प्यारीच्या विनंतीवरून दूर गेलेला श्रीकांत त्याच्या स्वर्गस्थ आईने दिलेल्या शब्दातून ,एका अवांच्छित विवाहातून स्वत:ला वाचण्यासाठी पैशाची तजवीज करायला पुनः लगेचच प्यारीकडे परतून येतो तर यावेळी त्याला ती गाण्याच्या बैठकीत दिसते.

झालं ! गेल्यावेळच्या तिच्या गृहस्थी होण्याच्या धडपडीने दु:खातही प्रभावित झालेल्या सात्त्विक श्रीकांतच्या मनाचा भडका होतो.तो तोंड घेऊन ब्रह्मदेशात जायचा मनोदय प्यारीला बोलून दाखवतो.प्यारी विरोध करते.

''बायकांची जात आजवर जे बोलत आली तेच मी सांगणार आहे.लग्न करून संसारी व्हा. ''

पण हे खरंच मनापासून का ? जेव्हा श्रीकांत त्याच्या आईने ठरवलेल्या नियोजित विवाहापासून मुक्त होण्यासाठी तिच्याकडे पैसे मागतो, तेव्हा धाबे दणाणलेली राजलक्ष्मी पैशांची मोठ्या तत्परतेने व्यवस्था करते तेव्हाच दोघेही समजून चुकतात की दोघांनाही एकमेकांशिवाय गत्यंतर नाही !

इथे श्रीकांत तिचा पुनः निरोप घेतो, यावेळी दीर्घकाळासाठी.ब्रह्मदेशाला पैसे मिळवण्यासाठी प्रस्थान हे या पलायनाचे नवे नाव.

शरदबाबूंनी अत्यंत बारकाव्यांनी,नर्मविनोदाने चितारलेला कलकत्ता -रंगून समुद्रप्रवास,त्यातला जलप्रलय ,रंगूनमधलं जीवन अन विशेषतः मुक्त स्त्री जीवन,तेथल्या बंगाल्यांचा अन भारतीयांचा अर्थातच दुटप्पी नीती-अनीतीव्यवहार ,जातीभेदाची,धर्माची सैलावलेली बंधनं अन त्या पोकळीत बोकाळलेला अनाचार. या दीर्घ विदेश-अध्यायाबद्दल एकच शब्द.मास्टरपीस.

विस्तारभयास्तव या स्थलांतराच्या एकूण प्रचंड आवाक्यातून एकच स्त्री व्यक्तिरेखा उल्लेखावी लागेल.तेजस्विनी अभया. एका मित्राबरोबर (रोहिणीदादा ) आपल्या परागंदा पतीच्या शोधात रंगूनला आलेली,त्या अनुभवात आपटी खाल्यावर त्या एकतर्फी प्रेम करणार्‍या मित्राच्या प्रेमाला न्याय देण्याचा काळाच्या खूप पुढे असलेला निर्णय घेणारी . समाजाला अन श्रीकांतसारख्या प्रवासात जोडलेल्या सुहृदालाही अप्रिय वाटणारा तो निर्णय धीट प्रतिवादात पटवून देणारी . या सार्‍या वादग्रस्त जीवनशैलीत गोते खाताना एकीकडे पुन :रुग्णांची सेवा करताना नेहमीप्रमाणे स्वत;च आजारी पडलेल्या श्रीकांतची (त्याचा हा छंदच असावा इतक्या वेळा ही परिस्थिती आलीय कादंबरीत.कथानायकाच्या हृदयातली माणुसकी !) कसल्याही समाजभयाची,लोकापवादाची पर्वा न करता सेवा करणारी अ-भया.

आणि कसले ते समाजजीवन! गरिबी अन साथीच्या रोगांनी बुजबुजलेले. लौकिक जीवनाचे पाश सोडून मनःपूत भरकटणारे श्रीकांतचे तारू आजारातून उठण्यासाठी रंगूनच्या नोकरीतून रजा घेऊन पुनः कलकत्ता बंदरात आलेय. उतरून घ्यायला आलीय राजलक्ष्मी.शांत स्थिर राजलक्ष्मी मनात काहीसा हेतू धरून आपल्याला अनुग्रह देणार्‍या गुरुंकडे काशीक्षेत्री श्रीकांतला घेऊन जाते आहे.इथे श्रीकांतला तिच्या वेगळ्याच अनुकंपेचं दर्शन घडतं.काशीमध्ये परित्यक्त अन विधवा स्त्रियांना तिने तिच्या घरी आश्रय दिलाय. आपल्यासारखीच त्यांची परवड होऊ नये म्हणून. पण प्रयागात चार लोकांसमोर तिच्यासमवेत स्नानास जायला श्रीकांत लोकापवादाला घाबरून नकार देतो तेव्हा चिडलेल्या राजलक्ष्मीचे पुनः बाईजी प्यारीमध्ये परिवर्तन होते,पुनः मुद्दाम श्रीकांतला दुखावणारे वर्तन.पुनः ताटातूट.भावप्रदेशातले बदलते ऋतू.

डोक्यात राख घातलेला श्रीकांत आता ब्रह्मदेशी जाण्याअगोदर एकदा वडिलांच्या नातेवाईकांनी कब्जा केलेल्या घरी भेट द्यावी म्हणून येतो. नुकताच आजारातून उठलेला,प्रवासाची दगदग व मानसिक ओढाताणीने थकून गेलेला श्रीकांत पुनः मलेरियाच्या चपेट्यात सापडून या घरी कोसळतो..तापाच्या गुंगीत तो असताना त्याचे पैशाचे पाकिटही चोरीस जाते तेव्हा अटळ नियतीसारखा एकच मार्ग उरतो श्रीकांतसाठी. राजलक्ष्मीला पैशासाठी पत्र घालणे!

व्याकुळलेली राजलक्ष्मी पैशांसहित स्वतःच हजर होते श्रीकांतच्या वडिलोपार्जित घरी तेव्हा सर्व नातलगांच्या उंचावलेल्या नजरांना तशाच उंचावलेल्या मानेने तो खुलासा करतो,'ही आपल्या पतीची सेवा करायला येथे आलेली राजलक्ष्मी !' स्वतःच्याच भीरुतेवर मात करून आतापर्यंत लोकांपासून लपवलेल्या लोपवलेल्या प्रेमाचा जाहीर स्वीकार करण्याचं सामर्थ्य राजलक्ष्मीच्या निरपेक्ष त्यागामुळे ,सेवेमुळे त्याच्यात आले आहे.

एक विशिष्ट टप्पा गाठलेला आहे जीवनातल्या आंदोलनांनी, पण कथानक फक्त अर्ध्यावर आलेय इथे.भाग एक व दोन संपलेत.

आता सांईथिया अध्याय सुरू होतो. राजलक्ष्मीने गाण्याबजावण्यातून कमावलेल्या बर्‍यापैकी पैशाचा व इस्टेटींचा दानपत्र-व्यवहार करून टाकलाय. 'शुद्धीकरण' मोहीम.

मुख्यत्वे मागास व डोंब वगैरे मागासवर्गियांच्या गंगामाटी नावाच्या सांईथिया परिसरातील एका गावी घर घेऊन ती श्रीकांतसहित तेथे नव्या आयुष्याचा श्रीगणेशा करू पाहतेय. पुनः तिच्यातली राजलक्ष्मी अवखळ मनस्वी प्यारीवर मात करतेय. ती व्रतंवैकल्यं,भजनपूजन, गावात बरेपणा मिळवून देणारे लोकव्यवहार अन यातून निर्माण होणारी एक खूप लोकमान्य प्रतिमा याच्या आहारी गेलीय. श्रीकांत तर मिळालाय. आता त्याला गृहित धरणे चालू आहे. अर्थात अभावितपणे.

श्रीकांत पुनः विद्ध अन पराभूत आहे. प्रेमाची पूर्ती अन परिणती जर प्रेमहीन वास्तवात व्हायची असेल तर आजवर कसल्या मृगजळाकडे तो लोभावत होता ,झेपावत होता ? त्याची मूळ नि:संगता जागतेय.

''माझे डोळे सहसा पाझरत नाहीत.प्रेमाचा भिकारी होण्याची वृत्ती माझ्या ठायी नाही.जगात मला कसलीच अपेक्षा नाही.कुणाकडून मला काही मिळालं नाही,दे दे म्हणून हात पसरायला मला शरम वाटते......माझ्या अंतरंगात झोपी गेलेलं वैराग्य चट्कन दचकून जागं झालं नि म्हणालं,'छे ,छे,छे !'

या गंगामाटीकडे येणार्‍या प्रवासात वज्रानंद हा तरुण,खळाळत्या उत्साही व्यक्तिमत्त्वाचा डॉक्टर-संन्यासी भेटलाय त्या दोघांना,लोकसेवेसाठी घर सोडून औषधांचा पेटारा डोक्यावर घेऊन गावोगाव फिरणारा, ब्रिटिशांच्या जुलुमांविरुद्ध लोक-जागरणही करणारा खास बंगाली युवा-राष्ट्रभक्तांचा प्रतिनिधी. संन्याशाचा परिवेश घेतलेला. धाकट्या भावासारख्या या लोभस व्यक्तीच्या सहवासात राजलक्ष्मीमधली प्यारी पुनः जागते अधुनमधून, श्रीकांतलाही एक सुहृद गवसतो, एवढंच काय ते विश्रांतीस्थान एकाकी मनाला त्याच्या.

उरलेल्या वेळात(अन तो वेळ खूप आहे शिवाय रिकामाही आहे-) पुनः सुरू होते श्रीकांतचे परिसरातल्या गरिबी अन रोगराईने गांजलेल्या जनजीवनात मिसळणे, दु:खितांची निरपेक्ष सेवा करणे,भ्रमत भरकट्त रहाणे.कर्मकांडग्रस्त राजलक्ष्मीची नजर चुकवून (कारण आजारातलं अशक्तपण साथीला आहेच कायमचे.).अशातच दीनांची सेवा करत अज्ञात ठिकाणी गरीब ब्राह्मणाच्या घरी एके दिवशी प्रकृती ढासळून श्रीकांतचे कोसळून पडणे.

ही तर्‍हेतर्‍हेची घरे, ब्राह्मणांची,अंत्यजांची, धर्मांतरितांची,गरीब विस्थापित गौहर-गोसाईसारख्या फकीर संप्रदायी,बाऊल पंथीय कवी-मुसलमानांची, त्यातल्या अनेक व्यक्तिरेखा, प्रसंग यांचा उल्लेखही येथे विस्तारभयास्तव करता येत नाही पण असे वाटते की एका लेखकाने असे जगावे, वास्तव असे पहावे तेव्हाच त्याची वाणी लेखणी इतकी सिद्ध होते, तेव्हाच तो खरा विश्वकुटुंबीय विशाल मनाचा होत जातो.

इकडे श्रीकांत घर सोडून बेपत्ता झाल्याने राजलक्ष्मीचे डोळे उघडलेत.पण पुरते नाहीत. .पुंटू नावाचं आणखी एक उपकथानक घडून गेल्यावर राजलक्ष्मीला आपल्या कृतक-वैराग्याचा,कर्मकांडांचा फोलपणा कळायचाय..

''आणि ते सुखासमाधानाने राहू लागले'' हा शेवट येण्यापूर्वी श्रीकांतही अजून एका जगावेगळ्या मृदुल स्नेहात गुरफटायचा आहे.या स्नेह-बंधाचं नाव आहे वैष्णवी कमललता .

आता वैष्णवांचं जग. भक्तीमय भजन पूजनाचं,पण रुक्ष कर्मकांडाच्या विरुद्ध धृवावरचं.मधुराभक्तीच्या माधुर्यानं ओथंबलेलं.शरदबाबूंनी जगातली कितीतरी जगे -वर्तुळातली वर्तुळे- रेखाटलीत आपल्या महाकादंबरीत.सगळ्या जगण्याचं शरद-सृष्टीत रुपांतर करणारे किती बारकावे,पापुद्रे..

श्रीकांत राजलक्ष्मीच्या उपेक्षेला अन कर्मकांडांना कंटाळून तथाकथित रजा संपवून ब्रह्मदेशाला जायचा पुनः विचार करतोय. त्याआधी एकदा स्वतःच्या गावी गेला आहे.इथे वैष्णवांच्या मेळ्यात श्रीकांत बालमित्र गोहरमुळे ओढला जातो अन कमललतेच्या रुपात बंगालच्या मधुराभक्ती-पंथाच्याच प्रेमात पडतो.

कमललता, राजलक्ष्मीइतकी सुंदर नाही,पण बैरागी मनाच्या,राजलक्ष्मीच्या प्रेमात पोळलेल्या श्रीकांतला असह्य मोहविण्याइतकी लाघवी.राजलक्ष्मीसारख्याच दुर्दैवाच्या फेर्‍यात सापडून संन्यासाचा आश्रय करून रहाणारी. श्रीकांतबद्दल वाटणार्‍या मोहाचं दमन अन उन्नयन करून त्याचा निरोप घेणारी बुद्धिमती स्त्री.

प्रीतीची शरदबाबूंनी या कादंबरीत चितारलेली दोन स्त्रीरुपं. प्यारी बाईजी अन संन्यासिनी कमललता.. आतून एकमेकीत मिसळलेली. अन्नदाआक्का अन अभया ही स्नेहमय प्रेरकतेची अशीच द्वैती स्त्रीरुपं.

अनेकानेक उपकथानकांचा ,रतनसारख्या सपोर्टिंग रोलमधल्या अनेक अविस्मरणीय व्यक्तिरेखांचा उच्चार न करता इथे मी हे लेखन संपवते. हातात घेतलेलं पुस्तक खाली न ठेववणं हे परम वाचनीयतेचं लक्षण. असा आनंद देणारी पुस्तकं मिळतात तेव्हा तो आनंद दोन्ही मुठींनी परिसरावर उधळून द्यावासा वाटतो.

मलाही तो मोह आवरला नाही..

- भारती बिर्जे डिग्गीकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारती, बाप्रे किती किती जुन्या आठवणी जागवल्यास... कॉलेज च्या जमान्यात सगळं सगळं साहित्य वाचलेलं शरतचंद्रांच, हिंदी अनुवाद ही खूप्पच प्रभावशाली होता.... मलाही श्रीकांत खूपच आवडती कादंबरी.

भारती....

दोन वेळा हा सुंदर लेख वाचला.....सुरुवातीला काहीसा घाबरलोच होतो की तुम्ही 'अभया' चा उल्लेख केला आहे की नाही...त्याला कारण म्हणजे प्रदीर्घ म्हणावा असा {क्रमशः केला नाही म्हणून विशेष आभार मानतो}... लेख संपत आला तरी अभया येईना त्याची चिंता लागून राहिली....पण ती आली आणि त्या पात्रावरील तुमचे नेमके भाष्यही.

मला शरदबाबूंच्या अनेक नायिका, उपनायिकांमधील फार भावलेले हे पात्र आहे 'अभया'. श्रीकांत कादंबरीचा जो काळ रंगविला आहे कथानकात त्याचा विचार करता अभयाची भूमिका ही फार क्रांतिकारी म्हणावी अशीच आहे.... राजलक्ष्मीच्या अगदी विरूद्ध.....

तुम्ही वर्णन करताना साहजिकच राजलक्ष्मीला उजवे दान दिले आहे [जे साहजिकच म्हणावे लागेल...], पण या कादंबरीतील सर्व नारी पात्रातील सशक्त आणि मजबूत पात्र म्हणजे अभयाच होय. पण का कोण जाणे शरदबाबूंनी राजलक्ष्मीला रेखाटताना ती कशी आदर्श भारतीय नारीचे रूप आहे....आणि अभया अपमानीत जीवन जगण्याच्याच योग्यतेची आहे, असेच विचार मांडले आहेत......ही टिपिकल पुरुषी वर्चस्वाची धारणा होती हे नक्की.

शरदबाबूंच्या या स्वभावावर लिहिता येईल बरेचसे....म्हणजे मग 'देवदास' असो, 'परिणीता', 'बिराज बहू' असो वा 'श्रीकांत'...... नायकप्रधानच कथानक असल्याने त्यांच्या सहवासात येणार्‍या प्रत्येक स्त्रीने हा नायक म्हणजे 'देवता' आहे [मग तो पक्का दारुड्या असला तरी....] असेच समजले पाहिजे हा अट्टाहास पराकोटीचाच.

असो.... माझ्या मतामुळे तुमच्या अप्रतिम लेखनाला कसलाही उपद्रव होणार नाही....इतके ते निखळ आणि प्रभावी उतरले आहे.

शरदबाबूंच्या कादंबर्‍यांच्या आवाक्याच्या हिशोबानेच तुमचा हा लेख उतरला आहे हे सांगणेही गरजेचे आहे.

अशोक पाटील

शैलजा,वर्षू नील, खूप आभार..या प्रकारच्या वाचनाची गोडी असावी लागते मुळात.
होय वर्षू, अग हे जुनाट पुस्तक पुनश्च वांद्र्याच्या तितक्याच प्राचीन वाचनालयात हाती आलं अगदी पान पान ढिलं अशा जीर्णरूपात तेव्हा तिळा उघडल्यासारखी घुसले त्याच्यात.
अशोकजी, तुमची सखोल साक्षेपी प्रतिक्रिया म्हणजे लेखकासाठी एक पुरस्कारच मिळाल्याचं समाधान.धन्यवाद या लेखाला दाद देण्यासाठी.
अभयेबद्दल मी मधल्या विदेश अध्याय परिच्छेदातही लिहिलंय अन शेवटीही सारांशभूत स्वरूपात. तुमची निरीक्षणे मार्मिक आहेत.शरद्बाबू इतके सनातनी आहेत म्हणूनच ते अन्नदाआक्काला हाय पेडेस्टल वर विराजमान करून तिच्या तुलनेत प्रत्येकीला मोजतात, अगदी राजलक्ष्मीही त्यांना मग आदर्श वाटत नाहीच, तिला तर ते सुरुवातीलाच 'पितळेचं दुकान' म्हणालेत.
पण एका तर्‍हेने ते तत्कालिन पुरुष दृष्टीकोन कादंबरीच्या सीमांमध्ये मांडतात व अलिप्तपणे त्या दृष्टीकोनाचा विकासही कथानक पुढे सरकताना सूक्ष्मपणे नोंदवतात.
अभयाचं मूल्यमापन म्हणूनच ते आडून, राजलक्ष्मीच्या पत्रातून व मुखातून करवतात तेव्हा पुरुषी निकषांना,समाजपुरुषाला ते अप्रत्यक्षपणे बदलण्याचा प्रयत्न करत आहेत असे वाटते.

फारुख शेखची श्रीकांत नावाची सिरियल होती ती ह्याच कादंबरी वरची ना?? मृणाल कुलकर्णी पण होती ना... तिच अभया होती का? फार वर्षांपूर्वीची असल्यामुळे आणि तेव्हा फारच लहान असल्यामुळे काही आठवत नाहीये नीट..

धन्स हिम्सकूल,हा संदर्भ शोधत होते. तेव्हाच्या माझ्या व्यग्रतेमुळे ती सीरियल मिस केलीय, आता नेटवरही सापडली नाही. 'इति श्रीकांत' नावाच्या अलिकडच्या -तरी २००५ वाटतं - चित्रपटाचा संदर्भ सापडला.शरद्बाबूंच्या चरित्रहीन वरची सीरियल मात्र दूरदर्शनवर फार पूर्वी पाहिली होती..छानच होती. ही प्रतिसृष्टी सीरियल मध्ये सामावणे कठीणच,त्याहून सिनेमाच्या मर्यादित अवकाशात,पण आस्वादाच्या तर्‍हातर्‍हा करायला आवडतात आपल्याला तसेही.... Happy

खुप छान लिहिलय. आवडते कथानक आहे हे.
सिरियलमधे नवनी परिहार होती आणि उत्पल दत्त, नूतन पण होते. बर्‍यापैकी जमलेली होती ती.

दिनेश....

तुम्ही उल्लेख केलेले कलाकार 'श्रीकांत' चे नसून 'मुजरिम हाजिर' चे होते. बंगाल आणि तेथील जमीनदारी पद्धतीवर बिमल मित्रांनी लिहिलेली ती कादंबरी. नूतन ने त्यात कालिगंज की बहू चा रोल केला होता....नवनी परिहार होती त्यात.

"श्रीकांत" मध्ये फारुख शेख टायटल रोलमध्ये होता तर राजलक्ष्मीच्या भूमिकेत सुजाता मेहता होती....अभया कुणी साकारली होती हे स्मरत नाही. मृणाल असू शकेल....पण खात्री नाही.

अशोक पाटील

तुम्ही सुरेख, भावविभोर होऊन लिहीलेत.
मला आता शरत्चंद्र आवडत नाहीत. त्यांच्या 'प्रेमाचे उदात्तीकरण' करणार्‍या 'अति सहनशील' नायिका त्याहुन आवडत नाहीत. पण हिंदी अनुवाद वाचलेत श्रीकांत, चरित्रहीन, बिजया,परिणीता वगैरे. आणि त्या वयात ते आवडले होते नक्कीच. त्यामुळे मोगर्‍याचा दरवळासारखा लेखाचा दरवळ पोचला माझ्यापर्यंत क्षणभर. Happy

रैना, आभार.
मान्य सगळे आक्षेप.
- पण अशाच असतात ना बहुसंख्य भारतीय स्त्रिया ?हा गुण की दुर्गुण निश्चित नाही करता येत.
पण स्वीकारून नाकारणारी, नाकारून स्वीकारणारी,गहन,खोल अशीच दिसते मला या उपखंडातली स्त्री.

अगदी आत्ताची नागर सुविद्य तरुणाई नक्कीच बदलतेय,मुली विशेषतः ,जे आवश्यकच आहे.काळाची गरजही. पण त्यांच्या रक्तातून वहात आलेल्या या स्त्रीत्वाचीही ओळख त्यांनी ठेवावी असं वाटतं मला.
आणि यात खरंच टिपिकल भारतीयत्वाचा दुराभिमान,संस्कतीचं सरसकट समर्थन करायचा हेतू नाही.तो असूच शकत नाही एक सजग आधुनिक स्त्री म्हणून.
स्वार्थच आहे.आपल्या आतल्या शक्तीची आणि सहनशक्तीची यथार्थ ओळख आहे..अधिक शांत,संतुलित जगण्यासाठी.

हो अशोक बरोबर. ती मालिका सुरु झाली आणि मी परदेशी गेलो, बघताच आली नाही. मुजरीम हाजिर मधे लालन सारंग पण होती.