ओ चांद जहां वो जाए ....

Submitted by अजित अन्नछत्रे on 17 March, 2013 - 00:58

ओ चांद जहां वो जाए, तू भी साथ चले जाना
कैसे हैं कहा हैं वो, हर रात खबर लाना

शारदा (१९५७) या हिंदी classic म्हणून गणल्या गेलेल्या चित्रपटातील एक सुरेल गीत !

१९५७ - कृष्ण-धवल चित्रपटांचा जमाना होता तो ! दादा साहेब फाळके पारितोषिकाचे मानकरी असलेल्या लक्ष्मीवरा प्रसाद यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात मुख्य भूमिका बजाविल्या होत्या मीनाकुमारी, शामा आणि राज कपुर यांनी. एव्हाना जाणकारांच्या लक्षात आलच असेल - बरोबर आहे, आपला नेहेमीचाच love triangle (मीनाकुमारी आणि शामा यांनी वठविलेल्या दोन प्रेमिका आणि राज कपूरने वठविलेला एकमेव प्रियकर) - या वरच आधारलेला होता हा चित्रपट. पण हा love triangle 'जरा हटके' असा आहे ! कारण इथे प्रेयसीचे (मीनाकुमारी) लग्न काही अपरिहार्य कारणामुळे प्रियकराच्या (राज कपुर) वडिलांबरोबर होते. आहे कि नाही 'जरा हटके' विषय - आणि तो हि १९५० च्या दशकात !

गीतकार राजिंदर किशन यांनी हळुवार आणि स्त्रीसुलभ भावनांचे शब्दांकन या गीतात फार कलात्मक रीतीने केले आहे. शिवाय लता आणि आशा यांचे सूर आणि रामचंद्र चितळकर (सी. रामचंद्र) यांचे संगीत असा अस्सल मराठमोळा संगम या गाण्यास लाभला आहे. किंबहुना, लता आणि आशा यांनी जी मोजकीच (साधारण ७० च्या वर) duets गायली आहेत त्यापैकी हे एक ! सी. रामचंद्र यांनी तर आपल्या मनमोहक संगीताने हे गाणे जणू अजरामरच करून ठेवले आहे ! स्वरांचा मुक्त हस्ताने केलेला वापर आणि उडती व लयबद्ध चाल या गाण्याच्या जमेच्या बाजू ! जुनी हिंदी गाणी शास्त्रीय संगीतावर आधारलेली असायची (अजुनही काही वेळेस असतात). या गीतावरही हंसध्वनी आणि शंकरा या दोन रागांची छाप जाणवते.

या गाण्यात मीना कुमारी आणि शामा यांची परस्पर विरोधी व्यक्तिमत्व फार खूबीने चितारण्यात आली आहेत. गाण्यात मीना कुमारीचा आउट-लुक काहीसा गंभीर आणि matured तर शामा काहीशी नटखट, खट्याळ, काहीशी अवखळ - किंबहुना सिनेमात शामाचे नाव 'चंचल' असेच आहे ! दूर देशी गेलेल्या आपल्या प्रियकराच्या विरहाने प्रियतमेच्या मनात उमटलेली हुरहूर या गाण्यात फार सुंदररित्या दाखवण्यात आली आहे. त्यात सी. रामचंद्र यांनी दिलेला बहारदार स्वरसाज म्हणजे जणू - सोने पे सुहागा!

गाण्याची सुरवात प्रियतमेने (मीनाकुमारी) चंद्राला घातलेल्या लडिवाळ साकड्याने होते.

ओ चांद जहां वो जाए, तू भी साथ चले जाना
कैसे हैं कहा हैं वो, हर रात खबर लाना

परदेशात राहण्याऱ्या आपल्या प्रियकराची खुशहाली दररोज सांगण्याची विनंती ती चंद्राला करत आहे! ध्रुवपद संपता-संपता लतादीदीनी लावलेला, गगनाला गवसणी घालणारा तार षडज जो भिडतो तो सरळ निळ्याशार आकाशातल्या चंद्रमालाच !

गाण्याचे पहिले कडवे मीना कुमारी यांच्यावर चितारण्यात आले आहे आणि स्वर लाभला आहे लतादीदींचा! परदेशात प्रथमच प्रवासास गेलेल्या आपल्या प्रीयकराच्या सदैव सोबतीत रहाण्याची विनंती प्रेयसी चंद्रास करत आहे.

Meenakumari in Sharda.jpg

वो राह अगर भुले, तू राह दिखा देना
परदेसमे राहीको मंजील का पता देना
है पेहेला सफर उनका, और देस है अंजाना
हर रात खबर लाना, ओ चांद .....

या कडव्यात मीनाकुमारीने रेखाटलेल्या परिपक्व व्यक्तिमत्वाला लतादीदींचा धीर-गंभीर आवाज फारच शोभून दिसतो. लतादीदींचा हा आवाज आवाज म्हणजे जणू एक शांत, निःशब्द डोहच ! जणू काठावर उभ्या असणाऱ्याला तसूभरही कल्पना येऊ नये कि डोहातील पाणी किती खोल आहे - या डोहात किती रत्न लपली आहेत !

दुसरे कडवे हे पहिल्या कडव्याच्या अगदी विरुद्ध आहे. शामाचा चंचल आणि अवखळ स्वभाव या कडव्यात फार खुबीने रेखाटला आहे. आणि त्यास सुरांची साथ दिली आहे आशादीदींनी !

Shama in Sharda.jpg

केहेना मेरे होठो पर, रुकती हुई आहें है
या रासता उनका है, या मेरी निगाहे है
बेताब महोब्बत का, बेताब है अफसाना
ओ चांद जहां वो जाए, ओ चांद ......

इथे शामाने चितारलेल्या चंचल व्यक्तिमत्वास आशादीदींचा ओघवता आवाज अगदी चपखल बसतो. या कडव्याच्या पहिल्या ओळीत आशादीदीं घेतलेली तान म्हणजे जणू केतकीच्या बनात सळसळणारी नागीण ! जणू कृष्णमेघांनी दाटलेल्या आकाशात लखाखणारी विद्युल्लता !

गाण्याचे तिसरे कडवे मोठ्या कल्पकतेने आखले आहे.

है चांद कसम मेरी, बस और न कुछ केहेना
केहेना कि मेरा तुम बिन, मुश्किल यहां रहेना
एक दर्द्के मारे को, अच्छा नही तडपाना
हर रात खबर लाना, ओ चांद ......

कडव्याची पहिली ओळ लतादीदींनी गायली आहे तर दुसरी आणि तिसरी ओळ आशादीदींनी - या दोन दिग्गजांचे आळीपाळीने कानावर पडणारे स्वर म्हणजे जणू दोन सरितांचा संगीतकाराने रचलेला लपंडाव ! जणू श्रावणात ऊन-पावसाचा चालणारा लपाछपीचा खेळ !

आणि मग, शेवटच्या ओळीत मिळतात या दोन सरिता - जणू अलकनंदा आणि भागीरथीचा देवप्रयागला होणारा स्वर्गीय संगम ! याच संगमाची आस जणू श्रोत्यास संपूर्ण गाणे ऐकताना लागलेली असते !

खरोखरीच, काय दडलय या जुन्या कृष्ण-धवल गाण्यामध्ये ? का पुनःपुन्हा ऐकावीशी वाटतात ही जुनी अवीट गाणी? त्यात असे काय आहे जे कधी संपतच नाही? कोणी सांगेल मला?

(समाप्त)

(फोटो इन्टरनेट वरून)

हे गाणे आपण या लिंक वर पाहू शकता: http://www.youtube.com/watch?v=u7XgcwWlcpU

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर आहे हे गाणं. पुन्हा ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद ! दोघींचे आवाज मस्त लागलेले आहेत पण मला स्वत:ला आशाताईंनी गायलेला भाग जास्त आवडतो. श्यामावरचे चित्रीकरणही चपखल झाले आहे. मीनाकुमारी थोडी जास्तच प्रौढ, गंभीर वाटते.

हे गाणे इतक्या वेळा ऐकले आहे की ते न ऐकताही त्यातल्या म्युझिकसकट सगळे गाणे आठवते.
सुंदर लेख.. आणखी इतर गाण्यांबद्दलही लिहाल का? उदा. अनुराधा मधील काही गाणी

छान लिहिलय. मी साईडला गाणे लावूनच वाचत होतो, त्यामुळे आणखिन मजा आली. गाणं ऐकणं, गुणगुणणे वगैरे एक गोष्ट पण त्यातले आवडलेले, दर वेळी तितकेच अचंबित करणारे, रोमांच आणणारे बारकावे परत परत अनुभवत गाणं ऐकणे ह्याची एक वेगळी मजा आहे. तुम्ही दर्दी माणूस दिसता, मनस्मी म्हणतायत तसं अजून गाण्यांविषयी वाचायला आवडेल. Happy

>>लतादीदींचा हा आवाज आवाज म्हणजे जणू एक शांत, निःशब्द डोहच ! जणू काठावर उभ्या असणाऱ्याला तसूभरही कल्पना येऊ नये कि डोहातील पाणी किती खोल आहे - या डोहात किती रत्न लपली आहेत ..
>>पहिल्या ओळीत आशादीदींनी घेतलेली तान म्हणजे जणू केतकीच्या बनात सळसळणारी नागीण ! जणू कृष्णमेघांनी दाटलेल्या आकाशात लखाखणारी विद्युल्लता !>>

फा॑र सुंदर लिहिलेत बिनधास्त अन एका अपरिचित तितक्याच मनोहर गीताचा परिचय दिलात. आभार.

छान लिहिलेय.
<किंबहुना, लता आणि आशा यांनी बोटावर मोजण्या इतकी जी duets गायली आहेत त्यापैकी हे एक !>
बोटावर मोजण्याइतकी का? वाचल्याचे आठवतेय की दोघींनी ७४ गाणी एकत्र गायलीत. गाणी वीसेक तरी आठवताहेत.

>>लतादीदींचा हा आवाज आवाज म्हणजे जणू एक शांत, निःशब्द डोहच ! जणू काठावर उभ्या असणाऱ्याला तसूभरही कल्पना येऊ नये कि डोहातील पाणी किती खोल आहे - या डोहात किती रत्न लपली आहेत ..
>>पहिल्या ओळीत आशादीदींनी घेतलेली तान म्हणजे जणू केतकीच्या बनात सळसळणारी नागीण ! जणू कृष्णमेघांनी दाटलेल्या आकाशात लखाखणारी विद्युल्लता !>>
अनुमोदन. Happy

अप्रतिम लेख. गाणं खरच मस्त खूपच सुरेख आहे. परत परत ऐकले तरी कधीच कंटाळा येत नाही आणी अतिप्रचंड नाजुक. Happy

प्रिय चीकू, mansmi18, वैद्यबुवा, भारती, भरत मयेकर, जाई आणि कांदापोहे,

आपणा सर्वांना आपल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद !

mansmi18: <<आणखी इतर गाण्यांबद्दलही लिहाल का?>> धन्यवाद - जरुर प्रयत्न करीन !

वैद्यबुवा: <<गाणं ऐकणं, गुणगुणणे वगैरे एक गोष्ट पण त्यातले आवडलेले, दर वेळी तितकेच अचंबित करणारे, रोमांच आणणारे बारकावे परत परत अनुभवत गाणं ऐकणे ह्याची एक वेगळी मजा आहे.>> अगदी बरोब्बर - पूर्णतयः सहमत !

भरत मयेकर: <<बोटावर मोजण्याइतकी का? वाचल्याचे आठवतेय की दोघींनी ७४ गाणी एकत्र गायलीत>> बरोबर आहे - दोघींची ७० च्या वर duets आहेत. त्यानुसार लेखात बदल केला आहे - धन्यवाद.

मस्त जमल्ये लेखनाची भट्टी.. एक अप्रतीम गाण्याच्या आठवणींना उजाळा दिल्याबद्दल अनेकानेक धन्यवाद....

आणि मग, शेवटच्या ओळीत मिळतात या दोन सरिता - जणू अलकनंदा आणि भागीरथीचा देवप्रयागला होणारा स्वर्गीय संगम ! >>> आह! हृदयातील सुखाची कळ दर्शवणारं चिन्ह....

वर्षानुवर्षे नित्यनेमाने ऐकत असलेल्या काही अवीट आणि कालौघात किंचितही क्षतीग्रस्त न झालेल्या ह्या गाण्याविषयी आज इतक्या आत्मियतेने कुणी लिहिल यावर चटदिशी विश्वास बसत नाही....पण इतके सुंदर लिखाण वाचल्यावर खात्री पटली की हीरा कोणत्याही काळात सदैव प्रकाशमयच राहतो....जरी तो अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला तरी.

लता आशा मीनाकुमारी श्यामा....सी.रामचंद्र राजेन्द्रकृष्ण.... असे जादूमय रसायन 'हंसध्वनी' त गुंफून एकत्र आल्यावर गाण्यातील तो 'चांद' देखील मनोमनी सुखावला असेल. पौर्णिमेची शीतलता म्हणजे नेमकी काय असे कुणी विचारले तर हे गाणे त्या व्यक्तीला ऐकवावे लागेल.... इतकी अप्रतिमता त्यात उतरली आहे.

"हंसध्वनी' रागाचे हेच वैशिष्ठ्य की यात रचलेल्या बहुतेक सर्व रचना मध्यरात्री समयीच गाईल्या जातात आणि रचनेत 'मनोकामना....भक्ती' असा भाव असावा लागतो.... राजेन्द्र कृष्ण यांच्या शब्दांनी नेमके तेच साधले आहे.

धागालेखक श्री.बिनधास्त यानीही या विषयात त्याना किती गती आहे हे सुरेखरित्या मांडले आहे. त्याबद्दल त्यांचे खास आभार.

अशोक पाटील

धन्यवाद अशोकजी आपल्या प्रतिसादाबद्दल !

खरोखरीच, लता-आशा, मीनाकुमारी-श्यामा आणि सी.रामचंद्र-राजेन्द्रकृष्ण - खतरनाक कॉम्बो ! आपले हंसध्वनी रागावरील लिखाणही आवडले.

शास्त्रीय संगीतात रस असणाऱ्यांनी खालील धागे जरूर पाहावेत:

किशोरी अमोणकर (राग हंसध्वनी) - http://www.youtube.com/watch?v=FglVACXnQIk

भीमसेन जोशी आणि रशीद खान (शंकरा रागाची ओळख) - http://www.youtube.com/watch?v=ALWy6XnRdDM
भीमसेन जोशी (शंकरा रागात चिंब भिजायचे असेल तर) - http://www.youtube.com/watch?v=AOJnsCwi0KA

बिनधास्तजी
खूप दिवसान्नी आपले लेखन वाचायला मिळाले !
अप्रतीम !! रसिकान्साठि हा नॉस्टल्जीया म्हणजे पर्वणिच !!
अनेक धन्यवाद !!