विरह

Submitted by अमेय२८०८०७ on 15 March, 2013 - 12:55

कसा सरता सरेना तुझ्या वाटेचा दिवस
शुभ्र पुनवेची झाली नसताना तू अवस
पुन्हा भेटीस कातर माझे अंगणाचे हात
ओल्या स्पर्शास आतुर उधाणाची चांदरात
पान हलताना भासे लागे तुझीच चाहूल
सावल्यांनी झावळ्यांच्या पडे मला रानभूल
रात्र विसावून गेली वेळ उसवून आली
तुला सोबती गेलेली पाखरेही मागे आली
काळजास रक्तरंग ओझे विरहाचे दाट
नाही तुझा प्रेमसंग कशी होईल पहाट

Group content visibility: 
Public - accessible to all site users