बेरीज वजाबाकी

Submitted by मानुषी on 14 March, 2013 - 09:55

बेरीज वजाबाकी

माणसाचं मन खरंच अनाकलनीय आहे!
एखाद्या वरवर साध्या वाटणार्‍या गोष्टीचा आपण किती विचार करतो! एखादी साधीशीच गोष्ट दिवसभर मनात घोळत रहाते! म्हणूनच हा परवा आलेला अनुभव इथे शेअर करावासा वाटला!

........बरेच दिवस बरंच शिवण झाल्यावर शिलाई मशीन कुरकुर करायला लागलं. जेवढं मला जमायचं, तेवढं खोलून अगदी आतपर्यंत तेल घातलं. पण नाहीच. मग बॉबिनही काढून सगळे पार्ट्स खोलून साफ़ केले, परत जोडले, बॉबिनवरचा एक सूक्ष्म स्क्रू जरा सैलावलेला वाटला तोही काढून परत टाइट केला. तरी काही टीप चांगली येईना. वाटलं किती इमाने इतबारे सेवा दिलीय या मशीनने आपल्याला. दुरुस्तीची वेळ आलेली दिसते.

मग सकाळीच "सरदारजी मशीनवाले" (आमच्या गावातलं शिलाई मशीनचं दुकान) यांच्याकडे जायचं ठरवलं. पण मग आठवलं की मैत्रिणीकडे मशीन दुरुस्तीसाठी कुणीतरी येत असल्याचं ती एवढ्यातच एकदा बोलली होती.
म्हणून तिला फ़ोन करून त्या माणसाचा नंबर कॅलेंडरवर लिहून घेतला, पुढे आडनाव लिहिलं, जे मैत्रिणीने सांगितलं. आणि लगेचच फ़ोन केला. तर तो नंबर चक्क माझ्या सेलफ़ोनमधे "मच्छिन्द्र मशीनदुरुस्ती" असा आधीच कधीतरी सेव्ह केलेला! नावापुढे मशीन दुरुस्ती लिहिलं नसतं तर कालांतराने लक्षातच आलं नसतं की हा कोण मच्छिन्द्र! अगदी आडनावासह सेव्ह केलं असतं तरी. कारण मशीन दुरुस्ती ही काही रोजची बाब नाही.
एकदम डोक्यात प्रकाश पडला. कित्येक वर्षांपूर्वी हा माझ्याकडे कधीतरी जेव्हा लागेल तेव्हा मशीन दुरुस्तीसाठी यायचा. तेव्हा तो अगदी विशीच्या आतबाहेर असावा. पण त्याचा मशीन दुरुस्तीत हातखंडा!

नंतर माझं मुलांच्या शिक्षणासाठी काही वर्षं पुण्यात रहाणं झालं त्यामुळे माझ्याबरोबर मशीनही पुण्यात हलवलं.
मग तेव्हापासून मशीनच्या दर्शनी भागावर मशीन दुरुस्त करणाऱ्या पुण्यातल्या माणसाचं कार्ड चिकटलेलं आहे. ते आत्तापर्यंत तसंच आहे.
आता या मच्छिन्द्रला फ़ोन लावताना एकदा मनात आलंच, की इतका काळ लोटलाय, मध्यंतरी इतकं पाणी पुलाखालून गेलंय......हा मुलगाही अजूनही मशीन दुरुस्तीच करत असेल? नाही नाही ............आता तो चांगला पुढे गेला असेल कदाचित याच व्यवसायात, कदाचित दुसरंच काही करत असेल.....पण आयुष्याचा इतका मोठा कालखंड कुणी नुसती शिलाई मशीन दुरुस्ती करून व्यतीत करत असेल हे मानायला माझं मध्यमवर्गीय, नाकासमोर बघून चालणारं मन आणि सरधोपट मार्गाने चालणारी माझी विचारसरणी तयारच नव्हती.
किती तरी अशी उदाहरणं डोळ्यापुढं आली.

माझ्याचकडे पूर्वी धुणीभांडी करणाऱ्या बाईंचा मुकुंदा माझ्या डोळ्यासमोर लहानाचा मोठा झाला. आता गावातला अगदी एक नंबर टेलर म्हटलं तरी चालेल. बायकांचं अगदी पान हलंत नाही त्याच्याशिवाय! आणि कधीही जा.... एका हाताने कपडा बेतत असतो आणि कानाला फ़ोन! फ़ोनवरून बायकांच्या शिव्या अगदी शांतपणे खात असतो, सांगितलेल्या वेळेवर कपडे न दिल्याबद्दल. कारण आता तो इतका उच्च पदी पोचलाय की तुम्हाला जर उन्हाळ्यासाठी कपडे हवे असतील तर ते तुम्ही ३/४ महिने आधी थंडीतच टाका त्याच्याकडे नाहीतर उन्हाळ्याचे कपडे तुम्हाला थंडी सुरू झाल्यावरच मिळणार!

पूर्वी आमच्या ऑफ़िसात काम करणारा विनोद आता स्वता:ची प्रॅक्टिस करतो. ऑफ़िससाठी जागाही घेतली आहे त्याने छोटीशी!

आमच्याच घरात घरकाम करणारा शरद खूप प्रामाणिक आणि हुशार. डॉइंग उत्तम. सर्व सणांना सुंदर रांगोळ्या घालतो. कोणतंही काम सांगा... फ़त्ते करूनच येणार. फ़क्त अभ्यासात डोकं चालंत नाही. त्यानेही आयुष्यात मोठं व्हावं असं मलाच काय घरातल्या सर्वांनाच वाटतं. त्याला हळूहळू ऑफ़िसचं काम शिकवतो आहोत, जोडीने त्याने ड्रायव्हिंगही शिकावं असं सगळ्यांनाच वाटतं. तर काळाबरोबर हे सगळे बदलले. शिकून कष्ट करून मोठे झाले.

खुद्द माझ्या घरातली, कुटुंबातली इतर मुलंमुलीही बघता बघता मोठी झाली. काही अपवाद वगळता, शिकून आपापल्या नोकरीत, व्यवसायात उच्च पदी पोचली. काही भारताबाहेर परदेशातही जाऊन आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत.

असे सगळे विचार मनात गर्दी करत होते. ते विचार बाजूला ठेऊन मच्छिन्द्रला फ़ोन लावला! "मच्छिन्द्र भाऊ बोलाताहेत का?"
"हो, कोन बोलतंय?" मच्छिन्द्र्चा आवाज.
"मी..................बोलतेय. तुम्ही मशीन दुरुस्ती करता का?" त्याचा होकार ऐकून मी माझा पत्ता सांगायला लागले तर त्याला माझा पत्ता चांगलाच पाठ होता. म्हणाला, "मॅडम मला माहिती आहे. येतो मी दुपारी.
त्याला नक्की कुठे यायचं हे सांगितलं.
कारण घराच्या खालच्या मजल्यावर ऑफ़िस व पलिकडे धाकट्या दीरांचा भाग. सगळं एकाच परिसरात. कुणीही आलं की नक्की कुठे जायचं हे न कळून जरा चक्रावतो.
कधी "स्टेटमेन्ट्स झाली का"? असं विचारत एखादा नवा क्लाएन्ट वर घरात घुसतो, कधी घरी बोलावलेला प्लंबर, इलेक्ट्रिशियन बावचळल्यासारखा ऑफ़िसात घुसतो. म्हणून मच्छिन्द्रला जरा नीट स्पष्ट सांगितलं.
तो बरोबर वर आला. "नमस्ते मॅडम"

मी त्याला पाणी दिलं आणि मशीन दाखवलं. पण तो जेव्हा आत आला तेव्हा मला जरा धक्काच बसला होता. वाटलं.......हाच तो मच्छिन्द्र? जो वीसेक वर्षांपूर्वी यायचा? माझ्या डोळ्यासमोर तर एका विशीतल्या मुलाची आकृती होती. हो हो .......पण मध्ये इतका काळ लोटला ना! मी स्वता:ची समजूत घातली.
त्याच्याशी बोलल्यावर हळूहळू ओळख पटत गेली. माथ्यावरच्या विरळ पांढऱ्या केसातून, चेहेऱ्यावरच्या सुरकुत्यातून, त्याच्या अंगावरच्या मळकट कपड्यातून, त्याच्या जवळच्या हत्याराच्या काळ्या मिचकुट्ट पिशवीतून.......... मी त्याची ओळख शोधत मनाला पटवत राहिले.

काळाच्या खुणा, फ़टकारे म्हणू हवं तर, सगळ्यांच्याच चेहेऱ्यावर, शरीरावर बसलेले दिसतातच. पण अशी एखादी व्यक्ती २०/२५ वर्षांनी जेव्हा अचानक सामोरी येते तेव्हा असंच होतं का?
हा मच्छिन्द्र नव्हताच. त्याच्या जागी कुणीतरी दुसरीच खूपच वयस्कर व्यक्ती दिसत होती का मला?
मी विचारात मग्न आणि तो मला म्हणत होता,"मॅडम, इकडचा हा भाग सगळा नवीन बांधलाय का?
कारण मी खालच्या मजल्यावर येत होतो. तुमची मशीन व्हरांड्यात होती. आणि तेव्हा कुत्रंही नव्हतं पाळलं
तुम्ही. आणि आजी होत्या तेव्हा. आणि तेव्हा मशीनही जुनी होती तुमची....बिना मोटरवाली. आजींची असेल बहुतेक ती मशीन." तो दारातल्या पायपुसण्यावर मशीन खोलून उकिडवा बसला होता. हात चालवता चालवता खाली मान घालून माझ्याशी बोलत होता.
पुढे म्हणाला, "पण ही नवीन मशीन फ़ार चांगली लागली तुम्हाला. सरदारजींनी अगदी पहिल्या लॉटमधली दिली होती तुम्हाला. तेंव्हाचे सगळे पार्ट ओरिजिनल जपानी होते. नंतर याच कंपनीच्या मशिनीत आपले इंडियन पार्ट आले, मग गेली मशिनीची क्वालिटी. आता नाही इतकी चांगली मशीन मिळणार."

त्याला जुनं सगळं नीट आठवत होतं. माझं पहिलं मशीन साधं होतं. ते त्याला आजींचं(माझ्या सासूबाईंचं) असेलसं वाटलं. नंतर काही वर्षांनी मी "फ़ॅशनमेकर" घेतलं. सिंगरच्या फ़ॅशनमेकरच्या टीव्हीवरच्या जाहिराती मला फ़ार आवडायच्या. जाहिरातीतल्या त्या मायलेकींच्या जागी मी स्वता:ला आणि माझ्या लेकीलाच पहायची.
आणि "फ़ॅशनमेकर" हे नावही मला इतकं आवडलं की मी ते घेऊनच टाकलं होतं.....अर्थातच "सरदारजीं"कडूनच. इतकी पुरातन काळातली गोष्टही त्याच्या चांगलं लक्षात होती.
मग मात्र मला वाटलं आपल्या किती गोष्टी लक्षात ठेवल्या याने, आणि मधली कित्येक वर्षं हा आपल्या खिसगणतीतही नव्हता.......अस्तित्वातच नव्हता म्हटलं तरी चालेल. त्याने पूर्वीच्या इतक्या गोष्टी लक्षात ठेवल्या त्या व्यावसायिक दृष्टीकोनातून की माणुसकीच्या नात्याने?

..........................मच्छिन्द्र आत आला तेव्हा "लुई" सोफ़्यावर झोपला होता. त्याची आधी व्यवस्था करावी लागली. कुणी आलं की त्याला आधी खोलीत कोंडावं लागतं. कारण आलेली व्यक्ती ही संपूर्णपणे आपली जबाबदारी आहे असं वाटून लुई त्या व्यक्तीला अगदी प्रेमाने भेटायला जातो, आणि आलेल्या व्यक्तीच्या खांद्यावर स्वता:चे दोन्ही हात ठेऊन, चक्क मिठी मारण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे आलेली व्यक्ती गर्भगळित होते. म्हणून आधी त्याला कोंडला मगच मच्छिन्द्रला घरात घेतला होता.

मला मात्र मच्छिन्द्रचं एकेक बोलणं ऐकून, पुलाखालून किती लाखो करोडो फ़ॅदमचं..........लाखो, करोडो गॅलन पाणी, वाहून गेलंय...............केवढ्या प्रचंड मोठ्या गतकालावधीचा लेखाजोखा हा माझ्यापुढे मांडत होता असं एक फ़ीलिंग आलं....जे मला खूप अंतर्मुख करून गेलं. रोजच्या प्रचंड गतीने पुढे जाणाऱ्या आयुष्याकडे असं पाहण्याची संधी फ़ार कमी वेळा येते. कारण त्या जीवनप्रवाहात आपण इतके वेगात पुढे जात रहातो की मागे वळून बघायला वेळच नसतो. पण या मशीन दुरुस्त करणाऱ्याने इतक्या वर्षातला असा हा हिशोब, ही बेरीज वजाबाकी, त्याचं काम करता करता मांडली होती, जी मला अजिबातच अपेक्षित नव्हती.
वाटलं......इतक्या वर्षात कुटुंबात, परिसरात काय काय प्लस मायनस झालंय!

इकडे संपूर्ण मशीन खोलून त्याने प्रत्येक पार्ट साफ़ करून त्याला चांगलं तेल घालून छान दुरुस्ती केली होती.
मग सुई ओवायला त्याला दिसेना, म्हणून त्याने आधी चष्मा घातला आणि मशीनच्या मागे मी एक दिवा(बल्ब) लावून घेतला होता तोही लावला........... हो, माझंही तेच कारण. या दिव्यामुळे सुई ओवण्याचं काम बऱ्यापैकी सोपं व्हायचं. माझ्या मनात विचार आला की खरंच किती काळ लोटलाय ........! पूर्वी आपण शिवायला बसलो की नुसती खिडकी नीट उघडली की सुई ओवायचं काम पाव सेकंदात फ़त्ते. आता मात्र मशीनच्या मागे एक दिवाच नीट लावल्याशिवाय सुई ओवता येत नाही. कधीकधी तरीही नाही जमलं तर धागा कडक करण्यासाठी एक मेणबत्तीही ठेवलीये मशीनच्या ड्रॉवरमधे!
मग वाटलं त्यालाही मला बघून असाच धक्का बसला असेल का?

असो.........मग त्याने सुई ओवली आणि माझं मशीन धाडधाड चालवून दाखवलं. मग मीही एक ट्रायल घेतली. कारण बरीचशी यंत्रं.........मग ती टू किंवा फ़ोर व्हीलर असो, कॉप्यूटर असो....काहीही असो.............मेकॅनिकसमोर छान दुरुस्त होतात, नव्याने चांगली चालतात आणि मेकॅनिकची पाठ वळली की अडेलतट्टूसारखी पुन्हा अडून बसतात.
आता अगदी स्मूद चालंत होतं मशीन.
मध्येच तो पाणी प्यायला. नंतर मी दिलेला चहा प्यायला. जवळजवळ अर्धा पाऊण तास तरी अगदी मान मोडून काम केलं होतं बिचाऱ्याने.
मग मी त्याच्या कामाचा तो म्हणाला तेवढा मोबदला दिला. अजूनही त्याच्या बोलण्यात "सरदारजीं"चं नाव येत होतं.
म्हणून मी सहजच विचारलं,"सध्या काय करता तुम्ही?"
"मॅडम मी तिथेच आहे सरदारजींकडे." तो कपबशी खाली ठेवत म्हणाला.

मला जरा कसंतरीच वाटलं. वर उल्लेखल्याप्रमाणे कुणी संपूर्ण आयुष्य नुसतं मशीन दुरुस्त करत आपला चरितार्थ चालवत असेल हे बरं नाही वाटलं. कदाचित आणखीही एकादा उद्योग हा करत असेल का जोडीने? असंही वाटून गेलं.
पण त्याने विचारलेल्या सर्व प्रश्नांच्या अनुषंगाने त्याने केलेल्या सर्व बेरजा वजाबाक्या मीही परत परत करत राहिले.

वरच्या पिढीचा विचार करताना बऱ्याच वजाबाक्या करायला लागल्या. मुलांचे आजी आजोबा दोघेही हयात नाहीत. पुढच्या पिढीत पुतणीची एक ऍडिशन झाली होती. आणि नंतर एवढ्यातच माझ्या मुलांची लग्ने होऊन आणखी दोन नवे सदस्य कुटुंबात दाखल झाले होते. त्यामुळे बेरजेचे गणितही झाले. बेरजेच्या गणितात कुटुंबातल्या सदस्यात एक महत्वाची भर म्हणजे आमचा लॅब "लुई".

रहात्या घरातही किती बदल.........खरं म्हणजे इथेही फ़क्त बेरीजच! कारण कुटुंब वाढत गेलं तसं घराचाही फ़ाफ़टपसारा वाढत गेला. वाहनांच्या संख्येतही भर पडली.
एखाद्या ऍनिमेशन फ़िल्ममधे जसा भूतकाळ आणि वर्तमानकाळ हा रिवाइंड करून, फ़्लॅशबॅकमधे काही तुकडे जोडून काही तुकडे मायनस करून प्रेक्षकांना फ़ास्ट फ़िरवून आणतात तसा माझा प्रवास झाला.
आणि इथे या मच्छिन्द्रची ती हत्यारांची काळी पिशवी ..........सतरा ठिकाणी ठिगळं जोडलेली, तीही अगदी तो २०/२५ वर्षांपूर्वी यायचा, तेव्हाचीच वाटंत होती.

सारखं वाटंत राहिलं याने काही प्रयत्न केले नसतील का? इतकी वर्षं हाताशी होती, तेव्हा देवाने दिलेलं तारुण्यही होतं, हा जिथे होता तिथेच कसा काय राहिला? बाकी बाह्य बदल ....नैसर्गिकपणे झालेले...खूपच जाणवले पण त्याबरोबरीने बाकीच्या गोष्टी आजिबातच कश्या बदलल्या नाहीत? असं असतं का.......की काही लोक अल्पसंतुष्ट असतात म्हणून ते होते तिथेच रहातात?
काही वेळा योग्य वेळी योग्य ते शिक्षण न घेतल्याचाही हा परिणाम असू शकतो. पण असे किती तरी फारसे न शिकलेले किती तरी लोक काळाबरोबर स्वता:ला बदलून मोठे झालेले पाहिलेत.

त्याने छान दुरुस्त करून दिलेल्या मशीनवर मनासारखं काम करतानाही हेच विचार मनात घोळत राहिले!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषीताई, राग मानू नका, पण त्यालाही तुमच्याबद्दल असंच वाटलं नसेल कशावरून? तुमच्या आयुष्यातले तुम्ही नोंदवलेले बदलही नैसर्गिकच (कुटुंबसदस्यांच्या संख्येतली बेरीज-वजाबाकी इ.) वाटत आहेत. व्यक्तिगत पातळीवर तुम्ही तुमच्या स्किलसेटमधे काही बदल/सुधारणा घडवून आणली असाल तर निदान या लेखात त्याचा उल्लेख आलेला नाही.

सर्वांना धन्यवाद!
स्वाती ........... राग आजिबातच नाही. पण या लेखाचा विषय माझ्यातले बदल, सुधारणा हे मीच माझ्याबद्दल नोंदवत जाणं हा नाही.
आणि >>>>>>>>>>मग वाटलं त्यालाही मला बघून असाच धक्का बसला असेल का?>>>>>>>> हेही मी नोंदवलंय की! बाह्य बदलाबाबत!
आणि >>>>>>>>>> कदाचित आणखीही एकादा उद्योग हा करत असेल का जोडीने? >>>>> हाही उल्लेख मी केलाच आहे की.
आणि माझ्याबाबतीत त्याला तसं फक्त वरवरच्या अ‍ॅपिअरन्सबाबत नक्कीच वाटलं असणार. कारण २०/२५ वर्षांचा काळ लोटला ना मधे.
पण माझ्या स्किलसेटमधे मी काय सुधारणा केल्या हे त्याला जाणवण्याइतकी त्याची माझी वैयक्तिक ओळख नाही. मी पूर्वी रोजच्या जीवनात काय करत होते .........आणि आता मी कुठे पोचलीये हे त्याला समजण्याचं काहीच कारण नाही. आणि ते इथे नोंदवत जाणं हा लेखाचा विषय नाही. जे आलंय ते लिखाणाच्या ओघात, संदर्भात आलंय!

>> मी पूर्वी रोजच्या जीवनात काय करत होते .........आणि आता मी कुठे पोचलीये हे त्याला समजण्याचं काहीच कारण नाही.
तसंच त्याच्या बाबतीत ते तुम्हाला समजलेलं नसण्याची शक्यता आहे ना.
तुम्ही त्याला तसं काही आपुलकीने विचारल्याचं किंवा सुचवल्याचंही लिहिलेलं नाही.
मला या व्यक्तीच्या बाबतीतला तुमचा सूर काहीसा जजमेन्टल वाटला (सगळे प्रगती करत असताना हा मात्र तिथेच!). आणि तसा तो नसेल तर या लेखाचा नक्की फोकसही कळला नाही. 'आपण कसे वरवरचे निष्कर्ष काढतो पहा' असाच विषय आहे का?

तसंच त्याच्या बाबतीत ते तुम्हाला समजलेलं नसण्याची शक्यता आहे ना.>>>>>> स्वाती मी तसंही लिहिलं आहे ना!

तो तुमच्या दृष्टीने यशस्वी झाला नाही याबद्दल तुम्हाला वाईट वाटणे साहाजिक आहे. यावरून तुम्ही स्वतःला काही जास्त समजता, किंवा त्याला दोष देता असा अर्थ मी करत नाही. केवळ मनातले विचार लिहीलेत.

अहो हुषार, शिकलेले, सर्व प्रकारची मदत असताना आयुष्य वाया घालवतात काही लोक. मला माहित आहेत. (मी आरशात बघतो कधी कधी).

माझे मत असे की वाईट सवयी, मनाची कमकुवतता, अति राग असल्या गोष्टी कधी इतरांना दिसत नाहीत. जवळची लोक हे वाईट आहे, सुधार असे सांगत नाहीत, सांगितलेले ती व्यक्ति ऐकत नाही.

कदाचित जगात अशी सुमार माणसेच जास्त असतील.

>>>>>>>>>तो तुमच्या दृष्टीने यशस्वी झाला नाही याबद्दल तुम्हाला वाईट वाटणे साहाजिक आहे. यावरून तुम्ही स्वतःला काही जास्त समजता, किंवा त्याला दोष देता असा अर्थ मी करत नाही. केवळ मनातले विचार लिहीलेत.>>>>>>>
झक्की अगदी बरोबर ! धन्यवाद!

मानुषी, सहज सुचलेलं म्हणून खुप आवडलं. खरे तर अशी जुनी माणसे भेटणेच खुपदा अवघड होऊन बसते.
आपल्या मनात एक प्रतिमा पक्की झालेली असते, गेलेल्या काळाचा आपण काही विचार आपल्या बाजूनेच केलेला असतो. पण समोरचा माणूस त्याच प्रतिमेत बसला नाही कि, थोडा धक्काच बसतो.

मी इथे पं. मालिनी राजूरकारांचा फोटो बघितला त्यावेळी पण असेच वाटले. अशी तेजस्वी गायकी असणार्‍या मालिनीताईंना म्हातारपण येऊच कसे शकते, असे वाटत राहिले. पण त्या अजूनही तश्याच गातात, हे वाचले त्यावेळी खुप छान वाटले.

<<<<<<<
माझे मत असे की वाईट सवयी, मनाची कमकुवतता, अति राग असल्या गोष्टी कधी इतरांना दिसत नाहीत. जवळची लोक हे वाईट आहे, सुधार असे सांगत नाहीत, सांगितलेले ती व्यक्ति ऐकत नाही.>>>>>>

झक्की तुमच्या पोस्ट्सना पद्म महापद्म खर्व निखर्व अनुमोदन. ( मी मात्र स्वतःला मनाच्या आरशात नेहेमीच बघते, आणी सुधारणा करण्याचा प्रयत्न करते. )

मनुषी छान लिहीले आहेस. तुमच्या लुई सारखाच आमचा डॅनीही आहे. त्यालाही कोणी आले की आम्हालाही त्याला एका हॉल मध्ये बंद करावे लागते.