मन तुटले हजारवेळा

Submitted by यःकश्चित on 13 March, 2013 - 10:18

मन तुटले हजारवेळा
========================================

मन तुटले हजारवेळा कोणीच पाहिले नाही
त्या तुटक्या मनात आता प्रितीच राहिली नाही...||

त्या कुसुमाचा वसंतातला मी बहार पाहिला नाही
बहारीस त्या ग्रीष्मात आता पल्लवीच राहिली नाही...||

श्रावणातल्या सरीतुनी मी भिजून पाहिले नाही
प्रेमतुषारी शुष्क मनी या स्नेहाच राहिली नाही...||

आनंदाच्या अफाट गगनी मी हसून पाहिले नाही
आर्त खिन्न वदनावरती स्मिताच राहिली नाही...||

अर्पून अवघे प्रेम जगाला मी सुख पाहिले नाही
धन्यवाद देणाऱ्या हाती मायाच राहिली नाही...||

तारुण्याची अवीट गोडी मी चाखून पाहिली नाही
माझ्या निरस रसनेवरती मधुराच राहिली नाही...||

ती आली अन् गेली मी तिला अडवले नाही
नियतीच्या या खेळात आता नियतीच राहिली नाही...||

-यःकश्चित

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला इथल्या माझ्या एकंदर अनुभवावरून असे वाटते की येथे पक्षपातीपणा होतो आहे..
येथे नवकवींना दुर्लक्षिले जाते...
जर कविता वाईट असेल तर कृपया वाईट आहे असे सांगावे...
जेणेकरून पुढील प्रयत्नात सुधारणा केल्या जातील...
पण इथे.....
अधिक न बोलणे इष्ट..!!!

यकश्चित माणसा, आपण या काव्यास गझल का म्हणत आहात हे कृपया स्पष्ट कराल का?

आणि आपल्या काव्यावर प्रतिसाद न येणे ही सुद्धा येथील रसिकांची एक प्रतिक्रियाच असते.क्कॉय?

यकःश्चित

(अवांतर - मला वाटते तुमच्या आय डी मधील विसर्गाची जागा बदलली असावी)

तांत्रिकदृष्ट्या ही रचना गझल ठरत नाही आहे. पहिली द्विपदी जमीन निश्चीत करते, ती यात होत नाही आहे.

Happy

शेवटची द्विपदी आवडली. गझलतंत्र आत्मसात होण्यासाठी भटसाहेबांची बाराखडी कृपया वाचा. किंवा येथे मायबोलीवर एक लेख आहे, त्यातही आहे ते!

@ कावळा, बेफिकीर : मला गझलीबाबत जास्त माहिती नाही..आणि गझलतंत्रहि अवगत नाही ...
इथे मि सतीशजींच्या २-३ गझल्स वाचल्या होत्या..
आणि मग हा एक छोटासा प्रयत्न केला...
त्यांच्या कवितांसारखी मला माझ्या कवितेची रचना वाटली म्हणून मि त्याला गझल म्हणालो...
त्याबाबत संपादन केले आहे..
चू.भू.दे.घे.

@कावळा@: बघा तुमच्यामुळे आणि बेफिकीर्जींमुळे मला गझल काय असते हे कळले...आणि आता मि पुढील लेखनात प्रगती करू शकेन..
यासाठीच मि प्रतिसादाची अपेक्षा करतो...

@रिया, कावळा, बेफिकीर : प्रतिसादाबद्दल शतश: धन्यवाद ...आपले मार्गदर्शन असेच पाठीशी राहू द्या...

@बेफिकीर@:
मला नक्की माहित नाही..पण बहुतेक ते "यःकश्चित"च असावे..

कारण आपण हा शब्द उच्चारताना "य" वर जोर देतो.म्हणून विसर्ग य च्या मागे असावा असे मला वाटते..

आणि संस्कृत मध्येही "कश्चित" चा अर्थ " कुणीतरी" असं होतो...

मग त्यावरून यःकश्चित म्हणजे "किरकोळ किंवा नगण्य कुणीतरी" असे अनुमान मी केले...

बाकी आपण माझ्यापेक्षा जास्त जाणकार आहात... Happy