पण बोलणार नाही...

Submitted by अनिल आठलेकर on 13 March, 2013 - 04:33

मी पेटणार आहे
पण बोलणार नाही
मरणा तुझ्या भयाने
किंचाळणार नाही...

स्वप्ने जरी सुखाची
नशिबी कधी न आली
थोट्या पराभवाने
मी संपणार नाही...

काटेच पाहिले मी
वाटेवरी फुलांच्या
पण वाट ती तरीही
मी टाळणार नाही...

फासे कधीच नव्हते
वशही मला तरीही
आशेवरी उद्याच्या
मी थांबणार नाही...

माझ्याच माणसांनी
केले मला विचारी
जाणूनही कुणाला
मी सांगणार नाही...

भेटेनही पुन्हा मी
पण बोलणार नाही
हा गाव वेदनांचा
मी सोडणार नाही...

__अनिल आठलेकर.. पुणे
१० मार्च २०१३, १.४२ AM

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान. Happy

काटेच पाहिले मी
वाटेवरी फुलांच्या
पण वाट ती तरीही
मी टाळणार नाही...

वाह !
आवडली कविता.

छान

काटेच पाहिले मी
वाटेवरी फुलांच्या
पण वाट ती तरीही
मी टाळणार नाही...

ऐवजी
फुलांच्या वाटेवरी ..आले असते तर ई ची लय साधते असे वाटते.असो .ले.शु.