तोचि साधू...।।

Submitted by कमलाकर देसले on 12 March, 2013 - 11:16

तोचि साधू...।।
Tuesday March 12, 2013
(महाराष्ट्र टाइम्स )

आध्यात्मिकतेची कसोटी काय? सर्वसाधारणपणे पटकन ओळखायचे असेल, तर गळ्यात तुळशीची अथवा तत्सम माळ, कपाळावर चंदनाचा टिळा, अष्टगंध किंवा बुका असला की तो आध्यात्मिक माणूस. हे बरोबर; पण हेच बरोबरही नाही.

दिखाऊ अध्यात्मातली धोकेबाजी तुकोबारायांना जाणवली असावी; म्हणून त्यांनी ‘फक्त’ दिसण्याचा अध्यात्माशी संबंध नसतो हे समाजाला कळावं, समाज शहाणा व्हावा, यासाठी धर्माचे पालन lकरणे पाखंड खंडन।। म्हणत ‘फक्त’ दिखाऊ लोकांवर वरी भगवा झाला नामेl अंतरी वश केला कामेl त्यासी म्हणू नये साधूl जगी विटंबना बाधूll असा स्पष्ट शेरा मारला. तर अध्यात्माचा संबंध अंतरंगाशी आहे हे सांगतांना मनाचा मवाळl वाचेचा रसाळl त्याच्या गळा माळl असो नसोll अशा प्रकारे दिखाऊ प्रवृत्ती व खरी आध्यात्मिकता यातला फरक आपल्या अभंगांतून समाजाला सांगितला. तरीही बहिरंग लक्षणे असणारा धार्मिक किंवा आध्यात्मिक साधक दांभिकच असेल, असेही नाही. पण अशी बहिरंग लक्षणे नसणारी आध्यात्मिक माणसेही आपल्या अवती-भवती असतात. ते आपल्या देहिक, मानसिक, आर्थिक परिस्थितीला व स्वाभाविक गुणांना आध्यात्मिक साधनेचे अधिष्ठान देतात.

आपल्या प्रत्येक वाढदिवसाला न चुकता कुठल्याही जातीधर्माच्या माणसाला रक्तदान करणारा ‘तो’, फक्त जिद्दीनेच या संधिवाताशी दोन हात करता येतील हे कळल्यावर तब्बल १८ ते २० वर्षं एकाच जागी बसून संधिवाताच्या आजाराची आध्यात्मिक साधना ओळखून प्रचंड वाचन करणारी आणि सुकलेल्या लाकडासारख्या वरवर कोरड्या दिसणाऱ्या प्रेमळ हातांनी लिहिलेल्या पत्रातून प्रेम, जिव्हाळा आणि गारवा माझ्यासारख्या अनेकांना देणारी ‘ती’, दहशतवादाने प्रभावित जम्मूखोऱ्यातील मुला-मुलींसाठी शाळा चालवणारी ‘ती’, पायाखाली स्वत:ची जमीन नाही, डोक्यावर हक्काचे छप्पर नाही, कसायला शेती नाही, पोटी चार लेकी एक मुलगा असणाऱ्या; पण घरात मिठा-पिठाच्या डब्यात मात्र ज्ञानेश्वरी, गाथा, साधक-संजीवनीसारखे ग्रंथ सांभाळणारा आणि त्यांचे अखंड वाचन करणारा, बाहेरून फाटका आणि आतून भर्जरी असणारा ‘तो’, ‘आय अॅम कलेक्टर’ असा स्वत:चा मनस्वी परिचय देत फक्त माणसे जोडणारा, माझी कविता फोनवर ऐकवून लोकांना फक्त आणि फक्त आनंद देणारा ‘तो’, चांगुलपणा हेच ज्याच्या लौकिक दु:खाचे कारण आहे, हे कळूनही पीडित मुलींशी लग्न करून निराशा पदरी घेणारा व चांगुलपणाचे डंख वारंवार अंगावर मारून घेणारा ‘तो’ किंवा नित्यनेमाने याचकाला, गायीला भाकरी, मुंग्यांना साखर, पक्ष्यांना जेवण, तान्हेल्याला पाणी पाजणारी ‘ती’ माऊली... अशी किती तरी माणसे माझी समज सुंदर आणि समृद्ध करतात .

या माणसांमधील ‘तो’, ‘ती’, ‘ते’ हे आपल्यासारखेच सामान्य आहेत. त्यांना जटा नाहीत. वरून ते मुळीच आध्यात्मिक दिसत नाहीत; पण तोचि साधू ओळखावाll हे तुकोबांनी नक्की अशाच माणसांच्या बाबतीत म्हटले असावे. याची मला खात्री आहे.
कमलाकर देसले

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर ओळख करुन दिलीत "साधू/सज्जन" माणसांची.....

हा संपूर्ण लेखाचा थोडासा भाग आहे का ??