होळी रे होळी !

Submitted by सचिन पगारे on 9 March, 2013 - 06:39

होळी रे होळी !

होळीच्या चार दिवस आधी पासूनच आमच्या चाळीत होळीची तयारी सुरु झाली.चाळीत शिरताना कुठून फुगा येऊन टाळक्यात बसेल याची शाश्वतीच नव्हती.जीव मुठीत धरून चाळीत शिरावे लागे.होळी हा सण आम्ही चाळकरी मोठ्या उत्साहात साजरा करत असू.आमच्या चाळी समोर एक छोटेसे पटांगण होते तेथे होळीचा खड्डा खणात असत.

शेजारच्या डोंगरावर असलेल्या रानात जाऊन पोर लाकडे तोडून आणत.मात्र ह्या वेळेस लाकड तोडायला जायचे नाही असा सर्वांनी संकल्प केला होता.कारण मागच्या होळीला बंडू नाना लाकड तोडायला झाडावर चढला होता इतर मुले हि लाकडे तोडत होती.तेवढ्यात 'मेलो मेलो, तात्या मला वाचव'अशा किंकाळ्या आम्हाला ऐकायला आल्या पाहतो तर काय बंडूनाना सैरावैरा पळत होता व मधमाश्या त्याचा पाठलाग करत होत्या.बंडू नानाला वाचवायला त्याचा जिवलग मित्र तात्या पुढे धावला तर एक मधमाशी त्याच्याही नाकाला चावली तोही बंडू नाना सारखा बोंबलत पळू लागला. ते भयानक दृश्य पाहून आम्ही जी धूम ठोकली ते चाळीच्या कट्ट्यावरच येऊन थांबलो.बंडू नाना आणि तात्या शेवटी घाण पाण्याच्या नाल्यात शिरले तेव्हा कुठे त्यांचा जीव वाचला. नंतर आम्ही चाळीच्या कट्ट्यावर बसून दोघांची आतुरतेने वाट पाहू लागलो.बंडू नाना व तात्या दोघेही सुजून परतले.आमीर खान सारखा सुंदर दिसणारा बंडू नाना आता ओमपुरी सारखा दिसू लागला. बंडू नाना होळीला जो सुजला तो शिवजयंतीला बरा झाला.

गेल्या वर्षीच्या घटनेची पुनरावृत्ती नको म्हणून ह्या वेळी लाकड विकत आणण्याचे ठरवले.आमच्या चाळीत चाळीस खोल्या होत्या प्रत्येक खोलीतून वीस रुपये वर्गणी काढली. काहींनी दिली तर काहींनी नाही आमच्या चाळीतली मुले फार वात्रट होती परांजपेनी वर्गणी दिली नाही म्हणून आपल्या वरांड्यात ज्या आराम खुर्ची वर बसून परांजपे पेपर वाचत बसत तीच खुर्ची पोरांनी होळीत टाकून दिली.

होळी पेटलेली असताना एक अजब दृश्य दिसले पहिल्या मजल्यावरचे पाटिल आजोबा जोरजोरात पळत होते. ते आपला वात्रट नातू पिंटूच्या मागे लागले होते पिंट्या पळत पळत आला आणि त्याने आजोबांची सागवानी काठी होळीत टाकून दिली.ते पाहून पाटिल आजोबा मटकन खाली बसले व पिंट्याला शिव्या देऊ लागले .होळी पेटल्यावर मुलांनी एकमेकावर गुलाल टाकायला सुरवात केली होती. पाटिल आजोबा तसेच डोक्याला हात लाऊन बसले होते. त्यांच्या पाठीत कुणी तरी रंगीत पाण्याने भरलेला फुगा मारला पाटिल आजोबा रागाने उठले तोपर्यंत पोरांनी त्यांना रंगाने रंगवून टाकले होते. नेहमी पांढराशुभ्र लेंगा व सदरा घालणारे पाटिल आजोबा पंचरंगी पोपटासारखे दिसू लागले. मुलांच्या नावाने शिव्या घालत ते त्यांच्या घरी गेले तेव्हा पाटिल आजी त्यांना घरात घेईना आजी म्हणाली "कोण तुम्ही?कोण पाहिजे?हे घरी नाहीत ते आल्यावर या."शेवटी शेजारच्या मधुकाकानी सागीतल्यावर आजीची खात्री पटली कि हेच आपले यजमान.अशा प्रकारे होळी एकदाची संपली.

आता दुसरा दिवस धुळवडीचा धुळवडीच्या दिवशी तर घराबाहेर डोकावण्याची पंचायत पोर इतकी वात्रट कि म्हातारा, म्हातारी, ओळ्खी अनोळ्की कुणालाही रंगवत बदाबद फुगे मारत.मी शाकाहारी ब्राह्मण, मागच्या होळीला कोणीतरी माझ्या डोक्यावर अंडे मारले होते त्या अंड्याच्या वासामुळे मला चार दिवस उलट्या होत होत्या त्या मुळे मी धुळवडीचा धसकाच घेतला होता. ह्यावेळी होळी खेळायला जायचेच नाही असे मी ठरवले होते. एवढ्यात आमच्या दाराची कडी वाजली आमचे चाळकरी मित्र मला रंगवायला आले होते ते दार वाजवू लागले मी काही केल्या दार खोलेना बाहेर नुसता गोंगाट चालला होता मी कानात मस्तपैकी कापसाचे बोळे घातले आणि आरामात पलंगावर पडून राहिलो. तासाभराने कानातले बोळे काढले आणि बाहेरचा कानोसा घेतला बाहेर सामसूम होती. म्हणून मी दार उघडून हळूच बाहेरपाहिले तर मला आश्चर्याचा धक्काच बसला. बाहेर माझे तीर्थरूप उभे होते.

आत आल्या आल्या त्यांनी माझ्या कानाखाली आवाज काढला 'बंड्या,नालायका, दार उघडायला काय झाले.अर्धा तास झालाय दार वाजवतोय ह्या पोरांनी रंग चोळून चोळून माझा पंचरंगी पोपट बनवून टाकलाय, अर्धा तास झालाय फुग्यांचा मार खातोय फुगे लागून लागून अंग दुखायला लागलेय आणि नालायका दार लाऊन काय बसलायस. "अरे देवा" गावाहून यायला मला हाच मुहूर्त भेटला होता का रे!वडिलांचा अवतार बघून माझी पाचावर धारण बसली काहीतरी विचारायचे म्हणून मी विचारले "अण्णा तब्येत कशी आहे तुमची?" वडील उखडले "गावाहून येईपर्यंत तर ठीक होती आता काही सांगता येत नाही, 'साल्या चाळ वाल्यांनी माझ्या असहायतेचा फायदा घेत चांगला अर्धा तास पाण्याचा मारा लावला होता.

मी गप्प बसलो नंतर काही तरी विचारायचे म्हणून विचारले "अण्णा, हि लाल टोपी तुम्ही कधी घेतलीत तुम्ही तर नेहमी पांढरी शुभ्र टोपी घालता" ह्यावर अण्णा भडकले "अरे गाढवा हि पांढरीच टोपी आहे तुझ्या नालायक चाळ वाल्यांनी रंगवून रंगवून तिला लाल केलेय." आता मात्र मी पुरता गप्पा बसलो. वडिल बडबड करतच आंघोळीला गेले.मि रागाने मित्रांना व चाळ करी यांना शिव्या देत बाहेर पडलो.

तोच माझ्यावर आभाळातून गारा पडाव्या तसा फुग्यांचा वर्षाव झाला. ज्याची मुख्य भीती होती तेही झाले चार पाच अंडीही अंगावर येउन फुटली एवढे कमी म्हणून कि काय मुलांनी एक पाण्याचं डबक तयार केले होते त्यात मला टाकले आता मी हि होळीत पुरताच रंगून गेलो होतो आणि आनंदाने इतरांना रंगवू लागलो आणि ओरडू लागलो "होळी सण मोठा नाही आनंदाला तोटा".

समाप्त

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बंडू नाना होळीला जो सुजला तो शिवजयंतीला बरा झाला.<<<

नेहमी पांढराशुभ्र लेंगा व सदरा घालणारे पाटिल आजोबा पंचरंगी पोपटासारखे दिसू लागले. मुलांच्या नावाने शिव्या घालत ते त्यांच्या घरी गेले तेव्हा पाटिल आजी त्यांना घरात घेईना आजी म्हणाली "कोण तुम्ही?कोण पाहिजे?हे घरी नाहीत ते आल्यावर या."<<<

Rofl

होळीला सुजला तो शिवजयंतीला बरा झाला.:अओ: तारखेने की तिथीने असलेल्या शिवजयंतीला?:फिदी:

एक वर्ष लागले? बाबौ!

तुम्हाला विनोद निर्मीती जमतेय, पण जरा जातियता टाळा.:फिदी:

एक बंडू अन एक नाना असावेत.
*
बाकीचे दोन हिष्टॉरिकल लेख वाचल्यानंतर होळीरे होळी म्हणून अंश्रनि ष्टाईल लाकडे जाळू नका लेख असेल अन खाली टिपिकल धुळवड सुरू असेल असे वाटले.
*
>>तुम्हाला विनोद निर्मीती जमतेय, पण जरा जातियता टाळा.<<
या लेखात तरी मला जातीयता दिसली नाही. पण एकादा शब्द सुटला असेल वाचताना..