आतिथ्य

Submitted by मनोमयी on 4 March, 2013 - 23:47

(सत्यकथा) १९६० चा काळ.
शांता, मंदा व बेबी तिन्ही बहिणींना सावंतवाडीला जायला थोडा ऊशीरच झाला होता. वालावल ते सावंतवाडी जवळपास तिस- पस्तीस कि.मी. अंतर. धाकट्या बेबीला सावंतवाडी बॅंकेतून ईंटरव्ह्युचा कॉल आल्यामुळे तिला सावंतवाडीला जाणे भागच होते. बेबी तशी म्हणावी तेवढी मोठी झाली नव्हती. जेमतेम सतराव संपलेलं. त्यामुळे मुलीला सावंतवाडी सारख्या अनोळखी शहरात एकटे पाठवणे तिच्या आईला योग्य वाटेना. तिने तिच्या सोबतीला शांता व मंदा या दोन्ही मोठ्या बहिणींना पाठवण्याचा निर्णय घेतला होता. घरची परिस्थीती जेमतेम, त्यातून ११ मुलांचा खटाटोप, त्यामुळे प्रत्येक मुलाला योग्य रितीने मार्गस्थ करणे गरजेचे होते. त्याकाळी ‘बॅंकेत नोकरी मिळणं’ ही असामान्य गोष्ट. बेबीला बॅंकेत नोकरी मिळणार हे ऎकुनच घरच्यांच्या अंगावर मुठभर मांस चढलेल.
पहाटे पासूनच तिघीही बहीणी सावंतवाडीस जाण्याच्या तयारीला लागलेल्या. मुलींची जात सावंतवाडी एके सावंतवाडी असे त्याकाळी चालणारे नव्हते. आईच्या हाताखालची कामे, ईतर भावंडांची पेज पाण्याची व्यवस्था करेपर्यंत पावणे सात वाजून गेलेले. त्यातून रात्रीपासूनच सुरु असलेली पावसाची रिपरिप अजुनही थांबलेली नव्हती. तिघांमद्ध्ये दोनच छत्र्या. बेबीचा ईंटरव्ह्यु असल्यामुळे तिची साडी व्यवस्थीत रहावी म्हणून एक छत्री तिला दिलेली व एका छत्रीत शांता व मंदा, अश्यारितीने तिघीही बहिणी आपापल्या साड्या सावरत बसस्टॉपकडे निघाल्या. त्याकाळी रस्ते, विज अश्या सुविधा नव्हत्या. वालावल ते कुडाळ तांबड्याबुंद मातीत बुडालेला रस्ता. त्यातून गावातून कुडाळला जाणारी एकुलती एक अशी सकाळी ७ची एस.टी. ती जर चुकली तर कुडाळ पायीच गाठावे लागे. तिघीही बसस्टॉप वर पोहोचल्या खऱ्या पण अजुनही एस.टी. ची जागमाग नव्हती. गावची एकुलती एक एस.टी. असल्यामुळे अगदी मैलभर दूर अंतरावरुनही तिची घरघर कानांना स्पष्ट ऎकु येई.
१५-२० मिनीटे रिपरिपणाऱ्या पाऊसात एस.टी. ची वाट बघत थांबल्यामुळे तिघीही जरा कंटाळल्याच होत्या. त्यातून बेबीला ईंटरव्ह्यूचे टेंशन.
"बाई, आज एस.टी. चा काय खरा दिसणा नाय. काय झाला काय? फटकीचा दुखणा तिका", बेबीने आपला रोष मोठ्याबहिणी समोर व्यक्त केला. शांताला घरात सर्व प्रेमाने ‘बाई’ म्हणत.
"येतली गो, तू काय्येक काळजी करु नको", शांता तिला धीर देत म्हणाली.
"एक तर आज बेबीचो ईंटरव्ह्यू, त्याच्यात एस.टी. लेट आणि या पावसाकसुदा आजच सवड गावली? दुष्काळात तेरावो महिनो. आमका जर आज वाडीक पोचाक ऊशीर जायत तर बेबल्याच्या नोकरीचा काय खरा नाय", मंदाने आपली चिंता व्यक्त केली.
"मिळतली नोकरी, काय्येक काळजी करु नकास. बेबी सायबांनी ईचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तरा दी मगे झाला", शांताने पुन्हा दिलासा दिला.
"ईंटरव्ह्यूक कसले प्रश्न ईचारतीत देवाक ठावक. साहेब कडक असले तर मगे झालाच", बेबीला ईंटरव्ह्यूचे वेध लागले होते.
"आज काय गाडीयेचा खरा दिसणा नाय. चलत गेललो तर एवढ्यात जकातीर पोचलो असतो, पण या पावसामुळे ताय काय शक्य जावक नाय", मंदा आपली साडी पायातून वर सावरत म्हणाली.
"होय गो होय!, पावस नसतो तर चलत जावक गावणार असता", बेबीने मंदाच्या विचारांशी संमत्ती दर्शवीली. तेवढ्यात त्यांना सर्वात धाकटा भाऊ सुधीर आपली टायरांत गवत भरलेली सायकल पायांनी हाकवत येताना दिसला. सुधीरला सायकल चालवण्याची प्रचंड आवड होती, पण सायकलच्या दोन्ही चाकांच्या ट्युबस पंक्चर झालेल्या होत्या. त्याकाळी एका ट्युबची किंमत सव्वा दोन रुपये होती. एवढी मोठी रक्कम कशी ऊभी करणार? या प्रश्नाचे समाधान त्याने शक्कल लढवून टायरमद्धे भाताच्या गवताच्या वळकट्या भरुन केले होते. तरीही सायकल चालवणे एवढे सोपे नव्हते.
"सुदलो मेलो, पावसात खय येता?", मंदा त्याच्याकडे पाहत म्हणाली.
"काय रे काय झाला? ईकडे कशाक ईलस?" शांताने सुधीरला विचारले.
"तुमका बघलय लांबसुन तुमची एस.टी काय येऊक नाय. तगरार फुला होती म्हणान फुला देवक ईलय बेबीक", सुधीर आपल्या खिशातुन तगराची दोन फुल काढत म्हणाला.
बेबीला फुल अतिप्रीय. आपल्या भरगच्च केसांच्या वेणीत तिने त्यातील एक टप्पोरे फुल खोचले व दुसऱ्याचा तीने दिर्घ सुवास घेतला. त्यामुळे तिला पुन्हा ताजेतवाने झाल्यासारखे वाटले.
"सुधीरा ह्या मात्र बरा केल हा!", ती खुशीतच म्हणाली.
"चल आता घराक जा, जास्ती पावसात भीजा नको", शांता काळजीने म्हणाली.
"तुमची गाडी येयसर थांबतय", सुधीर तिथेच घुटमळत म्हणाला.
"नको तू जा, गाडी येतली आता. तातांची दुकानात जावची वेळ झाली. आई वाट बघीत आसतली", मंदाने सुधीरला घरी पिटाळले. तो जाताच दूरवर गाडीची घरघर जाणवली व तिघींची कळी खुलली.
सावंतवाडीला पोहोचेपर्यंत साडे दहा वाजून गेले होते. बेबीचा ईंटरव्ह्यू होऊन तिघींनाही बॅंकेबाहेर पडेपर्यंत दुपारचे साडेबारा झाले. पाऊस अजुनही थांबला नव्हता. एकाएकी आकाश भरगच्च भरुन आले. थंड-थंड वारे अचानक वाहू लागले. बसस्टॅंडवर जाऊन बघताच त्यांना गाडी निघुन गेल्याचे कळले. निसर्गाचे रुप क्षणाक्षणाला बदलत होते. अधिकाधीक ऊग्र होत होते. मद्धेच एखादी विज चमकुन जाई व मागुन कानठळ्या बसवणारा ढगांचा गडगडाट.
"आज काय खरा दिसणा नाय, वादळ आसा की काय?", बेबीने कुतुहल व्यक्त केले.
"वादळ झाला तर आपण हयच अडकतलो. तेंव्हा गाडीक न थांबलेलाच बरा. आपण चलतच जावया", शांता म्हणाली व तिघीही परतीच्या रस्त्याला लागल्या.
दहाएक कि.मी. चालुन झालं असेल नसेल, वाऱ्याने आपला वेग कमालीचा वाढवलेला. सोसाट्याचा घोंगावणाऱ्या वाऱ्याने आतंक सुरु केला होता. रस्त्यावरचे वृक्ष ऊन्मळुन कोसळत होते. विजेच्या प्रचंड गडगडाटाशी फांद्या तुटण्याचा कडकडाट प्रतिस्पर्धा करत होता. निसर्गाने आज आकांतताडव करण्याचे योजले होते. वारा जणु पृथ्वीच्या ऊरावर थयथयाट करत होता. रस्त्यावर पडलेली झाडे ओलांडुन चालताना तिघींनाही त्रास होत होता. एखादा वृक्ष किंवा विज अंगावर कोसळण्याची भीती तीघींनाही वाटत होती. बरं कुठे विसावा घ्यायच म्हटल तर आसपास कुणाचेही घर दिसेना. तिघीही मनातुन घाबरुन गेल्या होत्या. थोडे पुढे जाताच रस्त्यापासुन दूर एक मांगर त्यांच्या दृष्टीस पडला व त्यांच्या जीवात जीव आला. त्यांनी विसाव्यासाठी ते मांगर वजा घर गाठायचे ठरवले.
त्या घराभोवतालची बरीचशी झाडे मोडुन पडली होती. माडांची तर दयनीय अवस्था झाली होती. सर्वत्र हिरव्यागार झावळ्या विखुरल्या होत्या. एका माडामुळे तर अक्षरश: अर्धे घर तुटले होते. दारातील छपरासाठी घातलेले पत्रे दूर कुठेतरी भरकटल्यासारखे जाऊन पडले होते.
दुपारचे दोन- अडीज वाजुन गेलेले. अश्या वेळी परक्या घरात जाण त्यांना योग्य वाटेना, पण वादळाने घातलेले थैमान बघता त्यांना तिथे थांबण्याखेरीज अन्य पर्याय नव्हता.
बेबीने धीरकरुन दाराची कडी ठोठावली. एका वृद्ध बाईने दार ऊघडले.
"कोण गो तुमी?", तिने प्रश्नार्थक कटाक्ष टाकला.
"आजी आम्ही वालावलीची, गाडी चुकली म्हणान चलत जाय होतो. वादळामुळे पुढे जावक गावणा नाय. हय थोडो वेळ रवला तर चलात?", मंदाने एका दमात धीर करुन विचारले.
"येवा आत येवा", म्हातारीने त्यांना आत घेतले.
"या वादळान नुसतो ईस्कोट मांडलो आसा", म्हातारी चटई अंथरत म्हणाली. बाजुलाच भिंतीला टेकून एक माणुस डोक धरुन बसला होता. त्याने या तिघींना पाहून कोणतीही प्रतीक्रीया दिली नाही. त्या गुपचुप एका कोनात बसल्या. त्या घरात एक प्रकारची विषण्णता तिघींनाही जाणवत होती. ईतक्यात म्हातारी आतून पाणी घेऊन आली. पाणी पिताना त्यांना स्वयंपाकखोलीतून कुण्या स्त्रीच्या रडण्याचा हुंदका ऎकु आला.
"आजी काय झाला?", शांताने आपुलकीने विचारले.
"काय नाय बाय, तू पाणी पी", म्हातारी आवंढा गिळत म्हणाली. तिघींचेही पाणी पिऊन होताच म्हातारी तांब्या-पेला घेऊन आत गेली. थोडावेळ ती बाहेर आलीच नाही. शेजारी भिंतीला टेकुन बसलेला माणुस कुठेतरी शुन्यात हरवल्याचे भासले. एक प्रकारची भिषणता त्या घरात जाणवत होती.
"बाई, माका हय काय चांगला वाटणा नाय. आपण जावया", बेबी शांताच्या कानात कुजबुजली.
"खय जातलो आता?, वादळ थांबासर हयच थांबुक होया", मंदा कुजबुजत डाफरली.
"पण काय झाला काय ह्यांचा, कायच कळणा नाय", मंदा पुन्हा पुटपुटली.
तेवढ्यात म्हातारी बाहेर आली.
"बाये, तुमका भुक लागली असतली म्हणान थोडी पेज टाकलय चुलीर", म्हातारी त्यांच्या समोर खांबाला टेकून बसत म्हणाली.
"आजी, कशाक एवढा करत? आम्ही जातो आपली", शांता म्हणाली.
"रवा गो, या वादळात खय जातालास?, वायचशी पेज जेवा मग जावा", म्हातारी आग्रहाने म्हणाली. नंतर कुणीही काहीच बोलत नव्हते. खोलीत एक बोचरी शांतता पसरल्याचे जाणवले. बाहेर वादळाचा ऊग्र तांडव सुरु होता तर आत प्रत्येकीच्या मनात विचारांचा तांडव सुरु होता. ईतक्यात तो भिंतीला टेकुन बसलेला ईसम ऊठून आत गेला. न रहाऊन मंदाने म्हातारीला विचारले. "आजी हे कोण?"
“माझो झिल आसा, सुन आसा आत. पेजेक आदण ईला काय बघतय", म्हणत म्हातारी विषय मद्ध्येच संपवत ऊठून आत गेली.
तिघींनाही काहीतरी चुकल्या चुकल्या सारखे जाणवत होते, पण आता तीथे शांत बसण्याखेरीज त्यांच्याकडे पर्याय नव्हता. म्हातारीने तिघींनाही पेज आणून दिली व सोबत तोंडाला खारवलेली आंबाडीही दिली. सकाळपासुन ऊपाशी असल्यामुळे पेज पिऊन त्यांना थोडी हुशारी वाटु लागली होती.
"आजी हात खय धुवचो?", बेबीने विचारले.
"मागच्या पडवेत धु... धुवा", आजी अडखळत म्हणाली. त्या आपापले भांडे घेऊन आत गेल्या.
स्वयंपाक खोलीत म्हातारीची सुनही तिच्या मुलाप्रमाणेच शुन्यात हरवून बसल्याचे दिसले. तिचा संपूर्ण चेहरा सुजला होता. डोळे रक्तावलेले दिसत होते. तिला अंगावरच्या वस्त्राचीही पर्वा ऊरली नव्हती. ते पाहून काहीतरी भयानक, अघटीत घडल्याचे तिघींनाही जाणवले, पण नक्की काय? याचाच ऊलगडा होत नव्हता. त्या मागच्या पडवीत तोंड व भांडी धुण्यासाठी गेल्या. तेथील एका फुटक्या बालदीत साचलेले पाघोळ्याचे पाणी घेऊन शांता व मंदा भांडी धुवु लागल्या. बेबी तेथीलच कठड्याला टेकून ऊभी होत कुजबुजली, "नक्की कायतरी झालेला आसा".
"शु....!!! गप रव, आता काय बोला नको", मंदाने तिला गप्प केले.
बेबी जिथे ऊभी होती तिथेच शेजारी माडाच्या चुडतांचा ढीग केलेला होता.
" हय एवढी चुडता कित्या टाकलीत?" बेबीने वाकुन चुडत न्याहाळत म्हटले.
एका चुडताखाली तीला माणसाचा हात असल्याचे दिसले. तिच्या सर्वांगावर काटा ऊभा राहीला. भितीने तिने तोंडावर हात घेतला व डोळे फाडुन ती न्याहाळु लागली.
"काय गो बेबी काय झाला?", मंदाने सहज विचारले.
"मंदा माका हय काय खरा दिसणा नाय, आपण हयसुन आधी जावया, ह्या काय तरी भयानक आसा", बेबी त्या चुडतांकडे ईशारा करत म्हणाली. ते पाहून मंदाही काहीक्षण सुन्न झाली.
"बाई लवकर ये, ह्या बघ काय?!!", तिने शांताला बोलावले.
धीर करुन मंदाने वरचे चुडत बाजुला सारले. त्या खाली लहान लहान मुलांची तीन प्रेते रचुन ठेवल्याचे आढळले. कुणाला काय बोलावे तेच सुचेना. मंदाने ते चुडत होते तसे केले. शांताने पेजेची भांडी नेऊन स्वयंपाकखोलीत ठेवली व त्या बाहेर आल्या.
बाहेर वादळाचा जोर थोडा ओसरल्याचे जाणवले. त्यांनी तिथुन जाण्याचा निर्णय घेतला.
"बायेनु, चललास?", मागुन म्हातारीने विचारले.
"होय आजी जातो आता", मंदा धीर करत म्हणाली.
"निट जावा हा, या वादळाचा काय खरा नाय", हे सांगताना म्हातारीच्या डोळ्यात पाणी तरळुन गेले.
घरी परतताना तिघींच्याही डोळ्यात पाणी होते.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भयानकच आहे, पण कथा नीट कळली नाही. सत्यघटना म्हणावी तर पुढे काय झाले याचा मागमुस लागत नाहीये. त्या घरात लहान मुले गेली ती एकदम कशी?

लेखिकेने सविस्तर सांगीतले तर बरे होईल, उत्सुकता आहे.

.

सत्यकथा आहे ? बापरे !
टुनटुन : बहुतेक वादळात सापडुन त्यांचं घर जे मधोमध मोडलं होतं त्यात ती लहान मुलं गेली असावीत. Sad

मनोमयी, अतिशय परिणामकारक, दृश्यमान होईल असं लिहिलयस. माझ्यातरी डोळ्यांसमोर ते सगळं उभं राहिलं...
इतक्या सुंदर गोष्टीचा शेवट मात्रं किंचित धावरा झालाय असं मला वाटतय. तसं म्हटलं तर वादळात अपघातानं मुलं गेलीयेत असा निष्कर्ष निघतोय. इतक्या भयंकर आघातातही त्या गरीब कुटुंबाची माणुसकी संपली नाहीये. वादळात आसर्‍याला आलेल्या तीन मुलींची जमेल तशी सरबराई केलीये. हा संदेश, भाव मनात उमटतो
पण.... तुझ्या शैलीत हे अधिक सुंदर रित्या व्यक्तं झालं असतं.

पण गोष्टं सुरेखच...

दाद तुम्ही अगदी बरोबर बोललात... ही एक सत्य घटना असल्यामुळे जेवढ घडल तेवढच मी लेखणीतून ऊतरवीण्याचा प्रयत्न केला आहे.
खर तर मलाही निटसं माहित नाही त्या मुलांबरोबर नक्की काय झाल असेल ते... पण आतिथ्याचा ऊत्कृष्ठ नमुना म्हणायला काहीच हरकत नाही... ही एक अपूर्ण कथाच म्हणावी लागेल...

ज्यांच्या बरोबर हा प्रसंग घडला त्यांनी तिथून लगेच काढता पाय घेणच पसंत केल...
कदाचीत त्या म्हातारीला त्या तिघींच्या रुपात आपली नातवंडच आसऱ्याला आल्याच वाटलं असेल...

बापरे नक्की काय झालं होतं तिथे? त्या बाईमध्ये कुणी संचारल होतं का? अन त्या वेडात तिने तिच्या मुलांना मारलं होतं?

छान लिहिलय
बाय / बाई तर गोवा साइडला आपल्या बहिणीस म्हणतात आणि घरातल्या मुलींना सुद्धा बाय म्हणतात जसे आपण छोटी असली तरी कसे ताई म्हणू तसे.

ह्यातील त्या ३ लहानग्यांची प्रेते म्हणजे वादळात मृत्युमुखी पडलेले त्या आज्जीची नातवंडेच असणार न ! म्हणून तिची सुन व मुलगा एवढे दुःखी चेहऱ्याने शून्यवत होवून बसलेत. अश्याही परिस्थितीत ह्या ३ बहिणींना आसरा देवून समयसूचकता दाखवत पेज देणे म्हणजे कोकणातल्या प्रेमळ माणुसकिचा परमोच्च क्षण... खुप भिडला हां प्रसंग मनाला.

एवढ्या वादळी पावसात अंतिम क्रिया करण्यासाठी / चितेसाठी लाकडे मिळणे दुरापस्त त्यात जर काही सोय झालीच तरी ती चिता नीट पेटेल का ह्याची शाश्वती नाही म्हणून त्यांना असे माडाच्या चुडतांचा ढीग करून अग्नि देण्याची पर्यायी व्यवस्था त्या बिचाऱ्या कुटुंबाने केली असणार.

बापरे!!

म्हातारी खरंच धीराची !! __/\__