अचारी मुर्ग / अचारी चिकन

Submitted by डॅफोडिल्स on 4 March, 2013 - 10:37
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मज्जा वाटतेय ना नाव वाचून ? पण अचारी म्हणजे कुक नाही.. अगदी मराठीत सांगायचे तर चिकन लोणचे मसाला. मूळचा उत्तर भारतीय प्रकार आहे हा.
नॉर्थकडे कश्याचीही लोणची बनवतात आणि तिही मोहरीच्या तेलात.
पण आपल्याला जर राई के तेल की खुशबु पसंद येत नसेल तर तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही तेल जSSSSरा सढळ हाताने वापरा. Happy

achari moorg (800x608).jpg

पाउण किलो चिकन मध्यम आकाराचे तुकडे करून
३ टेबल्स्पून तेल मोहरीचे किंवा कोणतेही जे आवडेल ते खाद्य तेल. (आपल्याला शक्य होईल व आवडेल तसे आणि तितके जास्त तेल)
जिरे, पिवळी मोहरी, कलोन्जी, बडीशेप आणि मेथ्या प्रत्येकी १ टी स्पून.
(हल्ली हे सर्व साहित्य मिसळलेले पंचफोरण ह्या नावाने मिळते. ते पंचफोरण असेल तर एक मोठा चमचा भरून)
३-४ हिरव्या मिरच्या
२ टेबल्स्पून आलं लसूण पेस्ट
१ टि स्पून हळद, १ टेबल्स्पून लाल तिखट, चवीप्रमाणे मिठ
१/२ कप ताजे घट्ट दही
लिंबाचा रस एक टेबल्स्पून
२ मध्यम आकाराचे कांदे बारिक चिरून
२ मध्यम आकाराचे टोमॅटो
मुठभर कोथिंबिर

क्रमवार पाककृती: 

चिकन चे तुकडे स्वच्छ धुउन त्याला चवीप्रमाणे मिठ, हळद, लाल तिखट आणि आलं लसूण पेस्ट लाउन घ्यावी. मग एक चमचा तेल आणि अर्धा कप घट्ट दही टाकून सगळ्या चिकनच्या तुकड्याना व्यवस्थीत लाउन चिकन झाकून ठेवावे.

मग एका जाड बुडाच्या पॅन मध्ये थोडेसे तेल टाकून त्यावर बारीक कापलेला कांदा गुलाबीसर होई पर्यंत परतुन घावा. मग आच बंद करून कांदा थोडा गार करायला वेगळ्या डिश मध्ये काढावा.

कांदा आणि टोमॅटो मिक्सर मध्ये बारिक वाटून दोन्हीची एकत्र प्युरी करुन घ्यावी.

मग पॅन मध्ये कांदा टोमॅटो ची ही गुलाबीसर केशरी प्युरी टाकुन मध्यम आचेवर परतुन घावी. मिश्रण शिजत आले की रंग बदलू लागतो. आता त्यावर मॅरीनेट केलेले चिकन चे तुकडे टाकून परतून घावे. चिकन ला दही लावल्याने परतत असताना थोडे तेल सुटू लागेल. मग एक कपभर किंवा आपल्याला हवे तसे थोडे अधिक पाणी घालावे. चिकन शिजत आल्यावर दुसरीकडे फोडणीच्या पळीत दोन चमचे तेल टाकून त्यात फोडाणीचे सामान.. पंचफोरण जरासा हिंग आणि उभ्या चिर दिलेल्या अक्ख्या हिरव्या मिरच्या घालून चुरचुरीत फोडणी करावी.
चिकनवर ही फोडणी घालून जरा स्वाद मुरण्यासाठी एक वाफ काढावी. आच बंद करावी
जेव्हढे आंबट आवडत असेल त्याप्रमाणे लिंबाचा रस घालावा. गरमागरम रोटी/ फुलक्यांसोबत खायला आचारी मूर्ग तयार !!

वाढणी/प्रमाण: 
चार खवय्यांसाठी
अधिक टिपा: 

हे चिकन सर्व्ह करायच्या बराच आधी काही तास बनवुन ठेवले तर जास्त चविष्ठ लागते. मोहरी मेथ्या कलोंजी चा स्वाद चांगला मुरतो.

दही घातल्याने ग्रेवीला दाटपणा येतो. पण थोडी तेलकट होतेच.

ओ अ‍ॅडमिन प्रादेशिक मध्ये उत्तरभारतीय ऑप्शन नाहिये का ? का ?

माहितीचा स्रोत: 
सब मायाजाल है !
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Pages