पेठा

Submitted by आर.ए.के. on 4 March, 2013 - 08:09

आज बाजाराचा दिवस... काशी आपल्या ४ वर्षाच्या छकु आणि १० वर्षाच्या संभ्याला सोबत घेऊन तालुक्याच्या बाजारी माळवं घेऊन आली होती. लहानगी ४ वर्षाची छकु काशीच्या जवळ जवळ घुटमळत बसली होती. संभ्या मात्र बाजारात कुठे तरी हुंदडत होता. सावळीच पण काळ्याभोर टपोर्‍या डोळ्यांची छकु शांत स्वभावाची होती. तिला काशी आसपास असली तरी चालायची. बाजारात आणलेलं माळ्वं व्यवस्थित मांडताना आपल्या इवल्या इवल्या हातांनी ती काशीला मदत करायची. काशीला आपल्या या चिमुरडीच भारी कोतुक वाटायच. ही जन्मली आणि शिरप्या एका अपघातामध्ये देवाघरी गेला. शिरप्याच्या आईनं पांढर्‍या पायाची म्हणून छकूला जणू वाळीतच टाकल. काशी काम करत असताना छकू रडायला लागली तरी शिरप्याची आई तिला घ्यायची नाही. छकु तळतळून रडायची. आणि काशी स्वतःच्या नशिबाला बोल लावत मनातल्या मनात आक्रंदायची. शेवटी तिच लेकरु होत ते..स्व्तःच्या पोटचा गोळा..घरात छकूची होणारी हाडतुड सहन करत काशी आपल्या परिने छकुला माया देण्याचा प्रयत्न करायची. खाण्या-पिण्याची , कपड्यालत्त्याची हौसमौज करणं जरी शक्य नसल तरी काशी आपल्या दोन्ही मुलांना प्रेमाने वाढवायची. शिरप्या गेल्या नंतर सासर्‍याचा जमिनीचा तुकडा कसायला काशीने सुरुवात केली. एव्हढुश्या जागेवर धान्य लावणं शक्य नव्हतं आणि धान्य कसायला लागणारं भांडवल पण नव्हतं म्हणून काशीने त्यावर भाज्या लावायला सुरुवात केली. मिरच्या , मेथी, टमाटे असलं काही काही लावून तालूक्याला जावून भाजी विकणं आणि त्यातून आलेल्या पैशांवर घर भागवणं हेच काशीच्या आयुष्याचं लक्ष्य बनून राहिलं होतं...शिरप्याची आई चार घरी भांडी धुणं करायची आणि सासरा बाजेला टेकलेला असायचा. दिवसभर खोकत राहायचा. सकाळी आणि संध्याकाळी जेवायला दिलं की मग बाकीचा वेळ बाजेवर पडून राहायचा. कधी कधी आभाळाकडं एकटक पाहात राहायचा...बोलायचा काहिच नाही....शिरप्या गेल्या पासून तो असच करायचा....जगण्याचा सूर हरवल्यासारखा निपचित हताश पडून राहायचा...जणू देवा बरोबर भांडण चालू होत त्याचं...करत्या सवरत्या मुलाला का हिरावलसं असा जाब "त्याला" विचारत आणि उत्तराची वाट पाहत गुपचूप एका कोपर्‍यात निमूट पडून राहायचा. स्वतःच्या नवर्‍याची ही अवस्था पाहून शिरप्याची आई खूप हळ्हळायची....कधी कधी रडायची...कधी कधी चिडायची...काशीला बोल लावायची....कोणावरच राग काढता येत नाही म्हणून काशीला वसवस करायची..आणि मग परिस्थितीला शरण गेल्यासारखी आपणच थकून काशीच्या कुशीत शिरुन तळमळून रडायची!
आतूनच पार कोलमडून गेलेल्या घराला सावरण्याची जबाबदारी आता काशीच्या खांद्यावर होती. आपल्या परीने या सगळ्यांना सांभाळायचा ती कसोशीने प्रयत्न करत होती. आता तिच्या सार्‍या आशा तिच्या दोन चिमुकल्यांकडून होत्या. त्यामानाने छकु खूप समजूतदार वाटायची. संभ्या धडपड्या होता. सतत काही बाही करत राहायचा. लहान्या छकू वर त्याचा भारी जीव होता. शिरप्याची आई जेंव्हा छकू वर चिडायची तेंव्हा संभ्या तिला बाहेर खेळायला घेवून जायचा. आपल्या लहानग्या बहिणीला साखरेच पोतं करून गल्लीच्या पायवाटेवरुन दुडूदुडू पळायचा. संभ्याच्या अंगाखांद्यावर छकू बिनधास्त खेळायची. त्याच्यासोबत खेळताना खळखळून हसायची. तिला हसताना पाहून संभ्या खुश व्ह्यायचा. तिला आवडतील म्हणून माकड्चाळे करायचा, कोलांट्या उड्या मारायचा. काशी भक्क होऊन अकाली समजूतदार झालेल्या आपल्या दोंन्ही लेकरांकडे पाहत बसायची. खिन्न होऊन पुन्हा कामाच्या रहाटगाड्याला स्वतःला जुंपून घ्यायची.
आजही बाजारात उदास मनाने काशी आली होती. आज पंधरा दिवस झाले शिरप्याची आई अंथरूण धरुन होती. आधी केलेल्या कामाचे पैसे द्यायला लोकं तयार नव्हते. हातावरचं पोट असलेल्या काशीच्या घरची परिस्थिती अजूनच कठीण झाली होती. आज माळ्वं म्हणून तिने फक्त ट्माटेच आणले होते. तसा टमाट्याला भावही जास्त नव्हता. पण आजचं माळवं विकून येणार्‍या पैशांतून शिरप्याच्या आईसाठी दवापाणी करायचं होतं...! चिमुकली छकु शेजारी माती खेळत होती. मनातून छकू खुष होती कारण आज बाजारातून संभ्या तिच्यासाठी पेठा आणणार होता. कालच अंगणात खेळताना शेजारच्या तान्याने स्वतःच्या घरून आणलेला थोडा पेठा छकूच्या हातावर टेकवला होता. आणि अजून पाहिजे म्हणून छकूने भोकाड पसरल होतं. तिची समजून घालायची म्हणून संभ्या तिला म्हणाला होता...तुला उद्या बाजारात भरपुर पेठा आणून देईन म्हणून..आणि आज बाजाराच्या वाटेवर छ़कूने पेठा पेठा म्हणून संभ्याला भंडावून सोडल होत. बहिण भावात चाललेल्या या संवादाचा काशीला पत्ता पण नव्हता. ती बिचारी टमाटे कसे लवकर विकले जातील या विवंचनेत होती. घरी जावून काशीला आज मीठ भाकरी पण करायची होती.
आल्या आल्या काशीने टमाटे व्यवस्थित रचून ठेवले. "धा रुपे किलो , धा रुपे किलो" असं आरडत तिने विक्रीला सुरुवात केली.
इकडे संभ्या छकुला पेठा मिळवून देण्याच्या कामी लागला. पेठा विकत घेवून देण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्ह्ते. पण लहान बहिणीला दिलेलं वचन तर पूर्ण करायच होतं. संभ्या एका मिठाईच्या गाडीपाशी आला. वेगवेगळ्या रंगाची आणि आकाराची मिठाई पाहून संभ्याच्या तोंडाला पाणी सुटलं. पण आधि छकू साठी पेठा मिळवणं गरजेच होत्....म्हणून संभ्या त्या गाड्यावर पेठा शोधू लागला..आणि एकदाचा त्याला तो पांढर्‍या रंगाचा पेठा दिसला. गाडीवाल्याच ल़क्ष्य नाहिय अस पाहून संभ्याने दोन पेठे खिशात कोंबले आणि हळूच तिथून सटकू लागला...तसा त्याच्या हाताला जोरात हिसका बसला. गाड्याच्या मालकाने संभ्याची चोरी पकडली होती. मालकाने संभ्याच्या कानफटात एक जोरात लगावली...संभ्या कवराबावरा झाला..पण मोठ्या चपळाईने हात सोडवून तो गर्दिने फुललेल्या बाजारात पळू लागला...एव्हढसं पोरगं आपल्यासमोर चोरी करुन आपल्याडोळ्यासमोरुन पळून कसं काय जाऊ शकतं म्हणून मिठाईवालाही संभ्या मागे बेभान होऊन पळू लागला..खडकाळ रस्त्यातून वाट काढत काढत संभ्या हळू हळू आपल्या दुकानाकडे पळत होता....मागून मिठाईवाला येत आहे याची जाणीव ज्या़ क्षणी संभ्याला झाली तेंव्हा संभ्या काशीच्या दुकानाच्या जवळ पोहोचला होता. आणि आता दोनच ढांगात य कार्ट्याला पकडू अशा आवेशात मिठाईवालाही संभ्या मागून काशी च्या दुकानापाशी पोहोचला होता... मिठाई विसरलेला संभ्या आता पुरता घाबरलेला होता...आता त्याला काही सुचत नव्हतं...त्याला आता फक्त काशीच्या कुशीत शिरायच होतं...आईच्या पदराआड लपून राहायच होतं...आता त्याला छकू आणि काशी दिसायला लागल्या....तो उडी मारून काशी पाशी पोहोचणार इतक्यात संभ्याचा पाय खडकाळ जमिनीतून वर आलेल्या खूर दगडाला अडखळला...आणि होऊ नये ते झाले..नेमका संभ्या काशीने रचून ठेवलेल्या टमाट्याच्या राशीवर आदळला....क्षणात काशीच आधीच मळभ भरल आभाळ टमाट्याच्या रंगानी लाल लाल होवून गेलं....!

Group content visibility: 
Public - accessible to all site users