राजगड ते तोरणा

Submitted by दुर्गभूषण on 4 March, 2013 - 06:54

राजगड ते तोरणा

दिनांक : १५ नोव्हेंबर २०१२
स्थळ : ठाणे रेल्वे स्थानक
पाठीवर तोफेसदृश्य गुंडाळी असलेली एक भलीमोठी पाठपिशवी घेवून एक तरुण इकडेतिकडे येरझारा घालतोय. तेवढ्यात एक उद्घोषणा होते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणारी १५ डब्यांची लोकल सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे. तरुणाच्या चेहऱ्यावरील आठ्यांमध्ये वाढ होते. आता चाणाक्ष वाचकांनी ताडलेच असेल कि अस्मादिक कुठल्यातरी किल्ल्यावर भटकंतीस निघालेले आहेत. सुमारे एक तासाहून अधिक वेळ निघून गेलेला असतो पण गाडीचा काहीच पत्ता नसतो. शेवटी मनात चरफडत अस्मादिकांनी कुर्ल्याला जाणारी धीमी गाडी पकडली.
तिकडे संग्राम, सुजित आणि बाकीची मंडळी छ.शी.ट. वरून हात हलवत परत आली. दिवाळी दोनच दिवसांवर आली होती त्यामुळे पुण्याला जाणाऱ्या गाडीत जागा मिळण्याचा प्रश्नच नव्हता. आता दादरला येवून तिथूनच शिवनेरी किंवा तत्सम काहीतरी करून भल्या पहाटेच पुणे गाठायचे होते. शेवटी घासाघीस करून माणशी २५० प्रमाणे पुण्याला जाणारी एक इनोव्हा ठरवली. मग दादरवरून सुजित, उज्वला, चेतन आणि संग्राम, पुढे कुर्ल्यावरून मी असा आमचा प्रवास सुरु झाला. आम्ही मुंबई सोडले तेव्हा १ वाजून गेला होता. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून घाटात पोहोचलो तेव्हा ट्राफिक चांगलेच जाम झाले होते. अमृतांजन पुलापर्यंत पोहोचायला दीड तास लागला. पहाटे ४-५ च्या सुमारास स्वारगेट गाठले.
पुण्यात पोहोचताच दोन मुठी थंडीने आमचे स्वागत झाले. तिथेच बस स्थानकाबाहेर कानटोप्यांची खरेदी करण्यात आली. आतमध्ये चौकशी खिडकीजवळ वेल्ह्याला जाणार्‍या गाडीची चौकशी केली तेव्हा मास्तरांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. पण त्याने शेवटपर्यंत गाडी आहे कि नाही हेही सांगितले नाही. आंतरजालावरील माहितीनुसार सकाळी ६.१५ ची बस होती. अजून २ तास बाकी होते तोवर एक झोप काढून घ्यावी म्हणून जरा आडवे झालो. जरा डोळा लागतोय असे वाटतच होते तोच पुणेकर सिद्धार्थ जोशी आम्हाला शोधात तिथे पोहचले. मग काय झोपेचे झाले खोबरे. ६.३० वाजून गेले होते अजून गाडीचा पत्ता नव्हता. मग तेवढ्यात एक दाढीवाले काका राजगडला जाणार काय असे विचारात तिथे आले. हो नाही करता सौदा पक्का झाला आणि राजगडला जाणारे अजून दोघे आमच्यात सामील झाले. आता ट्रेक करून बरेच दिवस उलटून गेलेत त्यामुळे त्यांची नावे काही आठवत नाहीत. बस स्थानकापासून थोड्याच अंतरावर काकांची जीप उभी होती.
rajgad-torna (6).jpg
पुणे मागे टाकून गाडी गुंजवणे कडे निघाली. वाटेत दूरदर्शनचे मनोरे अंगावर मिरवणारा सिंहगड खुणावत होता. साधारण ८.३० च्या सुमारास आम्ही गुंजवणे मध्ये पोहचलो. तिथेच एका हॉटेल मध्ये आमचे सामान टाकले. मस्तपैकी मिसळपाव, कांदेपोहे आणि चहा घेवून ताजेतवाने झालो. नाश्ता आणि बाकीचे विधी उरकेपर्यंत १० वाजत आले. सकाळी १० वाजता गड चढणे म्हणजे दिव्यच होते. पहिल्या १५ मिनिटातच धाप लागायला सुरुवात झाली. डोक्यावर सूर्य तळपत होता अंगावर घातलेले कपडे घामाने निथळू लागले होते. तेवढ्यातच “अरे, राजांनो माझी बोहनी करा रे” अशी आर्त साद कानावर पडली. बाजूच्या एका झाडाखाली (झाड कसले झुडुपच ते) एक आजी ताक विकायला बसली होती. नुकताच नाश्ता झाला असल्यामुळे पोटात जागा अशी नव्हतीच. तरी पण तिला थोडी मदत म्हणून सुजित आणि उज्वलाने एक ताक घेतले आणि तिला दुप्पट म्हणजे २० रुपये दिले. तिचे डोळे पाणावले, “ माझ्या पोराने १० रुपये मला असेच दिले” हे वाक्य ती कमीत कमी १५ वेळा तरी बोलली असेल. थोडेसे पुढे अजून एक आजी ताक विकायला बसली होती, नव्हे उभीच होती. आजीच्या एका डोळ्याला काहीतरी झाले होते, एक डोळा बंद होता आणि पाय देखील सुजले होते. तिची अशी अवस्था बघून आता माझेच डोळे पाणावले. हि आजी तर आख्खी बाटलीच घे म्हणून मागे लागली. तेवढ्यात मागून एक १०-१५ जणांचा समुदाय आला. ती आजी ताक घ्या, म्हणून थोडे अंतर त्यांच्यामागे अक्षरशः धावत गेली पण ते बधले नाहीत. शेवटी आम्हीच तिच्याकडून थोडे ताक घेतले. आमच्यातल्या काही लोकांना तिचे हे वागणे ढोंगी वाटत होते, असेलही. पण या वयात तिला हे सर्व करावे लागते याचे वाईट वाटते. आपण असे पिझ्झा, बर्गर खावून किती पैसे उडवतो किती टीप देतो ? जर १०-२० रुपये अशा लोकांना दिले तर बिघडते कुठे ?
आजीचा निरोप घेवून पुढे चालायला सुरुवात केली. सकाळी १० नंतर कोणताही गड चढण्याची माझी हि पहिलीच खेप होती. प्रत्येकी १० पावलांनंतर धाप लागत होती. तेवढ्यात पोटात सुद्धा दुखायला लागले. आता तर चढणे अधिकच कठीण झाले होते. चेतन, संग्राम, सिद्धार्थ कधीच पुढे निघून गेले होते. मी, सुजित आणि उज्वला मागे पडलो होतो. मजल दरमजल करीत दुपारी १.५० वाजता मी चोर दरवाज्याने गडावर प्रवेश केला. गडावर प्रवेश करताच समोरच पद्मावती तलावाचे दर्शन झाले. गडावरचे पद्मावती देवी मंदिर ट्रेकर्सनी तुडुंब भरले होते. त्यातील बरेच लोक जेवण वगैरे आवरून गडभ्रमंतीला निघत होते. आम्ही सुद्धा पोटपूजा आवरून घेतली. तिथे सुद्धा एक ताकवाल्या मावशी होत्या. त्यांच्याकडून सुद्धा आम्ही ताक घेतले. जसजसे उंचावर गेल्यावर हवा विरळ होते तसे गडावर उंच उंच गेल्यावर ताक पातळ होत होत गेले होते. असो.
सुवेळा माची
rajgad-torna (10).jpg
जेवण आटपेपर्यंत ३ वाजून गेले होते. आता लवकरात लवकर निघणे भाग होते कारण पुढे तोरण्याला सुद्धा जायचे होते. पद्मावती देवीला वंदन करून आम्ही गडफेरी मारायला बाहेर पडलो. वेळ कमी होता म्हणून आम्ही मोर्चा वळवला तो थेट सुवेळा माची कडे. एखाद्या लांब सापाप्रमाणे ती दूरवर पसरलेली होती. आता नेढे सुद्धा अगदी सुस्पष्ट दिसत होते.
नेढे ... छायाचित्रकार संग्राम सावंत .
rajgad-torna (17).jpg

आम्ही झरझरा पावले टाकत सुवेळा माचीकडे निघालो. वाटेत एका झाडावर एक वानरसेना बसली होती आणि आमच्या दिशेला पाहून एक माकड चित्रविचित्र आवाज काढत होते. सुरुवातीला थोडी भीती वाटली तरी पण हातात एक काठी घेतली. हळूहळू सर्व माकडे वर झाडीत दिसेनाशी झाली. पद्मावती मंदिराकडून माचीकडे जायला साधारणतः एखाद तास लागतो. वेळ कमी असल्यामुळे डूब्याला वळसा घालून आम्ही थेट झुंजार बुरुजावर आलो. तिथे दिमाखात फडफडणाऱ्या ‘भगव्या’ सोबत छायाचित्र काढून घेण्याची हौस सर्वांनी भागवून घेतली. मग आम्ही मोर्चा वळवला तो थेट नेढ्याकडे. लांबून एखाद्या छोट्या छिद्रासारखे दिसणारे नेढे प्रत्यक्षात मात्र ७-८ लोक सहज बसतील एवढे मोठे होते. नेढयामधून गडाचे आणि आजूबाजूच्या परिसराचे अतिशय विहंगम दृश्य दिसत होते. नेढ्यामधील छायाचित्रणाचा कार्यक्रम उरकून पुढे आलो आणि मागे वळून पाहतोय तर काय नेढ्याच्या खडकाचे रुपांतर आता हत्ती मध्ये झाले होते.
हाच तो हत्ती खडक.
rajgad-torna (28).jpgrajgad-torna (13).jpgrajgad-torna (22).jpg
गुंजवणे दरवाजा
rajgad-torna (8).jpg
सूर्य मावळतीकडे झुकू लागला होता. त्यामुळे सुवेळा माचीला इथूनच निरोप दिला. आता मोर्चा परत फिरला तो थेट पद्मावती मंदिरात. मंदिरातून पिशव्या उचलल्या आणि अंकुश सोबत तोरण्याकडे मोर्चा वळवला.
rajgad-torna (29).jpg
अंकुश म्हणजे इयत्ता नववी असणारा चुणचुणीत मुलगा. हा सध्या सुट्टी असल्यामुळे खालून गावातून ताक घेवून गडावर विकायला येतो. अंकुशचे ताक संपल्यामुळे तोही आमच्या सोबत निघाला. अंकुशचे घर खाली खिंडीपासून जवळच होते. म्हणून खिंडीपर्यंत तरी तो आमच्या सोबत असणार होता. पुढे अंकुश आणि त्या पाठोपाठ आमची भटकी सेना असा प्रवास सुरु झाला. तोरण्याला जाणारी वाट हि संजीवनी माचीतून निघून ‘अळू’ दरवाज्यातून बाहेर पडते आणि पुढे खिंडीकडे जाते. सुवेळा माचीकडे जाताना रस्त्यात खाली असलेला पाली दरवाजा आणि तिथून गडावर येणारी वाट दिसते. हि वाट अगदी सोपी आहे कारण या मार्गाने साधारणतः दीड तासात गडावर पोहचता येते. संजीवनी माचीही सुवेळा माची प्रमाणेच लांब लांब पसरली होती. इथेही पोहचे पर्यंत जिकडे तिकडे थांबून फोटोसेशन चालूच होते. इथेही डौलाने फडकणाऱ्या भगव्या सोबत मोठे फोटोसेशन झाले. ते आटपून अळू दरवाज्यातून निघून राजगडाच्या तटबंदीमधून बाहेर पडलो आणि तोरण्याच्या दिशेने चालू लागलो.
rajgad-torna (16).jpgrajgad-torna (2).jpgrajgad-torna (14).jpg
आता जवळजवळ सूर्यास्त व्हायलाच आला होता. आणि अजून बराच पल्ला गाठायचा होता. आमच्या पैकी फक्त चेतननेच ह्या वाटेने तोरणा घातला होता आणि तोसुद्धा रस्त्याबाबत थोडा साशंकच होता. म्हणून आमच्या बरोबर वाटाड्या म्हणून येण्यासाठी अंकुशलाच तयार केला. तोही जास्त आढेवेढे न घेता लगेच तयार झाला. आत्ता फक्त अंकुशच्या घरी निरोप देणे बाकी होते.
दूरवर दिसणारा राजगड आणि तेथून तोरण्याला जोडणारी टेकड्यांची रांग rj.jpg
अळू दरवाज्यातून बाहेर पडल्यावर थोडे खाली उतरल्यावर एक छोटेसे पठार लागते आणि त्यानंतर प्रचंड उतार आणि घसारा असणारी वाट सुरु होते. हीच वाट आपल्याला खाली खिंडीत नेवून सोडते. हि वाट उतरत असतानाच आता अंधार पडला होता. राजगडावरून तोरण्याला जाताना तब्बल २३ छोट्या टेकड्या पार कराव्या लागतात. पूर्ण रस्त्यामध्ये पाणी कुठेच नाही. हे साधारणतः ६-८ तासांचे अंतर आहे. वाटेत खिंड पार केल्यानंतर थोडे पुढे एकमेव घर आहे. पुढे कुठेही मनुष्यवस्ती नाही. पिण्याचे पाणी पुढे थेट तोरण्यावर मिळते. rajgad-torna (18).jpgrajgad-torna (1).jpgrajgad-torna (31).jpg

राजगडाचा डोंगर संपला आणि आम्ही एका छोट्या टेकडीच्या पायथ्याशी पोहचलो. आता पटापट विजेरया बाहेर पडल्या. आता हळूहळू टेकडी चढायला सुरुवात केली. रस्त्याच्या दुतर्फा कारवीचे रान माजले होते. त्यातून मार्ग काढत आमची सेना चालली होती. एखाद दोन टेकड्या पार करून बाहेर पडलो तर पक्का डांबरी रस्ता लागला. नशिबाने इथेच अंकुशचे नातलग भेटले त्यामुळे त्याच्या घरी जायची पायपीट वाचली. डांबरी सडक खाली गावात जाते. काही लोक गावात जावून वस्ती करतात. पण आम्ही ठरवले होते कि आजच तोरणा गाठायचा आणि तिकडे विश्रांती घ्यायची. सडक ओलांडून पलीकडे अजून एका टेकडीचा चढ सुरु झाला. हवेत गारवा जाणवू लागला पण चालून घामाच्या धारा लागल्या होत्या. साधारण एक तासाच्या चालीनंतर ते झोपडी सदृश्य घर लागले. हे सुद्धा अंकुशचे नातेवाईक होते. तिथे पोहचताच आम्ही अंगणात अक्षरशः अंग टाकले. घरातून ताक हवे का अशी विचारणा झाली. आम्ही म्हटले ताक नको, पण एक हंडाभर पाणी द्या. पण पाणी लांबून आणावे लागते म्हणून पाण्यासाठी नम्रपणे नकार मिळाला. १५-२० मिनिटांच्या विश्रांती नंतर सुद्धा कुणीच हालायला तयार नव्हते. सगळे अगदी थकून गेले होते. बळेबळेच सर्व निघाले अजून फक्त २०-२१ टेकड्या पार करायच्या होत्या. हळूहळू कारवीच्या रानातून मार्गक्रमण करत आम्ही पुढे निघालो. संग्रामचा पाय खूप दुखत होता. त्याला धड चालता येत नव्हते. तरी सुद्धा जास्त कुरकुर न करता पठ्ठ्या चालत होता. एकामागोमाग एक टेकड्या पार करत आमची वाटचाल सुरु होती. समोर अंधारात सुद्धा बुधला अगदी स्पष्ट दिसत होता. मधेच एका ठिकाणी वाटेला दोन फाटे फुटले, एक वाट सरळ जात होती तर एक वर चढत होती. सरळ जाणारी वाट एका गावात जाते तर वर जाणारी तोरण्याला. अंकुश नसता तर आम्ही नक्कीच सरळ गेलो असतो आणि चुकलो असतो.
संधीप्रकाशात ठळक दिसणारा तोरणा आणि बुधला
rajgad-torna (32).jpg
एकामागून एक टेकड्या पार करत आमचे मार्गक्रमण चालले होते. वाट कधी टेकडीच्या कडेला तर कधी मध्यावरून तर कधी दाट कारवी मधून जात होती. कधी कधी तर एवढी अरुंद वाट होती कि जर चुकन पाय घसरला तर थेट दरीत. आमच्याच मधले एक सद्गृहस्थ सतत मागे थांबत होते. कधी फोन आला म्हणून तर कधी तहान लागली म्हणून. शेवटी चेतनने चोर पकडलाच या भल्या माणसाला मागे राहून हळूच पिशवी मधली फळे एकट्याने खायची होती म्हणून तो सतत मागे राहत होता. असो, कुणाकुणाला काय काय आवड असते. रात्रीचे १०.३० वाजले होते थोडावेळ बसून आराम करूयात म्हणून एका ठिकाणी थांबलो. संग्रामचा पाय खूपच दुखत होता. हे ठिकाण म्हणजे गर्द रानातले एक मंदिर होते. मंदिर म्हणजे वर छप्पर किंवा बांधकाम असे नव्हतेच. एका झाडाखाली २-३ मूर्ती ठेवल्या होत्या. आम्ही गोलाकार बसून चिवडा, बिस्किटे यांच्यावर ताव मारला. पाणी खूप जपून प्यावे लागत होते. थोडे अन्न आणि पाणी पोटात गेल्यावर सर्वांना चांगलीच तरतरी आली. आता फक्त अर्धा तास इति चेतन. अर्धा तास गेला एक तास गेला पण तोरणा काही येईना शेवटी रात्री १२.३० वाजता आम्ही बुधल्याच्या खाली पोहचलो. चेतनच्या मतानुसार अजून फक्त एक लोखंडी शिडी चढून तोरण्यात प्रवेश करायचा होता. पण आजची रात्र येथेच काढूयात असे ठरले. बुधाल्याच्या पायथ्याशी थोडी मोकळी गोलाकार जागा होती. लगेच जोशीबुवांनी विलायतेतून मागवलेला नवीन कोरा तंबू काढला. इकडे सुजित, चेतनच्या पोटातील राक्षस जागे झाले होते. सुजित ने पिशवी मधून खायचे सामान काढले आणि दोघे त्यावर अधाशासारखे तुटून पडले. त्यांना असे बकासुरासारखे खाताना पाहून संग्रामच्या पोटात सुद्धा कावळे ओरडू लागले. जोशीबुवांचा तंबू तयार झाला होता. त्यात ते स्वतः आणि अंकुश व आम्ही बाकीचे बाहेर चांदण्यात.
rajgad-torna (27).jpg
रात्री कधी डोळा लागला कळलेच नाही, पहाटे कसल्याश्या चित्रविचित्र आवाजांनी मला जाग आली. वर बुरुजाच्या खालच्या भागात ३०-४० माकडे बसली होती आणि विचित्र आवाज काढत होती. त्यांना बघून माझी झोप पार उडाली आणि मी बाकीच्यांना जागे केले. खाली झोपलेली सर्व मोठी माकडे उठल्यावर वर बसलेल्या पूर्वजांनी धूम ठोकली. पटापट सर्व आटपून आम्ही तोरण्याकडे निघालो. आता योग्य मोबदला देवून वर थोडे बक्षीसही देवून अंकुशला निरोप दिला. आता एक छोटासा कातळ आणि पुढे एक लोखंडी शिडी लागली. शिडीवरून थेट तोरण्याच्या बुरुजात प्रवेश केला. पुन्हा चेतन ला विचारले अजून किती वेळ रे ? नेहमीचेच उत्तर आले ‘फक्त अर्धा तास’.
rajgad-torna (7).jpgrajgad-torna (11).jpgrajgad-torna (12).jpgrajgad-torna (24).jpg
आता इकडे तिकडे वेळ न दवडता थेट मेंगाई मंदिराकडे निघालो. तोरण्याला आम्हाला राजेश भेटणार होता आणि मग सुजित, चेतन आणि राजेश पुढे रायगडाला जाणार होते. म्हणून आम्ही वेळ न दवडता चालू लागलो. मध्येच मागे नजर टाकली तर दूर अंतरावर दुर्ग दुर्गेश्वर रायगड आणि बेलाग लिंगाणा खुणावत होते. आम्ही मंदिरात पोहचलो तेव्हा ९.३० वाजले होते तरीसुद्धा गडावर दुसरे कुणीच नव्हते. मंदिरात पिशव्या टाकून पहिले पाण्याच्या टाक्याकडे धावलो. अर्धा बाटली पाणी पोटात गेल्यावर हायसे वाटले.
इकडे संग्राम आणि उज्वलाने चुलीवर नुडल्स बनवायला घेतली होती. देवळाजवळच कुणीतरी सुकी लाकडे आणून ठेवली होती. आम्ही लोकांनी देवळाच्या मागच्या बाजूला अंग टाकले. उन डोक्यावर आले तरी लादी बर्फासारखी गार होती. आता हळूहळू ट्रेकर्सचे जथ्थे गडावर यायला सुरुवात झाली. आम्ही मागे बसून शेवयांचा आस्वाद घेतच होतो, तितक्यातच राजेश आला. मी राजेशला पहिल्यांदाच भेटत होतो. जेवणाचा कार्यक्रम आटपून पुन्हा पाणी भरून घ्यायला गेलो. तिथे माकडांची मोठी टोळी पाणी प्यायला आली होती. पुन्हा एकदा मोठी माकडे पाहून त्यांनी धूम ठोकली.

रायगडाच्या दिशेला तोंड करून महाराजांना दिलेली सलामी अर्थात घोषणा
rajgad-torna (21).jpg
आता रायगड चमूला निरोप द्यायची वेळ आली होती, खरे तर आमची पण खूप इच्छा होती जायची पण मुंबईस परत येणे भाग होते. चमूस शुभेच्छा देवून आम्ही जड अंतःकरणाने परतीच्या प्रवासास लागलो. १ वाजून गेला होता आणि अंगात काहीच त्राण उरले नव्हते त्यामुळे गडफेरी न मारताच परतीच्या प्रवासाला निघालो. निघताना झुंझार माचीला मनोमन आश्वासन दिले पुन्हा नक्कीच येवू आणि ते पण वस्तीला. अजून एक स्वप्न पूर्ण झाले. पण रायगड हुकल्याची रुखरुख मात्र लागून राहिली.
rajgad-torna (25).jpg
सर्व प्रकाशचित्रे सुजित सुपेकर यांच्या सौजन्याने .

जय महाराष्ट्र
भूषण शशिकांत गुरव.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त! सविस्तर वृत्तांत अगदी छान फोटोसहीत. वाचुन मजा वाटली आणी कौतुकही. बाकी त्या दोन आज्यांचे वाचुन वाईट वाटले. म्हातारपणातही अशी भटकंती देवाने देऊ नये. पण तुम्ही माणुसकी दाखवलीत हे खरे कौतुकास्पद.

मस्त

डांबरी सडक खाली गावात जाते. काही लोक गावात जावून वस्ती करतात. >> Biggrin आम्ही तोरणा-राजगड केला तेव्हा आम्हाला राम-लक्ष्मण भेटले होते.

वृत्तांत भारी आणि बुधल्याचे फोटो सुंदर आले आहेत. Happy

तेच तेच गड किल्ले असले तरी प्रत्येकाचा अनुभव आणि शैली वेगवेगळी असते. छान लेख.
आणि गडाएवढेच असे हाडामासाचे गडकरी पण महत्वाचे असतात. वेळप्रसंगी तेच आपल्या उपयोगी पडतात.

बाकी त्या दोन आज्यांचे वाचुन वाईट वाटले.<<< त्यांच्या कडे बघितले तरी कसेतरी होते,
मी २ वर्षापुर्वी गेलो होतो तेव्हाही ती म्हातारी अशीच मागे मागे आली होती २ रुपयाचे तरी सरबत घ्या म्हणून, तिने जे सरबत म्हणून दिले ते आजिबात पिण्यालायक नव्हते त्या बाटलीत मुंग्या व अन्य कचरा होता,
तिला १० रुपये दिले आणि पुढे चालू लागलो तर वरून खाली येणारा एका गृप च्या मागे ती म्हातारी पळाली.
बिचारी दिवसभरात तेही फक्त रविवारी काय मिळत असेल ते तिलाच ठाऊक.