पंचम (३): टॉप टेन- ऊत्कृष्ट दहा गाणी (माझ्या नजरेतून)

Submitted by योग on 4 March, 2013 - 01:17

पंचम (३): ऊत्कृष्ट दहा गाणी (माझ्या नजरेतून)

या लेखमालिकेतील भाग १ मध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे- "अर्थातच हीच गाणी टॉप टेन का, दुसरी का नाही यावर ऊत्तर नाही.. माझ्या एकंदरीत सर्व पार्श्वभूमी, दृष्टीकोनातून ती तशी आहेत, ईतकेच. प्रत्त्येकाचे कारण वेगळे. काही गाण्यांना वैयक्तीक वा व्यावहारीक आयुष्यातील काही घटनांचे, स्थळांचे संदर्भ आहेत, काहींना तंत्र (टेक्नोलॉजी) चे, काहींना ईतर कसले. मला जो पंचम सापडला तोच तसाच तुम्हालाही सापडायला हवा असा आग्रह नाही, पण एकदा माझ्याही नजरेतून पहा एव्हडीच अपेक्षा."

मला सापडलेला आणि समजलेला पंचम, एकंदरीत पंचम चे तंत्र, मंत्र या सर्व लिखाणाच्या अनुशंगाने खालील दहा गाणी मला पंचमच्या ३५ वर्षाच्या कारकिर्दीतील निव्वळ उत्कृष्टच नव्हे तर मैलाचे दगड वाटतात. प्रत्येक गाण्याने काहितरी नविन दिले, एक नवे पर्व सुरू केले. गाण्यांची यादी ही निव्वळ 'क्रमवारी' आहे क्र. १ चे गाणे सर्वात श्रेष्ट अशी गुणवारी नाही.

१. ये जो मुहब्बत है (कटीपतंग): या चित्रपटातील सर्वच गाणी सुंदर आहेत. किंबहुना मुकेश च्या आवाजातील 'जिस गली मे तेरा घर ना हो बालमा' हे गीत तर अक्षरशः शतकानुशतके गाजले आहे. 'मेरा नाम है शबनम..' याही गीताने तर निव्वळ आशा ताईंच्या गायकीच्या बळावर एव्हरेस्ट शिखराची ऊंची गाठली आहे. पण या सर्वात एक गीत अधिक मोहक वाटते- त्याचे शब्द, संगीत रचना, चित्रीकरण, अभिनय, गायकी, ई. सर्व गोष्टी ईतक्या परपस्परपुरक साखळीत बांधलेल्या आहेत की एखादी गोष्ट कमी केली तरी एकंदरीत गाण्याची मजा कमी होऊ शकेल.
गाण्याची सुरुवातच होते ते ती एका सुंदर व्हायलीन संचाच्या वादनाने. त्याच्या जोडीला ताल वाद्ये एका गोलाकार लयीत वाजतात, आणि नमेके धृवपद सुरू व्हायच्या आधी अक्षरशः अर्धा मात्रेच्या ऑफ बिट मध्ये वाजल्यागत स्ट्रिंग गिटार चा तुकडा येतो. एकंदर गाण्याचे दृष्य असे आहे की आपला हिरो म्हणजेच 'काका' ऊर्फ राजेश खन्ना एका बार मध्ये जाऊन प्रेमभंगाचे दु:ख दारूच्या नशेत विसरायचा प्रयत्न करतोय.. (राजेश खन्ना त्या बाबतीत पडद्यावरील एव्हरग्रीन व 'हॉट' देवदास होता असे माझे मत!) संपूर्ण गाण्याच्या चित्रीकरणात दारूड्याचे झिंगणे दाखवताना कॅमेरा बरेच वेळा गोल फिरवला गेला आहे. काकाच्या काही स्टेप्स सुध्दा पायात पाय किंवा एकात एक अडखळत झिंगत चालण्या सारख्या आहेत, त्याच्या जोडीला 'राजेश खन्ना सिग्नेचर' माना कलत्या हलवणे- या सर्वाला पुरक असा 'झोल रिदम' परिणाम देण्यासाठी पंचम ने खास विचार करून व्हायलईन चे वादन 'गोलाईत' करून घेतले आहे.. असेच वाटते. जवळ जवळ प्रत्त्येक व्हायलिन चा तुकडा हा एकसंध लांब मिंड नसून ('दर्दे दिल दर्दे जिगर दिल मे जगाया आपने' हे गाणे सुरू व्हायच्या आधीचा व्हायलीन तुकडा आठवून पहा- टिपिकल मिंड व लांबलचक स्ट्रोक्स!) छोटे छोटे स्वरांचे गोलाईदार भाग आहेत त्यामूळे संगीत रचनेमध्ये एक प्रकारचा घुमाव निर्माण होतो- त्याच बरोबर त्याच्या साथीने अक्षरशः 'बो बो बो बो ..' असा आवाज करत बाँगो वाजतो, आणि एखाद्या पुढे चालणार्‍याला सारखे शर्टाची कॉलर धरून हळूच मागे ओढावे तसे गिटार चे तुकडे व्हायलिन, बांगो या रिदम ला थोडेसे खेचल्यागत वाजवले आहेत- या सर्वाचा एकत्रीत परिणाम व परीपाक म्हणजे संपूर्ण गाण्याला व त्यातील शब्दांना "झिंग" चढते पण ती झिंग बेफाम नृत्त्याची नाही तर स्वतःच्याच दु:खात बुडालेल्या, खचलेल्या भावनांच्या हिंदोळ्यांवर झुलणार्‍या विफल प्रेमाची व मनाची आहे. "कुछ तो लोग कहेंगे" या गाण्यातील अस्वस्थ करणारा ठेहराव तर "जय जय शिवशंकर" मधील बेहोष करणारा ठेका या दोन्हितील मध्यबिंदू म्हणजे "ये जो मुहब्बत है" चा संगीतसाज वाटतो. आणि अर्थातच सर्वावर कळस चढवणारी या गाण्यातील किशोरदांची गायकी- फार कमी गाणी अशी आहेत ज्यात किशोरदांनी आकार, गोलाई, अशा गळ्याच्या हरकती केल्या आहेत. पण या गाण्यात वरील सर्व वाद्य साज, परिणाम, चित्रण याला पोषक, पुरक असे गायन करताना त्यांनी देखिल- "हो जाये बदनाsssssssम..." या ओळीत बदनाम शब्द; प्रत्त्येक कडव्याच्या शेवटच्या ओळीतील शब्द ("दिल टूट जाये तो क्या हो अंजाssssssssम...", "बस दूर ही से करके सलाsssssssssम"..") मस्त आलाप स्टाईल व गोलाईत गायले आहे आणि त्याच ऊलट काही ओळीत मात्र मुद्दामून तोडून गायल्यासारखे- "ये जो मुहब्बत है" (है वर केलेली हरकत्/एक्सप्रेशन) गायले आहे. एव्हडेच नाही तर गायन हे थोडे ठेक्याच्या मागून म्हणजे किंचीत खेचल्या सारखे गायले आहे.. एरवी ,"अरे काय खेचल्या सारखे गायले जात आहे- बरोबर मात्रे वर शब्द येत नाही.." असे गायकाला सांगावे लागते. पण या गाण्यात तीच एक अदा तोच एक गुण मात्र संपूर्ण गाण्याची अभिव्यक्ती व अपिल ऊभे करतो. राजेश खन्ना चा या(ही) गाण्यावरील अभिनय अर्थातच लाजवाब, ऊस्फूर्त! कोरियोग्राफर ने 'ठरवून' दिलेल्या स्टेप्स वर नाच करणारा दारूडा म्हणजे 'नशे' चा अपमानच! पण काका ने ज्या प्रकारे अख्खे गाणे स्वताच्या अदा, स्ट्पेस, देहबोली वर 'घुमवले' आहे त्याला तोड नाही.

या अशा सर्व लहान सहान गोष्टि, त्यातील बारकावे याचा विचार करताना पंचम मधील संगीतकार चित्रपट माध्यमाबद्दल किती जागरूक होता हेही दिसून येते आणि अर्थातच दिग्दर्शक, संगीतकार, गायक, अभिनेता, तंत्रज्ञ मंडळी यांच्या एकत्रीत प्रयत्न व देवाण घेवाणीतून जेव्हा एखादी निर्मिती होते तेव्हा ती अधिक सच्ची प्रामाणिक व मोहक वाटते.

आणि या गाण्याची एक आठवण मनावर कायम कोरलेली आहे ज्याच्यामूळे या चित्रपटातील ईतर गाण्यापेक्षा हे गाणे वरच्या क्रमांकावर आहे- २००२ च्या आसपास ऊसगावातील क्लिव्हलँड शहरात आम्ही कार्यक्रम करत होतो. कार्यक्रम युनिव्हर्सिटीत होता. प्रेक्षकात १६+ ते २५+ चा विद्यार्थी गट यात अमेरिकन, भारतीय, ईतर देशीय, आणि बाकी स्थानिक भारतीय मंडळी असे सर्वच प्रेक्षक होते. आम्ही गाणारे साधारण ३० च्या वयोगटातील. पडद्यावर खुद्द चित्रपटातील गाणे पण गायन मात्र माझे. म्हणजे चित्रपट क्लिप मधिल मूळ गायकाचा आवाज काढून निव्वळ ऑर्केस्ट्रा चा काराओके ट्रॅक, पण त्याच बरोबर सॉफ्ट्वेयर वापरून मूळ गाण्यातील काका च्या ओठांची हालचाल व किशोर दांनी गायलेले शब्द यांचा मेळ राहिल- (lip sync) असे सर्व ऊपद्व्याप करून मग हे सर्व मोठ्या पडद्यावर प्रोजेक्ट केले होते किंबहुना अशी आर.डी. च्या गाण्यांची एक मेडलीच मी बनवली होती.

थोडेसे विषयांतर- काहितरी नाविन्य हवे म्हणून असे दृक्श्राव्य गायन (व्हिडीयो सिंगींग) हा प्रकार मी २००० च्या सुमारास ऊसगाव मध्ये आमच्या संगीत गृप साठी चालू केला होता. नाहितर नुसतेच स्टेज व जाऊन गाणे गायचे तसे बोरच वाटायचे. अक्षरशः समोर लोक मस्त बुफे जेवण जेवत आहेत, लहान पोरं बागडत आहेत, आणि आम्ही स्टेज वर सर्वस्व ओतून २ तासाचा कार्यक्रम करत आहोत-निव्वळ ६०० डॉलर साठी आम्ही विद्यार्थी दशेत केलेल्या त्या कष्टांचे मोल आज मिलियन डॉलर पेक्षाही जास्त आहे! पण असे अनेक छोटे मोठे कार्यक्रम केल्यावर लक्षात आले- बॉस, या लोकांना कायम गुंतवून ठेवण्यासाठी पडद्याचा व स्टेज चा वापर होणे आवश्यक आहे. त्यातून ही आयडीया सुचली होती. आणि मग त्यासाठी आवश्यक ते सॉफ्टवेयर शिकणे, वापरणे, एक्स्प्लोरेशन, हे अनेक काळ होत राहीले- "गरज ही शोधाची जननी आहे" अगदी पटले.
तर थोडे विषयांतर झाले पण हे लिहायचा ऊद्देश हा की क्लिव्हलँड च्या त्या कार्यक्रमात पडद्यावर हेच गाणे सुरू व्हायच्या आधीचा तो व्हायलीन तुकडा लागला मात्र अक्षरशः प्रेक्षागारातून नुसता जल्लोष झाला, त्या बरोबर पडद्यावर 'काका' अवतरला आणि त्यामागोमाग प्रेक्षकांमध्ये किती तरूण मुली असतील याची साक्ष देणार्‍या आरोळ्या, शिट्ट्या देखिल!!!! i was literally on high even before the song started.. म्हणजे जल्लोष व शिट्टया काकासाठी पण हवेत मी, हे मी मान्य करतो! Happy आपली कला जीव ओतून सादर करताना त्यामधिल अशा सर्व गोष्टींची जाण ठेवून त्याला दाद देणारा प्रेक्षक हेच खरे तर कुठल्याही गायकासाठी/कलाकारासाठी टॉनिक असते. त्या एका घटनेने पंचम चे संगीत तब्बल ३० वर्षांननंतरही तितकेच तरूण आहे, सर्व सींमा लांघून पल्याड गेले आहे याचा याची देही याची डोळा पुरावा मी तेव्हा बघितला. कार्यक्रम संपल्यावर मला दाद द्यायला आलेल्या लोकांमधील पंचम व त्याच्या गाण्यांबद्दलचे प्रेम अक्षरशः भारावून सोडणारे होते. आयुष्यात असे अनेक भरभरून वाहिलेले क्षण केवळ पंचममूळेच आमच्याही वाट्याला आले यात शंका नाही.

२. रैना बिती जाये (अमर प्रेम): पंचमच्या ज्या ज्या गाण्यांना लता च्या गायकीने अजरामर केले आहे त्यापैकी हे गीत. अगदी पहिल्या आलापा पासून लतादिदींच्या गळ्यातून अक्षरशः एक 'सजीव आत्मा' या गाण्यात शिरतो तो गाणे संपले तरी त्याचा अंश कायम रहातो. पण गाणे सुरू व्हायच्या आधीच ललित रागाच्या सुरावटींतून एक आर्त, हुरहुर अशी जमिन व्हायलीन च्या एका तुकड्यातून गाण्याला प्राप्त होते. मग लताचा आलाप मग पंचम स्पेशल संतूर, बासरी, गिटार, एकतारा यांचा सुंदर मेळ असलेला लीड तुकडा आणि मग रैना बिती जाये मधल्या "जा" वर वाजलेल्या गिटार ची सम.. आणि मग गाणे चालू होते तेव्हा फक्त गिटार, खोल (बंगाली वाद्य), तबला एव्हडेच पुरून ऊरतात. तसं पहायला गेलं तर केहेरवा ( १२३४, १२३४) तालच पण तो किती वेगळ्या पध्दतीने बांधला आहे. खेरीज जवळ जवळ शास्त्रीय ठुमरी च्या जवळ जाणारे पण तरिही सेमि क्लासिकल अशा या संपूर्ण गाण्यात गिटार चा कायम वापर करण्याचा विचार व धाडस 'त्या काळी' केवळ पंचमच करू शकतो. आणि दुसर्‍या कडव्याच्या आधी पुन्हा एकदा गिटार स्ट्रम्स वापरून अख्खा तुकडा ऊभा केला गेला आहे. शेवटच्या कडव्यात "बिरहा की मारी प्रेम दिवानी, तन मन प्यासा अखियों मे पानी.." हे काळजाला हात घालणारे शब्द येण्या आधीच एव्हाना एकंदर रचना, वाद्य, लता ची गायकी, पडद्यावरील शर्मिला चा अभिनय या सर्वांनी गाण्याला आधीच एका ऊत्कर्ष बिंदूवर नेलेले असते की ते शब्द ऐकल्यावर ती 'कळ' आपसूक आपल्याही हृदयात निर्माण होतेच.

तसे पाहिले तर याच चित्रपटातील कुछ तो लोग कहेंगे, चिंगारी कोई भडके, ही गाणी देखिल तितकीच सुंदर आहेत. पण पंचम वरील एका कार्यक्रमात दाक्षिणात्य गायिका 'चित्रा' हीने हे गीत ईतके सुंदर पेश केले आणि ते गाताना तिच्या डोळ्यातील पाण्याचा अक्षरशः कुठल्याही क्षणी किनारा/कडा सोडून कडेलोट होतो की काय अशी भिती वाटत होती- हे तेव्हाच होते जेव्हा एखादे गीत/संगीत रचना तितके सशक्त (पॉवरफुल) व प्रामाणिक असते. पडद्यावरील त्या नायिकेचे मनोगत (चित्रपटात ती कोठेवाली आहे) आपल्या आवाजातून तितक्याच ताकदीने लतादिदींनी व्यक्त केले असले तरी साक्षात जेव्हा ते गाणे गाताना पुनः एखाद्या स्त्री च्या चेहेर्‍यावरील आर्त भाव थेट प्रकट होतात तेव्हा ते गाणे 'संपूर्ण' होते.
ही घ्या लिंक, पंचमवरील या कार्य्क्रमात खुद्दा 'काका' देखिल प्रेक्षकात ऊपस्थित होता.
http://www.youtube.com/watch?v=94GiI8Ejljw
गीत रचनेला ही खोली, गाभा देणारा, आणि त्या शब्दांमधिल स्त्री मनाला समजून रचना बांधणार्‍या संगीतकाराचा स्पर्श हा "परिसस्पर्श" आहे याची खात्री पटते.
[अगदी आजही हे गाणे अनेक स्पर्धा, सारेगमप, संगीत कार्यक्रम ई. मधून अनेक गायक गायचा प्रयत्न करतान दिसतात.]

३. आनेवाल पल जानेवाला है (गोलमाल): चित्रपटात हे गणे अर्धे थेट/प्रत्यक्ष व अर्धे ड्रिम सिक्वेंसं अशा स्वरूपाचे आहे. गोलमाल हा 'कायम' निखळ करमणुक देणारा चित्रपट. नविन गोलमाल (रोहीत शेट्टी कृत) मधल्या अ‍ॅक्रोबॅटिक्स ने जितकी मजा आणली नाही त्याच्या कईक हजार पट अमोल पालेकरच्या निव्वळ (खोट्या) मिशांनी आणली ईतका अभिजात व जातीवंत सुंदर असा हा विनोदीपट. त्यात अमोल पालेकर साठी किशोरदा गाणार म्हणजे खरे तर माहेरची साडी च्या प्रमुख भूमीकेसाठी कटरिना ला घेण्यासारखे आहे. खेरीज पंचम चे संगीत. काही केल्या पालेकर, पंचम, किशोर ही तिकडी तितकीशी फिट वाटत नाही पण तरिही याच तिकडीने पडद्यावर साकारले हे एक नितांत सुंदर गीत- "आनेवाला पल जानेवाला है... " गाण्याची सुरुवात होते सॅक्सोफोन व ब्राँस समूह वाद्याने, जोडीला तो खास 'पंचम बिट'- झिक तांग झिकी झिक तांग.. पुन्हा एकदा पहिल्या काडव्याच्या आधी सॅक्सोफोन चा तुकडा.. दुसर्‍या कडव्याच्या आधी पुन्हा एकदा खास पंचम स्टाईल गिटार तुकडे (बेस व स्ट्रींग), जोडीला व्हायलीन, सॅक्सोफोन, व ब्रांस सेक्शन. आणि या सगळ्यात पालेकर भाऊंसाठी नेहेमीपेक्षा थोडासा सॉफ्ट आवाज करून गायलेले किशोरदा, थोडक्यात संपूर्ण गाणे एक परीपूर्ण अनुभव ठरते.

४. कुछ ना कहो - कुमार सानू व्हर्शन(१९४२ लव्ह स्टोरी): या चित्रपटा आधी हिट चित्रपट आले होते पण गीत संगीत या नावाने मात्र सर्व बोंब होती. ढिंच्याक, डिस्को, लाऊड अशा अनेक प्रकारचे संगीत कानावर आदळत होते. अधून मधून राजश्री प्रॉडक्शन्स चे घरेलु व चांगले संगीत आणि डझनवारी गाणी असलेले काही चित्रपट, साजन, आशिकी सारखे चांगली गाणी असलेले काही अपवादात्मक चित्रपट सोडले तर एकंदर चित्रपट संगीत बहुतांशी गलीबोळात, टपर्‍यांवर, रिक्शात, ई. ठिकाणी वाजवायच्या लायकीचे येत होते. अजूनही त्याकाळचे ते "देखा है पहेली बार साजन की आंखो में प्यार... आणि त्या नंतरचे ते ट्या ट्या ट्या ट्या... म्युझिक कानात घुमते. अधुन मधून जो जिता वही सिकंदर, खिलाडी सारख्या मेलडीज येत होत्याच पण मेलडी, शब्द, आशय, संगीत ई. 'ठासून' भरलेलला एकही बार नव्हता. सर्वच गाण्यांची "दृष्य व्हॅल्यू" मात्र लय भारी अशी होती. आणि १९४२ लव्ह स्टोरी आला, 'पंचम' संगीतकार म्हणून. आम्हाला तेव्हडे पुरेसे होते. आणि चित्रपटातील प्रत्त्येक गाणे अक्षरशः जुन्या पंचम ची आठवण करून देत होते (अमर प्रेम, कटीपतंग वाल्या). पैकी 'कुछ ना कहो' या गीत रचनेत पियानो हा मनिषा (कोईराला) च्या कानातील मोती पडल्यापासून जो सुरू होतो तो अख्ख्या गाण्याचा सोबती होतो. टिपिकल जॅझी कॉर्ड्स प्रोग्रेशन असून देखिल त्यात मध्ये वापरलेले पॉझ, अगदी छोट्या जागा भरण्यास वाजलेले फ्ल्युट/बासरी (रोणू मुजूमदार), व्हायलीन संच, सींथ साऊंड, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे डॉल्बी डीजीटल ध्वनीमुद्रण. संपूर्ण गाण्यात कुठेही रिदम्/ठेक्याचा आताताईपणा नाही... जितक्या नाजूकपणे गाणे सुरू होते तो नाजूकपणा कायम रहातो.. कुठलेही मुख्य तालवाद्य नाही... निव्वळ गिटार कॉर्ड्स, पियानो यावर गाणे फुलत जाते.
या गाण्याच्या सुरुवातीचा बासरीचा तुकडा व मधले मधले छोटे जागा भरण्यास वाजवलेले तुकडे याबद्दल रोणू मुजूमदार एक गमतीशीर किस्सा सांगतातः रेकॉर्डींग सुरू होणार होते.. रिहर्सल चालू होती पण या गाण्याचा नेमका 'फिल' बासरीत त्यांना पकडता येत नव्हता.. कारण मुळात खालच्या/खर्जातील धून त्यामुळे बासरी ऊगाच जास्ती ब्राईट वाजवून चालणार नाही.. शिवाय परत हे प्रेमगीत त्यामूळे नेमके वाजवावे काय या पेचात मुजूमदार पडले. त्यावर पंचम म्हणाला .."हे बघ एखादी आई आपल्या मुलाला हळूवार गोंजारते आहे असे समोर आण आणि तो भाव मनात ठेवून वाजव"! बस्स, ते ऐकले मात्र आणि बासरीला एक फोकस मिळाला..
सुरूवातीचा बासरीचा तुकडा लक्षपूर्वक ऐकल्यास "गोंजारल्याचा" भाव प्रकर्षाने जाणवतो. पण त्या बासरीच्या पहिल्या 'चार बार' (मात्र गट) मुळेच संपूर्ण गाण्याला एक 'मुलायम' स्पर्श प्राप्त होतो हे निश्चित.
त्यापूढे जाऊन मुजूमदार साहेबांनी पंचम ला विचारले- "बाकी गाण्यात तर बासरीला स्कोप नाहीये.. पण मी ईथे नुस्ताच बसण्यापेक्षा वाजवतो काही तरी.." त्यावर पंचम म्हणतो- "हरकत नाही, अगदी मुलायम वाजवत रहा तुझी बासरी कुठे खटकणार नाही हे 'मिक्सींग' बोर्ड वर संभाळतो.."
मुजूमदार म्हणतात "पंचम का काम ऐसे संग संग मिलके होता था... जो संग मे बजाया जाए वही संगीत!".

कुमार सानू ला ज्या प्रकारे पंचम ने या चित्रपटात गाऊन घेतले आहे तसे नंतर कुणी गाऊन घेतल्याचे मला तरी वाटत नाही. 'आशिकी' ची गाणी सानू साठी 'रेकॉर्ड ब्रेक' अनुभव असतील तर १९४२ लव्ह स्टोरी ची गाणी त्याच्यासाठी मूर्तीमंत माधुर्याचा अनुभव असावा. नंतर सानू फक्त नाकाने गायला..
या गाण्याचे चित्रीकरणही तितकेच मोहक व 'देखणे' आहे. विधू विनोद चोप्रा चा तो सेट नंतर खूप फेमस देखिल झाला होता. याच चित्रपटासाठी पंचम ला शेवटचा (मरणोत्तर) फिल्म्फेयर पुरस्कार मिळाला.
कमीत कमी ऑर्केस्ट्रा/वाद्ये पण अतीशय ठळक परिणाम, ईंपॅक्ट- एखादा जिनीयस संगीतकारच हे करू शकतो.

आणि अर्थातच हे गीत कायमचे मनावर कोरले गेले त्याला अजूनही एक कारण आहेच- ईंजिनीयरींग पदवी शिक्षणातील ती आयुष्यातील सोनेरी पाने- मस्त गृप मध्ये एकत्रीत जाऊन धिंगाणा, पिकनिक, एकत्रीत चित्रपट, ई. सर्व. त्या वयात सर्वच सोनेरी असतं नाही? "आज बहुतेक रिझल्ट लागलाय" असे चक्क (भित भित) घरी खोटे सांगून गृप मधल्या एका मैत्रिणी बरोबर हा चित्रपट बघायला गेलो. (त्या काळी पदवी शिक्षण वयात देखिल 'गर्लफ्रेंड' वगैरे गोष्टी कॉमन नव्हत्या बरं.. आमच्या सारख्या मध्यम वर्गीय कुटूंबात वाढलेल्या साठी तर नाहीच! ती फक्त आमच्याच गृप मधली आमची सर्वांची मैत्रीण होती एव्हडेच काय ते). बाकी मित्र मंडळींपासूनही आम्ही दोघांनीच चोरून एकत्रीत बघितलेला तो चित्रपट- यातच बरच काही आलं नाही का?
तर चित्रपट संपल्यावर तीच्या घरी गेलो.. (कॉलेजात मित्रांमध्ये एकत्रीत जायची सोय नव्हती!) तीचा तो प्रशस्त वरळी सी फेसिंग फ्लॅट, स्वता:ची वेगळी बेड रूम (!), घरी नोकर चाकर, पाय ठेवू तिथे संगमरवर, या अश्या सेटींग मध्ये मस्त कॉफीचे घुटके घेत तीच्या खोलीत बसलो होतो.. ("मम्मा मला डीस्टर्ब करू नको हा.." या तिच्या लाडीक विनंतीला तीच्या आईने अगदी हासत होकार दिला.. तेव्हाही मला तीचा हेवा वाटला होता. "do not distrub" या असल्या पाट्या आम्ही तोवर हॉटेलात व चित्रपटात पाहिलेल्या. घरात हे असले शब्द कुणीच कुणाला ऊच्चारायची रीत वा सोय नव्हती.). आणि मग आम्ही दोघेही तीच्या बेडरूम मधल्या खिडकीतून वरळी सी फेस कडे पहात व त्यावरून येणार्‍या वार्‍याचा आनंद घेत फक्त ऊभे होतो.. आणि मग तीने "ते गाणे म्हण ना.. कुछ ना कहो" अशी फर्माईश केली... मी आमच्या कॉलेजच्या कार्यक्रम व स्पर्धांमधून गातो हे तिला माहित होते. नुकतेच ताजे ताजे ऐकून आलेले असल्याने त्यावेळी माझ्यातल्या गायकाने सफाईदारपणे म्हटले देखिल.. "किती छान म्हणतोस.." तीने माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हटले.. आणि मग बराच वेळ आम्ही त्या खिडकीत ऊभे होतो.. नि:शब्द पण प्रचंड बोलके क्षण!!!!

रियालिटी चेकः तिच्या स्वताच्या बेड रूम मधिल १२ व्या मजल्यावरील संगे मरमर घरात येणारा वारा 'वरळी सी फेस' वरून येत असे आणि आमच्या घरी तळमजल्यावर रहात असल्याने हवा, प्रकाश या बाबतीत कायम बोंब होती. जिथे वाराच फितूर होता तिथे बाकी काय लिहायचे? Happy

पण आमची मैत्री कायम टिकून राहिली.. पंचम ने असेही काही जीवलग देऊन ठेवले आहेत याची जाणीव होते.

५. दो लफ्जों की है दिल की कहानी... (ग्रेट गॅंबलर). युरोप सहली ला जायचे म्हटले की मनात पहिले चित्र ऊभे रहाते ते व्हेनीस सारख्या शहराच्या मध्यभागातून ती 'गंडोला' बोटी मधली सफर. ईतका कायमचा परिणाम या एका गाण्याने आमच्या पिढीवर केलेला आहे. त्यातही जोडीदारीण झिनत सारखी असेल तर 'जन्नत'.! हे गाणे पडद्यावर जित़के मोहक व्हेनीस च्या लॅंडस्केप मूळे दिसतेच तितकेच मादक व सुंदर दिसते ते अमिताभ व झिनत च्या जोडीमूळे. त्यातही या गाण्यातील दोघांची केमिस्ट्री काही औरच आहे. आणि त्यांच्यामागे तो टिपिकल टोपी घालून हे गाणारा तो मनुष्य- "आमोंरे मियो..." एरवी दोन प्रेमी युगुलात हा तिसरा का कडमडतोय असे 'कट्टा' प्रश्ण डोक्यात येतील पण युरोप ची बातच काही और आहे बॉस! तिथे दुसरा कुणाबरोबर आहे पेक्षा 'आपण कुणाबरोबर' आहोत याला महत्व आहे. त्यामूळे या असल्या बाबतीत "चोंबडेपणा" करायची गरज त्या "तिसर्‍याला" भासत नसल्या सारखा तो बेफिकीर दिसतो. म्हणून तीघांचे ते पडद्यावरील एकत्रित चित्र परफेक्ट वाटते.
असो. तर गाण्याची सुरुवात 'मंडोरा' या खास युरोपियन वाद्याच्या तुकड्याने होते.. त्याची खाशीयत अशी की एकाच वेळी दोन तीन गिटार व मँडलिन एकत्रीत वाजत आहे असा भास होतो. तो अख्खा सुरुवातीचा तुकडा त्या अजरामर गाण्याची सिग्नेचर आहे जणू. आणि मग खुद्द पंचम ने (?) गायलेले "आमोंरे मियो... " शब्दफेक, सूर, वजन सर्वच कसं १००% अचूक! मात्र हे "शरद कुमार" नमक कुणि गायकाने गायले आहे असे "अधिकृत श्रेयनामावलीत' लिहीले आहे. आणि मग आशा ताईंच्या आवाजातील संपूर्ण गीत. अख्खे गाणे गंडोला मध्ये चित्रीत आहे तेव्हा नेहेमीप्रमाणे नाय्क नायिकेला झाडाभोवती गिरक्या घेणे, पकडा पकडी, नुसतेच हातात हात घालून चालणे, असल्या गोष्टींना वाव नसल्याने मुखडा व कडव्यामधिल म्युझिक तुकडे देखिल तितकेच मोजक्याच लांबीचे आहेत हेही विशेष! वाद्येही फारशी वापरलेली नाहीत. मंडोरा, सिंथ साऊंड, आणि व्होकल हार्मनी निव्वळ एव्हड्यावर मात्र गाण्यात माधुर्य, मूड, भावना सर्व ओतप्रोत भरलेले आहे.

६. तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नही.. (आंधी): मी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहिलेला नाही मात्र नंतर केबल वा डिव्हिडी वर अनेकवेळा बघितला आहे. स्पष्टच सांगायचं तर निव्वळ गाण्यांसाठी बघितला. संजीव कुमार ऊर्फ 'ठाकूर' ग्रेट आहेच पण ते सुचित्रा सेन चे मुद्राभिनय अगदीच नको वाटायचे, त्यामूळेही असेल.
याही चित्रपटातील खरे तर सर्वच गाणी खास आहेत पण 'तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा..' हे असफल प्रेमगीतातील सर्वात मानाचं गाणं आहे असे म्हणायला हरकत नाही. दोन्ही अर्थाने मानाचं- म्हणजे नायकाने स्वाभिमान तर सोडलेला नाही आणि असफल प्रेमातील व्यक्तीच्या मनात हेच शब्द येत असावेत ईतके आशयघन काव्य आहे. संगीत रचना करताना एकंदर शब्द, आशय, मूड, रात्रीची वेळ हे ध्यानात घेऊनच अगदी रातकीड्यांच्या कीर्र आवाजाला, त्या टोन पुरक असल्यासारखी वाद्यरचना आहे. व्हायलीन, सितार, अ‍ॅकॉर्डीयन अशी त्या अनुशंगाने वरच्या सुरांसाठी पोषक व एकंदर 'आर्त' मूड राखणारी वाद्ये. आणि मला सर्वात ठळकपणे जाणवलेली गोष्ट म्हणजे गायकांच्या आवाजाला नेहेमीपेक्षा अधिक जास्त वापरला गेलेला 'एको ईफेक्ट', थोडक्यात आवाज घुमणे. एका निर्जन लेण्यांमध्ये नायक व नायिका भेटत आहेत बहुतेक त्याला अनुसरून हे केले असावे असे वाटते. अन्यथा लताच्या बाकी ईतर कुठल्याही 'मेलडी' पूर्ण गाण्याला पंचम ने एव्हडा 'एको ईफेक्ट' दिलेला आठवत नाही.
पुनः एकदा हे गाणे कायमचे मनावर कोरले गेल्यामागचा किस्सा अधिक गमतीदार आहे. तर ऊसगावला आमचा एक बंगाली रुमी होता.. तो स्वत:ला 'अमर प्रेम व आनंद' मधला राजेश खन्ना समजायचा त्यामूळे सर्वांना 'बाबू मौशाय' वगैरे हाका मारत असे. मराठी माणसाला 'गणपती' तसे याला 'किशोर दा' होते. खेरीज किशोर कुमार ची जवळ जवळ सर्व गाणी ही गीतकार, संगीतकार, चित्रपट, ई. सकट पाठ. विकांताला याचा आवडीचा ऊद्योग म्हणजे ३० मिनिटे अभ्यंग स्नान- आणि आतून न थांबणारी रेडीयो समालोचनासारखी कॉमेंट्री-.. "अभी आप सुनेंगे किशोर दा का गाया अमुक अमुक फिल्म का गाना..." सुननेवाले है, ईलेक्ट्रिकल ईंजीनियरींग से अमुक तमुक... अशी डीपार्टमेंट व मित्रांची नावे..." असे रेडीयो समालोचक असल्यागत याचे चालू असायचे. आणि न चुकता त्याचा एक आवडता भाग यायचा- "आंधी" मधिल तेरे बिना झिंदगी हे गाणे... लता ची कडवी संपली (गाणी आत तोच म्हणायचा) की हा आतून ओरडत असे- "अब ईसके बाद दादा (किशोर दा) एंटरी लेते है और गाना अचानक १४००० फूट ऊंचाईसे ३०,००० फूट पे ऊडने लगता है..."
बस्स! दर विकांताचे हे समालोचन आमच्या २ वर्षाच्या सहवासाचा एक हाय पॉईंट होते आणि नकळत हे एक गाणे त्यामूळे 'हाय पॉईंट' देखिल झाले.

७. झिंदगी के सफर मे गुजर जाते है (आप की कसम): हे गाणे बर्‍यापकी लांबलचक आहे. कडवी, संगीत रचना सर्व मिळून तब्बल ७ मिनिटाचे गाणे आहे. अर्थात पडद्यावर नायकाच्या जीवनातील अनेक स्थित्यंतरे दाखवली असल्याने त्या अनुशंगाने "दृष्य लांबी' योग्य आहे. अगदी पहिल्या ठेक्यापासून टिपिकल 'पंचम बिट' घेऊन गाणे सुरू होते. त्यात वापरलेल्या रेलवे ईंजिनाचा आवाज्/ईफेक्ट, पहिला अख्खा वाद्य तुकडा पुढे येणार्‍या कडव्यांना आधीच एक 'पकड' बहाल करतो. आणि प्रत्त्येक अंतराच्या आधी बांधलेली वाद्य रचना, संगीत निव्वळ लाजवाब! पडद्यावरील नायकाच्या आयुष्यातील बदलते ऋतू, स्थित्यंतरे यांचे एक संपूर्ण भावनिक रोलर कोस्टर राईड ऊभे करताना पंचम ने वापरलेले/रचलेले संतूर, व्हायलिन, बासरी, गिटार या वाद्यांचे तुकडे आपल्या जागी एकदम चपखल आहेत. आणि सर्वांना एकत्रीत बांधणारा पंचम बीट. आपल्याकडे 'रेलवे' च्या जोडीने चित्रीत झालेली अनेक गाणी आहेत.. पण रेलवे च्या "कायमचा प्रवास", या बोधवाक्याच्या अनुशंगाने या गीत रचनेमध्ये त्याचा केला गेलेला वापर व संगीत साज याचा एकत्रीत परिणाम कायमचा मनाव्र कोरला जातो. आजही, अजूनही या गाण्याचे देखिल रिमीक्स केले जाते-संदर्भ वेगवेगळे असले तरिही.

८. पिया बावरी (खुबसूरत): खुबसूरत हा चित्रपट हृषीदांच्या अनेक सुंदर चित्रपटांपैकी एक. त्यातही या गीताचे चित्रीकरण, त्यात दादा मुनिंनी (अशोक कुमार) गायलेली सरगम, त्यावरील रेखाचा नाच, गीताचा मूड, ठेका, आणि आशाताईंचे गायन- सप्तसिंधू संगम असे याचे वर्णन करता येईल. अध्धा त्रिताल मध्ये बसवलेले 'बिहाग' (?) रागातील हे गीत त्याच्या शास्त्रीय मूळापासून फारकत न घेता खुलत जाते. मात्र अगदी पहिल्या अंतर्‍यापर्यंत शास्त्रीय ठसा असताना अचानक दुसर्‍या अंतर्‍याच्या आधी संपूर्ण ठेका, चलन अगदी सहज 'पंचम बीट' मध्ये रूप बदलते. आशा ताईंच्या गळ्यातील हरकती, रेंज, सर्वच या गाण्यात कसोटीवर ऊतरते. काही ठिकाणी, विशेषतः मध्य द्रुत लयीत आलाप्/हरकत घेताना काही ठिकाणी त्यांच्या (लँडींग) नोट्स देखिल हलक्याश्या ऑफ गेल्यात असे वाटते- या वरून कदाचित हे गाणे त्यातील ऊस्फूर्तता कायम ठेवण्यासाठी संपूर्ण एकाच टेक मध्ये केले गेले असावे असा माझा अंदाज आहे. अर्थात, संपूर्ण गीत ज्याप्रकारे आशा ताईंनी गायले आहे त्याला तोड नाही. सूर लागेपर्यंत घोळवत बसणे किंवा फुलवणे ईतका वेळ चित्रपट गीत गायन वा सादरईकरण यात नसतोच. भाव, शब्द, सूर, लय, ई. सर्वच अंगे त्या ५ मिनीटाच्या गाण्यात 'फुलवणे' व अचूकपणे सादर करणे , थोडक्यात कमीत कमी वेळात जास्ती जास्त परिणाम हे असे गणित जुळवणे अगदी शास्त्रीय बैठक असलेल्या भल्या भल्यांना जमत नाही हे मी आजवरच्या अनेक प्रत्यक्ष अनुभव, ऊदाहरणांवरून सांगू शकतो. शास्त्रीय बैठकीचे संतुलन राखत एखादे चित्रपट गीत कसे गावे याचे प्रत्त्यक्षिक म्हणजे हे गाणे आहे असेच मला वाटते. आणि आजही हे गाणे अनेक स्पर्धा, कार्यक्रम, ई. मधून "कसोटी" म्हणून सादर केले जाते.

९. प्यार हमें किस मोड पे ले आया (सत्ते पे सत्ता): खालच्या सप्तकातून सुरू झालेले गाणे वरच्या सप्तकात संपते. शैलेंद्र, किशोर, पंचम या तीघांनी मिळून अक्षरशः धुमा़कूळ घातला आहे या गाण्यात. या गाण्याचे संगीत, वाद्यमेळ, सुरुवातीचा मंद ठेका, त्याचे पडद्यावरील तितकेच चपखल चित्रीकरण या सर्वामूळे हे गाणे एक ऊत्कृष्ट समूहगीताचा अनुभव देते. त्यातील 'बत्तीया बुझादो.. बत्ती तो बुझादे यार..' हे बोल अनेक हॉस्टेल्स मध्ये, अनेक प्रकारे, अनेक संदर्भात, अने़कांनी, अनेक वेळा गायले असतील यात मला तिळमात्र शंका नाही. त्या अर्थाने या गाण्याला 'मेरे सपनोंकी रानी कब आयेगी तू' या गाण्याईतकेच अपिल व तरूणाईची ओळख लाभली आहे असे म्हणता येईल.

१०. मेरा कुछ सामान (ईजाजत): या गाण्याबद्दल लिहायला शब्द अपुरे आहेत.. हे संपूर्ण गाणे हा एक 'अनुभवाचा' भाग आहे. निवळ शब्द पाहिले तर नुसतेच गद्यातील पत्र (पडद्यावर गाणे खरे तर नायिकेने नायकाला लिहीलेले एक पत्र म्हणून समोर येते). पण शब्दांतून जो अनुभव व अभिव्यक्ती मांडायची आहे त्याला तितकेच तोडीस तोड पुरून ऊरलेले संगीत. 'एक सो सोला चांद की रातें.. एक तुम्हारे कांधे का तिल..' किंवा 'गिला मन शायद बिस्तर के पास पडा हो..' ही समजावण्यची नव्हेच तर अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि तितकी ऊत्कट अनुभूती असेल तरच ती मनाच्या गाभातून वाद्य, संगीत साजाच्या स्वरूपात प्रकट होऊ शकेल. मग त्यावर कलाकारांनी केलेला अभिनय निव्वळ त्याला एक 'जिवंत चेहेरा' देतो- मात्र, काळजाचा ठाव घेणारे शब्द व संगीत याच्या स्वरूपात या गीताच्या आत्म्याने आधीच जन्म घेतलेला असतो.

पंचमची ही वरील ऊत्कृष्ट दहा गाणी लिहील्यावर हे जाणवले की ईतर अनेक ऊत्कृष्ट व मैलाचा दगड ठरलेली गाणी लिहायची राहूनच गेली आहेत. अक्षरशः नाणेफेक करून पुन्हा त्यातील १० निवडावी लागतील कारण प्रत्त्येकाचे वैशिष्ट्य, खुबी, अपिल, संदर्भ वेगळे आहेत, काही कालातीत आहेत तर काही आजही नव्याने समजत आहेत. पैकी खालील गाण्यांचा ऊल्लेख करता येईलः
१. आयों कहां से घनश्यामः मन्नादांची 'मधुघट' गायकी, अगदी निव्वळ मेलडी..
२. लकडी की काठी: कुठल्या लहान मुलाने हे गाणे ऐकले/गायले नसेल..?
३. ये शाम मस्तानी
४. हम किसी से कम नही मधिल मेडली
५. कहीं करती होगी वोह मेरा ईंतजार (मुकेश व लता)
६. सनम तेरी कसम
७. ये दोस्ती हम नही तोडेंगे (यातील अजरामर झालेली डबल सिटर स्कुटर!)
८. मै शायर बदनाम
९. तू है वही दिल ने जिसे अपना कहा
१०. तुमसे मिलके (परिंदा)
११. हुजूर इस कदर भी ना ईतराके चलिये
१२. ये लडका हाये अल्ला कैसा है दिवाना
१३. ये जवानी है दिवानी
१४. मैने तुझे मांगा तुझे पाया है
१५. हमें और जीनेकी चाहत ना होती अगर तुम ना होते
१६. दिये जलते है
१७. ओ हंसनी..
...

'घर', 'सागर' या चित्रपटातील सर्वच गाणी देखिल या यादीत घालता येतील.

पंचम ची तुम्हाला आवडलेली गाणी, शक्य झाल्यास त्यामागची कारणे, गुणवैशिष्ट्ये या सकट तुम्ही या लेखाच्या प्रतीसादात लिहावी अशी विनंती.

पंचम वरील लेखमालिकेत खरे तर अजून दोन भाग (४- पंचम वरील फेमस वाक्ये, संवाद.. ५- आजचे संगीत व एकंदर आढावा) लिहीन असे म्हटले होते. पण एकूण तीन भागात बर्‍याच गोष्टी, बर्‍याच अंगाने लिहील्या गेल्या आहेत असे वाटते. पंचम च्या कामातून पंचम ही व्यक्ती, त्याचे विचार ई. बर्‍याच अंशी प्रकट झाले आहे, समोर आले आहे असेही मला वाटते.

तेव्हा ही लेखमालिका ईथेच संपवतो. बाकी, कमी अधिक तुम्ही पोटात घालालच आणि काही ऊणीव राहिली असेलच तर ती तुमच्या येथिल प्रतीसाद वा ईतर पंचम वरील लेखनातून भरून काढाल अशी खात्री आहे. लेखमालिकेतील तिनही भाग आवर्जून वाचून वेळोवेळी प्रोत्साहन, चुका दुरूस्ती ई. निदर्शनास आणून दिल्याबद्दल सर्व वाचकांचे खास करून 'पंचम पूजकांचे' अनेक आभार!

मायबोलीवरही पंचम बद्दल ईतर अनेक सुंदर लेख लिहीले गेलेले आहेत. ते सर्वच मुद्दामून शोधून वाचावेत असे मी सुचवेन. पैकी, 'आगाऊ' ने लिहीलेला हा संक्षिप्त लेख मला अतीशय आवडतो: http://www.maayboli.com/node/5189
'प्रशांत द वन' यांनी लिहीलेला हा लेख देखिल अतीशय माहितीपूर्ण आहे:
http://www.maayboli.com/node/16420
मायबोली व्यतिरीक्त रेडिफ्.कॉम वर हा पंचम ची टॉप ३० गाणी असलेला लेखः
http://www.rediff.com/movies/slide-show/slide-show-1-special-the-30-best...

शेवटी एव्हडेच लिहीतो- पंचम जगा, पंचम जागवा.

[समाप्त].

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेरा कुछ सामान फार थोडक्यात गुंडाळले आहेस! त्यातल्या संतूरबद्दल अजून वाचायला आवडेल.
'तेरे बिना जिंदगीसे शिकवा' हे चालीवर लिहिलेले गाणे आहे...केवळ अशक्य वाटते ही गोष्ट.
"कुछ तो लोग कहेंगे" या गाण्यातील अस्वस्थ करणारा ठेहराव तर "जय जय शिवशंकर" मधील बेहोष करणारा ठेका या दोन्हितील मध्यबिंदू म्हणजे "ये जो मुहब्बत है" चा संगीतसाज वाटतो. >>> अप्रतिम निरिक्षण, व्हायोलिनचा 'झोल' इफेक्ट मस्त सांगितला आहेस.

धन्स रे आगावा Happy
आवश्यक ते बदल केले आहेत... पण ते "आमोंरे मियो.." पंचमचेच बरे का- हम नही मानेंगे! Happy (नाहीतर शरद कुमार पंचम ची अगदी हुबेहूब नक्कल सुंदर करतो असे म्हणायला हवे)

मी ही लगेच आवश्यक बदल केले रे!!!
माझेही टॉप टेन, खरे तर पंचमच्या बाबतीत असे काही करणे निरर्थक आहे, पण तरीही...
१] रैना बिती जाए
२] क्या जानूं सजन
३] पिया बावरी
४] मौसम प्यार का
५] आपकी आंखों में कुछ
६] फिरसे आइयो बदरा बिदेसी
७] रोज रोज आंखोंतले
८] दम मारो दम
९] आओ ना गले लगाओ ना
१०] शोले टायट्ल ट्रॅक/ सागर थीम

खूप दिवस लेखाची वाट बघत होते. तो आला. अपुनका बी सेम टुसेम पण मेरा कुछ सामान आवड्त नाही ते रचने मुळे नाही तर त्या वैताग गर्लफ्रेंड मुळे.

इस मोडसे जाते है. माझे आंधीतले सर्वात आवड्ते. असफल प्रेम वगैरे मी मानतच नाही. एकाकडून तरी ते खरे प्रेम असतेच. म्हणून हे प्रेमाचे गाणे आवड्ते. रचना मृदू आणि मधुर आहे.

हम किसीसे कम नही मधील काँपिटिशन अगदी अगदी. कव्वाली पण.

यादोंकी बारात मधले आप के कमरे में कोई रहता है. हरे रामा मधले आय लव्ह यू. किती जोश आहे त्या गाण्यात. उषा उत्थुप अगदी खेचून नेते आपल्याला. अमरप्रेम, घर अग्दी अगदी. मेरे जीवन साथी पण खास. कितने सपने कितने अरमा, दीवाना लेके आया है, ऐ मेरे दिल के चैन.

मुसाफिर हूं यारो. परिचय मधले. मग किताब मधील धन्नो की आखोंमे.

नदिया से दरिया. नमक हराम मधले. शोलेची टायटल ट्यून. अजून लिहायचे आहे.

>>पण मेरा कुछ सामान आवड्त नाही ते रचने मुळे नाही तर त्या वैताग गर्लफ्रेंड मुळे.
Happy
घ्या! तीच तर खरी 'हीट' होती त्या अख्या चित्रपटात.. Happy

मस्त लेख! माझी टॉप टेनची लिस्ट वेगळी आहे अर्थात! त्याबद्दल मी नंतर लिहीन कारण विचार करणं आलं Wink

सुंदर लेख.गीतांची निवडही आवडली.अश्विनीमामीच्या प्रतिसादातही उरलेले महत्त्वाचे मुद्दे आले.
पण,
>>दिग्दर्शक, संगीतकार, गायक, अभिनेता, तंत्रज्ञ मंडळी यांच्या एकत्रीत प्रयत्न व देवाण घेवाणीतून जेव्हा एखादी निर्मिती होते तेव्हा ती अधिक सच्ची प्रामाणिक व मोहक वाटते >>
..तेवढा एक 'गीतकार ' शब्द मात्र राहिला या यादीत. तिथूनच तर सुरुवात होते गीताच्या आनंदयात्रेची.

पंचम च्या बाबतीत टॉप टेन शक्यच नाहीये.:-)
भर म्हणुन
मेरे नैना सावन भादो
इस मोडसे जाते है
नाम गुम जायेगा
रोज रोज आखो तले
छोटीसी कहानीसे बारीशोके पानीसे

शैलेंद्र, किशोर, पंचम या तीघांनी मिळून अक्षरशः धुमा़कूळ घातला आहे या गाण्यात>>>>>>
तुम्हाला भुपेंद्र, किशोर, पंचम म्हणायचे होते का?

बाकी लेख नेहमीप्रमाणे सुरेखच! एक वेगळा सेक्शन बनवता येइल का या लेखांचा? म्हणजे हवा तेव्हा उघडुन वाचता येइल?

१) हम किसीसे कम नही मधले डांस काँम्पीटीशन्स = ६ गाण्यांचे मिळुन एक गाण्यांचा समुह बनवलेला..सगळी गाणी विविध प्रकारची. मधले ऋषी कुमारचे सेक्सोफोन वरची ट्युन आणि शेवटची गिटार ची ट्युन छान जमली आहे

२) कतरा कतरा: इजाजत.- अभिनेत्रीच्या मनात असलेले द्वंद असलेले गाण्यात एकच आवाज आशाताईंचा दोन वेगवेगळ्या सुरात (लेव्हल) वापरुन ...ते द्वंद स्पष्ट केले आहे..
.
३) कुछ ना कहो.: १९४२ अ लव्ह स्टोरी :- अतिशय सुंदर शांत .. रात्री झोपताना लाईट्स मंद करुन ..हेडफोन लावुन ऐकल्यावर वेगळाच "फिल" येतो..

४) आजा मेरी जान : हा अत्यंत पडेल चित्रपट होता. किसन कुमार चा ;).. परंतु गाणी जबरदस्त होतीत...याचे टायटल साँग हे " सागर" चित्रपटातील एका बॅकग्राउंड म्युझिक पीस वरुन घेतलेले आहे....

५) मेरे नैना सावन भादो : अतिशय उच्चकोटीचे गाणे.. या गाण्याला गाण्यास सुरुवातीला किशोर कुमारने नकार दिलेला.. त्याने आधी लताताईं नी गायलेले गाणे ऐकले.. मग हे गाणे घेतले

६) बस मेरे यार है..बस यही प्यार है = सागर.. अजुन एक सुंदर गाण...सुरुवातीला कंगव्याचा आवाजाला जसा वापरला आहे ते ऐकुन आम्ही लहानपणी कंगवा घेउन दातांवर वाजवुन तसे वाजवण्याचा प्रयत्न करायचो..

खूपच आवडला लेख. आरडीचं झिंग आणणारं आणि खोल गहीरं संगीत हा जीव कि प्राणच. सुरूवातीला तुफानासारखं झंझावाती संगीत देणा-या आरडीला गुलजारने हळूवार बनवलं. आरडी - गुलजार कॉम्बिनेशन ही रसिकांची पर्वणीच बनली. या जोडगोळीची जवळ जवळ सगळीच गाणी आवडतात. पण आरडीने गुलजार साठी केलेलं आणि सर्वात आवडलेलं संगीत हे इजाजतचंच. गाण्याचे शब्द जितके देखणे तितकीच त्या शब्दांना साजेल, खुलेल आणि तरीही मनभावन अशी चाल प्रत्येक गाण्याला आहे. मेरा कुछ सामानचा किस्सा तर प्रसिद्धच आहे. आरडीला काही पत्रकारांनी विचारलेलं कि तू कुठल्याही गाण्याला चाल लावू शकतोस ? आरडी म्हणाले गाण्यालाच का ? कशालाही. मग दुस-याने विचारले कि वर्तमानपत्रातल्या बातमीलाही ? आरडींनी हसून होकारार्थी मान हलवली. झालं पत्रकार म्हणजे दुसरे नारदमुनीच असतात. त्यांनी हे गुलजारला ऐकवलं. गुलजारने मग एक निबंध लिहून काढला आणि आरडीला विचारलं कि याला चाल लावून दाखव.. ते अगदीच गद्य लिखाण पाहूनही आरडींनी लगेचच पहिल्या दोन ओळींना जी चाल लावली ते पाहून गुलजारकडून पुढच्याच क्षणाला पुढची कडवी तयार झाली.. तो निबंध होता

मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है......

दोघेही ग्रेट !!

याच सिनेमात आशाच्या आवाजाचा विलंबित कोरसचा केलेला वापर अफलातून ! त्यावेळी बहुधा डिजीटल रेकॉर्डिंग नसतानाही आरडीने केलेला तो प्रयोग आहे.
आणखी काय लिहू ?

होठों में ऐसी बात मै दबाके चली आयी.. या गाण्याचं म्युझिक आरडीनेच अ‍ॅरेंज केलंय असं ऐकलंय. हे खरं असेल तर आरडींबद्दलचा आदर आणखीनच वाढतो.

मस्त रे योग. फक्त तुला अशी टॉप टेन ची लिस्ट करवलीच कशी असा प्रश्न पडत राहतो. अगदीच कनपट्टीला कोणी बंदूक ठेवून विचारलेच तर फार तर मी एव्हढेच म्हणू शकेन कि गुलजार-पंचम ही जोडी माझ्यासाठी अधिक आवडती पण बस्स तेव्हधेच. Happy

माझे टॉप ८:
१. फिरसे आइयो बदरा बिदेसी
२. क्या जानु सजन
३. कुछ ना कहो
४. रिमझिम रिमझिम
५. रिमझिम गिरे सावन (लता मंगेशकर व्हर्जन)
६. एक लडकी को देखा
७. तेरे बिना जिंदगी से कोई..
८. रैना बिती जाये
इतकेच आठवले..

मस्त लेख ..

ह्या लेखमालिकेमुळे पंचम नव्याने अनुभवता आला ..

हा लेखनप्रपंच केल्याबद्दल धन्यवाद .. Happy

>>मस्त रे योग. फक्त तुला अशी टॉप टेन ची लिस्ट करवलीच कशी असा प्रश्न पडत राहतो.
ह्ह्ह्म्म्म प्रश्ण योग्य आहे..पंचम च्या बाबतीत टॉप टेन अशक्यच आहे. तरिही एक प्रयत्न केला एव्हडेच, आणि वर लिहील्याप्रमाणे काही गाणी वैयक्तीक पार्श्वभूमीमूळे कायमची लक्षात राहिली हेही खरे.

>>होठों में ऐसी बात मै दबाके चली आयी.. या गाण्याचं म्युझिक आरडीनेच अ‍ॅरेंज केलंय असं ऐकलंय
हो खरेच आहे ते... किंबहुना दादा बर्मन यांची बरीच गाणी (कधी ते प्रकृती अस्वस्थ असताना, किंवा मुद्दामून पंचमला असिस्टंट चे काम म्हणून दिले गेले असताना) पंचम ने 'संपूर्ण' केली आहेत असे अनेक मुलाखतीत अशा ताई, पं शिवकुमार शर्मा, पं. हरीप्रसाद चौरसीया, ई. लोकांकडून ऐकले आहे.

गाण्यांची निवड चाहत्याप्रमाणे वेगवेगळी असणार >>> +१००...

पण संपूर्ण लेख - अप्रतिम. वेगवेगळ्या गाण्यांचे जे वैशिष्ट्य उलगडून सांगितले आहेस ते लाजवाब...

अप्रतिम लेखमाला!! मात्र पंचमच्या गाण्यांबाबत पहिली दहा किंवा पहिली शंभर अशी निवड करणं खूपच अवघड आहे.

अप्रतिम लेखमाला योग ....!!
खरं तर अशी १० गाणी निवडणंच फार कठीण काम आहे. प्रत्येकाची पंचम टॉप १० ची वेगळी लिस्ट होऊ शकते Happy
गाण्याबद्दल मस्त लिहिलं आहेस ....आवडलंच Happy

योग....

तुमच्या 'आर.डी. टॉप टेन' मधील मला भावलेले...जे आरडींचे सर्वोत्कृष्ट गीत ठरू शकण्यास सर्वार्थाने पात्र आहे.... गाणे म्हणजे "जिंदगी के सफर मे गुजर जाते है जो मकाम..." ~ आप की कसम.

या गाण्याविषयी तुम्ही जितके लिहाल तितके कमीच होईल अशीच माझी भावना आहे. संपूर्ण चित्रपटाची 'रामकहाणी' च आहे हे गाणे म्हणजे आणि तसेच नायकाला झालेला पश्चात्ताप....त्यामुळे होणारी त्याची तडफड....तगमग... वेदना.... ज्या रेल्वे इंजिनमधील ती धगधगणारी भट्टी प्रतिक म्हणून वापरली आहे.

"बिहाग" रागातील ही रचना {मारुबिहाग नव्हे....} वातावरणनिर्मितीसाठी अतिशय पोषक मानली जाते. हा राग मुख्यत्वेकरून गैरसमजुतीमुळे अलग झालेल्या "दोन जीवांचे पुनर्मिलन आणि सहवेदना" दर्शविण्यासाठी आळविला जातो... तद्वतच विरहाने होणारी तडफड दर्शविण्यासाठीही....['अनारकली' मधील 'मुहब्बत ऐसी धडकन है जो समझाई नही जाती...." हे लताचे गाणे "बिहाग" मधीलच]

तुम्ही रेल्वे प्रवासाचे अचूक वर्णन केले आहे. मला या गाण्याच्या चित्रिकरणाचे विशेष कौतुक करावेसे वाटते. रेल्वे, तो डबा, डब्यातून दिसणारे ते दृष्य, सुरुवातीला संथ गतीने होणारा प्रवास, खिन्नतेने वावरणार्‍या नायकाने शून्य नजरेने खिडकीतून बाहेर पाहत राहणे....गाडीने पकडलेला वेग....वेगात जात असताना लागलेला बोगदा...त्यावेळी आर.डी.च्या रचनेतील पटरीचा बदललेला आवाज...बोगद्यातून उघड्यावर आल्यावर पुन्हा त्याचा उंच पट्टीतील नैसर्गिक आवाज....साऊंड मिक्सिंगची ती अदभूत करामत 'जिंदगी के सफर मे...' गाण्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. तिच बाब ऋतूबदलांची..... तशीच नायकाच्या मानसिक तसेच बदलत्या खालावलेल्या शारीरिक स्थितीचीही.

काही गाणी ऑडिओ स्वरुपात भावतात तर काही व्हिडिओद्वारेही... पण 'आप की कसम' मधील आर.डी.स्पेशल हे गाणे दोन्ही माध्यमातून विलक्षण असेच असल्याने ते दृक, श्राव्य आणि अर्थ अशा बाजूंनी हृदयात घर करते.

आजही त्याला धक्का लागलेला नाही.

अशोक पाटील

>>काही गाणी ऑडिओ स्वरुपात भावतात तर काही व्हिडिओद्वारेही... पण 'आप की कसम' मधील आर.डी.स्पेशल हे गाणे दोन्ही माध्यमातून विलक्षण असेच असल्याने ते दृक, श्राव्य आणि अर्थ अशा बाजूंनी हृदयात घर करते.आजही त्याला धक्का लागलेला नाही.

ऊत्तम! +१००

अशोक जी,
<<'अनारकली' मधील 'मुहब्बत ऐसी धडकन है जो समझाई नही जाती...." हे लताचे गाणे "बिहाग" मधीलच]<<>>
I'm not sure!

एकदा कुठल्या तरी TV program मध्ये जावेद अख्तर ने सांगितले, की फिल्मी स्टाईल मधे कोणी जर त्याच्या कानाशी बंदूक लावून विचारले की 'हिंदी चित्रपट सृष्टी मधले एकच सर्वोत्तम गाणे निवड' तर तो 'जिंदगी के सफर मे' निवडेल!

Pages