बरेच झाले !

Submitted by राजीव मासरूळकर on 27 February, 2013 - 13:49

बरेच झाले

दुःखाने मी कधी न चळलो बरेच झाले
माझा मी ही मलाच कळलो , बरेच झाले !

भरात होता गंधोत्सव तव वसंतवेडा
अवचित मनभर मी दरवळलो , बरेच झाले !

समोर होत्या सोप्या लंपट वाटा तरिही
काट्यांमधून मी भळभळलो , बरेच झाले !

पाउस येता झडून गेला मोरपिसारा
मी ही थेँबांसंगे ढळलो , बरेच झाले !

पश्चिम झाली लालबुंद कुंकवासारखी
आणि अचानक मी मावळलो , बरेच झाले !

- राजीव मासरूळकर
दि .२.६.१२
रात्री १०.१५ वाजता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुगंधाळलो >>>अलामत बोंबललीयै की ........काल आमच्या उकाकाना बरे अलामतीच्या मुद्द्यावरून छेडत होतात ते ???
रदीफ कही निभावली गेल्यासारखी नाही वाटाली(हे वै. म. आहे जे चुकीचेही असू शकते ....चुकल्यास क्ष. !!!)

वैवकु,
उकाकांना छेडत नव्हतो हो मी. मी खरंच गोंधळलो आहे त्या बाबतीत. सुगंधाळलो मध्ये ती बोंबलली आहेच, त्यामुळेच वर तो शब्द प्रश्नार्थक दिलाय मी. पण त्यात यमक आहे. मतल्यात यमक आहे, पण पुढील शेरात नाही तेंव्हा काय असा माझा प्रश्न आहे.
तुम्हाला मी उकाकांना छेडतो आहे असं वाटलं याचंच मला आश्चर्य वाटलं.
धन्यवाद !

राजीव,
प्रांजळ अभिप्राय देतो, कृपया राग नसावा.
'बरेच झाले' ही रदीफ १, ४ या शेरांच्या आशयाला सुटेबल वाटली. बाकीच्या शेरात नाही.
पण सर्वच शेरांतून तुम्हाला काहीतरी चांगला आशय अभिव्यक्त करायचा आहे हे जाणवतं.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
अवांतर : राजीव आणि वैवकु,
माझ्या 'त्या' मतला चुकलेल्या (तथाकथित) गझलेवरून कृपया एकमेकाशी वाद घालू नका ही विनंती.
मतभेद असावेत पण वाद, वितंडवाद नकोत. जमेल तितका सुसंवाद असावा ही माझी नेहमीच इच्छा असते.

मी काफिया बाबत कन्फ्युज्ड आहे हे तिथे म्हटले आहेच. हे कन्फ्युजन होण्याची जी कारणे आहेत, ती बेफींबरोबरच्या वैयक्तिक चर्चेत त्यांना सांगून त्यांच्याकडून याबाबतचं शंकानिरसन करून घेणार आहे.
बेफींबरोबरच चर्चा का ? असा मुद्दा उपस्थित होऊ नये म्हणून आधीच स्पष्ट करतो की, माझ्या त्या रचनेवर 'काफिया' ची चूक त्यांनी निदर्शनास आणली, मला पटलीही आणि याबाबतीत मार्गदर्शन करण्यास ते
सक्षम आहेत याची मला खात्री वाटते.

भिडे सर , मनापासून आभार. सर, आमच्यात वाद नाहीच. कृपया, त्या चर्चेचा सारांश मला विपूत लिहून कळवावा. माझ्या मनातला गोंधळ दूर व्हायला त्यातून नक्कीच मदत होईल असं वाटतं.

छान पर्याय !!! आवडला

हा अनामिक गझलवेडा म्हणजे आपले सर्वांचे लाडके प्रा. सतीश देवपूरकर आहेत हे दिलेल्या पर्यायावरून मी खात्रीशीररित्या सांगू शकतो
(शितावरून भाताची परीक्षा :))

मलाही तशी शंका आली होती वाचताक्षणीच.
पण कुणी का असे ना , दिलेल्या पर्यायातील गंधोत्सव आणि दरवळलो हे शब्द मला आवडले. सुगंधाळलो मधून एक नवं क्रियापद जन्माला घालण्याच्या भानगडीत मी दरवळणे सारखा सहज वाटणारा थोड्या वेगळ्या अर्थाचा शब्द का वापरला नाही असं आता वाटत आहे.
'सुगंधाळलो'ची मजा 'दरवळलो'मध्ये नाही याचंही वैषम्य वाटणारच .
धन्यवाद .

पश्चिम झाली लालबुंद कुंकवासारखी
आणि अचानक मी मावळलो , बरेच झाले !<<< छान शेर आहे

(दुसर्‍या शेरातील अलामत - याविषयी वर बोलणे झालेलेच दिसते)

वैवकु,
>>>वा राजीव सर मला गझलेतले काही कळत नाही
आपण नेहमीच छान लिहिता मला आवडते .>>>

तुमचं अकाऊंट कुणीतरी हैक केल्यासारखं वाटलं.
मी प्रशंसेचा भुकेला नाही , हे कृपया लक्षात घ्या. खोटारडे प्रतिसाद देऊ नका .
तुमची टिका पचेल पण हे असलं नकोच.
मजा घेताय का ?
आणि हे नवीन काय राजीव सर वगैरे ?
मासरूळकरच बरं वाटतं मला तुमचं.

दुसरी द्विपदी खालीलप्रमाणे होती.

अवतीभवती गुच्छ फुलांचे खूप लगडले
अवचित मीही सुगंधाळलो, बरेच झाले !

अलामतभंग असल्याने तीत बदल केला आहे.

तुमचं अकाऊंट कुणीतरी हैक केल्यासारखं वाटलं.>>>>:हाहा:

मजा घेताय का ? >>>>>>>
अहो मासरूळकर थोडीशी गम्मत केली हो...... Happy

अनामिक गझलवेडा | 1 March, 2013 - 23:53 नवीन
रंगोत्सव व दरवळणे थोडेसे विजोड वाटते...................
दरवळणे म्हटल्यावर गंधोत्सव जवळचे वाटते!

<<<

१०० % सहमत

अनामिक गझलवेडा आणि बेफिकीरजी,
रंगोत्सव बद्दल सहमत. मला गंधोत्सवच लिहायचं होतं. पण संपादित करताना कशी चूक झाली न कळे. तो आता बदलला आहे. धन्यवाद.

अनिल आठलेकर सर , आपलेही मनापासून आभार !

दुःखाने मी कधी न चळलो बरेच झाले
माझा मी ही मलाच कळलो , बरेच झाले ! आफत....

पाउस येता झडून गेला मोरपिसारा
मी ही थेँबांसंगे ढळलो , बरेच झाले !

पश्चिम झाली लालबुंद कुंकवासारखी
आणि अचानक मी मावळलो , बरेच झाले ! सुन्दर....