अंड्याचे फंडे १ - रायटर अंड्या

Submitted by अंड्या on 26 February, 2013 - 12:10

रविवारची रटरटीत दुपार. कोण निघणार बाहेर त्या उन्हात. एकीकडे सारी दुनिया मस्त आरामात. आमचेच दुकान तेवढे खुले. म्हणून हा अंड्या तेवढा व्यस्त आपल्या कामात. अर्थात, दुकानात दुपारच्या वेळेला फारसे कोणी येण्याची शक्यता नसल्याने आराम हेच एक काम. पण भिंतीला तुंबड्या लाऊन बसेल तर तो अंड्या कसला. हल्ली फावल्या वेळेत माझे काही ना काही खरडवणे चालूच असते. दुकानाच्या दारात काऊंटरवर बसल्या बसल्या कधी मी आकाशातल्या पाखरांकडे बघून एखादी चारोळी रचतो, तर कधी समोरच्या चाळीतले एखादे पाखरू नजरेस पडल्यास त्याच कागदावर शेरोशायरी उतरते. पान भरभरून निबंध मी कधी शाळेतही लिहिला नव्हता. किमान १५० शब्दांची डिमांड असल्यास फार फार तर १५२ शब्दांचा सप्लाय करायचो. दोन जास्तीच्या मार्कांसाठी म्हणून चार अतिरीक्त ओळी खरडणे कधीही अंड्याच्या तत्वात बसले नव्हते. पण आजकाल आंतरजालावर लिहायची सवय लागल्यापासून अंड्याचे लिखाण फुल्ल फॉर्मात आले आहे. कारण कितीही फुटकळ लिखाण का असेना स्वताहूनच प्रकाशित करायची सोय असल्याने आणि काहीही खरडले तरी पाचपन्नास वाचक आणि दोनचार प्रतिक्रिया कुठे जात नसल्याने दिसला कागद-पेन कि बोटे नुसती शिवशिवायला लागतात.

तर सांगायचा मुद्दा हा की आजही असाच हा अंड्या दुहेरी ओळींच्या वहीत डोक्यात आलेला नवीन विषय शब्दांकित करत होता. आता हा नवीन विषय काय ते एवढ्यात विचारू नका, ते समजेलच पुढच्या लेखात, आणि दुहेरी बिहेरी वही नि काय असा प्रश्न मनात आला असेल तर तो देखील विचारायच्या आधीच सांगतो की त्याने अक्षर सुधारते असे म्हणतात. पण अक्षर सुधारणे म्हणजे कॉम्प्युटरची एक कळ दाबून फॉंट चेंज करण्याएवढे साधेसोपे नसल्याने गेले पंधरावीस वर्षे ते सुधारतेयच.

तर सांगायचा मुद्दा हा की हा अंड्या कानामात्रा एक करून पुर्ण एकाग्रतेने आपले लिखाण करत असताना तिथे एक गिर्हाईक आले. म्हटलं तर गिर्हाईक अन म्हटले तर वाडीतलेच काका जे बघावे तेव्हा या अंड्यालाच गिर्हाईक करत असतात. अमावस पुनवेसारखे महिन्याला दोनदा काय ते भेटतात पण बघावे तेव्हा एकच प्रश्न - काय अंडेराव, काय चालू आहे मग सध्या?

याच्या आधी माझे शिक्षण सोडून चार वर्षे झाली हे त्यांना चाळीस वेळा सांगून झाले तरी लहान मुलांना विचारल्यासारखे "कितवीला आहेस?" हा त्यांचा प्रश्न माझा पिच्छा काही सोडत नव्हता. पण सध्या माझ्या वाढत्या अंगाकडे पाहता अन हल्ली मी वाडीत फुल्लपॅंट घालून फिरायला लागल्यापासून त्यांनी प्रश्न तेवढा बदलला, मात्र तो विचारायची तर्‍हा नाही.

"कसले काय, तुम्हीच बघा त्या वहीत मारलेल्या रेघोट्या", दुकानातले मामा माझ्या डोक्यात टपली मारून अन काकांना चावी देऊन जेवायला बाहेर पडले. इथे चावी म्हणजे दुकानाची चावी नाही तर अंड्याच्या डोक्याची भुरजी करायला काकांना एक मुद्दा देऊन गेले.

"कसले रे आनंदा हे अक्षर, कोंबडीचे पाय जणू",

अंड्याने देखील आजवर कधी दावा केला नव्हता की त्याचे अक्षर म्हणजे मोतियांचे फुललेले ताटवे आहेत, पण कोंबडीचे पाय हि उपमा म्हणजे कायच्या काय राव. एखाद्या चिकन तंदूरी खाणार्‍यालाच ठाऊक कोंबडीच्या पायांतील सौंदर्य म्हणजे काय ते.

चालायचंच, तर सांगायचा मुद्दा हा की आता त्यांची गाडी माझ्या अक्षरावर घसरण्याआधी मीच स्वताहून माझी बाजू मांडत विषय रुळावर आणने गरजेचे होते आणि स्वताची इज्जत राखणेही. कम्पुटर जवळ असता तर सरळ एखादे मराठी संकेतस्थळ उघडून तिथे माझ्या नावासकट छापलेला लेखच दाखवला असता. सोबतीला ‘वाह बे अंड्या, छानच लिव्हलेस की’ छाप प्रतिसाद देखील न चुकता त्यांच्या डोळ्याखालून जातील याची काळजी घेतली असती. पण ते या घडीला शक्य नाही तर आता तोंडी परीक्षाच देउया म्हणून म्हणालो, "लिहितो आजकाल मी काका" (हा डायलॉग मारताना उगाचच शत्रुघ्न सिन्हासारखे उजव्या हाताने डाव्या छातीला बाम चोळल्यासारखे केले.)

"हो का.. दिसतेयच ते.. पण वाचता स्वत:ला तरी येतेय का?" काकांची नजर अजूनही माझ्या कोंबडीच्या पायांवरच अडकली होती.

आईशप्पथ या काकांच्या (हे मनातल्या मनात) पुढे शत्रूच्या स्टाईलमध्येच खामोश बोलावे असे ही क्षणभर वाटून गेले, "अहो काका, मी कॉम्प्युटरवर ईंटरनेट वापरून "मायमराठीबोलीभाषाडॉटकॉम" नावाच्या एका मराठी संकेतस्थळावर लिहितो."

"काय आहे हे ‘मामबोभा’ अन किती जण तिथे वाचतात?"

हायला हे बरंय, काकांना लगेच शॉर्टफॉर्म देखील जमला राव, असे मनातल्या मनात मी आश्चर्य व्यक्त केले आणि चेहर्‍यावर मोठेपणाचा आव आणत उत्तरलो, "तरी लाखभर वाचतात."

"हॅ हॅ हॅ..." इति काका.

नक्की ‘ह’ च्या बाराखडीतले कोणते मूळाक्षर मांडावे याबाबत अंड्या किंचित द्विधा मनस्थितीत पण ते असेच काहीसे नाटकीय हसले.

मनातल्या मनात "ओ काका कशाला उगाच चावतायत" अन प्रत्यक्षात "अहो काका खरेच एवढे जण वाचतात" इति अंड्या.

"छ्या, काहीही बोलू नका अंड्याशेठ. भारताची लोकसंख्या काय, त्यात मराठी माणसाचा टक्का तो केवढा, त्यातही वाचनाची आवड हल्ली कोणाला, वेळात वेळ काढून ती जपणारे कितीसे, वृत्तपत्र वगळता इतर सटरफटर कथा कादंबर्‍या वाचणारे किती, अन भेटलेही असे काही तरी त्यापैकी कॉम्प्युटर आणि ईंटरनेट किती जणांकडे असेल नसेल, जे काही असेल त्यांची संख्या हजारात तरी जाईल का? अन गेली तरी त्यांना जगातले सारे विषय वाचायचे संपले म्हणून ते तू लिहिलेले वाचायला येतील का? म्हणे लाखभर वाचक..... हॅ हॅ हॅ..."

"अहो काका... ओ काका... ओ ऐका ना.. अहो जगभरातून, ईंग्लंड अमेरिका चीन जपान अन कुठून कुठून मराठी लोक वाचायला जमतात. एकदा तुम्हीही या, वाचून तर बघा.. ओ काका..." माझ्या लिखाणाच्या उत्साहावर चूळ मारून जाणार्‍या काकांच्या पाठमोर्‍या मुर्तीला मी काकुळतीला येऊन हाका मारत होतो.. पण ऐकतील ते काका कसले. "काका मला वाचवा" बोलणार्‍याचे ऐकले नाही तर "काका माझे वाचा" बोलणार्‍याला ते दाद देणार आहेत होय. अजून दोनचारदा "काका काका" अश्या हाका मारल्या तर "काक: काक:" असे ऐकून उगाच कावळे जमा व्हायचे या भितीने मग मीच आवरते घेतले.

काका गेले आणि पाठोपाठ माझ्या लिखाणाचा या भूतलावरील पहिला अन आतापर्यंत तरी एकलाच असलेला पंखा दिगंबर धायगुडे दुकानात आला. याच्या ओल्ड फॅशन नावावर जाऊ नका. ते याला आजोबांकडून वारसा हक्काने मिळाले आहे. पोरगा मात्र अगदी फिल्मी किडा. सिनेमाची याला इतकी आवड इतकी आवड म्हणू सांगू की हिमेश मियांची सारी गाणी तोंडपाठ याची यावरूनच काय तो अंदाज बांधा. स्वतादेखील अभिनय, गाणी, संवादबाजी, नृत्य अश्या नाना आवडी पदरी बाळगून आणि म्हणूनच, एक कलाकारच एका कलाकाराला ओळखू शकतो या उक्तीला अनूसरून आम्ही दोघे एकमेकांचे चाहते.

दुकानात त्याची एंट्री नेहमीसारखी डायलॉग मारतच झाली,

जो आगे देख के चलता है,
लोग उसे पीछे से मारते है..

(त्यानंतर एक भला मोठा पॉज, समोरच्याला पहिल्या दोन ओळींचा अर्थ समजण्यासाठी दिलेला हा वेळ, आणि पुन्हा एकदा त्याच ओळी)

जो आगे देख के चलता है,
लोग उसे पीछे से मारते है..

और

जैसेही वो उन्हे जवाब देने पीछे पलट जाता है,
वही लोग उसके आगे निकल जाते है...

(अन लगोलग टाळी द्यायला वर केलेला हात)

"काय खरं नाही दिग्याशेट, आज सकाळी सकाळीच इम्रान हाशमी", मी त्याच्या टाळीसाठी वर केलेल्या हाताखाली माझा हात अलगद आणत म्हणालो.

"सकाळी नाही रे काल रातच्याला, डर्टी पिच्चर तिसर्‍याला, पण हा भाई आपला वर्जिनल डायलॉग बरं का..
तुला म्हणून सांगतो बे अंड्या, पिच्चर फक्त तीन गोष्टींमुळे चालतंया बघ - कथा, पटकथा आणि च्यामारी संवाद. याच्यातच जर लोच्या असेल तर हिंदीतली ‘विद्या मालन’ असो वा आपली "ताई सामानकर".. कोणी वाचवू शकत नाही. पिच्चर कितीभी डर्टी असला तरी तो चारच दिवसांत धुतला जातो बघ.."

इथून सुरु झालेल्या दिग्याने मला पुढच्या अर्ध्या तासात तीन तासांचा हिट सिनेमा सुपरहिट कसा बनवायचा याचे असे काही धडे दिले की आमचे फुल्ल अ‍ॅंड फायनल ठरलेच. हिरो आमचा "कुमार, कपूर नाहीतर खख.. खख.. खान" असणार. हिरोईनच्या जागी "कतरीना किंवा करीना" ला उचलणार. दिग्दर्शक म्हणून जोहरांच्या "करण" ला चान्स देणार. तर सांगायचा मुद्दा हा की प्रमुख कलाकारांच्या "क" च्या बाराखडीला कुठेही तडा जाऊ न देता कथा-पटकथा-संवाद अशी तिहेरी भुमिका निभावत लवकरच हा "अंड्या कपूर" मोठ्या पडद्याच्या मागे पदार्पण करणार आहे.

तळटीप - गीतकार म्हणून आपला अंड्या का नाही असा प्रश्न ज्या माझ्या होणार्‍या चाहत्यांना पडला असेल त्यांना एवढेच सांगू इच्छितो की खुद्द अंड्यानेच फुल्ल विनम्रतेने यांस नकार दिला, कारण आजकालच्या गाण्यांमध्ये असते काय तर, ढिंकचिका ढिंकचिका, चित्ता ता चिता चिता, चित्ता ता, ता रे....

- आनंद उर्फ अंड्या

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसरे काहीच सुचले नाही म्हणून "अंड्याचे फंडे - १" असे शीर्षक ठेवले. भविष्यात पुन्हा कधी अशीच वेळ जर या अंड्यावर आली तर "अंड्याचे फंडे - २" येईल........ पण ते येईलच असे नाही.

chaha pita pita vachayala maja aalee.
mala vaTale tu ashee series liheeto aahe.
pu le shu!

अंड्या, चांगलं लिहीतोयस...
गपपणी सगळे भाग लिहून माणसासारखा समारोप कर नायतर फटके खाशील ..

अंड्याचे फंडे म्हणजे मला अंड्यापासुन बनवलेल्या रेसिप्या असतील असे वाटले, पण मग विचार केला की हा अंड्या स्वतःच्याच रेस्प्या कशाला लिहेल. Wink
पण चांगलं लिहीले आहेस हो. Happy

दुहेरी ओळींच्या वहीत>>>>>>>>>>>>> दुरेघी वही ना रे Happy

मस्त लिहिलय Happy

वत्सला, सोनू
अरे खरेच भाग २ वगैरे काही नाहिये, पटकन लिहिले आणि चटकन टाकायचे होते तर शीर्षकात घुसत बसलो नाही. तुम्हालाच काही समर्पक शीर्षक सुचले तर सांगा.

सस्मित,
दुरेघी हाच शब्द बरोबर आहे मी विनोदनिर्मिती साठी दुहेरी लिहिले.. Proud .. चला चुकलो राव, बाकी भावना तर पोहोचल्या ना, तसाही हा अंड्या लहानपणापासून दुहेरीच बोलतोय पण कोणाच्या लक्षात आले नाही, आज लिहिले आणि पकडलो गेलो. Sad

अन्ड्याचे फ्नन्डे छान आहेत.
कावळे आले नाहित पण माय्बोलिकर मात्र तुझ्यासोबत असणारच.

पुलेशु.

मस्तं फंडू जमलय, अंड्या
<<अंड्या सांभाळुन ....... कवच नाजुक आहे तुझं.... >> काय हे... Happy

छान लिहिलं आहे, आवडले, "मराठी वाचणारी लाखभर माणसं" मस्तच. मी तुझे बरेच लेख वाचले, शैली चांगली आहे, लिखते रहो.

राव दोन दिवस नव्हतो तर मला वाटले होते की २०-२५ प्रतिसाद तरी जमले असावेत, पर कोई बात नही, मोठमोठ्या लोकांचे प्रतिसाद आलेत, दाद आत्याचा प्रतिसाद म्हणजे तिथेच १० मोजायचे.. Wink

उदयन, तू बाकी मला भेट रे कधी,
जेव्हा कवा अंड्यातना बाहेर येतोय तुलाच पहिली चोच मारतोया बघ. Wink

अंड्या, प्रतिसाद मोजु नकोस. लिहीत रहा. लाखो लोकं वाचताहेत तुझं लिखाण. Happy

दाद आत्याचा प्रतिसाद म्हणजे तिथेच १० मोजायचे.. >>>>>>> अरे शंभर मोज! तिच्यासारखी सिद्धहस्त लेखिका तुझे वाचुन प्रतिसाद देतीये!

पु ले शु

तू बाकी मला भेट रे कधी, >>>>>> एनी टाईम .एनी प्लेस...तु फक्त जागा बोल...बंदा ह्तोडा लेके हाजीर.. Wink
.
.
.
पुढचा भाग कधी ????????

हा हा हा .. सामीताई यू रॉक्स.. आता आणखी कोणाचा तरी एक प्रतिसाद बस्स.. २० चा बेंछमार्क झाला की कृतक्रुत्य होऊन अंड्या पुढचा लेख लिहायला घेतोच बघा.. Wink

जोक्स द अपार्टा, प्रतिसाद किती येताहेत त्यापेक्षा कसे येताहेत हे जास्त महत्वाचे असते हे अंड्या जाणतो, त्यामुळे फिकिर नॉट Happy

फंड्यांचा दुसरा भाग येऊ देच मग अंड्या Lol
पुढे तुमची फिल्मी दुक्कल काय दिवे लावते तेही वाचायला आवडेल... मस्त लिहिलंय Happy

मला वाटल आयत्यावेळी अंड्यांपासुन बनवायच्या पदार्थांच्या रेसेपी असतील. आणिबाणिच्या वेळी पटकन खायला बनवायला उपयोगी पडतील. म्हणुन मोठ्या अपेक्षेने लेख बघीतला....पण कसल काय....पोपट झाला..... Sad Lol

काय वो बंडुपंत अंड्याच्या रेसिपीज नेट वर कशाला शोधता.. अंड्याचे उष्णतेशी असे काही नाते आहे की ती कोणत्याही स्वरूपात पुरवली की काही ना काही तरी बनतेच..

परवा सकाळचाच एक किस्सा सांगतो, आमच्या वाडीच्या नाक्यावर एक अंडेवाला सायकलवरून अंडी घेऊन जात असताना पडला अन एक-दोन ट्रे अंडी फुटून रस्त्यावर पांढरा-पिवळसर सडा पसरला.. तो कशाला साफ करतोय.. गेला निघून.. दुपारी कडक उनं पडलं आणि बघता बघता रस्त्याभर आमलेट तयार झाले.... मग काय... वाडीतली पोरांनी घरून मीठमसाला आणि पाव आणला आणि तुटून पडले..

आता या रेसिपीला तुम्ही "तवारोड आमलेट" बोलू शकता.. Happy

मी पण अंड्याच्या रेसिपी अस्तील समजून आले वाचायला
. पण हे तर भारीच निघाले त्याच्याहून. मस्तच!

काय ओ सहेली मॅम, यानंतर अश्या पाच रेसीपीज आल्या.. आणि सुरुवातीच्या दोन फंड्यानंतर लोकांचा असा गोंधळ उडू शकतो म्हणून मी नावेही द्यायला सुरुवात केली.. ...... पण धन्यवाद हं Happy

Pages