कोठडी- स्वातंत्र्यवीर सावरकर: एक अधुरे शब्दशिल्प-एक स्मरणांजली

Submitted by भारती.. on 26 February, 2013 - 00:31

कोठडी- स्वातंत्र्यवीर सावरकर: एक अधुरे शब्दशिल्प
(स्वा. सावरकरांनी दि.२६-०२-१९६६ रोजी प्रायोपवेशन करून वयाच्या ८३ व्या वर्षी देहविसर्जन केले.
त्यांचे नम्र स्मरण.)

"लिंपुनि शिंपुनि जें । कायतरी
सजविसी दिवस भरी
बंदि मंदिर तें। एकादा
महाल वा सोनेरी?"

अजि नचि केवल या। बंदिच्या
भिंति त्या भुयारांच्या
रक्षिति अवसेसी। माझ्या ज्या
पासुनिया पुनवेच्या

"तरि रे कोठडीच्या। या क्रूरा
भिंती तोडुनी धीरा
झटशील तरी होई। न क्वचित का
पूर्ण मुक्तता शक्या?''

पूर्णा? अजि ना ना । मातीच्या
भिंति भंवति या साच्या
दगडी भिंती दुज्या!

"आशा सोडिना या जगतीं
दगडांच्याही या भिंती
धुळीला रे मिळती
तटहि किती
तडकूनिया तुटती!"
तरिही काय? अहो । आंशिक ती
शक्य "पूर्ण" ना मुक्ती
या तटांपुढती। बंदिच्या
क्षितिजांच्याही भिंती!

"परिसूं परि आम्ही । कुणीकुणी
त्याही ओलांडोनी
वृत्तींच्या क्षितिजा । वरिलीची
पूर्ण मुक्तता त्यांनी!"

रंगात उषेच्या आणी । सांजेच्या
चित्रिलें विश्वकर्म्यानें। ज्या साच्या
आकाश छता त्या। "मी"च्या।
हलक्यांच्या हंसू-असूंच्या या।
झोपाळ्यावरतीचि झुलत तया
पाहत होतों कीं। होतें जों
दिसत तोवरीं तरि त्यां!

स्वा.सावरकरांच्या कोठडी या कवितेचे हे हाती आलेले स्वरूप संस्करण पूर्ण न झालेल्या कवितेसारखे तर आहेच,शिवाय त्यात प्रक्षिप्त/ पुनः लिहून काढताना अपभ्रंश /अर्थविपर्यास झालेले शब्द असण्याचीही शक्यता वाटते कारण त्यांचा अर्थ नीटसा लागत नाही,शेवट अपुरा वाटतो.कवितेबरोबरच उपलब्ध असलेल्या कुण्या आत्मीयाने लिहिलेल्या ओळी अशा आहेत -
''अंदमानात कैद्यांना स्वत:ची कोठडी स्वत:च साफ करावी लागे. ती साफ करतांना तात्यांच्या मनात आलेले विचार या कवितेतून त्यांनी मांडले.''
दिलेले शब्दार्थ: अवसेसी-हा निराशा-तिमिरात गुरफटलेला काळ, पुनवेच्या- मुक्त जीवनाचा आनंदी दिवस.''

बस्स इतकेच.इतक्या सामग्रीवरून एका तेजस्वी,एकाकी जीवनाचे एक नि:श्वसित चितारायचे आहे.

थोडी पूर्वपीठिका . १९११ मधे अंदमानच्या अंधारकोठडीत स्वा.सावरकर पन्नास वर्षे कारावासाची शिक्षा भोगण्यास प्रविष्ट झाले ! पार्श्वभूमी होती मदनलाल धिंग्रांनी केलेला कर्झन वायलींचा वध, ज्याचे थेट लंडनच्या आगाखान यांनी इंग्रजांची मर्जी सांभाळण्यासाठी घेतलेल्या लब्धप्रतिष्ठितांच्या शोकसभेत स्वा. सावरकरांनी शोकप्रस्तावाला जाहीर विरोध करून केलेले समर्थन,त्यांच्या 'अभिनव भारत' या संस्थेच्या वाढत चाललेल्या क्रांतीकारक हालचाली,सावरकरांचे अग्निगर्भ लेखन,त्यातून सिद्ध झालेले खुदिराम बोस व अनंत कान्हेरेंचे हौतात्म्य.
''शुक पंजरी वा हरीण शिरावा पाशी| ही फसगत झाली तैशी |
भूविरह कसा सतत साहू या पुढती | दश दिशा तमोमय होती |''

आपल्याच वरील कवितेत आर्तव्याकुळ भाववादळात उन्मळलेले सावरकर आता कठोर निर्धाराने कोठडीत स्थिरावले होते.

तेथे होता पाहुणचार दंडाबेडी अडकवून टांगले जाण्याचा,तेल गाळणार्‍या कोलूस जुंपले जाण्याचा, अंधारमय भयावह एकांतवास सोसण्याचा.

त्या तशा वातावरणातही सावरकरांनी तेथे संप घडवून आणले,तेथल्या छळाच्या वार्ता बाहेरच्या जगास पोचवल्या, साक्षरतेचे (अन क्रांतीच्या रचनात्मक पैलूंचीही शिक्षण देणारे !) वर्ग तेथे चालवले, निकृष्ट अन्नाविरुद्ध आवाज उठवला, तेथल्या देशभक्त कैद्यांचे जीवन सुसह्य केले.

या सगळ्या रक्तरंजित दमनकथेत कवितेचे काय करायचे? परिस्थितीपुढे हार न मानणार्‍या महाकवीला कुणी कागद पेन्सीलही द्यायला तयार नव्हते कारण त्या लेखणीचे ओजच तर संपवायचा डाव होता..

याच कोठडीच्या भिंतीवर घायपात्याच्या काट्याने महाकाव्य लिहिण्याचा अश्रुतपूर्व संकल्प सावरकरांनी मग केला..याशिवाय बर्‍याचशा कविता त्यांना मुखोद्गत असत व सुटका होऊन बाहेर जाणार्‍या कैद्यांकडून त्या पाठ करून घेऊनही स्वातंत्र्यवीर त्या जगापर्यंत पोचवीत. या अत्यंत प्रतिकूलतेत किती कविता नि:श्वसितांसारख्या विरून गेल्या असतील किंवा मूळ स्वरूप बदलूनही बाहेर पोचल्या असतील.

ही कविता अशांपैकी एक वाटते.

तर ती ही कोठडी. कैद्यांनी आपली आपण साफ करायची.

कवितेत दोघेजण बोलत आहेत. अर्थातच कोठडीच्या एकांतवासात दुसरे कोण असणार आहे? सावरकरांचा स्वतःशीच संवाद चालला आहे. आणि तो बर्‍यापैकी पुरेसा नाही का ? त्यांच्या तोलामोलाचा संवाद त्यांच्याशी साधणारे असे कोण आहेत खरोखरी एरवीही ?शिवाय त्यांच्या आतमध्येच किती भूमिका गजबजल्या आहेत. एक महाकवी, एक विज्ञाननिष्ठ संशोधक,धर्मविशारद,इतिहास-अभ्यासक,भाषा-शुद्धीकरण विचारक,ज्योती;शास्त्रज्ञ, एक क्रांतीकारी स्वातंत्र्यसेनानी,एक समाजसुधारक, एक राष्ट्रचिंतेत राहून गेलेल्या अध्यात्मसाधनेचा उपासक ..एकाच आयुष्यात हे सारे साकारायला एरवी वेळ पुरला नसता पण हा बंदीवास कसा कनवाळूपणे मदतीला आला अन मुक्त चिंतनाला वाव मिळाला आहे !

या कवितेतले दोघे म्हणजे स्वातंत्र्यवीरांच्या दोन वृत्ती आहेत,किंचित दोलायमान, कामात रंगून जात भवतालाला न्याहाळणारी एक 'जगणारी' वृत्ती तर तिला खोचून, डिवचून, प्रश्न विचारून ,आत्मविकासाच्या शक्यता शोधायला लावणारी दुसरी वृत्ती -अलिप्तपणे 'बघणारी ' ..

'या सनातन जीवनवृक्षावर दोन सुंदर पंखांचे मित्रपक्षी रहातात.एक पक्षी झाडाची फळे चाखतो,जगतो,दुसरा पक्षी केवळ पहिल्याला साक्षीभावाने 'बघतो..'
''द्वा सुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिषश्वजाते
तयोरन्य: पिप्पलं स्वादत्त्यनश्यन्ननो अभिचाकशीति''
मुंडकोपनिषदातल्या या श्लोकाची आठवण देणारा हा आत्म-संवाद..

पहिल्या कडव्यात प्रश्नकर्ते सावरकर स्वतःलाच कडू उपहासाने विचारताहेत-
"लिंपुनि शिंपुनि जें । कायतरी |सजविसी दिवस भरी|
बंदि मंदिर तें। एकादा | महाल वा सोनेरी ?"
''दिवसभर लिंपून शिंपून काहीबाही सतत सजवतो आहेस ती ही तुझी कोठडी की एखादा भपकेबाज राजमहाल? ''
उत्तर असे आहे-
-अजि नचि केवल या। बंदिच्या| भिंति त्या भुयारांच्या |
रक्षिति अवसेसी। माझ्या ज्या | पासुनिया पुनवेच्या |
या फक्त माझ्या बंदिवासी भुयाराच्या भिंती समजू नकोस ! माझ्या अमावास्येचं ,माझ्या निराशेचं माझ्या आनंदापासून, माझ्या मुक्तीपासून त्या रक्षण करताहेत !!
प्रश्नापेक्षाही तिरकस उत्तर ! ही अंधारकोठडी माझ्या आयुष्यातल्या निराश काळो़खाचं आनंदप्रकाशापासून रक्षण करते आहे !

'नाथाच्या घरची उलटीच खूण ' तसं हे उत्तर.अन्यायाने मिळालेल्या कारावासाची केलेली ही स्तुतीमिषाने केलेली निंदा, की पुनवेचा आनंद खर्‍या अर्थाने समजण्यासाठी आधी काळोखी निराशा पूर्ण उपभोगावी लागते याची जाणीव ?खरे तर दोन्ही !

संवाद पुढे सुरूच आहे..
"तरि रे कोठडीच्या। या क्रूरा |भिंति तोडुंनी धीरा
झटशील तरी होई। न क्वचित का| पूर्ण मुक्तता शक्या?''
पुढचा प्रश्न-'' अरे वेड्या, ही कोठडी सजवायचे सोडून या क्रूर भिंती धैर्याने तोडून का टाकत नाहीस ?निदान पूर्णपणे मुक्त तरी होशील!''

-पूर्णा? अजि ना ना । मातीच्या |
भिंति भंवति या साच्या| दगडी भिंती दुज्या!
उत्तर साधेच आहे. किंचित विमनस्क.कसे शक्य आहे पूर्ण मुक्त होणे ? या कोठडीच्या भिंती मातीच्याच आहेत पण याभोवती दुसर्‍या विशाल दगडी भिंतींचा तट आहे ना.

..सावरकरांना आठवत असेल तो मार्सेल्सच्या सागरात उडी घेऊन सुटकेचा केलेला एक विफल प्रयत्न ! तिथे थोडी तरी आशा होती. त्या तसल्या गारढोण पाण्यात त्या क्षीण शरीराने केवळ इच्छाशक्तीच्या बळावर फ्रान्सचा किनारा गाठला होता. इतके झाल्यावरही वैफल्य पदरी आले होते.. आंतरराष्ट्रीय संकेतांचा भंग करून दंडेलशाहीच्या बळावर ब्रिटिश पोलिसांनी त्यांना पकडले होते व आंतरराष्ट्रीय न्यायालयातही न्याय मिळाला नव्हताच. इथे अंदमानात तर सुसज्ज छळछावणी होती..आपल्या 'काळे पाणी' या कादंबरीत सावरकरांनी अंदमानच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेतून पळून जाण्याचा शोकान्त विफल प्रयत्न चितारला आहे त्याअर्थी त्यांनी निदान कल्पनाशक्तीने तो विचार अजमावून तो पर्याय खोडून टाकला असला पाहिजे.

पुनः नवे प्रश्नावर्त, अधिक खोलात जाणारे-
"आशा सोडिना |या जगतीं| दगडांच्याही भिंती
धुळीला रे मिळती|तटहि किती|तडकूनिया तुटती!"
'' असा हताश होऊ नकोस रे! या जगात दगडांच्या भिंती धुळीला मिळतात ना ? प्रचंड तटही लाटांच्या मार्‍याने तडकून तुटतात मग तुझ्या प्रयत्नाला का नाही यश येणार ?''

याही प्रश्नाचे स्वतःलाच दिलेले उत्तर- आताचे हे उत्तर या कवितेला अकल्पित वेगळ्याच उंचीवर नेणारे, तपस्वी-तत्त्वज्ञाचे उत्तर-
-तरिही काय? अहो । आंशिक ती|शक्य "पूर्ण" ना मुक्ती
या तटांपुढती। बंदिच्या |क्षितिजांच्याही भिंती!
या भिंतीमधून सुटका ही सुद्धा आंशिक सुटका आहे, पूर्ण मुक्ती नाहीच कारण या जीवनाच्या बंदिवासाला क्षितिजाच्या भिंतींची राखण आहे !

एका विलक्षण वीरवृत्तीच्या आणि त्यागी आयुष्यानुभवातूनच सिद्ध होऊ शकते अशी दृष्टी, असे ज्ञात्याचे पाहणे. बंदिवास तर पाचवीला पुजला आहे. ही जन्मठेप, नंतरचीही स्थानबद्धता- आयुष्यालाच बेड्या पडल्या आहेत पण विचार मात्र शुद्ध होऊन निवळत चालले आहेत या अग्निपरीक्षेत. हळुहळू बंदिवासाची तात्कालिक खंत विरत चालली आहे अन आता एका विशाल मुक्तीसाठी मन आसुसले आहे,अंतरातला साधक जागा झाला आहे. नवा अर्थ असा आहे की हा बंदिवास म्हणजे केवळ एकांतसाधना. अस्तित्वाशी निगडित प्रश्न सोडवण्यासाठी हा एकांतवास घडला आहे..

मग शेवट. समापन-
"परिसूं परि आम्ही । कुणीकुणी|त्याही ओलांडोनी
वृत्तींच्या क्षितिजा । वरिलीची|पूर्ण मुक्तता त्यांनी!"
आता प्रश्नकर्ता अन उत्तर देणारा दोघेही प्रकट चिंतनात गढून एकमेकांत विरून जाताहेत कारण ते वेगळे नाहीतच मुळी !

पहिले सावरकर ( अवतरणचिन्हात ज्यांचे प्रश्न अन विचार आले आहेत ते) हे उत्तर ऐकून म्हणत आहेत,''आम्हीही ऐकले आहे की ती पूर्ण मुक्ती म्हणे मनोवृत्तींचेही क्षितीज ओलांडून गेलेल्या कुणाकुणाला लाभली आहे..''

ते येथे आतल्या-अंतर्यामातल्या- आकाशाच्या क्षितिजाबद्दल बोलताहेत. हे क्षितीज मनोवृत्तींच्या चंचल सुंदर रंगात रंगलेले..या कवितेसारख्या मनोरम भावतरंगात निथळलेले.. या मोहमय क्षितिजाला जे ओलांडून जातात तेच मुक्त होतात.. आपल्याला ती तसली मुक्ती हवी आहे,लहानसहान 'सुटका' नाही. किरकोळ लाभांसाठी हा जन्मच नाही..म्हणूनच इथे कवितेलाही सजवण्याच्या,संस्करण करण्याच्याही खटाटोपापलिकडे कवी गेला आहे असे दिसते ,आपल्या प्रतिभापुष्पाबद्दलही तो निर्मोही झाला आहे. त्याची अंतर्दृष्टी जागली आहे.क्षितिजापलिकडचे क्षितीज त्या अंतर्दृष्टीसमोर उघडते आहे.

अन दुसरे सावरकर,आतापर्यंत प्रतिवाद करणारे, कोठडीच्या झरोक्यातून दिसणार्‍या खर्‍या आकाशाच्या तुकड्यावर डोळे जडवून समारोप करत आहेत..
रंगात उषेच्या |आणी । सांजेच्या चित्रिलें विश्वकर्म्यानें। ज्या साच्या
आकाश छता त्या। "मी"च्या। हलक्यांच्या हंसू-असूंच्या या।
झोपाळ्यावरतीचि झुलत तया |पाहत होतों कीं।
होतें जों |दिसत तोवरीं तरि त्यां!
'मी'पणाच्या हलक्याशा सुखदु:खांच्या हिंदोळ्यावर झुलत मी आकाशाचं छत न्याहाळतोय...सकाळ होते अन दिवस हळुहळू संध्याकाळीकडे झुकतो .. ते सारे अनुपम रंग या आकाशपटावर विश्वकर्मा कुशलतेने चितारतो..जोपर्यंत रात्रीच्या कृष्णच्छाया दाटून सारे दिसेनासे होत नाही तोवर मी डोळे भरून पाहत रहातो हे रंगांचे खेळ.

..इथे अचानकपणे मूक होतो हा संवाद..जणू संध्याछायांमध्ये दिवसाचे लोपणे,रात्रीच्या शांत प्रहरांची सुरुवात.

हे जे बाहेरचं अन आतलं आकाश आहे ना, ते अंधारकोठडी अन जन्मठेप असल्या शब्दांना घाबरत नाही.आतलं आकाश पहाणारी कोठडी आहे शरीरमनाची,अस्तित्वाची मर्यादा. अन बाहेरच्या आकाशाखालची कोठडी आहे अर्थातच विटा-माती-दगडांची अंदमानची कोठडी.कैदी दोन्ही अर्थांनी कोठडीच्या चतु:सीमा केव्हाच ओलांडून गेला आहे. तो इथला होताच कधी ? तो तर आकाशाचा अधिकारी आहे.

सावरकरांची ही अनघड कविता खनिजद्रव्यांनी भरलेल्या खाणमातीसारखी वेगळ्या अर्थाने मूल्यवान आहे.त्यांचा स्वतःशीच चाललेला संवाद, त्यांनी स्वतःचेच निराशेतून बाहेर येण्यासाठी केलेले समुपदेशन,जाचक बंधनातून स्वातंत्र्यप्रिय मनाला सोडवण्यासाठी केलेले अंतिमार्थाचे मंथन या कवितेत विखुरलेले आहे, ही कविता नसून जणू त्यांच्या दैनंदिनीचे एक पान आहे..एका समृद्ध गहन व्यक्तिमत्वाचा प्रकाशकिरण पडून उजळलेला हा झरोका आहे.

आपण केवळ कल्पनाच करू शकतो त्या दिनक्रमाची,

आणि मग वंदन करतो त्या आयुष्याला. नि:शब्दपणे..

भारती बिर्जे डिग्गीकर
प्र.चि.१(सौजन्य मी भास्कर)-अंदमानातील सेल्युलर जेलमधील स्वातंत्र्यवीर सावरकरांची कोठडी
kothadi1.jpg

प्र.चि.२ -(सावरकर स्मारक ग्रंथ) -सेल्युलर जेलच्या भिंती

Snapshot_20130303.JPG

प्र.चि.३-(सावरकर स्मारक ग्रंथ ) ''कोलू''

Snapshot_20130303_2.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही सावरकरांची अजून एक दुर्मिळ कविता माझ्याकडे रसग्रहणार्थ दिली मी भास्कर यांनी .
त्यांचे पुनः आभार.
'सावरकर राष्ट्रीय स्मारक'च्या बर्वेजींचीही खूप तत्परतेने मदत झाली मूळप्रत निश्चित करण्यात, त्यांचेही अनेकवार आभार.

आता वरवर वाचला आहे हा लेख - जरा नीट, सावकाशीने वाचेन मग...

मनापासून धन्स - भारतीजी, मी भास्कर व बर्वेजी.

@भारती जी
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना त्यांच्या ४७ व्या पुण्यस्मरणदिनी आपण ही जी अप्रतीम आदरांजली अर्पण केलीत आणि त्यात आम्हालाही सहभागी होण्याचा आनंद मिळवून दिलात त्याबद्दल आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद! वेगळ्याच उंचीवर नेणार्‍या या कवितांचा आनंद आपल्यासारख्यांनी मनावर घेऊन विशद केल्याशिवाय आम्हाला आकलन होणे कठीण! आपण काव्याशी समरस होऊन केलेल्या या रसास्वादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद! श्री. बर्वे यांनाही खूप खूप धन्यवाद!
एकदा वाचन झाले असले तरी पुन्हा एकदा त्याचा रसास्वाद घेऊन पुन्हा लिहीन.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली.

|| वंदे मातरम् || >११११११११११११११११११११११

सर्वांचे अनेक आभार.. काहीशा जुन्या मराठीतली ही कविता तिच्या गोडव्यासकट समजून घ्यावी, त्यासाठी थोडावेळ द्यावा ही विनंती.
मी भास्कर, प्र.चि. लेखाच्या शेवटी टाकले आहे,आणखीही प्र.चि. मिळालीत पण आज तरी टाकता आली नाहीत नेटवर्क फेल होत असल्याने.

@भारती बिर्जे डि... | 26 February, 2013 - 21:19

योग्य केलेत.
माझ्या प्रतिसादातील कोठडीचे प्र चि मी आता वगळले आहे. मूळ लेखातच ते शोभते.

सुरेख.. सावरकर यांच्या खूपशा कविता वाचून व म्हणून माझे सैरभैर झालेले मन स्थिर होते.याच्या विरूद्ध अनुभव देणारे म्हणजे स्थिर मन अस्थिर करणारे खूप कवी आणि कविता आहेत. (जे कवी व ज्या कविता मलाही आवडतात.)

<<..इथे अचानकपणे मूक होतो हा संवाद..जणू संध्याछायांमध्ये दिवसाचे लोपणे,रात्रीच्या शांत प्रहरांची सुरुवात.>> भारती सुन्दर निरीक्षण आहे...
आणि इथेच वाचकाचा संवाद सुरु होतो. कविता संपल्यावर कविता चालु होते... माझ्यासाठी तरी.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त नुकत्याच झालेल्या येथील कार्यक्रमात पं मंगेशकरांनी सांगितलेली माहिती माझ्यासाठी नवीन होती. सावरकरांच्या कवितांना स्वातंत्र्योत्तर काळातही कसल्या परिस्थितीतून जावे लागले त्याची ही कहाणी :-
मधुकर गोळवलकर आणि ह्र्दयनाथ दोघेही [१९५३च्या आसपास, जो सावरकरांवरील शासकीय बहिष्काराचा परमोच्च काळ होता] आकाशवाणीशी सबंधीत होते. त्यावेळी मधुकर गोळवलकरांनी 'जयोस्तुते' ची केलेली चाल ह्र्दयनाथांना ऐकविली. मग गोळवलकरांना दिली तशी मलाही चाल लावण्यासाठी कविता द्या अशी विनंती ह्र्दयनाथांनी सावरकरांकडे केली. तेव्हा सावरकरांनी सांगितले की त्यांनी स्वतः 'जयोस्तुते' चाल लावण्यासाठी दिलेली नाही. गोळवलकरांनी स्वतःच ती कविता निवडली असेल. पण सावरकरांनी 'ने मजसी ने' ही कविता ह्र्दयनाथांना सुचविली. त्यांनी चाल लावली.
या दोन्ही कवितांचे रेकॉर्डिंग करायचा विचार आहे हे कळताच अधिकार्‍यांनी 'नोकरी गमवायची आहे का?' विचारले. त्यामुळे दोघांनीही तो बेत रद्द केला. पण कोण्या एका अधिकार्‍याने 'तुम्ही रेकॉर्डिंग करा. बघु कोण काय करतो ते.' असे म्हणून त्यांना उद्युक्त केले. तरीही गोळवलकर संगीत दिग्दर्शक म्हणून स्वतःच्या नावावर रेकॉर्डिंग करायला तयार झाले नाहीत. पण संगीत दिग्दर्शक म्हणून ह्र्दयनाथांचे नाव देण्यास त्यांनी मान्यता दिली. त्यामुळे 'जयोस्तुते'चे पहिले रेकॉर्डिंग झाले ते संगीत दिग्दर्शक म्हणून ह्र्दयनाथांचे नाव देऊन. पण रेकॉर्डिग होताच त्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावली गेली. कस्सेतरी निभावले मात्र रेकॉर्डेड गाणे आकाशवाणीवर प्रसारीत केले गेले नाही. नंतर सावरकरांवरील बहिष्कार त्यांच्या निधनानंतर थोडा शिथिल झाल्यावर 'जयोस्तुते' लोकांपर्यंत पोचले. त्यावेळी मात्र मंगेशकरांनी गोळवलकरांनीच संगित दिल्याचे स्पष्ट केले. नंतर 'ने मजसी ने' ही गाजले.
'सावरकरांकडे कशाला जाता? देशद्रोही माणूस आहे तो. तुम्हालाही तुरूगात जायचेय का? असे सल्ले सावरकरांवर पाळत ठेवणार्‍या गुप्त पोलिसांकडून देण्यात येत.
नंतर खरोखरच सावरकरांनी त्यांना लिहिलेले एक पत्र सापडले म्हणून एक दिवस तुरुंगाची हवादेखील खावी लागल्याची आठवणही त्यांनी नमूद केली. '
सावरकरांची कोणतीही गोष्ट अग्निदिव्यातून गेल्याशिवाय पूर्णत्वास जात नसे हेच खरे.

मी-भास्कर,

>> सावरकरांच्या कवितांना स्वातंत्र्योत्तर काळातही कसल्या परिस्थितीतून जावे लागले ...

याचा अर्थ हे जे स्वातंत्र्य आहे ते केवळ फसवं आहे.

आ.न.,
-गा.पै.

आहाहा...! अगदी पोट भरून वाचायला मिळले......... अनेक धन्यवाद!

स्वातंत्र्यवीरांबद्दल काय बोलायचे..? शि.सा. नमस्कार!

@भारती जी
आज पुन्हा एकदा काळजी पूर्वक वाचन केले.
जे पहिल्या वाचनात उलगडले नव्हते ते आता अगदी सहजपणे ध्यानी आले आणि याचे संपूर्ण श्रेय तुम्ही रसग्रहण ज्या आत्मीयतेने केले आहे त्याला आहे.
एरवी सावरकरांचे हे काव्य कळायला कठीण आहे म्हणून आम्ही पूर्ण वाचलेच नसते ते आता रसग्रहण वाचल्यावर पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटते.
धन्यवाद!

वा छान रसग्रहण ....

माझीही सावरकरांच्या चरणी आदरांजली

ये परतुनी ये हिंद भूमीच्या विरा
तिज नसे तुजवीणा प्यारा
या जगतीचा अन्य कोणता तारा
हे विरा ये विरा......

सुधीर

सुसुकु,
>>सुरेख.. सावरकर यांच्या खूपशा कविता वाचून व म्हणून माझे सैरभैर झालेले मन स्थिर होते.याच्या विरूद्ध अनुभव देणारे म्हणजे स्थिर मन अस्थिर करणारे खूप कवी आणि कविता आहेत. (जे कवी व ज्या कविता मलाही आवडतात>>>>
यथार्थ.
मी भास्कर,अशा अनेक गोष्टी आहेत खर्‍या, पण एक वरचे न्यायालय आहे जे अशा लेखनाला/काव्याला कालातीततेचा दर्जा देते.अस्थिर मनाला शांत करण्याची शक्ती देते.
गा.पै.,योग,सुधीर, आभार..

@भारती बिर्जे डि... | 1 March, 2013 - 20:36 नवीन
मी भास्कर,अशा अनेक गोष्टी आहेत खर्‍या, पण एक वरचे न्यायालय आहे जे अशा लेखनाला/काव्याला कालातीततेचा दर्जा देते.अस्थिर मनाला शांत करण्याची शक्ती देते.
<<

ही कविता आपल्याकडे पाठवली तेव्हां 'मला मिळालेली ही कविता पूर्ण नसावी असे वाटते' असा अभिप्राय
मी दिला होता. आपल्यालाही तसे वाटले.
मला असे का वाटले ते सांगावे की नाही अशा द्विधा मनःस्थितीत मी होतो. पण आपल्यालाही तसे वाटले आहे तर आपल्याला आपले कारण सांगायला हरकत नाही असा विचार करून लिहित आहे. तुम्हाला तसे वाटण्याचे कारण वेगळे असू शकते.
सावरकर म्हणजे आशावादाचा महामेरूच! त्यांच्या आयुष्यात अत्यंतिक नैराश्याच्या प्रसंगी देखील त्यांनी दुर्दम्य आशावादाच्या जोरावर नैराश्यावर मात केलेली प्रत्येक ठिकाणी आढळून येते. ही कविता मात्र म्हणाव्या तितक्या जोरकसपणे आशावादावर आरूढ होण्याआधीच संपली असे मला वाटले.
आपल्याला ती अपुरी वाटण्याचे कारण कळेल का?

@जो_एस | 1 March, 2013 - 14:41
ये परतुनी ये हिंद भूमीच्या विरा
तिज नसे तुजवीणा प्यारा
या जगतीचा अन्य कोणता तारा
हे विरा ये विरा......
<<
छान!

किती सुंदर लिहिलेय भारतीताई. सावरकर म्हणजे जयाचा उल्हास. काळ कोठडीत उमेदीची वर्षे काढूनही इतका आशावाद टिकवणे सोपे नाही. 'जयोस्तुते..' कितीही वेळा ऐकले तरी समाधान होत नाही.

भारतीताई - स्वातंत्र्यवीरांच्या मन:सागरात प्रवेश करुन जणू हे तुम्ही लिहिलंय असं वाटतंय.....
त्यातील आंदोलनं, त्यातील लाटा, धीरगंभीरता सगळं कसं शब्दांमधे उत्तम तर्‍हेने मांडलात -

स्वातंत्र्यवीरांना दंडवत आहेतच,
पण तुम्हालाही नमस्कारच ......

स्वातंत्र्यवीरांच्या सगळ्याच रचनांवर तुम्ही लिहिलेलं वाचायला आवडेलच .....
"वेदमंत्राहूनी आम्हां वंद्य यांची वैखरी"

मी भास्कर,
सावरकरांच्या शैलीतील भाषेची परिचित नितळता तसेच आकृतीबंधाचे घोटीव काम, (एका विचाराची लालित्यपूर्ण मांडणी व तो कवितेच्या परिघात विस्तारवून पूर्णत्वास नेणे या अर्थाने) या कवितेत कमी पडलेली जाणवतेच, पण हेच तिचे वैशिष्ट्य व सौंदर्य आहे..एखादी कविता कवी स्वतःसाठीच लिहितो,ती त्याच्या मनाचे माजघर असते.
स्वातंत्र्यासाठी लढणारी ही प्रतिभाशाली माणसे ही मुळात माणसेच आहेत, त्यांच्या मूळ प्रेरणा कोणत्याही अभिनिवेशाशिवाय ,प्रसाधनाशिवाय आपल्यापर्यंत एरवी पोचणे कठीणच.जसे की सहसा लहान मुलांसमोर वडील रडत नाहीत हा सामाजिक संकेत,पण त्यांनी दडवलेले अश्रू,निराशा, त्यावर मात करण्यासाठी स्वतःशीच केलेली खटपट समजून घेणे आपल्याच आकलनशक्तीत भर घालते, आपल्याला समृद्ध करते.. तसेच आहे हे.

आभार दिनेशदा,मलाही कुणीतरी ही रचना हृदयनाथांसारख्या वैभवी शैलीत संगीतबद्ध केलेली ऐकायला आवडेल. होईल का कधी तसं ?? योग ??!!

जाई ,अतृप्त आत्मा,अमेय,असा, खूप आभार .अमेय,बरोबर निरीक्षण.

वैभव,शशांकजी,तुम्ही दोघांनी खूप कौतुक केलंय माझं, खरं तर माझा हा बहुमान की स्वातंत्र्यवीरांच्या तीन कवितांवर मी लिहू शकले, पण आता अन्य कवितांवर इतरांनी(उदा. तुम्ही दोघे, चैतन्यजी, अन्यही कोणी) लिहिलेलं वाचायला मला आवडेल . दृष्टिकोनांची बहुविधता येईल त्यातून !

@भारती बिर्जे डि... | 2 March, 2013 - 13:30

धन्यवाद!

>> वैभव,शशांकजी,तुम्ही दोघांनी खूप कौतुक केलंय माझं, खरं तर माझा हा बहुमान की स्वातंत्र्यवीरांच्या तीन कवितांवर मी लिहू शकले, पण आता अन्य कवितांवर इतरांनी (उदा. तुम्ही दोघे, चैतन्यजी, अन्यही कोणी) लिहिलेलं वाचायला मला आवडेल . दृष्टिकोनांची बहुविधता येईल त्यातून !
<<
भारतीजींशी पूर्ण सहमत.
वैभवजी,शशांकजी, चैतन्यजी तुम्हीही घ्या की मनावर!

पण तरीही भारतीजी, आपल्याला आम्ही यातून निवृत्त होऊ देणार नाही.
सावरकरांनी इतके दिले आहे की रसग्रहणासाठी काव्याचा दुष्काळ कधीच पडणार नाही! ते शिवधनुष्य पेलणार्‍यांचाच शोध घ्यावा लागतो.

@भारती बिर्जे डि... | 3 March, 2013 - 12:51 नवीन
प्र चि ३ मध्ये माणसांकडून बैलांनी करायची कसली कसली कामे करून घेतली जात ते स्पष्ट दिसते.
अशी कामे करावी लागत असूनही ज्या राजबंद्यांनी आपले ध्येय सोडले नाही त्या सर्वांचे प्रतिनिधि म्हणजे सावरकर!

Pages