"प्रिय सह्याद्रीस...."

Submitted by सह्याद्रीमित्र on 24 February, 2013 - 00:28

प्रिय सह्याद्रीस,

स.न.वि.वि.

मॅलरी या जगप्रसिद्ध एव्हरेस्टवीराला कोणीतरी विचारलं "तुम्हाला एव्हरेस्ट सर करावंसं का वाटलं ?" तेव्हा त्याने उत्तर दिलं कारण ते तिथे आहे म्हणून !!! तुझ्या बाबतीत माझंही अगदी तसंच झालंय.ज्या दिवशी तुला भेटलो त्याच दिवशी तुझा निस्सीम भक्त झालो !!! तेव्हापासून आजपर्यंत तुझ्या अंगाखांद्यावर असलेल्या सुमारे २२५ किल्ल्यांवर गेलो आणि प्रत्येक भेटीत तुझं नवीन रूप बघायला मिळालं.मग तो साल्हेरचा शैलकडा असो वा रतनगडाचं नेढं,हरिश्चंद्राचा कोकणकडा असो वा तैलबैल्याच्या जुळ्या कातळभिंती !!! प्रत्येक ट्रेकमध्ये तुझं नवं विश्व आम्ही अनुभवत आलो आहोत.तूच मला सिमेंटच्या भिंतींपलीकडची सदाबहार दुनिया दाखवलीस.सामान्य माणसापासून "ट्रेकर" बनवलंस आणि समाजात वेगळी ओळख निर्माण करून दिलीस.जंक फूड विसरायला लावलस आणि अस्सल गावरान झुणका - भाकरीची चव चाखायला लावलीस.तुझ्यामुळंच मी माणसं जोडायला शिकलो.पाण्याचं महत्व कळालं ते तुझ्यामुळेच !! रस्त्यावर कुठेही कचरा टाकणारे आम्ही तुझ्या अंगावरचा कचरा स्वत:हून स्वच्छ करू लागलो.आमच्यातली "लीडरशिप क्वालिटी" तुझ्यामुळेच डेव्हलप झाली.कुठेही मोठयाने गाणी लागली की आमचे पाय आपोआप थिरकतात पण तीच गाणी कोणत्याही किल्ल्यावर लागली की मात्र आमचं पित्त खवळतं !! कट्ट्यावर कडकडा भांडणारे आम्ही तुझ्या संगतीत आलो की हातात हात घालून कामं करतो.कोणत्याही किल्ल्यावर भेटलेल्या एखाद्या अनोळखी ट्रेकरशीही आमची काही क्षणात अगदी घट्ट मैत्री होते.पुस्तकातला इतिहास तू प्रत्येक वेळी आमच्यासमोर जिवंत करत आला आहेस.आज नाशिक - मनमाड हायवेनं जाताना म्हटलं तरी झोप येत नाही कारण दोन्ही बाजूने सातमाळा रांगेतल्या त्या अभेद्य गिरिदुर्गांची साद ऐकू येत असते.भंडारद-याला नुसतं सहलीला म्हणून जरी गेलो तरी समोरचा तो रतनगड,आभाळाला भिडलेलं ते कळसूबाई शिखर,बेलाग कातळकड्याचे ते अलंग - मदन - कुलंग सगळ्यात आधी नजरेत भरतात !!! कधी पाठीला नुसती सॅक अडकवून जरी आम्ही कुठं निघालो तरी "आज कोणत्या मोहिमेवर ?" अशी कौतुकाने चौकशी होते.महाबळेश्वरच्या सनसेट पॉइंट वरून दिसणारा सूर्यास्त सगळ्यांना वेड लावतो खरा..पण त्यांनी नानाच्या अंगठयावरून दिसणारी सप्तरंगांची उधळण तरी कुठे पाहिलेली असते !!! घरी सहाचा गजर बंद करून पुन्हा निर्विकारपणे झोपी जाणारे आम्ही गोरखगडाच्या मुक्कामात मात्र आहुप्याच्या त्या रौद्रभीषण कड्यांमागून क्षितिजावर अनेक छटा रंगवण-या तेजोभास्काराची पहाटे पाच वाजल्यापासून वाट बघत असतो !!! तो खेळ असतोच तेवढा अविस्मरणीय !!! तुझ्या संगतीत आल्यापासून आमच्यात झालेल्या अमुलाग्र बदलाचं गमक फक्त तूच आहेस.पुस्तकी भाषेतल्या "प्लॅनिंग" "मॅनेजमेंट" "टीम बिल्डींग" "को - ऑर्डिनेशन" या शब्दांचा अर्थ आम्हाला ट्रेक करायला लागल्यापासूनच "प्रॅक्टिकली" समजला आणि आता आम्ही त्या गोष्टी अगदी विनासायास पार पाडतो.आज आठवडाभर तुझ्या भेटीची ओढ लावणारे शनिवार - रविवार आमच्याइतके जगात कोणालाही प्रिय नसतील !!!! कळसूबाईच्या..साल्हेर - सालोट्याच्या...अलंग - मदनच्या किंवा आजोबा - घनचक्करच्या त्या अस्मानी शिखरांवर पाऊल ठेवताचक्षणी तिथून दिसणा-या तुझ्या त्या विलक्षण रूपावर भाळून नकळत या ओळी सुचून जातात....

जिथे साम्राज्य असतं ते दूरवर विस्तारलेल्या अजस्त्र पर्वतांचं आणि अभेद्य आभाळस्पर्शी शिखरांचं..
जिथे रौद्रभीषण दृश्य दिसतं ते करवतलेल्या कडेकपा-यांचं आणि खोल तुटलेल्या बेभान द-याखो-यांचं ...
जिथे आवाज असतो तो भणाणणा-या वा-याचा आणि क्वचित कधीतरी माणसांच्या पावलांचा....
जिथे विसर पडतो तो रोजच्या धावपळीच्या आयुष्याचा आणि ब-याचदा आपल्या स्वत:चा....

आज तुझी वर्णनं लिहीताना या पानांसारखाच आमचा ऊर अभिमानाने भरून येतो.पण सामान्य माणसासारखी तुझी काही दु:ख आहेत याची जाणीव आम्हाला आहे मित्रा !!! नैसर्गिक आपत्तींमुळे ढासळलेले बुरुज,गंजलेल्या तोफा,हे तर आहेच पण तुझ्या सुपुत्रांना आमच्यातीलच काही बेशिस्तांनी विद्रूप केले आहे.जिथं मराठी रक्ताचे सडे पडले तिथे आता दारूच्या बाटल्यांचा खच पडू लागलाय .अविचाराने केलेली जंगलांची बेसुमार कत्तल हि भविष्यात अंध:कारच घेऊन येणार आहे.खरं तर ती लोकं क्षमेला पात्र नाहीत पण तरी आज त्यांच्या वतीने मी तुझी माफी मागतो.पण म्हणून आम्ही नुसताच हे बघत नाही बसलो आहोत.आमच्यातीलच काही सजग मावळ्यांची फौज या गडकिल्ल्यांना त्याचं गतवैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी जोमाने झटत आहे,आणि मला खात्री आहे भविष्यात तुझ्या अंगाखांद्यावरची दुर्गसंपत्ती पुन्हा नव्यानं कात टाकेल !!!

खरं तर तुझ्याविषयी मला काय वाटतं हे काही ओळींमध्ये बसवणं खरोखरंच खूप अवघड आहे.कारण लोक जरी तुला निर्जीव आणि दगडधोंड्यांचा पर्वत म्हणत असले तरी तू आमच्यासाठी सजीव आणि अगदी जवळचा मित्र आहेस !!! आज तू माझ्यासारख्या प्रत्येकाची पर्सनॅलीटी ख-या अर्थाने डेव्हलप केली आहेस.आज आम्ही जे आहोत ते तुझ्यामुळे आहोत आणि म्हणूनच आमच्यासारख्या तुझ्या सर्व मित्रांच्या वतीने आज मी ही "ऑफबीट" कृतज्ञता व्यक्त करत आहे.असाच कायम आमच्या पाठीशी उभा राहा आणि आमच्या अनुभवाच्या शिदोरीत भरभरून दान दे अशी हक्काची मागणी करत आहे !!

बहुत काय लिहिणे..

तुझा जीवलग,
सह्याद्रीमित्र

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जियो दोस्त. अप्रतिम लिहिलंय Happy

खरं तर तुझ्याविषयी मला काय वाटतं हे काही ओळींमध्ये बसवणं खरोखरंच खूप अवघड आहे.कारण लोक जरी तुला निर्जीव आणि दगडधोंड्यांचा पर्वत म्हणत असले तरी तू आमच्यासाठी सजीव आणि अगदी जवळचा मित्र आहेस !!!>>>>>+१०००००००००००००० Happy

सह्याद्रीमित्र,

अगदी अचूक आणि चपखल मनोगत मांडलं आहे तुम्ही. खरंतर तुम्ही स्वत:ला सह्याद्रीपुत्र म्हणवून घेतलं पाहिजे. Happy

आ.न.,
-गा.पै.

जाताजाता : प्रचि उत्कृष्ट आलीयेत. जरा खाली नावं देणार का? उत्सुकतेचा किडा अंमळ स्वस्थ बसून देईल तर शपथ! Happy

छान मनोगत.
( वृक्ष लागवड करताना मात्र, शक्यतो देशी वाण लावा आणि त्यांच्या देखभालीची, निदान पहिली काही वर्षे तरी व्यवस्था कराच. )

असाच कायम आमच्या पाठीशी उभा राहा आणि आमच्या अनुभवाच्या शिदोरीत भरभरून दान दे अशी हक्काची मागणी करत आहे !!

अमीन

जिथे साम्राज्य असतं ते दूरवर विस्तारलेल्या अजस्त्र पर्वतांचं आणि अभेद्य आभाळस्पर्शी शिखरांचं..
जिथे रौद्रभीषण दृश्य दिसतं ते करवतलेल्या कडेकपा-यांचं आणि खोल तुटलेल्या बेभान द-याखो-यांचं ...
जिथे आवाज असतो तो भणाणणा-या वा-याचा आणि क्वचित कधीतरी माणसांच्या पावलांचा....
जिथे विसर पडतो तो रोजच्या धावपळीच्या आयुष्याचा आणि ब-याचदा आपल्या स्वत:चा.... >>>>>>

जियो, जियो - मस्तच लिहिलंय ........

सगळ्याच सह्यप्रेमींना आपलेच वाटावे असे हृदयस्पर्शी पत्र! आवडले!!

साम्राज्य जेथे कडे कातळांचे, सडे पावसांचे, जिथे साचती
जिथे स्वैर वारे, उन्हाळे, हिवाळे, उरी प्रेरणा प्रत्यही निर्मिती
जिथे रौद्र भीषण कड्यांतून वाटा, कशा कोरल्या, कौतुके दाटती
उभ्या कातळी भींती, पाथरवटांनी, कशा मांडल्या कोट-बुरूजांमध्ये
पाऊसकाळी जिथे पूर लोटे, उड्या टाकती धबधबे चहुकडे
जाऊन जेथे स्वत्वास विसरू, न विसरू किती रम्य वाटे तिथे
पठारी कुठे पुष्पशय्याच भासे, असे विखुरले तृणफुली ताटवे
सूर्योदयाला कशी रंगभूषा, कसा अस्त सूर्यास लाभे तिथे
कुठे तप्त माध्यान्ही, कुंडात पाणी, करी तृप्त पांथस्थ, अन्‌ कौतुके

गेला कधी ना, इथे जो कुणीही, कसे त्यास व्हावे खुले सुख हे