हार्ट ऑफ डार्कनेसच्या स्मृती

Submitted by अमेय२८०८०७ on 22 February, 2013 - 12:41

माणसाच्या स्मृतीला विस्मरणाचे वरदान आहे. सेकंदागणिक पुढे सरकणाऱ्या आयुष्याच्या हजारो लाखो आठवणी कालांतराने नाहीशा व्हाव्यात ही निसर्गाने केलेली सोय उत्तमच आहे नाहीतर मेंदूमध्ये आठवणींचा कल्लोळ माजून विस्फोट होण्याची पाळी यायची. पण काही कडू-गोड चिजा अखेरपर्यंत स्मरणात राहतात. विशेषतः त्यांच्याशी पहिलेपणाची गाठ जुळली असेल तर. गेल्या एक-दोन दिवसांपासून 'हार्ट ऑफ डार्कनेस' या पुस्तकाची आठवण अशीच मनात रुंजी घालत आहे. काही जुन्या सिनेमांविषयी वाचत होतो आणि 'Apocalypse Now' या चित्रपटाचा उल्लेख वाचनात आला. पाण्यात ठेवलेल्या दगडांवरून अलगद उड्या मारत पलीकडे पोचावे तसे मन या चित्रपटाच्या नावाचा हात धरून 'हार्ट ऑफ डार्कनेस' पर्यंत पोचले. फ्रान्सिस फोर्ड कोपोलाच्या ('गॉड्फादर' चा दिग्दर्शक ) सिनेमाचा काही भाग या पुस्तकावरून बेतलेला आहे. माझ्यासाठी हे पुस्तक वाचनप्रवासातला लक्षात राहील असा खुणेचा थांबा ठरलेले आहे.
कडक मराठी माध्यमातून दहावीपर्यंत शिकलो. मराठी वाचन लहानपणापासूनच सुरु झाले पण इंग्रजी वाचनाचा मुहूर्त लागायला बारावी उलटावी लागली. तशी फुटकळ पुस्तके वाचली होती पण मराठी वाचनाची जी सहजगती फार आधीपासून पकडली तसे इंग्रजीच्या बाबतीत होत नव्हते. शिवाय बरीचशी उत्कृष्ट मानली गेलेली पुस्तके भाषांतरीत झाली होतीच त्यामुळे इंग्रजीची निकड भासत नव्हती.
बारावीची परीक्षा झाल्यावर कुठूनतरी पी.जी. वुडहाउसचे एक पुस्तक मिळाले. तीन चार दिवस नेट लावून वाचल्यावर त्यातली गंमत कळायला लागली आणि मग एकदम चित्र बदलले. इंजिनियरिंग सुरु झाले आणि इंग्रजी वाचनही. एका मित्राच्या आईला वाचनाची बऱ्यापैकी आवड होती. त्यांनी 'जेफ्री आर्चर', सिडने शेल्डन' सुचवले. सुरुवातच असल्याने त्या कादंबऱ्यांची वाचनसहजता भावली. मग अशाच चाकोरीतून वाचन सुरु राहिले. कुठेतरी याच्या पुढची पायरी गाठायला हवी अशी नैसर्गिक भूक निर्माण होत होती खरी पण गंभीर प्रकृतीची, क्लासिक मानली गेलेली पुस्तके वाचण्याचा धीर होत नव्हता. मराठी वाचनात 'फिक्शन-कादंबऱ्यांची' कास सोडून मी समीक्षा, वैचारिक, कविता धडपडत का होईना वाचू लागलो होतो पण अजून इंग्रजीसाठी बहुधा पहिलीतच होतो.
दुसऱ्या वर्षाची परीक्षा झाली. दोन महिन्याची मोठी सुट्टी होती. एकदा एका स्नेह्यांच्या घरी जाणे झाले. भारतीय वायुसेनेतून १९६५ च्या युद्धात जायबंदी होवून ते निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यानी भारताच्या परराष्ट्र खात्यात आणखी १५ वर्षे नोकरी केली होती. नोकरीनिमित्त युरोप-अमेरिकेत त्यांचे बरेच राहणे झाले होते. त्यांच्याकडे मराठी व इंग्रजी पुस्तकांचा दांडगा संग्रह होता. अतिशय बहुश्रुत व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्याकडे जाऊन मी वाचनाला दिशा मिळते का पहावे असे आईने सुचवल्यामुळे मी त्यांना भेटायला गेलो होतो.
माझ्या इंग्रजी वाचनाबद्दल त्यानी प्रश्न विचारायला सुरुवात केली. मी ओळखीची काही नावे पुटपुटली. ते स्वतःशीच हसल्यासारखे दिसले, पण कुचेष्टेने वगैरे नव्हे! ते म्हणाले ' अरे हे जे काही तू वाचतोयस ना, ती फक्त सुरुवात आहे. एका मोठ्या महासागरात वरवर डुबक्या मारण्यासारखे. अजून खूप उत्तमोत्तम लिखाण तुला वाचण्यासारखे आहे. काही हरकत नाही, अजून तुझ्याकडे बराच वेळ आहे ह्या सगळ्याची ओळख करून घ्यायला.आपण करू काहीतरी.' जवळच्याच कपाटातून त्यानी एक छोटेसे पुस्तक बाहेर काढले. ही घे तुझ्या वाचनाच्या नव्या टप्प्यावर माझ्यातर्फे एक भेट. माझ्या अत्यंत आवडत्या लेखकाचे सुंदर पुस्तक आहे हे.
मी पुस्तकाकडे पहिले. 'जोसेफ कॉनराड' नावाच्या लेखकाचे 'हार्ट ऑफ डार्कनेस' नावाचे पुस्तक होते. उत्तम बांधणीचे ते पुस्तक जुने होते पण सुस्थितीत होते. मला जणू त्या स्नेह्यांचेच व्यक्तित्त्व पुस्तकरूपात दिसत होते. संयत, आबदार आणि शालीन!
त्यानी मला लेखकाबद्दल माहिती सांगितली. पुस्तकाचा आशय थोडक्यात सांगितला. पुढे म्हणाले, 'पुस्तक वाचताना कधीही एकदम वाचायला सुरुवात करू नकोस. मुखपृष्ठ पहा, प्रस्तावना वाच, मलपृष्ठावर सहसा एखाद्या समीक्षकाची अथवा टीकाकाराची काही टिप्पणी असते, ती वाच. प्रत्येक पुस्तकाला- निदान चांगल्या पुस्तकाला - स्वतःचे असे वेगळे व्यक्तित्त्व असते. त्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी या गोष्टी उपयोगी ठरतात. लिखाण हा तर मूळ गाभा आहेच. हे पुस्तक पहिल्यांदा क्लिष्ट वाटेल, दुर्बोध वाटेल पण चिकाटीने वाच. हळूहळू वाच. काय लिहिलेय ते समजून घे. जुने असल्याने काही शब्द कळले नाहीत तर तसेच पुढे जाऊ नकोस. अर्थ माहीत करून घे. या सुट्टीत हे एकच पुस्तक वाचून झाले तरी चालेल असे बघ'.
आणि खरोखरच ते पुस्तक वाचताना मला माझ्या नवखेपणाची भरभरून जाणीव झाली. अवघ्या १०८ पानाच्या पुस्तकाने मला घोळवून दमवले. 'मारलो' नावाच्या ब्रिटीश खलाशाच्या आफ्रिकेतील एका नदीप्रवासाची कथा म्हणजे हे पुस्तक. आफ्रिका खंडातील नैसर्गिक समृद्धीचा शोध लागल्यावर वसाहतवादी युरोपिअन राष्ट्रांनी पद्धतशीर लूट करायला सुरुवात केली. स्थानिक लोकांना मागास आणि कःपदार्थ मानणाऱ्या गोऱ्यांच्या झुंडी अशा अनेक संपन्न देशांना शोषून स्वतःच्या देशाच्या संपत्तीत भर टाकू लागल्या. संहाराचे - विच्छेदाचे एक न थांबणारे सत्र चालू झाले. अशाच परिस्थितीत हस्तिदंताच्या व्यापारात असलेल्या बेल्जियन कंपनीत 'मारलो' काम करीत असतो. दर्यावर्दी असलेल्या या माणसाला आफ्रिकेची कामगिरी योगायोगानेच मिळते आणि आफ्रिकेच्या अंतस्थ भागातील एका ठाण्यापर्यंत 'कृत्झ' नावाच्या माणसाला शोधण्यासाठी केलेल्या नौका प्रवासातील रोमांचकारी, विषण्ण करणारे, हेलावून टाकणारे अनुभव म्हणजे ही कथा. या कथेतून 'कृत्झ'चे उमजून आलेले व्यक्तिमत्त्व आणि त्या अनुषंगाने नायकाला अतिसाम्राज्यवादाच्या दुष्परिणामांचा, वरवर सुसंकृत वाटणाऱ्या त्याच्या देशबांधवांच्या मतलबीपणाचा होणारा उलगडा हा या कथेचा परिपाक आहे.
कथेपेक्षाही पुस्तकाचे सौंदर्य आहे ते मांडणीत, भाषेमध्ये. एक एक वाक्य म्हणजे जणू एका निष्णात सर्जनने घातलेला टाका. शब्दांचा पीळ अंगावर येणारा.कथानक फुलवण्यात कसलाही दिखावूपणा अथवा शब्दबंबाळपणा नाही. ख्याल-गायकीसारखे लिखाण. खरोखरच एका गूढ, घनघोर अंधारातून मार्ग काढत निघालेल्या जहाजासारखा वाचनप्रवास हे पुस्तक वाचताना होतो. अनेक वाक्ये गपकन थांबवतात, हात धरून बसवतात, विचारास उद्युक्त करतात. डार्कनेस कुठला, आणि त्याच्या मुळापर्यंत जाणारा जीवनप्रवाह कसला याच्याविषयी विचार-आवर्तने सुरू होतात. कॉनराडचे शब्द लाह्यांसारखे तडतड उडून फुटत नाहीत, त्याच्या भाषेत पूर्ण विकसित होण्याचा ध्यास घेतलेल्या फुलाच्या पाकळ्यांचा टिकाऊपणा आहे.
वीसेक दिवसांच्या दंग्यानंतर जेव्हा पुस्तक खाली ठेवले तेव्हा मी मॅरॅथॉन धावून आल्यासारखा दमलो होतो. आपल्याच घरातील आतापावेतो दुर्लक्षिलेल्या खोलीचे दार अचानक उघडावे आणि आत अमोल खजिना दिसून डोळे विस्फारावे तशी अवस्था झाली होती. या पुस्तकाच्या निमित्ताने लेखनप्रयोजन, शब्द्नियन्त्रण, घटनासातत्य, लिखाणाचा पोत याविषयीचा विचार सुरु झाला. अर्थात हे सगळं त्या वीस दिवसात कळलं असं अजिबात नाही. हे आणि इतर अशी अनेक पुस्तके वाचण्याच्या आनंदातून कालानुक्रमे मिळालेली ही अनुभूती आहे. पण त्याची सुरुवात निश्चीतच ''हार्ट ऑफ डार्कनेस' पासून झाली हे निर्विवाद. कॉनराडची लेखणी त्या अनुषंगाने माझ्यासाठी दीपस्तंभ ठरली. नावात आणि आशयात अंधःकार असणाऱ्या एका पुस्तकाने माझ्या वाचनाच्या आणि ज्ञानाच्या पायवाटेवर मात्र झगझगीत प्रकाश टाकला.
ज्ञानसंपादन, कलासाधना याकरता 'गुरु' शिवाय पुढची पायरी गाठता येत नाही म्हणतात. माझ्यासाठीही वाचनाचा आनंद घेण्याच्या प्रक्रियेत ते वयोवृद्ध स्नेही गुरु प्रमाणे योग्य वेळी मदतकारी ठरले. आजही पुस्तके चाळताना ''हार्ट ऑफ डार्कनेस' अनामिक शांतपणे काचेपाठी बसलेले दिसते आणि आयुष्य उजळून टाकणाऱ्या अनुभव यात्रेवर जाण्यास प्रोत्साहित करणाऱ्या त्या (आता दिवंगत झालेल्या) बुजुर्ग व्यक्तीचा सौम्य, तेजःपुंज चेहरा माझ्याकडे पाहून हसतो आहे असा भास मला नेहेमी होत असतो.

a1_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेयः

सुरेख लेख. पुस्तकाबद्दलच कुतुहल पण चाळवल गेलय. आताच चेक केल...आमच्या लायब्ररीत आहे तेव्हा नक्की वाचेन. लिहीत रहा.

पुस्तक परिचय छान जमलाय. सुटसुटीत पण पुस्तक वाचायला उद्युक्त करणारा!

मला इंग्रजी पुस्तके वाचायला फारसे जमत नाही! मधुन-मधुन वाचते पण समरस होऊन वाचता येत नाही.
आता परत एकदा इंग्रजी वाचनाला सुरुवात करणार आहे.

'पुस्तक वाचताना कधीही एकदम वाचायला सुरुवात करू नकोस. मुखपृष्ठ पहा, प्रस्तावना वाच, मलपृष्ठावर सहसा एखाद्या समीक्षकाची अथवा टीकाकाराची काही टिप्पणी असते, ती वाच. प्रत्येक पुस्तकाला- निदान चांगल्या पुस्तकाला - स्वतःचे असे वेगळे व्यक्तित्त्व असते. त्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी या गोष्टी उपयोगी ठरतात. >>>>>>> अगदी अगदी!

परिचय छान लिहिलाय.
मला इंग्रजी पुस्तके वाचायला फारसे जमत नाही! मधुन-मधुन वाचते पण समरस होऊन वाचता येत नाही.) +१

फार सुंदर लिहिलेय अमेय.अनेक वाक्ये मनात रेंगाळणारी.वाचनावर मनापासून प्रेम करणारे कवीमन जाणवले. हे पुस्तक मीही वाचले नाहीय्.आता मिळवून वाचेन.