मनमोकळं: प्रवेशिका क्र. १: किंकर

Submitted by संयोजक on 21 February, 2013 - 01:03

विषय क्रमांक १ - माझी आवडती चित्रपटातील व्यक्तिरेखा –‘हिंदुराव धोंडे पाटील’ अर्थात निळू फुले

Mabhadi LogoPNG.png
खरंच आपल्याला नक्की काय भावते? माणसातली भूमिका की भूमिकेतला माणूस? अवघडच आहे ना उत्तर! पण प्रामाणिक मत द्यायचे तर ते तरी मोकळ्या मनानी देणे जरुरीचे ठरतं, नाही का? व्यक्तिरेखा आणि व्यक्ती यातील रेखा आखून घेत जो अलीकडे आणि पलीकडे तितक्याच समर्थपणे वावरू शकतो तो कलाकार हाच खरा अभिनेता ठरतो. असे असले तरीही कलाकाराची समर्थ अभिनेता म्हणून खरी ओळख पटते ती त्याने साकारलेल्या ताकदीच्या भूमिकेमुळेच.

असेच सुरेख अंतर राखत मातब्बर अभिनेते निळू फुले यांनी साकारलेला 'हिंदुराव धोंडे पाटील' हा ग्रामीण भागातील राजकीय कार्यकर्ता कधी विसरता येत नाही. संपूर्ण संवादावर आधारलेली हि भूमिका, केवळ मुद्राभिनय आणि आवाजातील चढउतार या दोन गुणांवर समर्थपणे तोलून धरत काही वेळा चक्क नायकाच्या भूमिकेसदेखील आव्हान उभी करते. मला तर वाटते की खलनायकाला नायकाच्या उंचीवर नेउन ठेवण्यात या चित्रपटाचा मोठा सहभाग आहे. शहरी आणि ग्रामीण जीवनाचे समाजकारण, अर्थकारण, राजकारण याचे प्रतिबिंब म्हणजे डॉ. जब्बार पटेल यांची ही अजरामर कलाकृती.

आहे रे आणि नाही रे यांच्यातील हा वाद. सत्य आणि असत्य याच्यातील संघर्ष. नायकाच्या भूमिकेतील एक गावात बाहेरून आलेला 'कोणीतरी' व त्याच्या समोर संपूर्ण गावावर सत्ता गाजवणारा एक 'सत्ताधीश' यांच्यातील मतभिन्नता. आपली अनिर्बंध सत्तेची भूक भागवण्यासाठी केलेल्या समाजाच्या पिळवणूकीला निःसंकोचपणे 'समाजसेवा' म्हणवणार्‍या राजकारणी नेत्याची कथा म्हणजे 'सामना'.

पक्षीय राजकारणातील सत्ता गट, त्यांच्यातील रस्सीखेच, परस्परास दिले जाणारे शह-काटशह यांच्या आंदोलनात हिंदुराव धोडे पाटील यांची मानसिक घुसमट इतकी नितांत सुंदर आणि प्रभावीपणे सादर केली आहे की खरोखरच तो ‘सामना’ डॉ. निळू फुले व डॉ. श्रीराम लागू या दोन अभिनय सम्राटांना ओलांडून कथेतील ‘हिंदुराव धोंडे पाटील’ आणि ‘मास्तर’ या पडद्यावरील कथानायकांच्या जीवनातील संघर्ष ठरतो.

चित्रपटाच्या प्रारंभी ‘हिंदुराव धोंडे पाटील’ यांची दिनचर्या जरी पूजाअर्चा करीत सुरु होत असली, तरी त्यात भक्तीभावापेक्षा अहंभाव जास्त आहे याची चुणूक ते अगदी सहजतेने देतात. बेवारसपणे रस्त्यात दारू पिऊन पडलेल्या 'अज्ञात' इसमास स्वतःचे घरात आश्रय देताना त्यात निःस्वार्थ मदत नसून असलेली स्वार्थपरायणता ते देहबोलीतून अगदी सहजतेने व्यक्त करतात.

‘सहकार ते स्वःकार’ हा स्वातंत्र्यप्राप्ती नंतरचा प्रवास टिपताना डॉ.जब्बार पटेल यांना दिसलेले ग्रामीण जीवन हिंदुराव धोंडे पाटील यांच्या व्यक्तिरेखेतून त्यांनी इतके अचूक उभे केले आहे की प्रेक्षकांना प्रत्येक गावातील हिंदुराव धोंडे पाटील नावाचे 'धेंड' त्यात दिसू लागते.

भारतीय समाज व्यवस्थेत इच्छा असो वा नसो, भ्रष्टाचार कसा ‘शिष्टाचार’ होऊ पाहत आहे याचे ज्वलंत सादरीकरण म्हणजे 'हिंदुराव धोंडे पाटील'. ते आपल्या भ्रष्टाचाराच्या दुष्कृत्यांचे समर्थन 'समाजहितासाठी' असे त्वेषाने करत राहिले. मग जे कोणी त्यातील सत्यासत्यतेविषयी प्रश्न विचारू लागले त्यांचे 'मारुती कांबळे' झाले. आणि त्यामुळेच आज आपल्या समाजव्यवस्थेमध्ये “मारुती कांबळेचे काय झाले ?” हा प्रश्न अनेक मास्तरांची अनेक उपोषणे होऊनदेखील अनुत्तरीतच राहिला.

आजही न सुटलेले अनेक प्रश्न आणि त्यावरील उपायांवर विचार मंथन करावयास अंतर्मुख करणार्‍या श्रेष्ठ कलाकृतीने त्या दोन्हीतील 'सामना' मात्र एकतर्फी होऊ दिला नाही हेच 'हिंदुराव धोंडे पाटील' याचे यश होय.

- किंकर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रचंड ताकदीच्या अभिनेत्याला जबरदस्त भूमिका मिळाली की ती व्यक्तिरेखा अजरामर तर होतेच पण तिचा प्रभाव संपूर्ण माध्यमावर पडून एक स्टिरिओटाईप/स्टॉक कॅरेक्टरही जन्माला येते. सामनानंतर 'खेड्यातला सत्ताधीश' निळूभाऊंपेक्षा वेगळ्याप्रकारे कोणी केलेला आढळत नाही.

सुरेख आणि नेमकं लिहीलेय... Happy

<<सामनानंतर 'खेड्यातला सत्ताधीश' निळूभाऊंपेक्षा वेगळ्याप्रकारे कोणी केलेला आढळत नाही.>> प्रचंड सहमत !

अगदी नेमकं लिहीलय.... 'हिंदुराव' हा मराठी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड आहे असेच म्हणावे लागेल.

मस्त लिहीलंय..
<<सामनानंतर 'खेड्यातला सत्ताधीश' निळूभाऊंपेक्षा वेगळ्याप्रकारे कोणी केलेला आढळत नाही.>> >>+१