निमाची मिना

Submitted by ऋयाम on 21 February, 2013 - 00:22

संदर्भ : निमाचा निमो @मायबोली दिवाळी अंक २०१२

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -

मिना माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. ती माझ्या सगळ्यात जवळ रहाते.

माझ्या वाढदिवसाला बाबांनी निमोला घरी आणलं तेव्हा कधी एकदा मी मिनाकडे जाते, आणि निमोला भेटवायला तिला आमच्या घरी घेऊन येते असं मला होऊन गेलं होतं. पण मिना नेमकी तेव्हाच तिच्या मावशीकडे गेलेली असल्यामुळे दोन दिवस आम्हाला भेटताच येणार नव्हतं. आमची आज्जीसुद्धा तेव्हाच थोडे दिवस आमच्या काकांकडे रहायला गेलेली असल्यामुळे तिलासुद्धा निमोला भेटवता आलं नाही. मला खरं तर फार वाईट वाटत होतं, पण मी बाबांना सांगितलं नाही. तरीही त्यांना कसं समजलं, कोणास ठाऊक! मी आपली, आपली आपली एकटीच आतल्या खोलीमधे बसले होते, तेव्हा ते माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला समजावलं. "अगंऽऽ, तू जर का अशीच गप्पगप्प राहिलीस तर निमो-त्यांनाही वाईट वाटेल की नाही?" त्यामुळे मी निमो-त्यांच्याशी खेळत मिना-आज्जीची वाट बघत बसले, म्हणजे माझी मैत्रीण मिना आणि आमची उषा आज्जी.

आमच्या उषा आज्जीलासुद्धा मासे खूप आवडतात. पण ती माशांना मासे नाही, 'मासोळ्या' म्हणते! आज्जीला निमोबद्दल सांगायला फोन केला, तेव्हा ती म्हणाली, "अगंऽ, आमच्या लहानपणी, आमच्या घराजवळच्या तलावात अश्शा एकेक सुंदर सुंदर मासोळ्या होत्या! आम्ही कित्ती वेळ त्यांचे पोहण्याचे खेळ पाहत बसायचो!" आज्जीच्या गावी जाऊन तिथल्या मासोळ्या बघायची मला खूप इच्छा आहे. आज्जीच्या लहानपणीच्या मैत्रीण मासोळ्यासुद्धा आता आज्जी मासोळ्या झाल्या असतील नाही? पण मला हे तिलाच विचारावं लागणार. कारण बाबांना काहीही विचारलं तरी ते मला हसतातच. त्या मासोळ्या कुठल्या रंगाच्या होत्या, त्यांना तुम्ही कायकाय खायला घालायचात? त्यांची नावं काय? मला अजुनही बर्‍याऽच गोष्टी उषा आज्जीला विचारायच्या आहेत. "आज्जी तू कधी गं येणार?"

* * * * *

"निऽमाऽऽ!" अशी हाक ऐकू आली, तेव्हा मी बरोब्बर ओळखलं, की मिनाच असणार. हाकेपाठोपाठ लगेचच आमच्या दारावर तीन वेळा टकटक-टकटक-टकटक पण ऐकू आलं. म्हणजे मिनाच असणार! तो आमचा कोडवर्ड आहे. इतर कोणालाही तो माहिती नाही. बेलपर्यंत हात पोचायला लागला की आम्ही आमचा दुसरा कोडवर्ड बनवणार आहे. पण ते जाऊदे! मिनाचा आवाज ऐकताच मी झटकन उठले आणि धावत जाऊन दार उघडलं. पण
बाहेरचं ते लोखंडी दार मला उघडता येत नाही त्यामुळे बाबांना हाक मारावीच लागते. मी तिथूनच "बाबाऽऽऽ, ओऽ बाबाऽऽऽ" म्हणून हाका मारू लागले. मिनाही माझ्यासोबतच अजूनच मोठ्ठ्यांदा "काकाऽऽ, ओऽ काकाऽऽऽ" म्हणून हाका मारायला लागली. मिनाचा आवाज प्रचंडच मोठा आहे. म्हणजे तिच्या आईपेक्षाही मोठ्ठा!

"आलोऽ किती ओरडाऽल??? " म्हणत बाबा बाहेर आले. त्यांनी माझ्या डोक्यावर टपली मारली आणि दार उघडून देऊन परत आत निघून गेले. जाता जाता मिनाला "काय मिनाक्काऽऽ कधी आलाऽत?" असं म्हणाले. "मी मावशीकडे जाऊन आले! काल रात्रीच..." असं मिनानं सांगितल्यावर "होऽ काऽ?" असं म्हणून हसून बाबा आत निघाले. बाबा तेव्हा दाढी करत होते वाटतं, त्या पांढर्‍या पांढर्‍या दाढीमधे ते अगदी सँटाक्लॉजसारखे दिसत होते! आम्ही दोघींनाही त्यांच्या दाढीकडे बघून खूप हसू येत होतं.

तेवढ्यात अचानक मला निमो आठवला आणि मी मिनाचा हात पकडून तिला थेट निमोकडे घेऊन गेले. निमोला पाहताच मिना खूप खूष झाली! अजून सकाळचे आठपण वाजले नव्हते, त्यामुळे माझीच काय, निमो त्यांची न्ह्या.. नह्या... न्या.. न्याहरीसुद्धा झालीच नव्हती. मी निमोला मिनाकडून न्या-ह-री द्यायचं ठरवलं. मी फोनवर तिला सांगितलंच होतं त्यामुळेच बहुतेक ती येताना निमोसाठी पावाचा एक छोटासा तुकडा घेऊन आली होती. मी सांगितल्यावर तिने पावाचे अगदी छोटेछोटे तुकडे केले (त्या बिच्चार्‍या काळ्यापांढर्‍यांसाठी!), आणि निमो त्यांना खायला घातले. मी सांगितल्यावर तिनं आमच्या फिशटँकवर टकटक सुद्धा केलं, की लग्गेच निमोससकट सगळेच धुम पळत वर आले! बहुतेक त्यांच्या पोटातसुद्धा भुकेमुळे कावळे ओरडत होते! तो काळापांढरा मासा तेवढा अजून वर येत नव्हता. मिना म्हणाली, की त्याला कदाचित भूक लागली नसेल.

पण मिनाला निमो आणि त्याचे सारेच सवंगडी फार आवडले! मग मी तिला ते खडामीठ आणि बर्फाचे खडे, तो उलटा पोहणारा गमत्या मासा वगैरे वगैरे सगळं सगळं सांगितलं, आणि तिला खूपच मज्जा वाटायला लागली. अंधार झाला की मासे थोडेसे शांत होतात तेही मला तिला दाखवायचं होतं. तिलाही ते सगळं बघायचं होतं म्हणून मग मी तिला आजच्या दिवस आमच्या घरी रहायलाच बोलावलं. ती लगेच त्यांच्या घरी गेली. मीही ओरडून बाबांना सांगितलं. तेवढ्यात मिना परत आली. "रात्रीचं जेवण आमची आईच देते म्हणालीये ... " असं मिनानं सांगितल्यावर मला खूप खूप आनंद झाला. कारण मिनाच्या आईच्या हातचं जेवण मला खूप आवडतं! थोड्या वेळात आंघोळ करून मग रहायला येते असं सांगून मिना तिच्या तिच्या घरी निघून गेली. मिना आणि निमोबरोबर कायकाय मज्जा करायची ह्याचा विचार करत मी दात घासायला निघाले. मी अशी आपणहून दात घासायला आले, की माझ्या बाबांना खूप हसू येत असतं. ते दाखवत नाहीत, पण हसू येत असतं... बाबांचा हसरा चेहेरा आठवून मला आधीच हसू यायला लागलं. हसत हसतच मी बाथरूमकडे निघाले...

* * * * *

दुपारी परत मिना कुठे निघून गेली होती काय माहित? मी तीनचारदा त्यांच्या दारावर टकटक-टकटक-टकटक केलं, पण कोणीच दार उघडलं नाही. दुपारभर तिची वाट बघून मला खूप कंटाळा आला. दुपार झाली, संध्याकाळ झाली, तरी मिनाचा पत्ताच नाही?! थोडं उशीराच, आमच्याच दारावर टकटक-टकटक-टकटक ऐकू आलं, तेव्हा मी बरोब्बर ओळखलं, मिनाच असणार! मी झटक्यात दार उघडलं. बाहेर पहाते, तर तिचं पांघरूण आणि टूथब्रश घेऊन मिनाच आली होती. मिना तिचा तो छानसा फुलाफुलांचा नाईटड्रेस घालून आली होती. आता मिना आणि मी रात्रभर खेळणार!

मिना आली, ती थेट 'निमोकडेच जाऊया' म्हटली. मी खरं तर तिच्यावर चिडणार होते, पण तेवढ्यात तीच म्हटली, "अगंऽ, मी वाढदिवसाला गेले होते, तिथे उशीर झाला! पण हा बघ मी तुझ्यासाठी आणि निमोसाठी लपवून केक आणलाय! मीसुद्धा खाल्ला नाहीये! चल लवकर, दोघी मिळून खाऊया!"

मी आणि मिनानं मग तो केक अर्धा अर्धा केला. मी माझा माझा अर्धा भाग पटाक करून खाऊनसुद्धा टाकला. तेवढ्यात मिनाने अचानक मज्जाच केली! तिने केकमधून पाचसहा छोटेछोटे तुकडे काढले आणि निमो-त्यांना खायला दिले. केकचे तुकडे पाहून निमो झरझर पोहत वर आला. त्याने आधी केकचा नीऽट वास घेतला. 'ठपठप ठपठप ठपठप' असा पाण्याचा आवाज केला. बहुतेक त्याला केक फारच आवडला होता, त्याने फटाफट दोनतीन तुकडे खाऊनसुद्धा टाकले! आमचा तो वेडू अजूनही खालीच होता. त्याला पाहून मात्र आम्हा दोघींनाही फार वाईट वाटू लागलं. सगळं निमोनंच खाल्लं, तर हा काय खाणार? पण तेवढ्यात एक गंमत झाली! निमो पोहत पोहत त्या वेडूकडे गेला आणि मगाशी 'ठपठप ठपठप ठपठप' करत झडप घालून घेतलेले तुकडे तोडून त्याचे लहान लहान तुकडे केले. तो वेडू लगेच निमोजवळ गेला आणि त्याने त्यातला एक तुकडा खाऊन टाकला. मला आणि मिनालाही खूप छान वाटलं. बहुतेक तो वेडू गमत्या मासा निमोचा जवळचा मासा मित्र होता ...

चित्र : साभार, मायबोली.कॉम दिवाळी अंक

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे हे.. Happy दिवाळी अंकातले पण वाचले . कसे काय राहून गेले की वाचायचे तेव्हा..

ऋयाम, मस्त गोष्ट..... लेकीला खूप आवडली. ( हे काका इतका का वेळ लावतात दुसरी गोष्ट सांगायला ? असा प्रश्न विचारायला सांगीतला आहे तिने Happy )

मस्तच! आवडली. लेकींना वाचुन दाखवते!!

तुझ्या पंख्याची प्रतिक्रिया. 'खुपच छान आहे ही पण गोष्ट! थोडी फनी पण होती!' 'पण निमाची आई मला स्टोरीमध्ये नाही दिसली!!!! मला तिची आई स्टोरीमध्ये पाहिजे आहे. It's not fair!!!'

गोष्ट आवडली.
>>"निऽमाऽऽ!" अशी हाक ऐकू आली, तेव्हा मी बरोब्बर ओळखलं, की मिनाच असणार. हाकेपाठोपाठ लगेचच आमच्या दारावर तीन वेळा टकटक-टकटक-टकटक पण ऐकू आलं. म्हणजे मिनाच असणार!>> शेल्डन आठवला.