ओळख खिलाडूवृत्तीची

Submitted by अमेय२८०८०७ on 19 February, 2013 - 13:18

टी.व्ही. या रोगाची लागण आयुष्यात लवकर झाली. काकाने १९८४ साली पहिला टी.व्ही. घरात आणला. 'क्राऊन'च्या त्या छोटेखानी मॉडेलने थोडक्या काळातच घरा-दाराचा कब्जा घेतला. मोठ्यांना सिनेमे-मालिका (आतासारख्या संथ चालणार्‍या नव्हेत!) यांची पर्वणी होती. छायागीत, चित्रहारच्या टायमिंगनुसार कामे होऊ लागली. मी लहान असल्याने मालिका वगैरेतले फारसे कळत नसे, फक्त 'फिर मिलेंगे ...हम लोग' म्हणणारा अशोक कुमार आणि त्यातली नन्हे, बडकी, लल्लु अशा आडवळणी नावाची पात्रे थोडी लक्षात आहेत.
मला आवडायचे ते खेळ पहायला. आमच्या घरात आजीपासून (सध्या वय 'गोईंग ऑन एटी' ओन्ली) सर्वांना क्रिकेटची बाधा होती, अगदी आजार म्हणावी अशी. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडमधील (आपल्या वेळेनुसार) पहाटेच्या रामपारी सुरू होणार्‍या असोत किंवा इंग्लंडमधील दुपारी सुरू होणार्‍या, सगळ्या मॅच पाहण्यासाठी घरदार उठलेले अथवा जागलेले असायचे.
क्रिकेट काय आम्ही खेळत सुद्धा होतो त्यामुळे अतिपरिचय होता, बॅटिंग करताना, बॉलिंग करताना कसे वाटते त्याचा बेसिक का असेना अनुभव होता. पण एक खेळ मात्र भयानक 'ग्लॅमरस' आणि वीजिगिषु वाटे, तो म्हणजे टेनिस. टेनिसचे कोर्ट (मैदान), रॅकेट काहीच साध्य होणारे नसल्याने टेनिस आदर्श रुपात खेळायची सोयच नव्हती त्यामुळे या खेळाबद्दल गूढ आकर्षण होते. त्यातही आम्ही बॅडमिंटनच्या रॅकेटी आणि प्लॅस्टिकचे बॉल वापरून इम्प्रोवायझेशन करीत असूच, फिफ्टीन- लव्ह ओरडताना मजा यायची--पण ही खरी पद्धत नव्हे, देशी तोडगा आहे याचीही जाणिव होती. यावर एकच उतारा होता तो म्हणजे सटी-सामाशी दिसणार्‍या मॅचेस मन लावून पहाणे. आजच्यासारखी खेळाची स्पेशल चॅनेल्स नसल्याने मायबाप दूरदर्शन दाखवील त्या स्पर्धा पदरात पाडून घ्याव्या लागत.
ऑस्ट्रेलियन, फ्रेंच, विंबल्डन आणि अमेरिकन या टेनिसमधल्या चार महत्त्वाच्या वार्षिक स्पर्धा. या स्पर्धांचे मला वाटते क्वार्टर फायनलपासूनचे सामने लाईव्ह दाखवले जायचे. त्यातून विंबल्डनचा थाट और असायचा. पांढरे धोप कपडे घातलेले खेळाडू, हिरवळीचे मैदान आणि पांढरेच पण स्टायलीश स्कर्ट्स घातलेल्या महिल्या खेळाडू बघताना साता समुद्रापार असूनही प्रत्यक्ष सामना बघत असल्याचा फील यायचा. सुंदर गौरांगना पाहून कानाच्या पाळ्याही उगीचच लाल व्हायच्या पण खास दाद जायची ती खेळालाच. या टेनिसमुळेच पहिला आयडॉल गवसला तो म्हणजे बोरीस बेकर नावाचा जर्मन खेळाडू.
१९८५ च्या विम्बल्डन स्पर्धेत बेकरने थयथयाट घातला. आधुनिक युगाची नांदी म्हणावी असा वेगवान खेळ, सर्व्ह अ‍ॅन्ड व्हॉलीचा धडाकेबाज नमुना आणि कमालीच्या उच्च दर्जाची शारीरिक तंदुरुस्ती त्यानेच या खेळात आणली. कधी सूर मारणारा, कधी लोळण घेऊन प्रतिस्पर्ध्याचा शॉट परतवणारा बेकर टेनिस जगतात १९८५ मधील एकाच विजयाने लगेच उच्च स्थानाला पोहोचला. दुसर्‍या महायुद्धानंतर जर्मनांशी एरवी वाकुडभाव ठेऊन वागणार्‍या परंपराप्रिय इंग्रजांनीसुद्धा त्याला आपलेसे केले. आयुष्यातील सगळ्यात चांगले टेनिस वर्षानुवर्षे विम्बल्डनच्या हिरवळीवर खेळल्याने आज तर तो इंग्रजांना आपलाच वाटतो पण त्याच्या सुरुवातीच्या काळात लाभलेले प्रेमही विशेष होते. चांगला घरगुती इंग्लिश खेळाडू नसल्याने इंग्रजांनी बहुधा त्याला आपलेसे केले असावे. पुढे हाच मान स्टेफी ग्राफने मिळवला.
बेकरची धुंदी १९९७-९८ मध्ये तो निवृत्त होईपर्यंत टिकून होती. या काळात त्याचे जय-पराजय जणू आपलेच आहेत अशी त्याची मोहिनी मनावर घट्ट बसली होती. त्याच्याबद्दल विविध मासिके मिळवून वाचणे, पोस्टर्स जमा करणे याचे आगळे सुख मिळत असे. त्याला हरवणारे खेळाडू आमचे जानी दुश्मन होते. अगासी- सांप्रास एरवी आवडायचे पण केवळ बेकरला नेमाने हरवतात म्हणून ते काळ्या यादीत होते. १९९५ साली एका अत्यंत चुरशीच्या सामन्यात काहीशा उताराला लागलेल्या बेकरने विम्बल्डनवर भरातील अगासीला जेव्हा धूळ चारली तेव्हा मी आणि माझा भाऊ रात्रभर जल्लोष करत होतो.
पण ह्या थोड्या पुढच्या गोष्टी! बेकरची खरी हमरी-तुमर्री (अर्थात मैदानात) रंगली ती एडबर्गशी. १९८८ ते १९९० सलग तीन वर्षे विम्बल्डनच्या अंतिम स्पर्धेत दोघांची गाठ पडली. तीनही सामने वेगवेगळ्या कारणांनी अतिशय रोचक झाले. दोन वेळा एडबर्ग जिंकला (१९८८ व १९९०) पण १९९० चा सामना इतका समतोल चालला होता की कोणीही जिंकू शकले असते. शिवाय एडबर्गचे व्यक्तिमत्त्व इतके शांत संयत होते की त्याच्या जिंकण्याचा राग येत नसे. मैदानाबाहेर एकमेकांविषयी अत्यंत आदराने बोलणार्‍या या दोघांच्या मुलाखती आणि प्रत्यक्ष निकराच्या लढती पाहून स्पोर्ट्समन स्पिरिट म्हणजे काय याचे जणू एक बाळकडूच मिळाले जे पुढच्या आयुष्यातही काहीसे उपयोगी पडले. एका क्षणानंतर मानसिक क्षमता शारीरिक क्षमतेपेक्षा कशी उपयोगाची ठरते, प्रतिस्पर्ध्याचे कच्चे दुवे हेरून आपला खेळ कसा उंचावला पाहिजे, फोकस अणि प्रयत्न असतील तर टॅलेंटपेक्षाही परिश्रम करणारास कसे यश मिळू शकते याचे टेनिस आणि तसे इतर सगळेच खेळ चांगले मार्गदर्शक ठरले. अर्थात सगळ्याचे काही वैयक्तिक आयुष्यात डायरेक्ट अ‍ॅप्लिकेशन झाले असे नाही, ते कधीच होत नसते पण काही वैचारिक बैठक आणण्यात या खेळांचा हातभार नक्की लागलेला आहे.
फुटबॉलचे वेडही असे टी.व्ही. पाहूनच लागले. १९८६ चा विश्वचषक दैवी होता. मॅराडोना नावाच्या परीस स्पर्शाने साधारण वाटणारी अर्जेन्टिनाची टीम जर्मनी, इंग्लंड, ब्राझीलला भारी पडली. फुटबॉल फीवर काय असतो याचा पहिला अंदाज त्या ८६ च्या स्पर्धेमुळे आला. फुटबॉल हे जीवनभराचे प्रेम आहे. मी कधीमधी फुटबॉल बघतो हे सांगणारी माणसे खोटारडी आहेत असे माझे वैयक्तिक मत आहे. तुम्ही एकतर फुटबॉलविषयी झोपता उठता बसता विचार करता, अथवा अजिबात करत नाही. फुटबॉलच्या गप्प सुरू झाल्यावर कडक इस्त्रीवाले तोंड असलेल्या माणसांचाही धुंडिराज झालेला मी अनुभवलेला आहे आणि अनेक गुप्त दरवाजे सहजरित्या उघडलेले पाहिले आहेत.
पुढे नोकरीच्या निमित्ताने अनेक देशांतील माणसांशी भेटी झाल्या. खेळाची आवड हा बर्‍याच वेळा संभाषण सुरू करण्याचा, मैत्रीची सुरूवात करण्याचा दुवा ठरला. मी नोकरीला सुरूवात केली तेव्हा भारताची उद्योगविषयक उदार प्रतिमा नुकती उजळायला सुरुवात झाली होती. अनेक परदेशी लोकांना भारताविषयी प्रचंड अज्ञान होते. क्रिकेट्व्यतिरिक्त जागतिक स्तराचे खेळाडू अभावानेच असल्याने भारतात खेळांविषयी कमालीची अनास्था असेल असे त्यांना काहीसे वाटे. अगदी अलीकडेही एका युरोपिअन बंधूने माझ्या घरी जगातील सर्व महत्त्वाची स्पोर्ट्स चॅनेल आहेत आणि फुटबॉल, टेनिस, फॉर्म्युला वन अशा अनेक खेळांना मी आवडीने फॉलो करतो हे ऐकून अचंबा व्यक्त केलेला आहे. त्याच्या घरी ह्यातली एक तृतीयांश सुद्धा दिसत नाहीत.
खेळाचा महिमा अगाध आहे. स्वतः खेळणे तेही जागतिक स्तरावर हेतर दैवदुर्लभ यश पण अशा दैवी खेळाडूंचा खेळ प्रत्यक्षात - अप्रत्यक्ष पहायला मिळणे, त्यातून आनंद मिळवणे हे भाग्यही सगळ्यांच्या वाट्याला नसते. परदेशात चांगल्या आर्थिक स्थितिमुळे म्हणा किंवा कशामुळे खेळ हा जन-मानसाच्या भाव-विश्वाचा अविभाज्य भाग बनलेले आहेत. आपल्याकडेही खेळ आवडीने पाहणारे आता अनेक जण आहेत पण सहकार्‍यांशी चर्चा करताना जाणवते की अज्ञाने परमं सुखम म्हणणारे काही वजा केले तरी बहुतांश बाकींच्या वाट्याला हे सुख बालपणापासूनच आले आहे असे नाही. कुटुंबाच्या स्थितिमुळे अथवा एकंदरीत जगण्याच्या लढाईमुळे बर्‍याच जणांच्या आयुष्यात हा आनंद उशीराने आला अथवा आलेलाच नाही. अशा स्थितीत सर्वसाधारण परिस्थिती असतानाही घरात काळाच्या बरोबरीने सुविधा घेऊन येण्यासाठी धडपडणार्‍या आणि आम्हा पोरांना जागतिक खेळांचा आनंद आणि समज घेऊ देण्यार्‍या घरातील मोठ्या माणसांचे प्रयत्न आणि प्रोत्साहन आज अधिकच भावतात. खेळांबरोबर ओघाने येणार्‍या खिलाडूवृतीमुळे खूप काही शिकायला मिळाले आहे- मिळते आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेच्या हे कसे काय वाचायचे राहिले ??

हे पण मस्त लिहिले आहे.
टेनिसमधील बेकर, एडबर्ग, अगासी हे सगळे दिग्गज बघतानाचा काळ आठवला....

मस्त लेख. बियॉन बोर्गशिवाय विंबल्डनचा उल्लेख होऊच शकत नाही. केवळ जिंकणे हेच ध्येय असलेला मेकॅन्रो आणि धीरगंभीर, अथांग समुदासारखा शांत असा बोर्ग यांच्यातले युद्ध टेनिसप्रेमी कधीच विसरू शकणार नाहीत. पहिल्यांदा लागोपाठ पाच वेळा विम्बल्डन जिंकण्याची कामगिरी करणारा बोर्ग आजही रसिकांच्या हृदयात सर्वोच्च स्थानी आहे. खिलाडूवृत्तीचं दर्शन त्याच्या प्रत्येक हालचालीतून आणि देहबोलीतून व्यक्त होत असे. खिलाडूवृत्तीची चालतीबोलती शाळा असं त्याचं वर्णन केलं तरी चालेल. त्याच्यानंतर इव्हान लेंडल आणि स्टिव्हन एडबर्ग आणि अर्थातच आणखीही काही खेळाडूंचं नाव घ्यावं लागेल. केवळ खेळासाठी म्हणून सेकंड इनिंगसाठी मैदानात उतरलेल्या जिमी कॉनर्स आणि मार्टिना नवरातिलोवाचंही नाव त्यासाठी घ्यावं लागेल.

काही खेळाडू जिंकण्यासाठी लक्षात राहतात तर काही रसिकांना जिंकून घेतात.