रोमानियन कविता आणि मी....

Submitted by उज्ज्वला अन्नछत्रे on 19 February, 2013 - 08:40

रोमानियन कविता आणि मी....

रोमानियाला राहायला गेले, आणि तिथल्या गलात्स या छोट्या शहरात मला ती भेटली ! नव्या देशात राहायला गेलं म्हणजे पहिल्यांदा तिथली भाषा निदान जरुरी पुरती शिकणं आलंच !
आणि केवळ या कारणासाठीच तिची माझी भेट होणं अपरिहार्य होतं ! ती रोमानियन भाषेचे धडे देण्यासाठी माझ्या घरी आली. सुंदर बांधा, सुरेख लालसर गोरा रंग आणि एखाद्या लहानशा.. उत्सुक मुलीचे असावेत असे विलक्षण बोलके डोळे ! मी क्षणभर पहातच राहिले. बोलण्या वागण्यातली अदब आणि आत्मविश्वास मला आवडून गेला. हातात हात घेत आम्ही एकमेकींची ओळख करून घेतली.
‘मी तमारा.’ ‘मी उज्ज्वला.’
‘तुझ्या नवर्यालाही मीच रोमानियन भाषा शिकवली.’ ती म्हणाली आणि हसली.
फारतर १८-२० वर्षाचं वय असणारी तमारा शिक्षिकेच काम करते, म्हणजे लहानपणापासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत असावी, मी मनात म्हटलं. अरुण आधीच रोमानियात राहायला आला असल्याने त्याचं रोमानियन शिकून झालं होतं ..अर्थात जरुरीपुरतं. कारण ऑफिस च्या कामासाठी दुभाषिकांची सोय असते.
मी चैतन्याची ओळख करून देत म्हटलं, “ही ११ वीत आहे. बुखारेस्ट च्या आंतरराष्ट्रीय शाळेत.” ती म्हणाली ,”तर मग चैतन्या, तुला तिथे रोमानियन विद्यार्थी-विद्यार्थिनी देखील भेटतील.आणि रोमानियन भाषा शिकण्याचा लगेच उपयोग करता येईल.”
तिने गप्पांच्या ओघात मला एका ६-७ वर्षांच्या मुलाचा फोटो दाखवत म्हटलं, “हा माझा मुलगा, डेव्हिड.”
मी आश्चर्याने चकितच झाले ! मग मात्र मी तिच्या शिक्षणाबद्दल चवकशी केली.फ्रेंच आणि इंग्रजी भाषेत post graduation झालेली तमारा प्रबंधाचा विषय कोणता घ्यायचा याचा विचार करत होती.

फ्रेंच आणि spanish भाषेचा प्रभाव असलेली रोमानियन भाषा शिकताना तमाराची आणि माझी छान मैत्रीच होऊन गेली !
जुजबी भाषा शिकून मी आणि चैतन्या बुखारेस्टला राहायला गेलो. त्यानंतर काही महिन्यांनी हळू हळू या नव्या देशाबद्दल माहिती करून घेण्याची उत्सुकता आणि त्यानंतर रोमानियन साहित्याचा विशेषतः कवितांचा अभ्यास करावा असा विचार मनात आला आणि मार्गदर्शक म्हणून तमाराची मदत घेता येईल असे लक्षात आले, कारण भाषा शिकताना सहजच तिच्या बोलण्यात कवितेमध्ये या आशयाचा वेगळा शब्द वापरला जातो असा जाता जाता उल्लेख असे.

तिच्यापाशी कवितांचा विषय काढला मात्र ! ती खुशच होऊन गेली अगदी ! संवेदनशील तमारालाही कवितांचं खूप प्रेम .मग आम्ही ठरवलं, कि काही ४-५ रोमानियन कवींच्या थोड्या थोड्या कविता आम्ही अभ्यासायच्या आणि त्यातून मला जो कवी जास्त भावेल , त्याच्या कविता नंतर अभ्यासायच्या.
यानंतर एक एक कविता घेऊन त्याचे इंग्रजीत ती विवेचन करी आणि रोमानियन शब्दांचा, वाक्प्रचारांचा त्या संदर्भात अर्थ. नव्या देशाची कविता शिकताना त्या देशातील चालीरीती, कधी सण – उत्सव ,रूढी परंपरा, समजुती आणि अशा अनेक पदारांबद्दल चर्चा चालू झाली आणि खर्या अर्थाने मी रोमानियाला समजून घेऊ लागले !

मिहाई एमिनेस्कु , जाॅर्ज बकोविया , निकिता स्तनेस्कू आदी कवींच्या कविता वाचताना निकिताची कविता वाचली semn -1 (खुण -1) नावाची .आणि त्याच्याच आणखी कविता वाचताना मनानी ग्वाही दिली. यापुढे जास्त करून निकिता स्तनेस्कू चा अभ्यास करायचा म्हणून !
हा अभ्यास आता चालू झालाय ,त्याच्या काही कविता आणि इतरही काही कवींच्या कविता तुमच्या भेटीला घेऊन येतेय !

या कवितांबरोबरच तमाराच्या आणि माझ्या नात्याचा प्रवास रोमानियन भाषेची विद्यार्थिनी- शिक्षिका पासून मैत्रिणी आणि नंतर जीवश्च कंठश्च मैत्रिणी इथपर्यंत झाला .

अधून मधून तिलाही तुमच्या भेटीला घेऊन येईन हे नक्की !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> निकिता स्तनेस्कू

याच्या या छोटेखानी (भाषांतरित) कवितेच्या प्रेमात पडले होते :

Tell me, if I caught you one day
and kissed the sole of your foot,
wouldn't you limp a little then,
afraid to crush my kiss?...

वाट बघते कवितांची. Happy

होय. इथे रोमानियातही ती कविता फार प्रसिद्ध आहे आणि ती वाचनात आल्यापासून रस्त्यावर तरुण मुला- मुलींना पाहताना कुणी हलकेच लंगडतं आहे का ते पहावंसं वाटतं !:-) Happy

>> रस्त्यावर तरुण मुला- मुलींना पाहताना कुणी हलकेच लंगडतं आहे का ते पहावंसं वाटतं
Happy

सुंदर कविता आणि लेख. एका कविला आणि कवितेला मूळ भाषेत समजून आस्वाद घेणे हा आनंददायी अनुभव असतो.