''हिशेब''

Submitted by अव्या खलिफा on 19 February, 2013 - 03:22

Untitled-3.jpg

नाक्यावरची पांढरपेशी वर्दळ
आणि रोखलेल्या धटिंग नजरा,
अशातच बारक्या रडव्या पोराला सांभाळत सांभाळत भाजीचे वाटे सारखे करत असायची ती.

गुलमोहोराच्या झाडाला टेकून पथारी मांडून, म्युन्सिपालीटीच्या डोमकावळ्यानपासून बचाव करत ती आणि तीचा नवरा गेली ५-६ महिने भाजीचा व्यवसाय करीत होती. दोघांकडे पाहून संसाराला सुरुवात होऊन २-४ च वर्ष झाली असावीत असं एकंदरीत वाटत होत.
एरव्ही गि-हाइकाशी त्रासिक चेहर्याने भाजीचा भाव करायची पण तिच्या त्या वळवळनार्या अवघ्या ८-९ महिन्याच्या गोळ्याकडे विलक्षण समाधानाने पहायची, आणि पाहता पाहता हरखून जायची.कदाचित त्याच्या आणि आपल्या भावी आयुष्याची गणित जुळवत असावी.मोठं मुल दीड दोन वर्षाचं, नवरा पण फक्त कुंकवाला आधार होता नाही तर त्याचं कर्तव्य भाजीचा ठेला उचलून दुसर्या दिवशी सकाळी लावून देण्या शिवाय काहीच नव्हतं, इतर वेळी कधीतरी हा प्राणी बिल्डींग ची तुंबलेली गटारं उपसत असताना नाही तर कुठे तरी पिवून पडलेला असलेलाच दिसायचा.
हिच्याकडे हाताच्या बोटावर चटकन हिशेब करण्याच्या हुशारी शिवाय विलक्षण सौंदर्य होतं आणि त्याच गोष्टीचा तिला वेळोवेळी त्रास होत होता. रस्त्यावरून येणार्या-जाणार्याची सहज नजर तिच्याकडे जायची.आतासं कुठे तिने ह्या नजरांना भिक न घालायची कला शिकून घेतली होती.

इलाखा हाय-फाय होता, सुशिक्षित आणि पांढरपेश्यांचा.ती रोज त्या धांदलीमध्ये तफावत बघत राहायची.समोरच्याच आयस्क्रीम पार्लर च्या डस्टबिन मध्ये मोठ्या लोकांनी अर्धवट खाल्लेले आईस्क्रीम टाकताना ती बघायची, एक मारवाडी काका तिच्या ठेल्या समोर रस्त्यांवरच्या कुत्र्यांपुढे बिस्किटाचे पुडेच्या पुडे रिकामी करायचा आणि तीचं ते दीड दोन वर्षाचं मुल त्या बिस्कीटांकडे आसुसलेल्या नजरेने पाहत राहायचं, मोठ्या लोकांच्या बायका शॉपिंग, एक्स्ट्रा एक्टीवीव्हीटीज च्या नावाखाली ट्रेंड कपडे घालून फिरताना बघून तीला किंव येत असावी बहुदा, कारण ह्यांना स्वतःची मुलं सांभाळता येत नाहीत, दोन नि चार महिन्याच्या मुलांना घरी काम वाल्या बाईकडे किंवा बेबी सीटर ठेवून एक्स्ट्रा एक्टीवीव्हीटीज च्या नावाखाली चकटफु करतात.

त्यादिवशी तिच्या ठेल्या समोर गर्दी पाहिली अंदाज घेत पुढे गेलो.....तसा थक्क झालो.
तिथल्याच एका प्रख्यात व्हाईट कॉलर माणसाने तिच्या गरिबीचं आणि सौंदर्याचं गणित करून हिशेब मांडण्याचा प्रयत्न केलेला असावा आणि तो हिशेब किती चुकीचा आहे हे पायताणाने दाखवत होती बहुदा.

सेट विज्जत मधी राह्यचं, हिथं कोत्मिरी सारखा चीरीन तुला हुबा, असं म्हणून बाजूला त्याच्या त्या कृत्याचा किळस तिने मानेला हिसडा देत थुंकून दिला, खोचलेला पदर उपसत उपसत ती बाजूच्या दगडावर बसून ढसा ढसा रडू लागली

आणि त्या सेट चे विस्कटलेले केस, शर्टाची तुटलेली बटणं बघून त्याला बहुतेक मी येण्या आधीच प्रसाद मिळाला होता असं जाणवलं.

'ये लश्मे जाऊदे कि तुला काय याड लागलंय काय' .....ए चला कि , गप पनी निगा कि, तमाशा लावलाय काय?? वगैरे बरळत त्या बघ्यांच्या गर्दीत केव्हापासून हा बायकोचा रुद्रअवतार बघत असलेला तिचा नवरा बाहेर आला. एक तिखट पण लाजिरवाणी नजर त्याकडे फेकली गेली तसं त्याने शरमेने तोंड फिरवत भाज्यांचा विस्कटलेला पसारा आवरायला सुरुवात केली.

दुसर्या दिवशी ठेल्यावर काल काही घडलेच नाही जणू अशा अविर्भावात ती रोजच्या प्रमाणे चहा चा कप तोंडाला लावत आणि बारक्याच्या हातात टोमेटो देवून त्याला खेळवत होती.

अवि.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users