(तस्वीर तरही) तुझ्यावर प्रेम माझे आणखी जडले!

Submitted by राजीव मासरूळकर on 19 February, 2013 - 03:10

पहिला प्रयत्न कृत्रिमतेत आणि तंत्रशरणतेत फसला , म्हणून हा दुसरा प्रयत्न.

तुझ्यावर प्रेम माझे आणखी जडले!

तळ्याकाठी किती पाणी , तरी झडले...
जसे हे झाड, माझेही तसे घडले !

मनाचा पोहरा विहिरीतटी ठेवुन
सभोती रान हिरवे हंबरुन रडले !

तुझ्या हातून माझा हात सुटला अन्
तुझ्यावर प्रेम माझे आणखी जडले !

परीक्षा पास झाले फार शाळेच्या
खऱ्‍या प्रश्नांस उत्तर द्यावया अडले !

मनूजा, गर्भ अंधारी सदा वाढे
प्रकाशा काय दुःखाचे तुझ्या पडले ...?

- राजीव मासरूळकर
दि १९.०२.२०१३
दुपारी १.१५ वाजता

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तळ्याकाठी किती पाणी , तरी झडले...
जसे हे झाड, माझेही तसे घडले !

तुझ्या हातून माझा हात सुटला अन्
तुझ्यावर प्रेम माझे आणखी जडले !<<<

छान शेर आहेत.

(परत एक अटेंप्ट करण्याच्या दिलखुलास वृत्तीसाठी वेगळे अभिनंदन)

मनःपुर्वक आभार , डॉ साहेब.

'हो' भरीचा आहे खरोखर.

शेवटच्या शेरात 'प्रकाशा' हा शब्द प्रकाशाला अशाप्रकारे लक्षात घेतला तरच थोडाफार अर्थ कळणार. पुन्हा एकदा घोळ !

दुरूस्तीसाठी पुन्हा एकदा विचार करतो.

परत एक अटेंप्ट करण्याच्या दिलखुलास वृत्तीसाठी वेगळे अभिनंदन>>>> माझ्यातर्फेही
पहिले ३ खूप मस्तय्त
शाळेचा नाही आवडला
शेवटचा खयाल अतीशय उत्तम वाटला
हिरवे रान हंबरुन रडले >>मस्त कल्पकता

तुझ्या हातून माझा हात सुटला अन्
तुझ्यावर प्रेम माझे आणखी जडले !<<< माझ्यासठी हासिले गझल शेर या गझलेतला

शाळेबद्दलचा शेर आधी

शिकावे खूप... जग सारे... जरी वाटे
मला शाळेत जाणे फार हो नडले

असा होता.
तो आता पूर्णतः बदलून स्त्रीलिंगी केला आहे.