काही स्फुट शेर

Submitted by सतीश देवपूरकर on 19 February, 2013 - 01:27

काही स्फुट शेर
तुला पाहता नसानसांच्या नभात माझ्या तांबरते!
जणू माझिया रक्तामधुनी वीज रेशमी थरारते!!

कळीकळी उमलून अचानक अंग अंग हे मोहरते;
असे वाटते तुझी कस्तुरी माझ्यातच मग दरवळते!
.........................................................................
हव्याहव्याशा खुणा स्वरांच्या मंद वाहत्या वा-यावर....
पानपान थरथरे मनाचे, गोड शिरशिरी गात्रांवर!
.........................................................................
अजूनही प्राणांत माझिया स्पर्श तुझा तो झुळझुळतो;
अजूनही त्या आठवणींचा प्रपात हृदयी कोसळतो!
.........................................................................
असाच केव्हा तरी किनारी जातो मग मी भटकाया.....
जिथे सांडले तू-मी मोती, आज सर्व ते वेचाया!
.........................................................................
-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या आजोबांच्या बोलण्यात तांबरणे हा शब्द ऐकला आहे. म्हणजे.. "अग तो खिळा तांबरून गेला आहे.., हाताला लागेल".. याचा अर्थ मी तांबरणे म्हणजे गंजणे असा घेतला होता. नविन काही अर्थही आहे बहुधा या शब्दाचा!

नसानसांच्या नभात खिळे ठोकले जात असावेत. तांबरणे म्हणजे पहाटणे, उजाडणे अश्या अर्थी घेतले असल्यास माहीत नाही. पण तो मतला नसावा कारण तांबरते आणि थरारते यात अलामत भंगत आहे. नसानसांचे नभ ही संकल्पना अजून पचनी पडलेली नाही. त्यामुळे तूर्त इतकेच.

प्राजुताई!
प्रथम तुमचे व सुप्रियाताईंचे दोघी गझलकारांचे अभिनंदन! परवाचा नवीपेठेतील मुशायरा आम्ही दोघांनी (मी व सौ.) जोडीने अटेंड केला! छान होत्या आपल्या दोघींच्या रचना! आधी वाचलेल्या होत्याच! पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला!
आता या आमच्या स्फुट शेरांविषयी.....
खरे तर ही एक 'तुला पाहता.....'शीर्षकाची' आमच्या रानफुलेतील एक जुनी रचना आहे!
गझलकार जेव्हा कविता लिहितो, तेव्हा त्याच्या कवितांच्या/गीतांच्या ओळीवरही गझलीयतेची कशी छाप येते हे यावरून कळावे!
गझल म्हणून ही रचना लिहिलेली नाही! ही एक अगझल कविता आहे! पण आज सकाळी जेव्हा ही रचना आम्ही वाचू लागलो तेव्हा आम्हाला जाणवले की, अरे, या रचनेतील प्रत्येक द्विपदी म्हणजे तर एक शेरच झालेला दिसत आहे! प्रत्येक द्विपदी हीच एक स्वतंत्र कविता झाली आहे!
म्हणून आम्ही या द्विपद्या सुटे वा स्फुट शेर
म्हणून इथे पोस्ट केले!

आता पहिला शेर असा आहे......
तुला पाहता नसानसांच्या नभात माझ्या तांबरते!
जणू माझिया रक्तामधुनी वीज रेशमी थरारते!!

प्राजुताई आपण म्हणता ते बरोबर आहे.....
तांबरणे म्हणजे गंजणे.... लोखंड गंजते! लोखंडासंबंधी तांबरणे शब्द आला तरच गंजणे अर्थ बरोबर आहे!
मूळ शब्द आहे संस्कृत ताम्र! म्हणजे
तांबे!
पण तांबरणेचे दुसरे अर्थ आहेत......
आरक्त होणे, तांबुसणे, लाल होणे इत्यादी!

संधिकाली आकाशात जो लालिमा/रक्तिमा/लाली पसरते त्याला उद्देशून तांबरणे हा शब्द वापरतात!
तिन्हीसांजेला सूर्य बुडताना व सकाळी सूर्य उगवताना दोन्ही वेळेस आकाश तांबरते!

यावरून आमचाच एक जुना शेर आठवला.....

हा संधीप्रकाश आहे, पण, प्रहर कोणता आहे?
हा माझा उदय म्हणू की, मी मावळतो केव्हाचा!

वरील आमच्या स्फुट शेरात आम्ही प्रेयसीला/परमेश्वराला उद्देशून म्हणतो की,
(हे प्रिये/हे देवा) तुला पाहिल्यावर जणू माझ्या नसांरूपी आकाशात तांबरते, म्हणजे तुझाच लालिमा/लाली/आरक्तता माझ्या नसांच्या आकाशात पसरते जणू काही माझ्या रक्तामधून एखादी रेशमी वीजच थरारते!
इथे नसानसांना आकाशाची उपमा दिली आहे कारण आकाश अनंत असते तशा आपल्या नसाही अगणित असतात! नसांमधून रक्ताभिसरण चालते ज्यात एक चैतन्य असते! रक्ताचा रंगही लाल असतो! आमच्या प्रियेला/देवाला पाहिल्यावर आम्हाला काय प्रत्यय येतो/आला त्याचे इथे प्रतिकांतून काव्यात्मक वर्णन केले आहे! जणू काही माझ्या नसांमधल्या रक्तातून एक रेशमी वीज थरारते! इथे प्रेमाची भावना असल्यामुळे रेशमी वीज म्हटले आहे! वीज अचानक चमकताना जसे आपण क्षणभर थरारतो....आपली काया कंपीत होते, रोमांचीत होते, तसे तुझ्या(प्रियेच्या/देवाच्या) दर्शनाने माझी काया, माझ्या नसानसा थरारून जातात, कंपीत होतात, रोमांचित होतात, पुलकित होतात! प्रियेचे/देवाचे अचानक दिसणे म्हणजे एका रेशमी विजेचे नसानसातून चकाकणे/थरारणेच आहे असे आम्ही म्हणतो!
हे थरारणे हवेहवेसे रेशिमस्पर्शी आहे! प्रियेचा लालिमा जणू आमच्या नसानसांत क्षणार्धात उतरतो, चमकून जातो, पुलकित करून जातो, थरारून जातो!
टीप: इथे प्रियेच्या अकस्मात होणा-या दर्शनाच्या प्रत्ययाचे काव्यात्मक वर्णन प्रतिकांमार्फत करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे!
............प्रा.सतीश देवपूरकर

भूषणराव! वर प्राजूताईंना लिहिलेला प्रतिसाद पहावा.... आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळावीत!

सर्व शेर आवडले
शब्दकळा विशेष आवडली कल्पकता भावली प्रत्येकाचा फ्लो मस्त आहे असाच प्रयत्न गझलेतही पहायला मिळाला तर मला तुमच्या गझला आता आवडतात त्यापेक्षा जरा जास्त आवडायला मलाच मदत होईल असे वाटते

तुमचा प्रतिसादही फार छान आलय सर

प्राजुला तुम्ही प्राजुताई अशी लडिवाळ ....बापाच्या मायेने हाक मारताय ते पाहूनही भरून् आले

धन्यवाद या स्फूट शेरांसाठी फार छान आहेत हे सगळे

Happy
आता छान वाटतंय ...................

बाकी आज भरदुपारी कसे मायबोलीवर सुट्टी वगैरे आहे काय की घेतलीत की लंच टाईम असतो या वेळी !!....

>>प्राजुताई!
प्रथम तुमचे व सुप्रियाताईंचे दोघी गझलकारांचे अभिनंदन! परवाचा नवीपेठेतील मुशायरा आम्ही दोघांनी (मी व सौ.) जोडीने अटेंड केला! छान होत्या आपल्या दोघींच्या रचना! आधी वाचलेल्या होत्याच! पुन:प्रत्ययाचा आनंद मिळाला!<<

ओ, गझला छान होत्या म्हणा ना. आंतरजालावर गझलेला आलेला प्रतिसाद `रचना' छान आहे असा आला तर काहीतरी गडबड आहे असे समजावे असा एक अलिखित नियम आहे. असो थांबतो (आधीच माझ्या प्रतिसादानंतर युध्द, कवचकुंडल काय काय ऐकावे लागते. )

असो तुमच्या प्रेमकाव्याच्या द्विपदी छान आहेत. गझलेचा शेर अजुन थोडा वेगळा असतो/ असावा असे माझे वै.म.

वैभू,
बाकी आज भरदुपारी कसे मायबोलीवर सुट्टी वगैरे आहे काय की घेतलीत की लंच टाईम असतो या वेळी !!....<<<<<<<<<<<,

आज शिवजयंतीची सरकारी सुट्टी होती महाविद्यालयाला!
टीप: आमच्या मनात आले की, आमचा लंच टाईम होतो!
लंचला घरी पलायन करतो कारण देवपूरकर मामी आमचे शिवाय जेवत नाहीत! तसा शिरस्ता आहे आमचा, जो गेले ३६ वर्षे आम्ही पाळत आलो आहोत!(अभ्यासदौ-यांचे दिवस सोडून). तुझे माझे जमेना, तुझ्या वाचून करमेना.....असे आहे आम्हा म्हातारा-म्हातारीचे! आता बहुतेक वेळा आम्ही दोघेच किंग-क्वीन घरात असतो! पोरे आपापल्या व्यापात व्यग्र असतात, आणि आम्ही आमच्या!

गिरिजाताई!
हे वृत्त कोणते आहे ? चालीत म्हणायला मस्त आहे !!<<<<<<<
वृत्त गोडच आहे, डौलदार आहे, पण नाव आम्हास माहीत नाही.....कदाचित जाणकार नाव सांगतील!

गझलेची वृत्ते व विद्यार्थी-विद्यार्थिनींची नावे आमच्या स्मरणातच राहत नाहीत!
हाक मारायला गेलो तर कुणाला कुणाच्याही नावाने हाक मारली जाते, पण डोळ्यांच्या इशा-यावरून पोरे ओळखतात की, आम्ही कुणाला हाक मारत आहोत! तद् अनुसार ते ओ देतात!

गजलुमियां!
गझलेचा शेर अजुन थोडा वेगळा असतो/ असावा<<<<<<<<<<
असे नसते गजलुमियां!
कोणतीही द्विपदी, कोणत्याही आशयाची/विषयाची/मूडची.....जर स्वत:च्या जागी एक स्वयंपूर्ण दर्जेदार कविता असेल, एखाद्या सुभाषितासारखी असेल, जिच्यात भावनांचा पीळ असेल, सस्पेन्स असेल, सुंदर शब्दकळा असेल, नाट्य असेल , विचारांचे, आशयाचे सौंदर्य असेल, अत्यंत सोपी, सहज ,बोलकी, प्रासादिक व थेट अभिव्यक्ती असेल, तिला शेर म्हणता येते कारण तिचा आस्वाद घ्यायला दुस-या कोणत्याही वरच्या खालच्या ओळींची आवश्यकता नसते!
मग ती द्विपदी गझलेची असो वा कवितेची असो वा स्फुट ओळी असोत! त्या द्वपदीला शेरच म्हणतात!
शेरात उत्कटता असते व शेराचा समारोप हा सुखद धक्का देणारा असतो, ज्यामुळे आपोआप शेर संपल्यावर वा,व्वा,वाहवा अशी प्रतिक्रिया श्रोत्यांकडून येते! कामयाब शेरात अंतीम सत्य असते! एकाच वेळी अनेकांना त्यात आपले प्रतिबिंब पहायला मिळते व म्हणूनच एक शेर अनेकांना भावतो! कामयाब शेरास अर्थांचे अनेक पदर असतात! एकदा ऐकला की श्रोत्यांचा तो पाठ होतो, त्यांच्या ओठांवर तो रेंगाळत रहातो. काळजाला हात घालतो, लोकांना विचार करायला लावतो, श्रोत्यांचा तो पिच्छा करतो, त्यांना झपाटून टाकतो!

आता प्रत्येकाचा प्रत्येक शेर या सर्व कसोट्यांवर यशस्वी होतोच असे नाही! कुठे न कुठे तरी काही तरी चिमूटभर राहून जाते, ज्यातच खरे काव्य कदाचित दडलेले असते! एखादा शेर एकाला खूप आवडतो पण दुस-याला तो तितकासा आवडत नाही असेही होवू शकते! शेराची घनता कळायला शायराप्रमाणेच वाचकांनाही एक किमान साहित्यिक पोच असणे आवश्यक असते!
कामयाब शेर लिहायला प्रत्ययातील प्रामाणिकपणा, लेखनगर्भ निष्ठा, सबूरी, थांबायची तयारी, सखोल चिंतन, शब्दांची अचूक जाण, समृद्ध साहित्यिक पोषण, प्रज्ञा, प्रतिभा, कल्पनाविलास इत्यादी गोष्टींची आवश्यकता असते! नुसतेच शब्दांशी खेळल्याने, शब्द चिवडण्याने शेर होत नाही, तो अंतरंगात जन्मास यावा लागतो!

..........प्रा.सतीश देवपूरकर

>>>>कोणतीही द्विपदी, कोणत्याही आशयाची/विषयाची/मूडची.....जर स्वत:च्या जागी एक स्वयंपूर्ण दर्जेदार कविता असेल, एखाद्या सुभाषितासारखी असेल,.....................पासून ............. शब्द चिवडण्याने शेर होत नाही, तो अंतरंगात जन्मास यावा लागतो!...... पर्यंत मी १०१% सहमत आहे तुमच्या बर्‍याचशा प्रतिसादात हे वाचलेलं आहेच. फक्त सांगायच एवढच आहे की हे सगळ वरच्या प्रेमकाव्यात सापडलं नाही

फक्त सांगायच एवढच आहे की हे सगळ वरच्या प्रेमकाव्यात सापडलं नाहीगजलुमियां!
ते न सापडायला हरवले थोडेच आहे?
ते महसूस करायचे असते!
महसूस होत नसेल तर जाऊ द्या, द्या सोडून!
इथे महसूस करायला दुसरे अनेक धागे आहेत बघा वर व खाली!

एकही शेर आवडला नाही. हे शेर प्रकाशित करण्याचे काही कारणच नाही. हे शेर मराठी गझल क्षेत्रात कुठेही नसले तरीही चालू शकेल असे शेर आहेत. पॅलेस्टाईनच्या दंगलीत नागरीक पोलिसांवर लांबून दगड फेकतात त्या ऐवजी हे शेर फेकले तर पोलिस जागच्याजागी ठार होतील. नवल म्हणजे हे कोणीतरी निवडक दहात घेतलेले आहेत. ज्याची त्याची मर्जी म्हणा! प्रतिसादांमध्ये कवी प्राजू व कवी सुप्रिया यांच्या मुशायर्‍याचा उल्लेख का आहे, मध्येच अनाकलनीय, असंबद्ध व भयावह भावमुद्रा का आहेत, निबंध का आहेत, दृष्ट काढण्यास का सुचवले जात आहे आणि अचानक म्हैस व्यायलाचा साक्षात्कार कसा काय झाला आहे हे आमच्या मस्तकावरून गेलेले आहे.

आम्हास वाटते की एकदा एखाद्या मैदानात सर्व गझलकारांना तलवारी घेऊन उभे करावे व शारीरिक बळाच्या जोरावर जो झुंज जिंकेल तो म्हणेल ती गझलेची पूर्व दिशा व्हावी.

कळावे

गं स

पॅलेस्टाईनच्या दंगलीत नागरीक पोलिसांवर लांबून दगड फेकतात त्या ऐवजी हे शेर फेकले तर पोलिस जागच्याजागी ठार होतील.>>>>>>>>> लोल

>>पॅलेस्टाईनच्या दंगलीत नागरीक पोलिसांवर लांबून दगड फेकतात त्या ऐवजी हे शेर फेकले तर पोलिस जागच्याजागी ठार होतील<<
(सहमत - फक्त मी माझ्या द्विपदी या शब्दावर ठाम आहे.)
कवयित्री प्राजु यांचा अर्थ बरोबर असेल तर धनुर्वात होऊन मरतील. सतीशजींचा अर्थ बरोबर असेल तर लाजुन लाजुन मरतील पण मरतील नक्की

गं. स.

पावशेर/सव्वाशेर/छटाक/नौटाक मधले काही नाही ते!

ते शेर/द्विपद्या आहेत!

छानच वकिली करता आपण!

खुज्यांच्या सगळेच मस्तकावरून जाते!

आपला कल्पनाविलास हा कल्पनातीत आहे!

गझलेची उत्तरदिशा समजली की, पूर्व आपोआप कळते!