परत का आलात?

Submitted by सई केसकर on 18 February, 2013 - 10:42

सध्या मी माझं भारतातील "फॉर गुड" आयुष्य जगायला सुरुवात केली आहे. मला "भारतात परत का आलात?" हा प्रश्न हमखास विचारला जातो. याला बरीच वैयक्तिक आणि नॉट-सो-वैयक्तिक करणं आहेत. त्यातील दुस-या श्रेणीतील सगळी महत्वाची आणि पहिल्या श्रेणीतील एकच मी सांगणार आहे Happy

त्या आधी मला इथे आवर्जून असं सांगायचं आहे की हा लेख अमेरिकेत (किंवा परदेशात) राहणाऱ्यांच्या विरोधात अजिबात लिहिलेला नाहीये. कधी, कुणी, का आणि कसं परत यावं, किंवा का येऊ नये हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. भारतात परत येण्याच्या निर्णयात "ऐसा देश हैं मेरा", किंवा "आय लव्ह माय इंडिया" वगैरे गाण्यांचा अजिबात हात नव्हता. आणि माझं परदेशातील वास्तव्य आणि मित्र मंडळ अतिशय आनंदी आणि मजेदार होतं. एकटेपणा किंवा एकटेपणाची भीती हेही माझ्या निर्णयामागचं कारण नाही. मी अजूनही माझ्या ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत झालेल्या काही परदेशी मित्र-मैत्रिणींशी अगदी रोज बोलते. आणि त्यातील काही लोक मला भेटायला भारतात यायचे बेतही करतायत.

पण परदेशात आणि खास करून अमेरिकेत न राहण्याचं एक कारण म्हणजे तिथलं वास्तव्य कायम व्हिसावर अवलंबून असतं. आणि ९/११ नंतर दोन वेळा अमेरिकेच्या व्हिसा प्रक्रियेतून गेल्यावर मला तिसऱ्या वेळी त्यातून जायची अजिबात इच्छा नव्हती. माझी शैक्षणिक शाखा आणि माझा भारतीय पासपोर्ट मला अमेरिकेच्या TAL (Technology Alert List ) मध्ये समाविष्ट करतो. या यादीत आतंकवादी ज्या ज्या तांत्रिक माहितीचा वापर करू शकतो त्या सगळ्या शाखा येतात (केमिकल, बायोमेडिकल, बायोलॉजी इत्यादी). त्यात जर तुम्ही ठराविक देशाचे नागरिक असाल तर सहा ते सात महिनेसुद्धा लागू शकतात. त्यामुळे अमेरिकन व्हिसा मिळवताना नेहमी मला २२१ g, हा फॉर्म देऊन चार ते सहा आठवडे थांबावं लागतं (यात व्हिसा मिळेल याची हमी नसते. काही लोकांना सहा महिन्यानंतर नकार आल्याच्या केसेस आहेत). पहिल्यांदा जेव्हा मी या २२१ च्या चक्रात अडकले होते तेव्हा मी ऑस्ट्रेलियात होते. माझ्या बरोबर व्हिसा साठी आलेल्या माझ्या युरोपियन सहकार्याला एका दिवसात व्हिसा मिळाला. मला तब्बल अडीच महिन्यांनी माझा पासपोर्ट परत मिळाला. तोपर्यंत माझे सगळे सहकारी कॉनफरन्स उरकून परतही आले होते. तेव्हा मला अमेरिकेला जाता येत नाही यापेक्षा मी परदेशात पासपोर्टशिवाय राहते आहे याचाच जास्त राग येत होता. काही दिवसांनी "मला व्हिसा नको पण माझा पासपोर्ट परत द्या" म्हणून त्यांना फोन केला तेव्हा मला अतिशय उद्धटपणे, "तुमचा पासपोर्ट FBI कडे देण्यात आलाय आणि आम्ही काहीही करू शकत नाही" असं सांगण्यात आलं.

या २२१ g मुळे गेल्या काही वर्षांत कित्येक शास्त्रज्ञ ठरवलेल्या कॉनफरंसला वेळेत पोहोचू शकले नाहीत. काही काही लोकांची व्हिसा रिन्यू करताना अडकल्यामुळे परिवारापासून सहा सहा महिने ताटातूट झाली आहे. काही विद्यार्थ्यांचे एक सेमिस्टर वाया गेले आहे. सुट्टीला परत आलेले विद्यार्थी ऐन पी.एच.डी च्या मधेच भारतात अडकून राहिलेले आहेत. काही विषयांच्या कोन्फरंस आता दुस-या देशांमध्ये आयोजित केल्या जातात. कारण मान्यवरांना व्हिसा मिळून वेळेत पोहोचायची हमी देत येत नाही.

कित्येक युरोपियन देशांच्या नागरिकांना विना व्हिसा ३ महिन्यापर्यंत अमेरिकेत राहता येते. यात असे बरेच देश आहेत जिथे त्याच देशातील नागरिकांनी आतंकवादी हल्ले केलेले आहेत (उदा. ब्रिटन, फ्रांस). अशा देशांतील लोक कधीही विमानात बसून कुठल्याही तपासणीशिवाय अमेरिकेत दाखल होऊ शकतात. मध्यंतरी अशा एका ब्रिटीश नागरिकाच्या बुटात स्फोटक पदार्थ सापडले होते (तेव्हापासून एयरपोर्टवर बूट काढायचा नियम निघाला). या नियमांमध्ये तुमचं नाव जर इस्लामिक वाटत असेल तर तुम्हाला जास्त वेळ थांबावे लागते. ब्रिटीश पासपोर्टवर जन्माला आलेले असे किती इस्लामिक नावाचे लोक असतील? फ्रांसमध्ये कित्येक अरबी लोक वर्षानुवर्षं स्थाईक झालेले आहेत. त्यांचा फ्रेंच पासपोर्ट त्यांना विना इंटरव्यू अमेरिकेत येऊ देतो. पण अरबी देशातून आलेल्या अरबी लोकांना कित्येक महिने थांबावे लागते. २२१ मधून जसे तपासणी नंतर माझ्यासारखे लोक सुटतात तसेच कित्येक पाकिस्तानी, अरबी, चीनी लोकही सुटतात. पण ज्यांची काहीच तपासणी होत नाही त्या लोकांमध्ये एखादा आतंकवादी नसेल असे कशावरून?

मला अमेरिकेत पोस्ट डॉक मिळाल्यावर पुन्हा त्या प्रक्रियेतून जावं लागणार याचा विचार करूनच अंगावर काटा आला. दुसऱ्यावेळी देखील चार आठवडे लागले आणि व्हिसा ऑफिसरनी, "You are smart and single. what if you find yourself an American husband? You are just paying the price of being so smart." असा शेरा मारला होता. पोस्ट डॉक चे काही महिने संपल्यावर मी हा व्हिसा रिन्यू करायचा नाही हे पक्कं ठरवलं होतं.

अमेरीकेनी ही प्रक्रिया आमच्यासारख्यांसाठी सुखद करावी असं माझं अजिबात मत नाही. त्यांनी त्याच्या देशात कुणाला थारा द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. आणि अमेरिकन नागरिकांचं संरक्षण करण्याचे सगळे मार्ग त्यांनी वापरले पाहिजेतच. त्यात आमच्यासारख्या लोकांची गैरसोय होणे ही तशी छोटी बाब आहे.अमेरिकेतील वास्तव्यात मला स्वत:बद्दल आणि माझ्या कामाबद्दल खूप काही शिकायला मिळालं आहे. आपण तिथे उगीच गेलो असं मला अजिबात वाटत नाही. पण आपण उगीच परत आलो असंही वाटत नाही.

खरं सांगायचं तर मला परदेशात राहून फेसबुकवर किंवा ट्विटर वर "भारतातील राजकारण, भारतातील अत्याचार, भारतातील भ्रष्टाचारावर मतं व्यक्त करायची हळू हळू लाज वाटू लागली होती. मी अमेरिकेत राहून अमेरिकेच्या राजकारणाचा अभ्यास करायचे पण तिथे मला नेता निवडता यायचा नाही. आणि भारतातील राजकारणाचा उहापोह करून, फेसबुकवर मित्रांशी वाद घालताना त्यांच्यावर लिंका फेकून, खूप सारा दंगा करूनही मला भारतात मतदान करणं जमेलच याचीही खात्री नव्हती. मग आपण नुसतेच पेपर टायगर आहोत असं वाटू लागलं होतं. आणि अशी आयुष्यभर नोकरी करत करत कदाचित आपल्यातली ही टोचणारी सुई बोथट होईल याचीही काळजी वाटू लागली होती.

माझी निर्णय प्रक्रियेचा ढाचा "आधी ठरवा मग विचार करा" हा आहे. माझे सगळे निर्णय नेहमी असे एखाद्या सकाळी, अचानक उद्भवतात. त्यामुळे हा निर्णय झाल्यावर जवळपास आठ महिने माझी नोकरी बाकी होती. त्या काळात मी खूप लोकांशी बोलले. काही तिथे राहणाऱ्या काही परत आलेल्या, काही तिथलं नागरिकत्व मिळवलेल्या, माझे अमेरिकन आणि युरोपियन मित्र मैत्रिणी. काही लोक माझा आदर्श बनले. त्यातलीच एक गायत्री नातू. मला तिचं नाव आवर्जून घ्यावासं वाटतं कारण माझ्यासारखा लेख बिख लिहायच्या भानगडीतही ती कधी पडली नाही. तिचा निर्णय सुरवातीपासूनच पक्का होता. आणि नुकतंच तिचं प्रसाद बोकीलशी लग्न झालं. त्या लग्नाची गोष्ट तर म.टानी देखील उचलून धरली. तिच्या लग्नाचा एक छोटा भाग बनल्याचा मला अभिमान आहे.

परत येताना मला दिल्या गेलेल्या सल्ल्यांमध्ये पुन्हा व्हिसा ऑफिसरचाच मुद्दा निघाला -- लग्नाचा. भारतात जाऊन तुझ्यासारख्या उच्च शिक्षित, जग बघितलेल्या मुलीसाठी नवरा शोधणं अवघड आहे. अर्थात, हा प्रश्न वयक्तिक आहे. आणि खूप दिवस मी त्यावर ठरवून लिहिलेलं नाही. पण परत येऊन तीन महिने झाल्यावर माझे याबद्दलचे विचार अजून ठाम झाले आहेत. एखाद्या देशात जाताना किंवा तिथून परत येताना दोन्हीवेळी हा लग्नाचा प्रश्न का उपस्थित व्हावा? लग्न होणार नाही, हा आयुष्यातल्या एवढ्या मोठ्या निर्णयातील अडसर का व्हावा? आणि नाही झालं तर असा कोणता मोठा गहजब होणार आहे? हे आवर्जून लिहायचं कारण असं की मी खूप वर्षं या "सामाजिक अपेक्षेच्या" ओझ्याखाली राहून माझ्या आयुष्याला वेसण घालण्याचा प्रयत्न केला. आणि माझी खात्री आहे की माझ्यासारख्या इतर मुलीदेखील "आपलं लग्न झालं नाही तर?" या भीतीपोटी त्यांच्या आयुष्यातील काही निर्णय पुढे ढकलत असतील किंवा रद्द करत असतील. अर्थात इथे पुन्हा विरोध लग्न करण्याला नाही. पण न मिळालेल्या जोडीदारासाठी हातात असलेलं उच्च शिक्षण, नोकरी, प्रवास करायची संधी दवडणंदेखील बरोबर वाटत नाही. आणि ही भीती फक्त भारतीय मुलींची नाही हे ही लक्षात आलं. ही सगळ्या देशांतील मुलींना सतावणारी भीती आहे. पण भारतात परत येण्याच्या निर्णयातील सगळ्यात समाधानाची बाजू ही, की अशी भीती, काळजी पोटात असतानाही मी परत येऊ शकले. आणि याचं सगळ्यात मोठं श्रेय माझ्या आई बाबांचे आहे. त्यांनी माझ्या प्रत्येक प्रवासात माझी पूर्ण साथ दिली आहे. आणि या बाबतीतही कुठल्याही प्रकारची चिंता, चिडचिड, दु:ख, असंतोष कधीही व्यक्त केलेला नाही. माझा परत येण्याचा निर्णय पूर्णपणे माझा होता. अर्थात आई बाबांना त्याचा प्रचंड आनंद झाला. पण मी नसल्याची त्यांना खंत होती हे त्यांनी मला कधीही दाखवून दिले नाही.

इतरही खूप छोटी छोटी करणे आहेत. जसं की, रविवारी फुले मंडईत जाणे, हक्काची बेकारी उपभोगणे, रिक्षातून फिरणे, रोज सकाळी अंजीर खाता येणे, माझ्या भाचरांचे लाड करता येणे. पण सगळ्यात महत्वाचं कारण हेच की मला भारतात परत यायचं होतं आणि माझ्या डोक्यात कोण्या एका शनिवार सकाळी लक्ख प्रकाश घेउन आलेला तो विचार कधीच कमजोर झाला नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणुनच मी अजुन पर्यंत
अमेरिकेला गेलो नाही
विमानाचे तिकिट काढले नाही
व्हिसा साठी निवेदन दिले नाही
इतकेच काय मी अजुन
पासपोर्ट देखील काढला नाही.
.
.
Biggrin

सई,
लोलाचं म्हणणं काही प्रमाणात पटलं. अ देशाचे आपल्या देशात येणार्‍या ब देशातल्या नागरिकांसाठी आणि क देशातल्या नागरिकांसाठी वेगळे नियम आणि प्रक्रिया आहेत. ब देशातल्या नागरिकांना जास्त जाचक आहेत आणि तू ब देशाची नागरिक आहेस त्यामुळे तुला ते फेस करावे लागतेय. इटस नॉट फेअर.. हार्डलक! पण लाइफ नेव्हर प्रॉमिस्ड टू बी फेअर हे तुला माहितीच आहे.
सॅम म्हणतात तसं लेखाचा थोडा घोळ झालाय असं मलाही वाटतंय.
लेखामधे विशेष असं मला दिसलं नाही. व्हिसा प्रॉब्लेमच्या काही तांत्रिक गोष्टी समजल्या इतकेच. लेखाचा फोकस नक्की कुठे आहे ते मला कळत नाहीये.
म्हणोनी तू लिहू नयेस असे नाही. तुला लिहावसं वाटलं तू लिहिलंस. हे लिहिण्याबद्दल अपोलोजेटिक असण्याची वा डिफेन्ड करायची गरज नाही. लिहिण्यावर आक्षेप घेणारे अनेक जण भयाण रतिब घालत असतात सतत. तेव्हा ते असूदे Happy

भविष्यातील उपक्रमांसाठी शुभेच्छा.

छान लिहिलंयस सई. स्पष्ट आणि प्रामाणिक. शेवटी काय, आपल्या अनुभवानुसार, प्रकृतीनुसार, विचारसरणीनुसार आणि त्या त्या वेळाच्या परिस्थितीनुसार त्यातल्या त्यात योग्य असे निर्णय घेतले जातात. कदाचित तु स्वतःसुध्दा अजून एक वर्ष अमेरिकेत काढलं असतंस तर निर्णय बदलला असतास, कुणी सांगावं.

शुभेच्छा.

व्हिसा बद्दल एव्हडी बोंब तर मग ऊस्गावच्या tax law बद्दल बोलायलाच नको!

(half million dollars investor visa-green card असतो की .त्या लिंक मधल्या दोघांना एक मिलीयन फंडींग मधून ते सहज शक्य आहे!)

@ नीधप

माझा लेखच सुस्पष्ट नसल्याने मला असा ठाम विरोध करता येत नाहीये पण
१. हा व्हिसाचा प्रकार नुसताच पर्सनल नाहीये. त्यातला जो "अनफ़ेअर" भाग आहे तो वैयक्तिक नाहीये. मला त्याचं चिरंतन दु:ख सुद्धा नाहीये. जो राग होता तो लोकल होता. तो गेला. पण मला असं वाटतं की ही प्रोसेस भारतीय स्कील्ड immigrants साठी खास करून अन्फ़ेअर आहे. खालच्या लिंक वरून ते स्पष्ट झालेलेच आहे. धन्यवाद मृण्मयी.
तशीच ही बातमी बघा
http://articles.economictimes.indiatimes.com/2013-02-18/news/37160522_1_...

२. बाकी काही नसलं तरी २२१ g आणि व्हिसा वर एवढं discussion झालं हे माझ्यासाठी पुरे आहे. तोच हेतू होता. त्यामुळे मी प्रत्येक प्रतिसादाला, तो जरी माझ्या विरोधात असला तरी उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय. माझं लेखन चांगलं नसलं तरी मला काय म्हणायचं त्याबद्दल या उपयुक्त मंचावरचे लोक बोलते झाले तरी खूप आहे. अर्थात मी माझ्या दृष्टीकोनातून याकडे बघते. आणि २२१ g हा एकच अमेरिकन व्हिसाचा प्रोसेस मी अनुभवलाय. त्यामुळे इथल्या प्रतिसादांतून मलाही नवीन गोष्टी कळल्या.

पण मला असं वाटतं की ही प्रोसेस भारतीय स्कील्ड immigrants साठी खास करून अन्फ़ेअर आहे. >>>>>

माझ्या अगदी खूप ओळखीतल्या एकाला "स्कील्ड एमप्लॉयी" या कॅटॅगरीत केवळ ८ महीन्यात ग्री. का. मिळाले. ही आहे ९ वर्षापूर्वीची गोष्ट. पण हे लक्षात घ्या की त्याला त्याच्या कंपनीनी स्पॉन्सर केले होते. केवळ युनिव्हर्सिटीमधील संशोधनाच्या आधारावर हे घडत नाही.
स्कील्ड इमीग्रंट, स्कील्ड आहे आणि त्याच्या स्कीलची आम्हाला गरज आहे असं सांगणारी अ‍ॅथॉरिटी (स्पॉन्सरर) ही लागतेच लागते.

Pages